चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ मे २०२१

Updated On : May 18, 2021 | Category : Current Affairs


लसीकरण मोहिमेचा दुसऱ्या लाटेत फायदा- पंतप्रधान मोदी :
 • करोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. ९० टक्के आरोग्य व्यावसायिकांनी यापूर्वीच पहिली मात्रा घेतली असल्यामुळे लशींनी बहुतांश डॉक्टरांची सुरक्षितता निश्चित केली असल्याचे ते म्हणाले.

 • चाचणी असो, औषधांचा पुरवठा असो की विक्रमी वेळेत नव्या पायाभूत सोयींची उभारणी असो, हे सर्व अतिशय वेगाने होत असल्याचे मोदी यांनी डॉक्टरांच्या एका गटाशी दूरसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. विरोधी पक्ष सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावर टीका करत असताना आणि सरकारने करोना महासाथीची दुसरी लाट वाईट रीतीने हाताळल्याचा त्यांनी आरोप केला असताना मोदी यांनी हे विधान केले आहे.

 • प्राणवायूची निर्मिती आणि पुरवठा यांच्या आव्हानांवर मात करण्यात येत आहे. उपचारात एमबीबीएस  विद्यार्थ्यांना सामावून घेणे, तसेच ग्रामीण भागात आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांची सेवा घेणे यांसारखे मनुष्यबळ वाढवण्याच्या उपायांमुळे आरोग्य यंत्रणेला अतिरिक्त मदत मिळाली असल्याचेही ते म्हणाले.

मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी :
 • मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अ‍ॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे. ६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली. साध्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली, कारण करोनाची साथ अजून चालू आहे.

 • गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.  विश्वसुंदरी स्पर्धेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, मेझा ही २६ वर्षांंची मेक्सिकन तरुणी विश्वसुंदरी ठरली. २०१९ मधील विश्वसुंदरी दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी तुंझी हिने  तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढवला.

 • तू जर तुझ्या देशाची प्रमुख असतीस तर करोनाची साथ कशी हाताळली असतील असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने असे उत्तर दिले, की ही परिस्थिती हाताळण्यासाठी कुठली आदर्श पद्धत नाही. पण असे असले तरी गोष्टी टोकाला जाण्यापूर्वीच मी टाळेबंदी केली असती. जास्त प्राणहानी यात शक्य असल्याने ती परडवणारी नाही. आपण लोकांची काळजी घेतली पाहिजे. मी देशाची प्रमुख असते तर सुरुवातीपासूनच लोकांची काळजी घेतली असती.

 • ब्राझीलची ज्युलिया गामा (वय २८) उपविजेती ठरली, तर पेरूची जॅनिक मॅसेटा (वय २७) ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

RBI अ‍लर्ट: २३ मे रोजी ‘ही’ सुविधा काही तासांसाठी असणार बंद :
 • देशात सध्या मोठ्या प्रमाण डिजिटल बँकिंग पर्याय उपलब्ध आहे. सहज सोप्या पद्धतीने डिजिटल माध्यमांतून देवाणघेवाण केली जाते. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. या दरम्यानं डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केली आहे.

 • तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 • एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.

जगातील पहिला ‘त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम’ प्रजातीचा कोळी :
 • मेळघाटमध्ये जगातील पहिला कोळी प्रजातीचा ‘त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम’ नर आढळून आला आहे. दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अतुल बोडखे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी हा दावा केला आहे.

 • दर्यापूर येथील कोळी संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक प्रा. डॉ. अतुल बोडखे आणि संशोधक चमूने संशोधन करीत मेळघाटमध्ये जगातील ‘त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम’ प्रजातीच्या पहिल्या नर कोळ्याची नोंद केली. या प्रयोगशाळेतून आतापर्यंत १७ नवीन कोळी प्रजातींचा शोध लागलेला आहे. या जातीच्या पहिल्या मादीची नोंद प्रजापती आणि सहकारी संशोधक चमूने गुजरातमधील पालजजवळील अरण्य पार्क गांधीनगर येथे २०१६ मध्ये घेतली. या कोळ्याची नोंद मेळघाटमधील तापी नदीकाठी असलेल्या जंगलामधून तसेच धारखोरा बुरळघाट व नवाब नाला घटांग, धारणी रोड येथून घेण्यात आली.

 • आतापर्यंत मेळघाटमध्ये कोळ्याच्या एकूण २०४ प्रजातींची नोंद झालेली आहे. या प्रजातीच्या नराची लांबी ३.६ मिमी असून मादी ४.१ मिमी लांबीची आहे. हा कोळी जंगलामधील पालापाचोळ्यामध्ये आढळतो. तसेच तो निशाचर असून आकाराने खूप छोटा असल्याने त्याला ओळखणे कठीण आहे. या कोळी प्रजातीचा संपूर्ण अभ्यास जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाच्या कोळी संशोधन प्रयोगशाळेत करण्यात आल्याची माहिती प्रा. डॉ. अतुल बोडखे यांनी दिली.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल - बार्सिलोनाच्या महिलांना जेतेपद :
 • बार्सिलोनाच्या महिलांनी अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत चेल्सीचा ४-० असा धुव्वा उडवून महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेदावर पहिल्यांदाच नाव कोरले. पुरुष आणि महिलांमध्ये चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणारा बार्सिलोना हा पहिला क्लब ठरला आहे.

 • गेल्या आठवडय़ात महिलांच्या सुपर लीगचे जेतेपद पटकावल्यामुळे चेल्सीचा संघ आत्मविश्वासात होता. पण बार्सिलोनाने जलद गतीने एकमेकांकडे चेंडू सोपवणे आणि चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवत चेल्सीच्या खेळाडूवर दडपण आणले. पहिल्याच मिनिटाला चेल्सीच्या मेलनी लेउपोल्झच्या स्वयंगोलमुळे बार्सिलोनाला आघाडी घेता आली. त्यानंतर पहिल्या सत्रातच आणखी तीन गोल करत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व गाजवले.

 • अ‍ॅलेक्सिया पुटेल्लास (१४व्या मिनिटाला), आयताना बोनमाटी (२०व्या मिनिटाला) आणि कॅरोलिन हन्सेन (३६व्या मिनिटाला) यांनी गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले. चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणारा बार्सिलोना हा स्पेनमधील पहिला क्लब ठरला. याआधी सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या लिऑनने या स्पर्धेवर अधिराज्य गाजवले होते.

राज्यात दिवसभरात ४८ हजार २११ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९०.१९ टक्के :
 • राज्यात आता दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत लागली आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतील भर सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४८ हजार २११ रूग्ण करोनातून बरे झाले तर, २६ हजार २११ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ५१६ रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

 • आजपर्यंत राज्यात ४८,७४,५८२ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९०.१९ टक्के झाले आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यात ८२ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यू दर आता १.५३ टक्के आहे.

 • करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ नमुने (१७.२५) टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर, २८ हजार १०२ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात ४,४५,४९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

१८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)