चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जून २०२२

Date : 18 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - प्रणॉय उपांत्य फेरीत :
  • भारताच्या एचएस प्रणॉयने डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावरील रॅसमस गेमकेवर सरळ गेममध्ये विजय मिळवत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन  स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. थॉमस चषक बॅडमिंटन  स्पर्धेच्या डेन्मार्कविरुद्धच्या अंतिम फेरीतील निर्णायक पाचव्या सामन्यात प्रणॉयने गेमकेलाच नमवून ऐतिहासिक जेतेपद पटकावले होते. उपांत्यपूर्व सामन्यात त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना प्रणॉयने गेमकेला २१-१४, २१-१२ असे ४० मिनिटांत हरवले. त्यामुळे आतापर्यंतच्या या पाचव्या सामन्यात प्रणॉयने तिसरा विजय मिळवला.

  • इंडोनेशिया स्पर्धेत जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावरील प्रणॉयने दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी २०१७ मध्ये त्याने ही किमया साधली होती. मार्च महिन्यात स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या प्रणॉयची उपांत्य फेरीत चीनच्या झाओ जून पेंगशी गाठ पडणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेमकेचा खेळ अपेक्षेप्रमाणे बहरला नाही.

  • पहिल्या गेममध्ये प्रणॉयने ५-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर विश्रांतीप्रसंगी त्याच्याकडे ११-७ अशी आघाडी होती; पण पहिला गेमसुद्धा जिंकण्यात त्याला अडचण आली नाही. दुसऱ्या गेममध्ये गेमके सुरुवातीला ३-६ असा पिछाडीवर होता; परंतु त्याने ६-६ अशी बरोबरी साधली. अगदी ९-९ अशी टक्करसुद्धा त्याने दिली; परंतु नंतर प्रणॉयने सामन्यावर नियंत्रण मिळवत सामनाही खिशात घातला.

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आता पर्वतरांगांवर :
  • महाराष्ट्राला शूरवीरांचा गौरवशाली इतिहास लाभला असून अनेक महापुरुषांनी महाराष्ट्र घडविला आहे. अशा या महाराष्ट्राचा आणि शूरवीरांचा, महापुरुषांचा, नेत्यांचा गौरवशाली इतिहास आता राज्यातील विविध पर्वतरांगांवर शिल्पाच्या रुपात मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे तसेच सविस्तर आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.

  • राज्यात रस्ते विकास करणाऱ्या एमएसआरडीसीने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एमएसआरडीसीने आता पर्वतरांगांवरील खडकांवर शिल्पाच्या रूपात महाराष्ट्राचा इतिहास जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माउंटन रशमोर’च्या धर्तीवर ही संकल्पना मांडण्यात आली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भव्य शिल्पे दक्षिण डकोटा राज्यातील पर्वतरांगांवर कोरण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचा इतिहास सांगणारी शिल्पे आता पर्वतरांगांवर कोरण्यात येणार आहेत.

  • ही शिल्पे सह्याद्रीसह आणखी कुठे साकारता येतील याचा शोध घेण्यासाठी, हा प्रकल्प व्यवहार्य ठरेल का? हे तपासण्यासाठी तसेच पुढे याचा आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच निविदा जारी केली आहे.

असांज यांच्या अमेरिकेतील प्रत्यार्पणास ब्रिटनची मंजुरी :
  • इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांशी संबंधित गोपनीय दस्तावेज उघड केल्याच्या आरोपावरून ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांचे अमेरिकेस प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मूळचे ऑस्ट्रेलियाचे ५० वर्षीय नागरिक असांज यांच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली. अमेरिकेत जाणे टाळण्यासाठी असांज अनेक वर्षांपासून देत असलेल्या कायदेशीर लढाईस मिळालेले हे महत्त्वपूर्ण वळण आहे.

  • मात्र, असांज यांना या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी आहे. असांज यांचे वकील कायदेशीर लढाईची दुसरी फेरी पुन्हा सुरू करण्याचीच शक्यता आहे.

  • गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले, की १७  जून रोजी न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या विचारविनिमयानंतर असांज यांचे अमेरिकेस प्रत्यार्पण करण्याचे आदेश देण्यात आले. ब्रिटनच्या प्रत्यार्पण कायद्यातील तरतुदीनुसार, प्रत्यार्पण स्थगितीचे कोणतेही कारण नसल्यास, या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरी अनिवार्य असते.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी :
  • केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे. यात नॉर्ड व्हीपीएन (Nord VPN), एक्स्प्रेस व्हीपीएन, टॉरसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वांना इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) भारतातील व्हीपीएन वापराबाबत निर्देश दिले. या नंतर या सर्व कंपन्यांनी भारतात सेवा देणं बंद करत असल्याचं सांगितलं. यानंतर लगेचच सरकारने हा निर्णय घेतलाय.

  • देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) सायबर सुरक्षेचा विचार करून काही मार्गदर्शक सूचना दिल्याचं सांगितलं आहे. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचे अंतर्गत आणि गुप्त कागदपत्रे गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्ससारख्या गैरसरकारी क्लाऊड सर्व्हिसेसवर अपलोड करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • एनआयसीने म्हटलं, “सरकारी कर्मचाऱ्यांची सायबर सुरक्षेचा विचार करून काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मागर्दशक सूचना देण्यात आल्या आहेत.” याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांन आपल्या मोबाईल फोनमध्ये कॅम स्कॅनरसारखे अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल न करण्याबाबत सांगण्यात आले आहे. जुलै २०२० मध्ये सरकारने ज्या चीनच्या अॅप्सवर बंदी घातली होती त्यात कॅम स्कॅनरचा समावेश होता.

‘अग्निपथ’ योजना: हवाई दलात भरती प्रक्रियेला होणार सुरुवात, हवाईदल प्रमुखांनी जाहीर केली तारीख :
  • लष्करातील ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेबाबत देशभरात संतापाचे वातावरण आहे. शुक्रवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने केली. केंद्र सरकारच्या या नव्या योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्ये होत आहे. राज्यातील विविध स्थानकांवर गोंधळ उडाला, तर अनेक गाड्या जाळण्यात आल्या. दरम्यान, लष्कराच्या या नव्या योजनेबाबत एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

  • या तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होईल : एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी म्हणाले की, हवाई दलातील भरती प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे. ते म्हणाले की, भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते. या योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षे ठेवण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, मला कळविण्यात आनंद होत आहे की, पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली आहे. मला खात्री आहे की मोठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील.

  • सरकारच्या योजनेवर लष्करप्रमुख काय म्हणाले : केंद्र सरकारच्या या योजनेबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत वयोमर्यादा २१ वरून २३ वर्षे करण्याच्या निर्णयामुळे सैन्यात भरती होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. पण कोविड-१९ महामारीमुळे गेली दोन वर्षे भरती योजना थांबवण्यात आली होती. लष्करात भरतीसाठी वयात एकवेळ सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर लवकरच भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल, असे जनरल पांडे यांनी सांगितले. लष्करप्रमुखांनी इच्छुक तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून लष्करात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.३५ टक्के :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ९७.३५ टक्के लागला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीत म्हसळा तालुका अव्वल ठरला आहे.

  • बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात रायगड मुंबई विभागात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के, पालघरचा निकाल ९७.१७ टक्के, बृहन्मुंबईचा निकाल ९६.३० टक्के, मुंबई उपनगर १ चा निकाल ९६.७२ टक्के आणि मुंबई उपनगर २ चा निकाल ९६.६४ टक्के लागला आहे. तर रायगड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९७.३५ टक्के लागला आहे.  रायगड जिल्ह्यात  दहावीच्या परीक्षेसाठी ३५ हजार १९५ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. ३४ हजार ९९१  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी ३४ हजार ०६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे ९७.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

  • सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. ९८.१२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९६.६५ टक्के मुले उत्तीर्ण झाली. १८ हजार ३७१ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १८ हजार २६२ मुले परीक्षेला बसली होती त्यातील १७ हजार ६५१ उत्तीर्ण झाली. तर १६ हजार ८२४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १६ हजार ७२९ मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी १६ हजार ४१६ मुली उत्तीर्ण झाल्या. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याचा निकाल ९९.०२ टक्के लागला, तर खालापूर तालुक्याचा सर्वात कमी ९४.४३ टक्के निकाल लागला.

दहावी निकाल - अमरावती विभाग राज्यात सातव्या स्थानी ;९६.८१ टक्के निकाल :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.८१ टक्के लागला असून नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावतीचे स्थान सातवे आहे.

  • वाशीम जिल्हा ९७.६२ टक्क्यांसह विभागात पहिला आला आहे. तर सर्वात कमी निकाल (९६.३१ टक्के) यवतमाळ जिल्ह्याचा आहे.

  • अमरावती जिल्ह्याचा निकाल ९६.३९, अकोला ९७.०४ तर बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९७.१६ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात यशाचा ठसा उमटवला असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.९६ इतकी आहे़ मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ इतकी आहे.

  • विभागीय मंडळामार्फत मार्च २०२२ मध्ये माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान घेण्यात आली़

  • या परीक्षेकरिता अमरावती विभागातून १ लाख ५७ हजार ७५३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ५५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ५० हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; १० वी-१२ वी पुरवणी परीक्षेच्या तारखांची घोषणा, वाचा :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ९६.९४ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. ३.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील झालेत. त्यामुळेच मंडळाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केलीय. यानुसार १२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलै २०२२ रोजी, तर १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. मंडळाने (MSBSHSE) दहावी निकालाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच ही माहिती दिली.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, “१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येईल.”

  • “१२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, तर १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे,” असंही मंडळाने नमूद केलं.

१८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.