चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जून २०२१

Updated On : Jun 18, 2021 | Category : Current Affairs


देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ७३ दिवसात प्रथमच आठ लाखांच्या खाली :
 • देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. देशातल्या नवबाधितांची, मृतांची संख्या हेच सांगतेय. अद्यापही करोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणारी संख्या ही आशादायी बाब आहे. गेल्या ७३ दिवसांत प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली आली आहे.

 • नव्या बाधितांची संख्याः - देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ४८० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ९८ हजार ६५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ही संख्या कायम आठ लाखांच्या वरच होती. मात्र, गेल्या ७३ दिवसांत पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे.

 • करोनामुक्त आणि मृतांची आकडेवारी - तर काल दिवसभरात ८८हजार ९७७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या आता दोन कोटी ८५ लाख ८० हजार ७४७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या १ हजार ५८७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांची एकूण संख्या आता तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे.

स्विस बँकांतील भारतीयांच्या निधीत तिपटीने वाढ :
 • भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे.

 • दोन वर्षांच्या घसरणीच्या प्रवाहाच्या विपरीत २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकांतील एकूण निधीने मागील १३ वर्षांतील सर्वोच्च स्तर गाठला आहे. २०१९च्या अखेरीस ८९.९ कोटी स्विस फ्रँक (सुमारे ६,६२५ कोटी रुपये) असणाऱ्यां निधीत वर्षभराच्या कालावधीत तिपटीहून मोठी वाढ झाली आहे.

 • यापूर्वी २००६ मध्ये भारतीयांच्या निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र त्याला उतरती कळा लागली होती.  रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारतीयांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असली, तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र घसरत आला आहे.

पशुपती कुमार पारस यांची ‘लोजप’च्या अध्यक्षपदी निवड :
 • अलीकडेच पक्षात बंड करून पुतणे चिराग पासवान यांना पक्षाध्यक्षपदावरून पदच्युत करणारे लोक जनशक्ती पक्षाचे खासदार पशुपती कुमार पारस यांची गुरुवारी या पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

 • दुपारी ३ वाजेपर्यंत इतर कुणीही नामांकन अर्ज सादर केला नसून, पारस यांच्या निवडीची औपचारिक घोषणा नंतर केली जाईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. चिराग पासवान यांच्या समर्थकांनी ज्यांच्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे, ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पारस हे सौजन्य म्हणून दूरध्वनी करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

 • दिवंगत रामविलास पासवान यांचे सर्वात लहान बंधू असलेले पशुपती यांनी यापूर्वी ज्यांना पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून हटवले, त्या चिराग यांच्याबाबत काही निर्णय घेण्यात आला आहे काय, याबद्दल लगेच कळू शकले नाही.

केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमध्ये सुधारणा :
 • दूरचित्रवाहिन्यांकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी वैधानिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

 • माहिती व प्रसारण मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क (सुधारणा) नियम २०२१ बाबतची अधिसूचना गुरुवारी अधिकृत गॅझेटमध्ये प्रकाशित केली. नागरिकांच्या फायद्यासाठी पारदर्शक अशी वैधानिक यंत्रणा पुरवण्यासाठी या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असल्याचे मंत्रालयाने सांगितले.

 • ‘माहिती व प्रसारण मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमध्ये सुधारणा करून टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वैधानिक यंत्रणा विकसित केली आहे’, असे ट्वीट माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी केले.

 • सध्याच्या नियमांनुसार, कार्यक्रम आणि जाहिराती यांच्याबाबतच्या संहितेच्या उल्लंघनाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आंतर- मंत्री समितीच्या माध्यमातून संस्थात्मक यंत्रणेची तरतूद आहे.

सीरममध्ये जुलै महिन्यात मुलांसाठी Novavax लशीच्या चाचणीस सुरूवात होण्याची शक्यता :

 

 • पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेऊ शकते. एएनआयने म्हटले आहे की, सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी Novavax कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.

 • दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस करोनाच्या व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

 • अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती.

Copa America 2021: मेसी-सुआरेझ एकमेकांशी भिडणार :
 • अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि उरुग्वेचा लुइस सुआरेझ यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पहाटे अर्जेटिना आणि उरुग्वे यांच्यात लढत रंगणार आहे.

 • अर्जेटिना आणि उरुग्वे या संघांना नोव्हेंबरनंतर आपल्या तीन सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही.  या सामन्यातील विजेता संघ अ गटातून अग्रस्थानी पोहोचणार आहे.

 • चिलीविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करल्याने अर्जेटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्यावर प्रचंड टीका झाली.  लुकास कार्टाच्या जागी मध्यरक्षक म्हणून ख्रिस्तियन रोमेरो याला खेळवण्यात येणार आहे.

 • उरुग्वेची मदार सुआरेझ आणि एडिन्सन कावानी यांच्यावर असून जिओवानी गोंझालेझ, पेनारोल, लुकास टोरेरा, रॉड्रिगो बेंटानकर, निकोलस डे ला क्रूझ, फेडेरिको वाल्वेर्डे, फाकुन्डो टोरेस आणि जोनाथन रॉड्रिगेझ यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

१८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)