चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जून २०२०

Date : 18 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा २७ सप्टेंबरपासून :
  • करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा या वर्षी २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. सुरुवातीला २१ सप्टेंबरपासून ही स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ती आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे.

  • अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ३१ ऑगस्टपासून आहे. या स्थितीत ही स्पर्धा संपल्यावर दोन आठवडय़ांनी फ्रेंच स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अर्थातच करोनाचे जगावर असणारे संकट अजून कायम आहे, त्यामुळे अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धा होतील की नाही याबाबत आता सांगणे अवघड आहे. विम्बल्डन यंदा १९४५ नंतर प्रथमच रद्द करण्यात आली आहे. मात्र प्रेक्षकांशिवाय आणि आरोग्यविषयक सुरक्षिततेचे विविध नियम सांभाळून अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी खाजगी विमानाने येण्यापासून विविध कठोर नियम घालण्यात येण्याचीही चर्चा आहे. त्या विरोधात नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या खेळाडूंनी आवाजही उठवला होता.

UNSC - आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड :
  • बुधवारी भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली. दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.

  • १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.

  • विजयानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. भारत नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवीन दिशा देणार असल्याचं ते म्हणाले. भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. “भारताची २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे. आम्हाला सर्वांचं उत्तम समर्थन मिळालं. तसंच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याप्रती आदर व्यक्त करतो,” असंही ते म्हणाले.

चीनला दणका; रेल्वे चिनी कंपनीला दिलेलं ५०० कोटींचं कंत्राट करणार रद्द :
  • भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे आणि चीनच्या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याच्या उद्देशाने सरकारने योजना तयार केली आहे. त्यानुसारच भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वी चिनी कंपन्यांना मिळालेल्या कंत्राटांवरही याचा परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत. 

  • टेलिकम्युनिकेशन्श क्षेत्राशी संबंधित सरकारच्या मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएललाही नवीन प्रणाली बसवताना चिनी सामान न वापरण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

  • देशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं ज्या चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देण्यात आली आहेत त्यासंबंधितील करार रद्द करण्याची सहमती देण्यात आली आहे. २०१६ साली सीआरएससीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. या कंत्राटानुसार ४०० किमी रेल्वे मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बसवणे आणि देखभाल करण्याचे काम ही चिनी कंपनी करणार होती. भारतीय रेल्वेच्या या महत्वकांशी प्रकल्पामध्ये सीआरएससी ही एकमेव चिनी कंपनी होती. या प्रकल्पामाधील इतर सर्व कंपन्या या भारतीयच आहेत.

उद्योगपतींनी किमान एक तरी प्रकल्प आणावा, त्यावर तातडीने कार्यवाही करु – मुख्यमंत्री :
  • महाराष्ट्रात उत्पादने सुरु व्हावीत यासाठी आम्ही उत्सुक असून प्रत्येक उद्योगपतींनी त्यांच्या मनातले किमान एकतरी प्रकल्प आमच्याकडे घेऊन यावा. आम्ही हे प्रकल्प तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.

  • कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते. यामध्ये हर्ष गोयंका, जमशेद गोदरेज, नौशाद फोर्ब्स, थियागराजन यांनी आपले विचार मांडले. मुख्यमंत्री म्हणाले, करोनाच्या वातावरणातही उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते आहे, हे फार महत्वाचे आहे. अशा सर्व उद्योग आणि गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागतच करू. कालच आम्ही १६ हजार कोटी रुपये गुंतवणूकीसाठी करार केले आहेत. देशाच्या दृष्टीने ‘मेड इन इंडिया’ तर आहेच पण महाराष्ट्राचे देखील एक वैशिष्ट्य आहे.

  • “जिथे शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्य पद्धती आपल्याला कायमस्वरूपी अवलंबता येईल, जेणेकरून करोना नंतरच्या काळातले आपले जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहील हे ही आपल्याला पहावे लागेल. मुंबईत ५० टक्के लोक झोपड्यांत राहतात. माझ्या वडिलांनी एकेकाळी या झोपडीधारकाला घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. निश्चितच आमच्यासाठी या करोना नंतरच्या काळात हा प्राधान्याचा विषय राहील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गलवान संघर्षांचा द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम :
  • गलवान खोऱ्यात घडलेल्या अभूतपूर्व अशा घटनेचा द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होईल, असा कडक संदेश परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे चिनी समपदस्थ वांग यी यांना बुधवारी दिला आणि परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत, असेही चीनला सांगितले.

  • भारत व चीन यांच्या सैन्यात मंगळवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर जयशंकर आणि वांग यांचे दूरध्वनीवर संभाषण झाले.

  • ‘गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या हिंसक संघर्षांबाबत भारत सरकारचा निषेध परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी कठोरतम शब्दांत चीनला कळवला आहे’, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.

  • दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ६ जूनला झालेल्या एका बैठकीचा हवाला जयशंकर यांनी वांग यांना दिला. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती निवळण्याबाबत आणि सैन्य परत घेण्याबाबत या बैठकीत मतैक्य झाले होते, याचा मंत्रालयाने उल्लेख केला.

१८ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.