चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 जुलै 2023

Date : 18 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदक आत्मविश्वास दुणावणारे –सर्वेश कुशार
  • आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा खूप महत्त्वाची होती. या स्पर्धेतील पदकाने माझा आत्मविश्वास दुणावला आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उंच उडी प्रकारातील खेळाडू सर्वेश कुशारेने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. त्याच वेळी जागतिक स्पर्धेतील पात्रतेची संधी या वेळी अवघ्या सहा सेंटिमीटरने हुकल्याची खंत वाटते, असेही तो म्हणाला.
  • सर्वेशने बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी २.२६ मीटर उडी मारून रौप्यपदक मिळवले. विशेष म्हणजे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे उंच उडी प्रकारातील हे केवळ दुसरेच पदक ठरले. यापूर्वी २०१३ मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत जितीन थॉमसने २.२१ मीटर उडीसह रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर यंदा सर्वेश रौप्यपदकाचा
  • मानकरी ठरला. सर्वेश मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील देवगावचा असून, सध्या तो पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत (एएसआय) जितीन थॉमस यांच्याकडेच मार्गदर्शन घेत आहे.
  • जागतिक अजिंक्यपद  स्पर्धेसाठी २.३२ मीटर, तर ऑलिम्पिकसाठी २.३३ मीटर असा पात्रता निकष आहे. जागतिक स्पर्धेसाठी आता सर्वेशला जागतिक मानांकनानुसारच खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी सर्वेशकडे अजून एक वर्ष आहे. सर्वेश म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेसाठी पात्रता हुकल्याची खंत जरूर आहे. आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही; पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी माझ्याकडे वर्षभराचा कालावधी आहे. प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करून ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’’
  • ‘‘आईवडिलांकडून प्रत्येक पावलावर मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. शाळेत असताना रावसाहेब जाधव यांनी माझी तयारी करून घेतली. सुविधांचा अभाव असूनही त्यांनी मक्याच्या भुस्याची गादी करून माझ्याकडून सराव करून घेतला. शाळेत असताना २०१२ मध्ये मिळवलेले शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले पदक आजही मला प्रेरणा देते. गुजरात राष्ट्रीय स्पर्धेत मी २.२७ मीटर उडीसह सुवर्णपदक जिंकले. ही माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. थॉमस सरांच्या मार्गदर्शनाचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्याचबरोबर भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून मिळणारा स्पर्धात्मक अनुभव फायद्याचा ठरतो आहे,’’ असेही सर्वेशने सांगितले.
भगवान हनुमान थायलंडचे मॅस्कॉट कसे ठरले? 
  • कालच आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली. या चॅम्पियनशिपचे आयोजन थायलंडची राजधानी बँकॉक येथे करण्यात आले होते. २५ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा मॅस्कॉट हे ‘भगवान हनुमान’ होते. ही चॅम्पियनशिप मूलतः दोन वर्षांच्या अंतराने आयोजित केली जाते. परंतु करोनाच्या साथीमुळे २०२१ साली ही स्पर्धा रद्द करण्यात आली. दर खेपेस या चॅम्पियनशिपच्या मॅस्कॉटची निवड यजमान देश करतो. यावर्षीच्या चॅम्पियनशिपचे यजमानपद हे थायलंडकडे होते. कधीकाळी भारतीय संस्कृतीचा भाग असलेल्या थायलंडमध्ये आजही हनुमान ही देवता लोकप्रिय आहे.  त्यामुळेच या वर्षीच्या चॅम्पियनशिपसाठी थायलंडकडून मॅस्कॉट म्हणून हनुमानाची निवड करण्यात आली. हनुमान हे रामभक्त आहेत, त्यांच्या रामभक्तीत झळकणारी गती, शक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता विलक्षण आहे. स्थिर निष्ठा आणि भक्ती या त्यांच्या शक्ती आहेत. तर आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचा लोगो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कौशल्याचे, परिश्रमाचे, खेळाप्रतीच्या समर्पणाचे प्रतिनिधित्त्व करतो, त्यामुळेच या स्पर्धेसाठी मॅस्कॉट म्हणून ‘हनुमाना’ची निवड करण्यात आली, असे आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मॅस्कॉट म्हणजे नक्की काय? हे जाणून घेणे रंजक ठरावे. 

मॅस्कॉट म्हणजे नक्की काय?

  • आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या मैदानात अनेकदा वेगवेगळ्या वेशभूषा केलेले कलाकार पाहतो. कधी कोणी एखाद्या प्राण्याच्या स्वरूपात असतो तर कधी शस्त्रधारी योध्याच्या रूपात असतो, त्यांची वेषभूषाही साधी नसून भव्य दिव्य असते. यांना मॅस्कॉट असे म्हटले जाते. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांना १९३२ पासून मॅस्कॉटची परंपरा आहे. मॅस्कॉट म्हणजे शुभ चिन्ह. मॅस्कॉट या शब्दाचे मराठी भाषांतर शुभंकर- शुभ घडविणारा असे करण्यात येते. सार्वजनिक ओळख असलेल्या गटाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी ज्या शुभ चिन्हाचा वापर केला जातो, त्यास मॅस्कॉट असे म्हणतात. काही संस्कृतींमध्ये पारंपारिकरित्या मॅस्कॉट चिन्हांना नशीब-शुभ आणणारे/ घडविणारे समजले जाते. या चिन्हांमध्ये मानवी आकृती, प्राणी, पक्षी किंवा इतर सांस्कृतिक वस्तूंचा समावेश होतो. शाळा, क्रीडा संघ, सामाजिक संस्था, लष्करी युनिट किंवा एखादा ब्रॅण्ड आपली सार्वजनिक ओळख व्यक्त करण्यासाठी अशा स्वरूपाच्या चिन्हांचा उपयोग करतात. अशा स्वरूपाच्या मॅस्कॉट किंवा शुभंकरांचा वापर क्रीडा संघांचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. शुभ घडविणे हा या मॅस्कॉटच्या मागील पारंपरिक हेतू असला तरी आधुनिक जगात या मॅस्कॉटस् च्या वापरामागे मार्केटिंग-जाहिरात हा उद्देश असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. खेळाच्या संघांशी संबंधित हे शुभंकर बहुतेक वेळा त्या संघाच्या नावाने ओळखले जातात. 
‘फ्लाइंग राणी’ नवीन डब्यांसह कार्यरत; २१ डबे प्रवाशांच्या सेवेत
  • पालघर, डहाणू, वापी, वलसाड व सुरत येथील दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदारांची लाईफ लाईन असलेली फ्लाईंग राणी १६ जुलैपासून नव्या स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. १९७७ पासून विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या या गाडीचे १८ डिसेंबर १९७९ साली असलेले डबल-डेकर मध्ये रुपांतर करण्यात आले होते. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एल. एच. बी. पद्धतीचे २१ डबे या गाडीमध्ये कार्यरत करण्यात आले आहेत. 
  • १९०६ पासून कार्यरत असणारी ही गाडी पहिल्या महायुद्धाच्या काळात बंद ठेवण्यात आली होती. १ मे १९३७ रोजी ही गाडी पुन्हा सेवेत कार्यरत झाली. तत्कालीन वलसाड प्रांताच्या जिल्हाध्यक्ष यांच्या पत्नीने   या गाडीचे फ्लाईंग राणी असे नामकरण केले आहे. फ्लाईंग राणी १९६५ सुमारास मध्यम पल्ल्याची सर्वात जलद गाडी असल्याचा मान पटकावला होता. त्यानंतर देशातली ही पहिली डबल-डेकर गाडी पश्चिम रेल्वेची शान असल्याने याला  फ्लाईंग राणी असे नाव सार्थक ठरले.
  • १९९८-९९ च्या सुमारास या गाडीला पालघर येथे थांबा देण्यात आला. त्यानंतर या भागातील दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांच्यासाठी या गाडीतील डबे हे जणू प्रवासातील आश्रयाचे ठिकाण ठरले होते. या गाडीची सन २००१ मध्ये डबल डेकर डबे नव्याने बदलण्यात आले होते, तेव्हापासून गेली २२ वर्ष हे डबे कार्यरत राहिले आहेत.
  • प्रवाशांसाठी अधिक आरामदायी व सुरक्षित असे कोच डबे या गाडीत अंतर्भूत करण्यात आले असून त्यामध्ये वातानुकूलित चेअर कार, सात विना आरक्षित डबे, पासधारकांसाठी एक प्रथम दर्जा व एक सामान्य डबा, महिला पास धारक प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा या गाडीत अंतर्भूत करण्यात आला आहे. डब्यांची संख्या वाढली असली तरी प्रवाशांना वाहून नेण्याची संख्या जवळपास तितकीच राहिली असून लाल व निळया रंगांच्या डब्यांमुळे या गाडीला आकर्षक स्वरूप बहाल झाले आहे.

रानी नव्हे राणी..

  • या नव्या गाडीच्या नावा फलकावर मराठीमध्ये ‘फ्लाईंग रानी’ असे संबोधित करण्याऐवजी हिंदीमध्ये ‘फ्लाईंग रानी’ असे उल्लेखित आहे. मात्र या खालोखाल गुजराती अक्षरांमध्ये राणी असा उल्लेख वैशिष्टय़पूर्ण केला असल्याने पश्चिम रेल्वेने मराठीमधील नामफलक न करता हिंदीमध्ये उल्लेखित केल्याने प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे आहे.

फाटके आसन, गळके छत

  • बदलण्यात आलेल्या डब्यांपैकी काही डबे जुने असून पहिल्या दज्र्याच्या डब्यांमधून पावसाचे पाणी झिरपत असल्याचे  प्रवासादरम्यान दिसून आले १३६ आसन क्षमता असणाऱ्या डबल डेकर डब्यांऐवजी १०२ आसन क्षमता असणारे डबे बसविण्यात आले आहेत. दैनंदिन प्रवाशांची गर्दी असणाऱ्या गाडीत पूर्वीच्या तुलनेत अरुंद दरवाजे असल्याने गाडीच्या थांब्याच्या वेळेत प्रवाशांना चढणे- उतरणे गैरसोयीचे ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
परदेशी चलनाच्या तस्करीत वाढ का?
  • करोना काळात सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर परदेशी चलनाच्या तस्करीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करोनानंतर टाळेबंदी उठवल्यानंतर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशभरातून ११ कोटी ३६ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त केले होते. गेल्या सहा महिन्यात एकट्या मुंबई विमानतळावरून १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले.

बँकॉक परदेशी चलनाचे केंद्र का ठरते आहे?

  • बेकायदेशीरपणे परदेशी चलन थायलंडला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या सहा परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. बँकॉक व दुबई परदेशी चलन तस्करीचे केंद्रस्थान झाले आहे. या तस्करीत अनेक परदेशी टोळ्या सक्रिय असून त्या मागे हवाला व्यवसायिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणत पर्यटन व्यवसाय असल्यामुळे तेथे रोखीने व्यवहार अधिक होतात. त्यामुळे ते परदेशी चलनाच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर्सची तस्करी होते. त्याचा फायदा हवाला व्यावसायिक घेत आहेत.

हवाला व्यवसाय व परदेशी चलनाच्या तस्करीचा काय संबंध?

  • हवाला व्यवसाय हा पूर्णपणे विश्‍वासावर चालतो. एखाद्या डिमांड ड्राफ्ट सुविधेप्रमाणे हा व्यवहार चालतो. हे जाळे देशासह परदेशातही पसरलेले आहे. मुंबईतून एखादी रक्कम गुजरातमध्ये पाठवायची असेल तर मुंबईतील व्यक्ती हवाला दलालाला ती रक्कम देते. ती रक्कम स्वीकारल्यानंतर गुजरातमधील दलालास कळवले जाते. त्यानंतर गुजरातमधील दलाल त्याच्याकडील रक्कम व्यवसायिकाला पुरवतो. या व्यवहारांत एका कोटीमागे एक टक्का, तर एक कोटीपेक्षा कमी रकमेवर दोन टक्के दलाली (कमिशन) घेतले जाते. परदेशातही असे व्यवहार होतात. कोणाला अमेरिकेत एक हजार डॉलर्स हवे असतील तर ते मुंबईत हवाला ऑपरेटर ८२ हजार रुपयांना देईल. हवाला ऑपरेटर त्याबदल्यात अमेरिकेतील किंवा मुंबईच्या दलालास अमेरिकन डॉलर्स देतो. या प्रकारात दोन्हीकडून पैशांचा व्यवहार होतो त्यामुळे त्यात कर बुडवले जातात. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे हवाला व्यवसाईकांना मोठ्या प्रमाणात परदेशी चलन, विशेषतः अमेरिकन डॉलर्सची आवश्यकता असते.

यावर्षी किती परदेशी चलन जप्त करण्यात आले?

  • नुकतेच ९ व १० जुलै या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर सहा परदेशी नागरिकांना परदेशी चलनासह अटक करण्यात आले. त्यावेळी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत थायलंडमधील पाच व जपानमधील एका नागरिकाला अटक करण्यात आले. त्यापूर्वी ९ जुलैला दोघांना परदेशी चलनासह अटक करण्यात आली होते. त्यातील एक जपानी नागरिक आहे, तर दुसरी महिला थायलंडमधील बँकॉक येथील रहिवासी आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून १०० अमेरिकन डॉलर्सच्या १,४१५ नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक कोटी १५ लाख ३९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबई विमानतळावरून आठ कोटी ३६ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले होते. या वर्षभरात १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - अंजुमला कांस्यपदक; पुरुषांच्या सांघिक गटात भारताला रौप्य :
  • भारताच्या अंजुम मुदगिलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रविवारी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. अंजुमने अंतिम फेरीत ४०२.९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. जर्मनीच्या अ‍ॅना जॅन्सेनने (४०७.७ गुण) सुवर्ण आणि इटलीच्या बार्बरा गॅमबारोने (४०३.४ गुण) रौप्यपदक आपल्या नावे केले. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अंजुमने सहाव्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली होती. अंजुमचे विश्वचषक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. गेल्या महिन्यात बाकू येथे झालेल्या विश्वचषकात तिने याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. 

  • दुसरीकडे, पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात संजीव राजपूत, चैन सिंह आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या भारतीय त्रिकुटाने रौप्यदपक जिंकले. भारताच्या त्रिकुटाने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली. या लढतीत त्यांच्यासमोर चेक प्रजासत्ताकचे आव्हान होते. पीटर निमबुरस्की, फिलिप नेपेयचाल आणि जिरी प्रिव्रात्स्की यांचा समावेश असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या संघाने चुरशीच्या लढतीत १६-१२ अशी सरशी साधत सुवर्णपदक कमावले.

  • भारतीय नेमबाजांनी या विश्वचषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रविवारी एक कांस्य आणि एक रौप्यपदक मिळवत भारताने एकूण ११ पदकांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. भारताच्या खात्यावर चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.

बुद्धिबळपटू गुकेशची विक्रमी कामगिरी; २७०० एलो गुणांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा भारतीय :
  • भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ली क्वँग लिएमवर विजय नोंदवत स्विर्त्झलॅड येथे सुरू असलेल्या बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये अग्रस्थान मिळवले. यासह त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये  २७०० एलो गुणांचा टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा १६ वर्षीय गुकेश सर्वात युवा भारतीय, जगातील तिसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.

  • ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये सामन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची गुणवारी बदलत असते. त्यामुळे गुकेशने लिएमवर मात केल्यानंतर त्याला २७०० एलो गुणांचा टप्पाही पार करता आला. मात्र, आपले क्रमवारीचे गुण २७०० हून अधिक ठेवण्यासाठी गुकेशला पुढेही चांगली कामगिरी सुरू ठेवावी लागेल.

  • बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये गुकेशने आतापर्यंत दर्जेदार खेळ केला आहे. त्याने दहा सामन्यांत १६.५ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. दुसऱ्या स्थानावरील लिएमचे १५ गुण, तर तिसऱ्या स्थानावरील आंद्रे एसिपेन्कोचे १४.५ गुण आहेत.

कॉ. वृंदाताई करात यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ जाहीर :
  • क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ” चालुवर्षी कॉ. वृंदाताई करात यांना देण्यात येणार आहे.

  • कॉ.करात या पश्चिम बंगाल मधील असून विद्यार्थी दशेपासून एस.एफ.आय. या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आल्या आहेत. दिल्लीमधील कापड गिरणी मजुरांच्या हक्कासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले .२००५ मधे पश्चिम बंगालमधुन त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

  • एक अत्यंत जागरुक आणि लढाऊ खासदार म्हणून त्यानी प्रभावी काम केले आहे . त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरोवर त्यांची निवड झाली. दिल्लीमध्ये सामान्य लोकांच्या राहत्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात येत असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सामान्य माणसांना दिलासा मिळवून दिला.

  • सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधीलकी आणि योगदान लक्षात घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाने त्याना आपला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे . दि. ६ ऑगष्ट रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते हा पुरस्कार कॉम्रेड वृंदाताई करात याना प्रदान करणेत येणार आहे. मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल , श्रीफल आणि २१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठचे संघटक ॲड . सुभाष पाटील संघटक , अध्यक्ष भाई सुभाष पवार आणि सचिव ॲड . नानासाहेब पाटील यांनी दिली.

राज्यात १८ ते ५९ वयोगटाचा वर्धक मात्रेला चांगला प्रतिसाद :
  • राज्यात १५ जुलैपासून सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत वर्धक मात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे ८५ हजार नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

  • करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एकूण लसीकरणामध्ये जुलैपासून घट झाली आहे. परंतु १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण राज्यभरात सुरू झाल्याने पुन्हा लसीकरणाचा प्रतिसाद वाढला आहे. राज्यभरात शुक्रवारी सुमारे दीड लाख जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये सुमारे ५० टक्के लसीकरण हे वर्धक मात्रेचे झाले आहे.

  • सर्वाधिक लसीकरण मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये - वर्धक मात्रेचे लसीकऱण खासगी रुग्णालयांमध्येच सशुल्क सुरू होते. त्यामुळे हे लसीकरण खासगी रुग्णालयांपुरतेच मर्यादित राहिल्याने मुंबई, पुणे या शहरांमध्येच मोठ्या प्रमाणात होत होते. १८ ते ५९ वयोगटामध्ये दैनंदिन सरासरी सहा ते सात हजार नागरिक वर्धक मात्रा घेत होते. शुक्रवारपासून सरकारी केंद्रावर मोफत लसीकरण सुरू केल्यामुळे एका दिवसातच ८४ हजार ९४८ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक लसीकरण मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्येही सशुल्क लस घेणे परवडत नसलेल्या नागरिकांना आता मोफत मात्रा उपलब्ध झाल्याने यांची गर्दी आता केंद्रावर वाढत आहे. शुक्रवारी मुंबईत १८ ते ५९ वयोगटातील १२ हजार ७३० तर ठाण्यात १० हजार १४३ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

करोना लसमात्रांचा २०० कोटींचा टप्पा पार :
  • करोना प्रतिबंधासाठीच्या भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. देशातील नागरिकांना देण्यात आलेल्या करोना लसमात्रांनी रविवारी २०० कोटींचा टप्पा ओलांडला.

  • आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ९८ टक्के प्रौढ लोकसंख्येला लशीची किमान एक मात्रा देण्यात आली आहे, तर ९० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील ८२ टक्के मुला-मुलींनाही लशीची एक मात्रा देण्यात आली आहे, तर ६८ टक्के मुला-मुलींना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. या वयोगटासाठी ३ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली होती.

  • देशात १६ जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली होती़  दीड वर्षांत लसमात्रांचा २०० कोटींचा टप्पा पार झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला़  ‘‘भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. भारतीयांनी विज्ञानावर विश्वास दाखवला. या मोहिमेत डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मी त्यांच्या दृढसंकल्पाचे कौतुक करतो’’, असे मोदी म्हणाले.

सर्वाधिक लसमात्रा दिलेली पाच राज्ये

उत्तर प्रदेश (३४,४१,९३,६४१)

महाराष्ट्र (१७,०५,५९,४४७)

पश्चिम बंगाल (१४,४०,३३,७९४)

बिहार (१३,९८,५२,०४२)

मध्य प्रदेश (१२,१३,१५,९११)

द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात आज लढत; मतदानाला सुरुवात :
  • देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होईल. द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली आहे. देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा विश्वास सत्ताधारी पक्षाला आहे.

  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४०३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल.

  • एकूण ४८०९ लोकप्रतिनिधींचे मतांचे मूल्य हे १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख, ४३ हजार, २३१ एवढे आहे.

१८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.