चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जुलै २०२१

Updated On : Jul 18, 2021 | Category : Current Affairs


सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक :
 • सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन ‘सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक’ असे करतानाच, ‘काही चुकीचे घडेल, तेव्हा न्यायपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहील’ हे भारताच्या लोकांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी केले.

 • केवळ लिखित घटना असणे एवढेच भारतीय न्यायपालिकेचे वेगळेपण नाही; तर लोकांची या यंत्रणेवर प्रचंड श्रद्धा आहे, यामुळेही ती वेगळी आहे, असे भारत-सिंगापूर मध्यस्थी परिषदेत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले. या परिषदेत त्यांच्यासोबत सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन हे प्रमुख वक्ते होते.

 • ‘आपल्याला न्यायपालिकेकडून दिलासा व न्याय मिळेल याचा लोकांना विश्वास आहे. चुकीच्या गोष्टी घडतील तेव्हा न्यायपालिका आपल्यामागे उभी राहील हे त्यांना माहीत आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक आहे,’ असे न्या. रमण म्हणाले.

 • ‘यतो धर्मस्ततो जया’ या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोधवाक्याला अर्थ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने, पक्षकारांना संपूर्ण न्याय देण्याकरिता घटना आम्हाला व्यापक अधिकार आणि अधिकारक्षेत्र देते, याचा सरन्यायाधीशांनी आवर्जून उल्लेख केला.

केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक बांगलादेशचे नागरिक :
 • केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानेच स्थान देण्यात आलेले मंत्री निसिथ प्रामाणिक हे बांगलादेशचे नागरिक असल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करावी, अशी विनंती राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. तथापि, प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी या आरोपाचे जोरदार खंडन केले असून प्रामाणिक यांचा जन्म आणि शिक्षण भारतातच झाले आहे, असे म्हटले आहे.

 • बराक बांगला आणि रिपब्लिक टीव्ही त्रिपुरा अ‍ॅण्ड डिजिटल मीडिया, इंडिया टुडे आणि बिझनेस स्टॅण्डर्ड या वृत्त वाहिन्यांनी प्रामाणिक हे बांगलादेशचे नागरिक असल्याचे म्हटले आहे, असा दावा बोरा यांनी पत्रामध्ये केला आहे. बोरा यांनी हे पत्र आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केले आहे.

 • प्रामाणिक यांचा जन्म बांगलादेशच्या गाईबंधा जिल्ह्यातील हरिनाथपूर येथे झाला आणि ते संगणकाच्या शिक्षणासाठी पश्चिम बंगालमध्ये आले असा दावा बोरा यांनी या बाबत आलेल्या वृत्तांच्या हवाल्याने केला. संगणक पदवी मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते कूचबिहारमधून खासदार म्हणून निवडून आले, असा दावाही बोरा यांनी केला.

विहिंप अध्यक्षपदी रवींद्र नारायण सिंह :
 • व्यवसायाने अस्थिव्यंग शल्यचिकित्सक असलेले पद्माश्री पुरस्काराचे मानकरी रवींद्र नारायण सिंह यांची शनिवारी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मूळचे बिहारचे असलेले सिंह हे आतापर्यंत विहिंपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. वैद्यकशास्त्रातील योगदानाबद्दल २०१० साली त्यांना ‘पद्माश्री’ हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता.

 • ‘आमच्या विश्वस्त मंडळाने पद्माश्री रवींद्र नारायण सिंह यांची  अध्यक्ष म्हणून निवड केली आहे’, असे विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एप्रिल २०१८ पासून विहिंपचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे विष्णू सदाशिव कोकजे यांची ते जागा घेतील.

 • ‘कोकजे  ८२ वर्षांचे आहेत. संघटनेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून ते मुक्त होऊ इच्छित होते. त्यांच्या इच्छेनुसार आणि आमच्या घटनेनुसार निवडणूक घेण्यात आली’, असे जैन यांनी सांगितले. सिंह हे प्रख्यात अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (ऑर्थोपेडिक सर्जन) आहेत. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय यांच्यासह इतर क्षेत्रांतील योगदानाबद्दल ते ओळखले जातात. अशा व्यक्तीची विहिंपच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे जैन म्हणाले.

विद्यापीठांचे नवे सत्र १ ऑक्टोबरपासून; ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया :
 • देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील नवे शैक्षणिक सत्र १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यासाठी प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावयाची आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्याबाबतची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

 • सीबीएसई, आयसीएसई आणि सर्व राज्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा सूचना उच्च शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

 • देशातील सर्व शालेय मंडळे आपले १२ वीचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याची अपेक्षा आहे. परंतु पात्रता परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्यास नवे  सत्र १८ ऑक्टोबरपासून सुरू होईल, असेही यूजीसीने म्हटले आहे. शिकविण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया ऑनलाइन, ऑफलाइन सुरू राहिलीच पाहिजे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये; ऑक्टोबरपासून नवीन सत्र :
 • विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना परीक्षांसाठीची नियमावली जाहीर केली आहे. करोना संसर्गामुळे या वर्षीचं सत्र सुरू करण्यास उशीर झाला आहे आणि परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता आयोगाने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना परिक्षांबद्दलचे निर्देश दिले आहेत.

 • आयोगाने सांगितलं की, २०२१-२२ च्या सत्रासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी आणि उरलेल्या रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. त्याशिवाय सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना १ ऑक्टोबर रोजी नवं शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशा सूचना आयोगाने केल्या आहेत.

 • तसंच परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिक्स पद्धतीने ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 • त्याचप्रमाणे यूजीसीने सांगितलं की १२वीच्या सर्व बोर्डांच्या परिक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागेल. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. सत्र परीक्षा घेण्याचा किंवा सत्र संपल्यानंतर सुट्ट्या देण्याचा निर्णय त्या त्या शिक्षणसंस्थांचा राहील.

आयर्लंडला दणका देत क्विंटन डी कॉकनं मोडला धोनीचा विक्रम :
 • दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात १२० धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने यष्टीरक्षक म्हणून सर्वात कमी वयात ही कामगिरी केली आहे. हा विक्रम पूर्वी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने ३० वर्ष आणि ९९ दिवस असे वय असताना १०,००० धावा केल्या होत्या. तर डी कॉकचे वय २८ वर्षे आणि २११ दिवस असे आहे.

 • डी कॉकने २५९ डावात १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने यासाठी २७२ डाव खेळले होते. धोनीने २९३ डावात १०,०००  धावा पूर्ण केल्या.

 • या सामन्यात डी कॉक आणि जानेमान मलान यांच्यात २२५ धावांची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडला ७० धावांनी पराभूत केले. यासह ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४ गडी राखून ३४६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडचा संघ २७६ धावा करुन सर्वबाद झाला. डी कॉकने ९१ चेंडूत १२२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ११ चौकार ठोकले.

१८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)