चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जुलै २०२०

Date : 18 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२०२१ टोक्यो ऑलिम्पिकचे वेळापत्रक या वर्षीसारखेच :
  • टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आली असली तरी या वर्षीप्रमाणेच स्पर्धेचे वेळापत्रक आणि लढतींचे ठिकाण सारखेच असणार आहे. टोक्यो संयोजन समितीकडून यासंबंधी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) देण्यात आली.

  • ऑलिम्पिकचा उद्घाटनाचा समारंभ पुढील वर्षी २३ जुलैला होणार आहे. मात्र महिलांच्या सॉफ्टबॉल आणि फुटबॉलच्या लढती दोन दिवस आधी म्हणजे २१ जुलैपासून सुरू होतील. पुरुषांचे फुटबॉलचे सामने २२ जुलैपासून होणार असून तिरंदाजी स्पर्धा २३ जुलैपासून होणार आहे. २४ जुलैपासून दिवसभराचे वेळापत्रक असेल. त्यामध्ये नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पदकाचा निकाल आहे. पुढील आठवडय़ात गुरुवारी (२३ जुलै) एक वर्ष बाकी म्हणून मोठा समारंभ न करता औपचारिकता पार पाडण्यात येणार आहे. हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाची सलामीची लढत २४ जुलैला न्यूझीलंडविरुद्ध आहे.

  • ‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख यांनी या आठवडय़ाच्या सुरुवातीला ऑलिम्पिक आयोजनासंदर्भातील अनेक शक्यता व्यक्त केल्या होत्या. ‘‘प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची अजिबात इच्छा नाही. ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करायचे आहे त्यामध्ये प्रेक्षकांचा समावेश महत्त्वपूर्ण आहेच. त्याच वेळेस खेळाडूंसह सहभागी सर्व मंडळींचे सुरक्षित आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे,’’ असे बाख म्हणाले.

महाराष्ट्रात ८ हजार ३०८ नवे करोना रुग्ण, २५८ मृत्यूंची नोंद :
  • महाराष्ट्रात ८ हजार ३०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये २५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत.

  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५४.८१ टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.९१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

  • सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४४ हजार २८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात समोर आलेल्या संख्येनुसार आज १ लाख २० हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ३०८ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही २ लाख ९२ हजार ५८९ इतकी झाली आहे.

‘ही’ मोबाईल कंपनी आणणार ‘मेक इन इंडिया’ स्मार्टफोन; भारतात करणार ७,५०० कोटींची गुंतवणूक :
  • स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवून ५० हजार करण्यात येणार आहे.

  • “कंपनीनं भारतात ७ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता सध्याच्या ३.३ कोटी युनिट्सवरून १२ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.

  • “विवो भारतात इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापनाही करणार आहे. त्यानंतर ना केवळ मेक इन इंडियाच उत्पादनांची निर्मिती होईल तर मोबाईलचं डिझाईनदेखील भारतातच तयार केलं जाईल,” अशी माहिती निपुण मारया यांनी दिली. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सध्या हे डिझाईन सेंटर भारतीय ग्राहकांच्या गरजेवर लक्ष देणार आहे. तसंच भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन २०२०-२१ च्या दरम्यानच लाँच होणार आहे.

  • मारया यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात ५जी साठी तयार केलेल्या X50 सीरिजचा स्मार्टफोन लाँच करत प्रिमिअम सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉरल लोकल या अभियानालाही आपलं समर्थन असल्याचं ते म्हणाले.

भगवान राम नेपाळीच होते हे सिद्ध करण्यासाठी नेपाळने घेतला ‘हा’ निर्णय :
  • “भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काही दिवसांपूर्वी केलं होते. “भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत. 

  • अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे, असंही ओली म्हणाले होते. मात्र आता या वक्तव्यानंतर नेपाळच्या पुरातत्व विभागाने पंतप्रधानांचा दावा खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

  • नेपाळच्या पुरातत्व विभागाने लवकरच श्री रामाच्या नेपाळमधील जन्मस्थानासंदर्भातील अभ्यास आणि संशोधनाचे काम हाती घेणार असल्याची घोषणा केली आहे. “एक जबाबदार संस्था म्हणून नेपाळचे पुरातत्व विभाग काम करतो. मागील अनेक वर्षांपासून हा विभाग देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी उत्खनन, संशोधन आणि अभ्यास करत आला आहे,” असं नेपाळच्या पुरातत्व विभागाचे महासंचालक दामोदर गौतम यांनी सांगितलं. आता पंतप्रधानांनीच भगवान रामाच्या जन्मासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर यासंदर्भात पुरातत्व विभागाला मागे फिरता येणार नसल्याचे गौतम यांनी सांगितलं.

करोनाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं-मोदी :
  • करोना नावाच्या संकटाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनाचं संकट जेव्हा भारतात आलं तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभी राहिली आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात करोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

  • भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत निश्चित चांगले आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. भारताने जनतेला करोनाच्या लढाईशी जोडलं. प्रत्येकजण करोनाशी लढा देतो आहे. आपल्या देशावर आलेलं संकट परतवून लावायचं आहे हा निर्धार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरु केली आहे.आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अन्न सुरक्षा योजनेचाही उल्लेख केला आहे.

  • संयुक्त राष्ट्राच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअल सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी भारताने नैसर्गिक संकटांशी केलेला सामना, करोनाविरोधातली लढाई, गरीबांसाठी राबवलेल्या योजना आणि आत्मनिर्भर भारत या मुद्यांवर भाषण केलं.

१८ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.