महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार
- स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
- उदय सामंत यांनी सांगितलं की, “डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.”
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे,” अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
- ‘या’ कंपन्यांनी केला सामंजस्य करार
ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड – १२ हजार कोटींची गुंतवणूक
हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – १६ हजार कोटींची गुंतवणूक
आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल – १६ हजार कोटींची गुंतवणूक
रुखी फुड्स – २५० कोटींची गुंतवणूक
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड – १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक
ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा: नोव्हाक जोकोव्हिचचे विजयी पुनरागमन
- करोना लस न घेतल्याने गतवर्षी ऑस्ट्रेलियातून माघारी परतावे लागलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकेव्हिचने यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचने मंगळवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत स्पेनच्या रोबेटरे कॅरबाल्लेस बाएनाला ६-३, ६-४, ६-० असे सहज नमवले.
- दुसरीकडे, अनुभवी अँडी मरेने इटलीच्या १३व्या मानांकित माटेओ बेरेट्टिनीला पराभवाचा धक्का दिला.जोकोव्हिचला पहिल्या फेरीच्या लढतीत चाहत्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच त्याच्या विजयापेक्षा लक्षवेधी ठरला. संपूर्ण लढतीदरम्यान स्टेडियम ‘नोला’च्या गजराने गुंजून गेले होते. तसेच सर्बियाचे ध्वजही मोठय़ा प्रमाणावर दिसत होते.
- ब्रिटनच्या बिगरमानांकित मरेने आपल्या खेळातील चुणूक नव्याने दाखवताना बेरेट्टिनीचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ६-३, ४-६, ६-७ (७-९), ७-६ (१०-६) असा पराभव केला. दुखापतीमधून सावरल्यावर पुनरागमन करणाऱ्या डॉमिनिक थिमला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला. मात्र, पहिल्याच फेरीत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने थिमवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात केली.
- महिला एकेरीच द्वितीय मानांकित ओन्स जाबेऊरला विजयासाठी विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. जाबेऊरने तामरा झिदान्सेकचा ७-६ (१०-८), ४-६, ६-१ असा पराभव केला. एलिसे मेर्टेन्सने दोन ग्रँडस्लॅम विजेत्या गार्बिन मुगुरुझाला ३-६, ७-६ (७-३), ६-१ असे नमवले.
मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती
- मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच (१८ जानेवारी) सुरुवात होणार आहे.
होणार ५ टक्के कर्मचारीकपात
- स्काय न्यूज आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ५ टक्के कर्मचारीकपात केली जाणार आहे. या कारवाईअंतर्गत एकूण ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यात आहे. आजपासूनच त्याची सुरुवात होणार असून मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग या विभागांत ही नोकरकपात केली जाऊ शकते.
गेल्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
- मायक्रोसॉफ्ट कंपनीत जगभरात ३ लाख २१ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. यामध्ये एकट्या अमेरिकेत १ लाख २२ हजार कर्मचारी आहेत. तर ९९ हजार कर्मचारी हे जगभरात विस्तारलेले आहेत. मागील काही दिवसांपासून पर्सनल कॉम्प्यूटर विक्री क्षेत्रात मंदी आहे. त्याचा फटका मायक्रोसॉफ्ट या कंपनीला बसलेला आहे. याच कारणामुळे मायक्रोसॉफ्टकडून हा निर्णय घेण्यात येतोय. मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी जुलै महिन्यातच काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. Axios या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जवळपास १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.
देशात करोनाबाधितांची संख्या १०० पेक्षा खाली, ४ दिवसांपासून एकाचाही मृत्यू नाही
- मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. येथे रुग्णांची संख्या रोज वाढत असून रुग्णालये अपुरे पडू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात मात्र रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. मार्च २०२० पासून सोमवारी पहिल्यांदाच नव्या करोनाग्रस्तांची संख्या १०० पेक्षा खाली गेली आहे. तसेच मार्च २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवस एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
- देशात करोनाचा संसर्ग सध्या अटोक्यात आहे. शासकीय आकडेवारीनुसार देशात मार्च २०२० पासून पहिल्यांदाच नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा १०० पेक्षा खाली गेला आहे. तसेच २०२० पासून पहिल्यांदाच सलग चार दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी भारतात ८३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी हीच संख्या ११४ होती. याआधी भारतात १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्येची नोंद २७ मार्च २०२० रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा खाली आलेली नव्हती.
- सध्या दक्षिण भारतासह महाराष्ट्रात नव्याने करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात देशात १०६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यातील ८३१ रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. दिल्लीमध्ये सोमवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये एकूण ३२ नवे रुग्ण आढळले.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका: सातत्यपूर्ण कामगिरीचे भारताचे ध्येय
- श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश संपादन केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत त्यांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असेल. हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्यात इशान किशनला मधल्या फळीत संधी मिळणे अपेक्षित आहे. त्याचा या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असेल.
- या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने आता प्रत्येकच सामन्याचे महत्त्व वाढले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली.
- फलंदाजीत रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी, तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी चमक दाखवली. मात्र, आता तुल्यबळ न्यूझीलंडकडून भारताला अधिक आव्हान मिळणे अपेक्षित आहे.
देशात १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून ? ; करोना गटाचे कार्याध्यक्ष डॉ. अरोरा यांचे संकेत :
मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली.
देशात १५-१८ वयोगटातील मुलांची संख्या सात कोटी ४० लाख ५७ हजार असून त्यापैकी तीन कोटी ४५ लाख मुलांनी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतली आहे. जानेवारीच्या अखेपर्यंत बहुतेक मुलांची पहिली मात्रा पूर्ण होईल.
२८ दिवसांनी दुसरी मात्रा देण्यात येणार असल्याने त्यांचे लसीकरण मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले. १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. हे लसीकरण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे अरोरा म्हणाले.
आंतरराष्ट्रीय मंचावरून भाषण देताना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने उडाला पंतप्रधान मोदींचा गोंधळ :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असं मोदींनी यावेळीस जगभरातील देशांना सांगितलं.
आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांचा भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतेय या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल.
झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.
सौरव गांगुली BCCIच्या अध्यक्षपदावरून हटणार? जाणून घ्या कारण :
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून पायउतार होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे.
अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनवण्यात आले, त्याआधी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता.
सौरव गांगुली २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संबंधित होता. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, त्याचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत मंडळाला नवा अध्यक्ष मिळू शकतो. गांगुलीच्या अध्यक्षपदाखाली भारताने अनेक द्विपक्षीय मालिकेतही यश संपादन केले.
गांगुलीच्या कार्यकाळातच राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण नव्या इंनिंगसाठी सज्ज झाले. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून बंगळुरूमध्ये काम करत होता, त्यानंतर गांगुलीने त्याला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास राजी केले. याशिवाय, गांगुलीने लक्ष्मणशीही बोलून त्याला NCAमध्ये सामील होण्यासाठी राजी केले.
जर तुम्हीही एजंटकडून बुक करत असाल रेल्वे तिकीट, तर आताच व्हा सावध; अन्यथा भरावा लागेल दंड :
करोना महामारीच्या दरम्यान रेल्वेकडून तिकीट कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट बुक करून आणि ती कन्फर्म झाल्यानंतरच प्रवास करता येणार आहे. तथापि, काही सवलतींमध्ये आता प्लॅटफॉर्मवरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.
काही लोक त्यांच्या मोबाईल किंवा इतर डिव्हाईसवरून आगाऊ रेल्वे तिकीट बुक करतात तर काही लोक प्रवासासाठी दलालांसोबत संपर्क साधतात. अशातच, भारतीय रेल्वे आयआरसीटीसीने प्रवाशांनी बेकायदेशीररित्या तिकीट बुक न करण्याचा इशारा दिला आहे.
हे दलाल तिकीट बुकिंगच्या नावावर प्रवाशांकडून जास्त शुल्क आकारतात. तसेच अनेकदा चुकीचे तिकीट सुद्धा देतात. या गोष्टीचा विचार करून रेल्वेने याबाबत सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने अवैध पद्धतीने तिकीट बुक करणाऱ्या आणि प्रवाशांकडून जास्त पैसे घेणाऱ्या दलालांवर कारवाई सुरु केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलांतर्फे सहा मंडळांमध्ये प्रत्येक दिवशी विशेष मोहीम चालवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनी देखील या गोष्टीपासून सावध राहावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय.
पंजाब विधानसभेची निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला :
राज्य सरकार तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेली मागणी मान्य करून, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात होणारी निवडणूक गुरू रविदास जयंतीच्या कारणास्तव १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सोमवारी घेतला.
गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाणार असल्याने ते १४ फेब्रुवारीला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, भाजप व त्याचे मित्रपक्ष, बसप व इतर संघटनांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार, ही निवडणूक आता २० फेब्रुवारीला होईल, असे आयोगाने एका निवेदनात सांगितले. ही तारीख उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्याशी जुळणारी आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका तसेच पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.
ऑक्टोबर २०१३ मध्ये मिझोराममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही तारखा आयोगाने बदलून नोव्हेंबरमध्ये केल्या होत्या. एप्रिल २०१४ मध्ये मिझोराममधील एका पोटनिवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले होते, तसेच अशाच कारणांसाठी मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.