चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2023

Date : 18 February, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…

  • सध्या जगभरात दिग्गज टेक कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच Google या दिग्गज टेक कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. पुन्हा एकदा Google ने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुगलच्या भारतातील युनिट्समधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.
  • गुगलने आपल्या भारताच्या युनिटमधील ४५३ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या बिझनेसलाईनच्या अहवालानुसार या ४५३ भारतीय कमर्चाऱ्यांना (Google indian Employee layoff) काढून टाकण्याची कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आणि याची माहिती मेलद्वारे देण्यात आली. हा मेल गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे.गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची सहमतीही या मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे.
  • अहवालानुसार, अनेक कारणांमुळे कमर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असून, सुंदर पिचाई यांनी या सर्व निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पाठवलेल्या मेमो मध्ये त्यांनी दावा केला होता की, गुगलचे यूएसच्या बाहेरील Google कमर्चाऱ्यांना स्थानिक नियमांनुसार स्थानिक पद्धतींनुसार समर्थन मिळेल. google ने भारतातील ४५३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र जागतिक स्तरावर किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे किंवा कंपनीने मध्ये अजून कमर्चारी कपात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

  • भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर १२ दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे. भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
  • भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे. दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे २३०० किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल. नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या योगदाना प्रकाशझोतात आणणे, तरूणींना भारतीय नौदलामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे, लोंगेवाला युद्धस्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणे, संपूर्ण रॅलीमार्गात नौदलातील वीरांगनांशी संवाद साधणे, एनडब्ल्यूडब्ल्यूए (नेव्ही वेल्फेअर अॅण्ड वेलनेस असोसिएशन) दिनाचे औचित्य म्हणून एनडब्ल्यूडब्ल्यूएचे उद्देश, हेतू सर्वांपर्यंत पोहोचवणे आदी उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ‘शी इज अनस्टॉपेबल’ हे या रॅलीचे बोधवाक्य आहे. या मोहिमेचे आभासी उद्घाटन नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के. हरी कुमार यांच्याहस्ते पार पडले.
  • शी इज अनस्टॉपेबल’ या अनोख्या रॅलीमध्ये महिला नौदल अधिकारी आणि खलाशी तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या पत्नींचा समावेश आहे. भारतीय नौदलामध्ये आपल्या भरीव कामगिरीने बदल घडवून आणणाऱ्या आणि संपूर्ण नौदलासाठी आदर्श ठरलेल्या महिलाही यात सहभागी होणार आहेत. या आगळ्या साहस मोहिमेविषयी जीप इंडियाच्या प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाल्या, केवळ संपूर्णपणे महिलांसाठी खास अशी मोहीम राबविणाऱ्या भारतीय नौदलाच्या पाठीशी उभे राहणे हे आम्हांला सन्माननीय वाटते. एक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच महिला नेतृत्व आणि सर्वच क्षेत्रातील महिलांच्या समानतेवर विश्वास ठेवत आलो आहोत.

IPLचे बिगुल वाजले! पहिला सामना ३१ मार्चला तर २८ मे रोजी अंतिम सामना; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली की, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीचे आव्हान असेल. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
  • ५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल. गेल्या वेळी गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळला. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला होता.
  • आयपीएल २०१९ नंतर प्रथमच सर्व संघांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे २०२० मध्ये यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याच वेळी, २०२१ मध्ये भारतात काही मैदानांवर सामने खेळवले गेले होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते मध्यभागी थांबवले गेले आणि यूएईमध्ये पूर्ण झाले. २०२२ मध्ये ही स्पर्धा संपूर्णपणे भारतात खेळली गेली, परंतु मुंबई-पुणे येथे लीग सामने आणि अहमदाबाद-कोलकता येथे प्लेऑफ सामने खेळले गेले.
  • सर्व १० संघ साखळीमध्ये १४-१४ सामने खेळावे लागतील - सर्व १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ १४-१४ सामने खेळेल. या दरम्यान, प्रत्येक संघाला त्यांच्या घरी ७ सामने खेळावे लागतील, तर उर्वरित ७ सामने विरोधी संघाच्या मैदानावर खेळावे लागतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ ७ होम आणि ७ अवे सामने खेळेल.

गुंतवणूकदारांच्या हितासाठी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक

भांडवली बाजार नियामक प्रणालीच्या (सेबी) मजबुतीकरणासाठी तज्ज्ञ समितीवर कोणाची नियुक्ती करावी याबाबतच्या सूचना बंद लिफाफ्यातून देण्याचा केंद्राचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आणि गुंतवणूकदारांचे हितरक्षण करताना संपूर्ण पारदर्शकता राखली जावी, असे सुनावले.

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2023

 

शिवछत्रपती पुरस्कार यंदाही नाही :
  • करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला यंदा सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. गतवर्षीप्रमाणेच (२०१९-२०) यंदाही (२०२०-२१) शिवछत्रपती पुरस्कार दिले जाणार नाहीत. परंतु करोनातून सावरत क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढील वर्षीपासून हे पुरस्कार नियमितपणे दिले जातील, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी दिले.

  • १९६९-७०पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या काही वर्षांत १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनाचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली होती. २०२०मध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारीला झालेल्या शानदार कार्यक्रमात ६३ जणांना २०१८-१९च्या पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु गेली दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या वर्षीही पुरस्कार लांबणीवर पडल्याचे केदार यांनी सांगितले.

  • राज्य शासनाकडून शिवजयंतीचा मुहूर्त बऱ्याचदा चुकवला जातो. २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ हे तीन वर्षांचे प्रलंबित पुरस्कार एकत्रितपणे देण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१७-१८ आणि २०१८-१९च्या शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण करताना अनुक्रमे विनोद तावडे आणि केदार या राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी शिवजयंतीचा मुहूर्त साधला होता, परंतु या प्रथेत करोनामुळे दोनदा खंड पडला आहे.

हिजाब वादावर लवकरच तोडगा; कर्नाटक सरकारचा विश्वास :
  • कर्नाटकमधील ७५ हजारांपैकी फक्त आठ उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांत हिजाबचा वाद असल्याचे कर्नाटक सरकारने गुरुवारी सांगितले, तसेच हा मुद्दा सोडवण्यात येईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला.

  • हिजाब वादाशी संबंधित सर्व याचिकांवर निर्णय होईपर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धार्मिक पेहराव करून वर्गात बसण्यास मनाई केली होती. तथापि, गुरुवारीदेखील काही विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ व ‘बुरखा’ घालून वर्गात बसून द्यावे असा हट्ट कायम ठेवल्याने हा वाद शमला नाही.

  • ही ‘समस्या’ काही मोजक्या उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांतच आहे, असे कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी येथे पत्रकारांना सांगितले. ‘७५ हजार शाळा व महाविद्यालयांपैकी आठ महाविद्यालयांतच ही ‘समस्या’ आहे. आम्ही यावर तोडगा काढू. सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या आदेशाचे पालन केले याबद्दल आम्हाला आनंद आहे’, असे ते म्हणाले.

  • बल्लारीतील सरलादेवी महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींना आत जाऊ न देण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेसमोर धरणे दिल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस आणि वकिलांनी समजूत घातल्यानंतर निदर्शक पांगले.

लातूर केंद्रावर राज्य नाटय़ स्पर्धेचे प्रयोग रंगणार :
  • महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेसाठी लातूर येथे केंद्र मंजूर झाले आह़े. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून हे केंद्र मंजूर झाले.

  • दरम्यान, राज्य नाटय़ स्पर्धेच्या लातूर केंद्राचे वेळापत्रक जाहीर झाले असून २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दररोज सायंकाळी सात वाजता विविध नाटकांचे सादरीकरण होणार आह़े.

  • महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचे लातूरला केंद्र व्हावे, ही लातूर जिल्ह्यातील नाटय़ कलावंत, नाटय़ रसिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती़. त्याचा विचार करून हे केंद्र मंजूर झाले आह़े. लातूरला केंद्र नसल्याने लातूरच्या कलावंतांना सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड अशा केंद्रांवर जाऊन नाटय़कृती सादर करावी लागत होती़.

  • लातूरच्या प्रेक्षकांनाही स्पर्धेत सादर होणारी नाटके पाहता येत नव्हती. या नाटकांचा जास्तीत जास्त नाटय़ रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आह़े.

सिंगापूरच्या पंतप्रधानांकडून पंडित नेहरुंचं कौतुक; पण ‘त्या’ एका वक्तव्यावर मोदी सरकारने घेतला आक्षेप :
  • सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी बुधवारी त्यांच्या संसदेत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख केला. लोकशाही कशी चालावी असं सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांचं उदाहरण दिलं. दरम्यान यावेळी त्यांनी सध्याच्या घडील असणाऱ्या भारतीय लोकप्रतिनिधींवर दाखल गुन्ह्यांचा उल्लेख करत टीकादेखील केली. यानंतर भारताने आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सिंगापूरच्या भारतातील राजदूत सायमन वोंग यांना समन्स बजावला आहे.

  • सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सिंगापूरच्या उच्चायुक्तांकडे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलेली शेरेबाजी अनावश्यक आहे. आम्ही हा मुद्दा त्या देशाकडे उपस्थित केला आहे,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

  • संसदेतील चर्चेदरम्यान बोलताना सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी लोकशाही कशी चालावी यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांचं उदाहरण दिलं. वर्कर्स पार्टीच्या माजी खासदाराविरुद्धच्या तक्रारींवरील समितीच्या अहवालावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केलं.

तिरुपती देवस्थानाला ९.२ कोटींचे मरणोत्तर दान :
  • चेन्नईतील ७६ वर्षांच्या एका महिलेने तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराला ९.२ कोटी रुपयांचे मरणोत्तर दान केले आहे.

  •  पार्वतम नावाच्या या अविवाहित स्त्रीच्या वतीने तिच्या बहिणीने ६ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आणि ३.२ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट गुरुवारी सकाळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांना मंदिरात सोपवला, अशी माहिती मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • ३.२ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा विनियोग या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या मुलांसाठीच्या अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी करावा, अशी विनंती कुटुंबीयांनी टीटीडीला केली.

निर्बंध शिथिल करा; रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना :
  • देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़

  • करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडय़ात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली़  गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळल़े दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले’’ याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आह़े ‘‘करोना

  •  रुग्णवाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले  सार्वजनिक आरोग्य संकटाला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी,’’ असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आह़े

  • सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत, असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आह़े करोना नियंत्रणाबरोबरच नागरिकांचे जीवन आणि उपजीविकेवरील करोनाचा दुष्परिणाम कमीतकमी असेल, यावर भर देण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार राजेश भूषण यांनी या पत्रात केला़.

१८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.