चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 डिसेंबर 2023

Date : 18 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
६० कोटी भारतीयांच्या जीवनमानात सुधारणा! अमित शहा यांची मोदी सरकारवर स्तुतिसुमने
  • देशातील ६० कोटी गरीब लोकांचे जीवनमान सुधारणे हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला. अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला संबोधित करताना शहा यांनी मोदी सरकारचे गुणगान गायले.
  • शहा म्हणाले, की ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करून भारताला सुरक्षित केले, अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले, अयोध्येत श्रीराम मंदिराचे बांधकाम हाती घेतले, चंद्रयान मोहिमेच्या माध्यमातून भारताला चंद्रावर नेले, स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वोत्तम आर्थिक परिमाणे गाठली आणि स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च औद्योगिक विकासाचे नेतृत्व केले.’’ ते पुढे म्हणाले की अनेकदा पत्रकार नरेंद्र मोदींच्या यशाबद्दल विचारणा करतात. ‘‘कोणत्याही वाद, संभ्रम किंवा दुमताविना मी असे सांगेन, की ६० कोटी भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी यांनी केलेल्या कामाला मी सर्वाधिक गुण देईन’’.
  • या वेळी अमित शहा यांनी उपस्थितांना देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेण्याची विनंती केली.
तीन राज्यांत भाजपानं मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्यांना संधी का दिली? पंतप्रधान मोदी म्हणाले…
  • नुकतेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या तिन्ही राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी दिग्गज नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे.
  • ‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या देशाचं दुर्दैव आहे की, जे लोक आपल्या भाषणातून बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्वातून समाजजीवनावर प्रभाव पाडतात, त्यांच्यातील एक मोठा वर्ग जुन्या आणि बंदिस्त मानसिकतेत अडकला आहे. हे फक्त राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. ही प्रवृत्ती सार्वत्रिक जीवनात सगळीकडे आपल्याला त्रास देत असते.”

“माध्यमांचं लक्ष काही कुटुंबावरच अधिक राहिलं”

  • “जसे कुठल्याही क्षेत्रात एखादं नाव मोठं झालं, कुणीतरी आपली जाहिरात केली तर बाकीच्या लोकांवर लक्ष जात नाही. मग, तो व्यक्ती कितीही प्रभावशाली असो किंवा चांगलं काम करत असू. तेच, राजकीय क्षेत्रातही होत असतं. दुर्दैवाने अनेक दशकांपासून माध्यमांचं लक्ष काही कुटुंबावरच अधिक राहिलं आहे,” असं मोदींनी सांगितलं.

“भाजपा हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे”

  • “त्यामुळे नवीन लोकांच्या उपयुक्तेबाबत चर्चा होत नाही. म्हणून कधी-कधी काही लोक तुम्हाला नवीन वाटतात. पण, ही लोक नवीन नसतात, हेच सत्य आहे. त्यांच्याकडे मोठा अनुभव असतो. भाजपा हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे. संघटनेत काम करताना कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी त्याच्यातील कार्यकर्ता नेहमी जिवंत असते,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
अयोध्येत मशिदीचे बांधकाम मेपासून
  • रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे मुस्लिमांना अयोध्येतील धन्नीपूरमध्ये देण्यात आलेल्या जागेत मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
  • धन्नीपूरमध्ये मशिदीचे बांधकाम करत असलेल्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’ने  निधी संकलनासाठी पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपासून वेगवेगळय़ा राज्यांमध्ये प्रभारी नियुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे.मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारूकी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, आतापर्यंतच्या योजनेनुसार धन्नीपूरमधील पाच एकर जागेवर मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. मशिदीचा अंतिम आराखडा फेब्रुवारीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये राम जन्मभूमी – बाबरी मशीदप्रकरणी निकाल देताना वादग्रस्त जागेवर राम मंदिराचे बांधकाम करण्याचे आणि मुस्लिमांना आध्योध्येतील प्रमुख ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे.
सशस्त्र दलांत परंपरा-नावीन्याचे संतुलन आवश्यक!संरक्षणमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त 
  • ‘‘सशस्त्र दलांनी परंपरा जपताना नावीन्याचा अंगीकार करून, दोहोंत समतोल साधावा,’’ अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. हैदराबादजवळील दुंडीगल येथील हवाई दल अकादमीमध्ये संयुक्त पदवी प्रदान संचलन सोहळय़ास संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी परंपरा आणि नावीन्याचे महत्त्व मांडले.
  • संरक्षणमंत्री म्हणाले की, ‘‘फक्त परंपरांचे पालन केल्याने ही व्यवस्था तलावातील साचलेल्या पाण्यासारखी होते आणि जर त्याला नावीन्याची जोड दिली गेली तर ती वाहत्या नदीप्रमाणे जिवंत होते’’. सशस्त्र दलांमध्ये परंपरा महत्त्वाच्या आहेत. कारण त्या काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. त्यांनी दीर्घ काळापासून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे परंपरांना योग्य महत्त्व देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
  • सिंह यांनी हवाई दलातील नवनियुक्त वैमानिकांना (फ्लाइंग ऑफिसर) नेहमीच नवीन विचार आणि विचारधारा जपण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, संरक्षणमंत्र्यांचे हवाई दलप्रमुख ‘एअर चीफ मार्शल’ व्ही. आर. चौधरी यांनी स्वागत केले. या सोहळय़ाद्वारे हवाई दलाच्या २५ महिलांसह एकूण २१३ छात्रांना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विविध शाखांत औपचारिकरीत्या रुजू करण्यात आले. उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आठ जणांची भारतीय नौदलातील अधिकारी, भारतीय तटरक्षक दलात नऊ आणि मित्रदेशांतील दोन जणांना ‘िवग्ज’ प्रदान करण्यात आले.
  • या सोहळय़ाचे प्रमुख वैशिष्टय़ असलेल्या ‘कमिशिनग सेरेमनी’मध्ये पदवीधर ‘फ्लाइट कॅडेट’ना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे ‘स्ट्राइप्स’ प्रदान करण्यात आले. ‘फ्लाइंग ऑफिसर’ अतुल प्रकाश यांना वैमानिक अभ्यासक्रमात अव्वल क्रमांकाबद्दल राष्ट्रपती सन्मानपत्र आणि हवाई दल प्रमुख ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात ‘आयुष्यमान भारत’चे नऊ लाख लाभार्थी; लाभार्थी राज्यांमध्ये महाराष्ट्र १२ व्या स्थानावर
  • आरोग्य सेवा नागरिकांच्या आवाक्यात यावी, तसेच त्यांच्यावर स्वस्तात उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारुपाला आली असून या योजनेंतर्गत मागील चार वर्षांमध्ये तब्बल चार कोटी ९८ लाख २ हजार ९५९ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त ९ लाख ४९ हजार ३२९ नागरिकांनीच लाभ घेतला असून, या योजनेचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र देशात १२ व्या स्थानकावर आहे.
  • देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मधुमेह, कर्करोग, हृदय रोग यासह विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखांपर्यंतच आरोग्य सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये देशामध्ये ७० लाख ६ हजार नागरिकांनी लाभ घेतला होता. तर २०२३-२४ मध्ये लाभार्थ्यांची संख्या १ कोटी १९ लाखावर पोहोचली.
  • देशातील लाभार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत फारच धीम्या गतीने वाढत आहे. तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मागील चार वर्षांमध्ये ९ लाख ४९ हजार ३२९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
  • २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांची संख्या फक्त १ लाख ३३ हजार ९२६ इतकी झाली आहे. २०२३-२४ मध्ये आसाम, छत्तीसगड, तेलंगणा व जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधील लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख ते ९ लाखांपर्यंत होती. त्याच वेळी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३३ हजार इतकी आहे. महाराष्ट्रातील २०८ सरकारी रुग्णालयांसह ८३६ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र असे असताना आजही अनेक नागरिक या योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.

18 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.