चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ डिसेंबर २०२१

Date : 18 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘कोव्होव्हॅक्स’ला ‘डब्ल्यूएचओ’ची मान्यता :
  • सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्होव्हॅक्स’ या करोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी मंजुरी दिली. करोनाविरोधातील लढाईत त्यामुळे आणखी एका लशीची भर पडली आहे.  

  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोव्होव्हॅक्स’च्या मुलांवरील आपत्कालीन वापरास परवानगी देण्याच्या निर्णयाचे ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले.

  • करोनाविरोधातील आपल्या लढाईतील हा आणखी एक मैलाचा दगड आहे. कोव्होव्हॅक्सला ‘डब्ल्यूएचओ’ने मान्यता दिली असून ही लस सुरक्षित आहे, तसेच तिची परिमाणकारकताही सिद्ध झाली आहे, असे ट्वीट अदर पुनावाला यांनी केले आहे.

  • दर्जा, सुरक्षितता आणि परिणामकारकता, जोखीम व्यवस्थापन आराखडा आदींबाबतच्या भारताच्या औषध महानियंत्रकांच्या अहवालाच्या आधारे ‘कोव्होव्हॅक्स’ला आपत्कालीन मंजुरी देण्यात आल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान  जाहीर झाला आहे. याबद्दल मोदी यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले आहेत.

  • दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील तसेच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

  • भूतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. भूतानच्या विकासाचे प्रारूप हे शाश्वत असल्याचे  कौतुक मोदींनी केले आहे. २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.

कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा - महाराष्ट्राला तिहेरी जेतेपद :
  • रांची येथे सुरू असलेल्या १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने तिहेरी (फ्री-स्टाइल, ग्रीको रोमन, महिला) सांघिक जेतेपद मिळवले. महाराष्ट्राने स्पर्धेत एकूण १९ पदकांची लयलूट केली. यामध्ये सात सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.

  • फ्री-स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी एकूण चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई करून अग्रस्थान मिळवले. धनराज शिर्के (४४ किलो वजनी गट), पंकज पाटील (४८ किलो), तनिष्क कदम (६२ किलो), ओमकार शिंदे (८५ किलो) या चौघांनी महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकावर नाव कोरले. शुभम आचफळने (५२ किलो) रौप्यपदक जिंकले. सोहम कुंभार (४१ किलो), रोहन पाटील (३८ किलो) यांनी कांस्यपदक प्राप्त केले.

  • महिलांच्या विभागात महाराष्ट्रासाठी श्रावणी लवटे (३६ किलो), अहिल्या शिंदे (५० किलो), प्रगती गायकवाड (५८ किलो) यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. समीक्षा जाधव (३३ किलो), गौरी पाटील (४२ किलो), जानवी गोडसे (५८ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले.

  • ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही. या प्रकारात ओम चौगुले (४४ किलो), विनय पुजारी (८५ किलो) यांनी रौप्यपदकाचा वेध घेतला. तर यश रांजणे (४१ किलो), तुषार पाटील (६२ किलो), ओम कराळे (३८ किलो) आणि वैष्णव अडकर (६८ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा :
  • करोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. यामुळे आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती.

  • मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज (१७ डिसेंबर) काढला आहे.

  • या शासन निर्णयात म्हटले आहे, “करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिध्द झाल्या नाही. त्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश व नियुक्तीसाठी निश्चित कमाल वयोमर्यादा १ मार्च २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनेक उमेदवारांनी ओलांडली.

  • अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.”

१८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.