चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 ऑगस्ट 2023

Date : 18 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लिपिक-टंकलेखक, कर सहायक पदाच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. लिपिक टंकलेखक संवर्गात मराठीसाठी  १ हजार ६२, इंग्रजीसाठी १६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली, तर कर सहायक पदासाठी २२५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. 
  • एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  टंकलेखक भरतीमध्ये मराठी टंकलेखनामध्ये लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम, राधिका गोलहार यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. तर इंग्रजी टंकलेखनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक, मनोहर माळी यांनी मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक आणि ज्योती काटे यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
  • तसेच कर सहायक पदासाठीच्या भरतीचा निकालही जाहीर करण्यात आला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल जेंगठे यांनी राज्यातून आणि मागासवर्गीयांतून प्रथम क्रमांक, तर अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी महिला गटातून प्रथम क्रमांक मिळवला. शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात आल्याचे एमपीएससीने नमूद केले.
पेपर फुटला की कॉपी? तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट
  • तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथील एका केंद्रावर पेपर फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.  एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नांची छायाचित्रे आढळून आली असली तरी प्रथमदर्शनी हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी करण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारामुळे तब्बल चार वर्षांनी होत असलेल्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
  • १० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षा एकाच वेळी न घेता टप्प्याटप्प्याने होणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, गुरूवारी येथील म्हसरूळच्या केंद्राबाहेर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे टॅब, दोन भ्रमणध्वनी, वॉकी टॉकी, हेडफोन असले अत्याधुनिक साहित्य आढळून आले. त्याच्या झडतीमध्ये भ्रमणध्वनीमध्ये तलाठी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे छायाचित्र आढळून आले आहे. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा रंगली असतानाच तपास यंत्रणेने मात्र ही शक्यता नाकारली आहे.
  • संशयिताची तातडीने चौकशी सुरू केली असून तो काही परीक्षार्थीना कॉपी पुरवित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. या प्रकारात आणखी तीन-चार जण सहभागी असण्याची शक्यता असून त्यांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तर या प्रकरणी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेकडून काही तांत्रिक माहिती हवी असल्यास तसेच लेखी पत्र देण्याची सूचनाही पोलिसांना केल्याची वाघ म्हणाले.
चंद्रयानाच्या ‘लँडर’चे विलगीकरण यशस्वी; २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर ‘लँडिंग’
  • ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पार पडला. मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडय़ूल) लँडर मॉडय़ूल विलग करण्यात यश आले असून आता या लँडिंग मॉडय़ूलचा चंद्र पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची (लँडिंग) सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे.
  • ‘विक्रम’ हा लँडर आणि त्यावर असलेला ‘प्रग्यान’ हा रोव्हर मुख्य यानापासून यशस्वीरीत्या विलग झाल्याचे ‘इस्रो’ने एक्स या समाजमाध्यम खात्यावर जाहीर केले. आता विलग झालेले लँडर मॉडय़ूलची चंद्राभोवतीची कक्षा अधिक घटविली जाणार असून प्रोपल्शन मॉडय़ूल येते काही महिने किंवा वर्षे आहे त्याच कक्षेमध्ये चंद्रभोवती परिभ्रमण करेल आणि चंद्र तसेच पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास सुरू ठेवेल, असे इस्रोने स्पष्ट केले. २३ ऑगस्ट रोजी या मोहिमेतील सर्वाधिक अवघड आणि शेवटचा टप्पा असेल. या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे अवतरण केले जाईल. चंद्रयान-२ मोहीम याच टप्प्यावर अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने या प्रक्रियेमध्ये अनेक बदल केले असून यावेळी निश्चित यश येईल, असा संशोधकांना विश्वास आहे. 
  • आतापर्यंत अस्पर्शित राहिलेल्या चंद्राच्या दक्षिण धृवावर ‘विक्रम’ उतरणार आहे. त्यानंतर त्यावर बसविलेला ‘प्रग्यान’ हे स्वयंचलित यान चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करेल आणि तेथील माती, दगड आदीचा अभ्यास करेल. या मोहिमेमुळे चंद्राबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची भारताबरोबरच जगभरातील संशोधकांना अपेक्षा आहे.
Chandrayaan-3 चे एक पाऊल पुढे, चंद्रावर उतरण्याच्या पूर्वतयारीला झाली सुरुवात
  • ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्रो ( ISRO ) तर्फे चंद्रावर उतरण्यापूर्वी चांद्रयान ३ ची वाटचाल ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली जात आहे. चंद्राभोवती १५० ते १७७ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयान ३ मोहिमेतील एक महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे.
  • चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारे Vikram lander हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे आणि आता त्याने मुख्य यानापासून काही अंतरावर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे अशी घोषणा इस्रोने केली आहे. आता उद्या म्हणजे १८ ऑगस्टला lander ची कक्षा आणखी कमी जाईल आणि ते आणखी चंद्राजवळ आणले जाईल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
  • तेव्हा सर्व पुढील नियोजित टप्पे सुरळित पार पडले तर येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी ५५० विशेष बसगाडय़ा
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी महामंडळाने ५५० इतक्या विशेष गाडय़ांचे नियोजन केले असून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
  • गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण समजला जातो. त्यामुळे वसई, विरारमधून दरवर्षी मोठय़ा संख्येने कोकणवासीय हे गणेशोत्सव काळात आपल्या मूळ गावी जातात. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष सेवा पुरविली जाते. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी पालघर एसटी महामंडळातर्फे वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून विशेष गाडय़ांचे नियोजन करून नोंदणी सुरू झाली आहे.
  • ५५० विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यापैकी आताच ३०० गाडय़ांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे. मागील वर्षांपासून एसटीच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला केवळ अडीचशे ते तीनशे गाडय़ा सोडल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पाचशेहून अधिक गाडय़ांचे नियोजन आहे.

 

दोन वर्षांनंतर सीएए-एनआरसी कायद्याविरोधात पुन्हा निदर्शने सुरू :
  • जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधातील आसाममध्ये पुन्हा निदर्शने सुरू झाली आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसु) ने सीएए विरोधात निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना रॅली काढण्यापासून रोखण्यात आले.

  • आसामध्ये दोन वर्षांपूर्वी सीएए विरोधात निदर्शने करण्यात येत होती. मात्र, कोविडमुळे ही आंदोलनं थांबवण्यात आली होती. आता येत्या काही दिवसांत पुन्हा सीएए विरोधातील आंदोलन करण्यात येणार असल्याचे ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्यावतीने सांगण्यात आले आहे.

  • आसाममधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे, आसाम कराराची अंमलबजावणी करणे, दहशतवाद्यांशी सामना करणे, सर्व ईशान्येकडील राज्यांमधून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) मागे घेणे तसेच आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये अंतर्गत-रेखा परमिट नियम लागू करणे. यासह इतर प्रमुख मुद्यांवर हा विरोध होतो आहे.

“भारतात येऊन प्रश्न विचारा”, थायलंडमधील भारतीयाला एस जयशंकर यांचं उत्तर :
  • भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या थांयलंड दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी बँकॉक याठिकाणी पार पडलेल्या एका कार्यक्रमात भारत-थायलंड संबंधाबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांनी एका भारतीय तरुणानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं आहे. जेव्हा मी परदेशात असतो, तेव्हा भारतीय राजकारणावर कोणतंही भाष्य करत नाही. त्यामुळे तुम्ही भारतात येऊन हा प्रश्न मला विचारा, याचं उत्तर द्यायला मला आनंद होईल, असं जयशंकर म्हणाले.

  • प्रश्न विचारणारा तरुण हा मूळचा तामिळनाडू राज्यातील असून तो थायलंडमध्ये राहतो. संबंधित कार्यक्रमात त्यानं तामिळनाडूच्या संदर्भाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी जयशंकर यांनी संबंधित प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं आहे.

  • “मी जेव्हा परदेश दौऱ्यावर असतो, तेव्हा भारतीय राजकारणाबाबत भाष्य करत नाही. तुम्ही भारतात येऊन हा प्रश्न विचारा, मला याचं उत्तर देण्यास खूप आनंद होईल,” असं जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी संबंधित कार्यक्रमात भारत-थायलंड संबंध, आत्मनिर्भर भारत, भारतातील व्यावसायिक सुलभता, भारतीय विद्यापीठे, रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं, अशा विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय :
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कमांडोंना केंद्राने हटवलं आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात अजित डोवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डोवाल यांच्या व्हीआयपी सुरक्षेशी संबंधित उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि कमांडंट यांची बदली करण्यात आली आहे.

  • फेब्रुवारी २०२२ मध्ये एका व्यक्तीने अजित डोवाल यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला रोखलं होतं आणि नंतर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाच्या एसयुव्हीमधून एका व्यक्तीने कडक सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या अजित डोवाल यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

  • कार रोखण्यात आली होती आल्यानतंर अजित डोवाल यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सीआयएसएफने कार रोखत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं.

  • या व्यक्तीचं नाव शंतनू रेड्डी होतं. आपल्या शरिरात चिप बसवलेली असून, बाहेरुन त्याद्वारे नियंत्रण केलं जात असल्याचा त्याचा दावा होता. एमआरआय चाचणी केली असता शरिरात अशी कोणतीही चिप बसवली नसल्याचं समोर आलं होतं. बंगळुरुची असणाऱ्या या व्यक्तीचं मानसिक संतुलन योग्य नव्हतं. नोएडामधून ही कार भाड्याने घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. अजित डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. घटना घडली तेव्हा अजित डोवाल आपल्या निवासस्थानी होते.

सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी!; भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश :
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) बंदी उठवण्याबाबत आणि कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत केंद्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

  • प्रशासकीय कारभारात होत असलेल्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने मंगळवारी भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ‘एआयएफएफ’ संदर्भातील याचिकेची तातडीने सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान सरकारनेच कुमारी विश्वचषक स्पर्धा भारतात घेण्यासंदर्भात ‘फिफा’शी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी २२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

  • न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, एएस बोपण्णा आणि जेबी परिडवाला यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी आणि कुमारी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन या संदर्भात केंद्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारची भूमिका योग्य ठरेल, असे सांगितले.

  • केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. केंद्र सरकार, प्रशासकीय समिती आणि ‘फिफा’चे पदाधिकारी यांच्याशी मंगळवारीच तातडीने चर्चेच्या दोन फेऱ्या पार पाडल्या आहेत. याबाबत आणखी चर्चा अपेक्षित आहे, अशी माहिती त्यांनी न्यायालयात दिली.

येत्या पाच वर्षांत होणार तब्बल ७७७ क्रिकेट सामने; आयसीसीने जाहीर केले पुरुष क्रिकेटचे वेळापत्रक :
  • आगामी पाच वर्षांमध्ये क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने पुरुष क्रिकेटच्या पुढील टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. २०२१ ते २०१७ या कालावधीत १२ देशांदरम्यान तिन्ही फॉरमॅटमध्ये ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. यामध्ये १७३ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ टी-२० सामने होणार आहेत. सध्याच्या टप्प्यातील सामन्यांपेक्षा पुढील टप्प्यातील सामन्यांची संख्या जास्त आहे.

  • द्विपक्षीय मालिकांव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये मोठ्या स्पर्धांचाही समावेश करण्यात आलेला आहे. पुढील वर्षी भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकापासून याची सुरुवात होईल. त्यानंतर २०१४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे टी २० विश्वचषकाचे आयोजिन करणार आहेत. पाकिस्तान २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. तर, २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका एकत्रित टी २० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. २०२७ मध्ये, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे विश्वचषक आयोजित करणार आहेत.

  • आयसीसीच्या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या आहे. आगामी टप्प्यात दोन्ही संघ दोन कसोटी मालिका खेळणार आहेत. पण, यावेळी सामन्यांची संख्या चारवरून पाच करण्यात आली आहे. म्हणजेच दोन्ही संघ आता प्रत्येक पाच-पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळतील. यातील एक मालिका २०२३-२४ ​​मध्ये ऑस्ट्रेलियात होईल. तर, दुसरी मालिका २०२५-२६मध्ये भारतात होईल.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची ही ३० वर्षांतील पहिलीच वेळ असेल. यापूर्वी १९९२ मध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत आणि इंग्लंडदरम्यानही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

१८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.