चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ एप्रिल २०२०

Date : 18 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्वेन्टी-२० विश्वचषकाविषयी योग्य वेळी निर्णय घेऊ : 
  • करोनामुळे जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द अथवा लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या तरी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेऊ, अशी भूमिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मांडली आहे.

  • १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण जगात करोनाने थैमान घातले असून ऑस्ट्रेलियानेही कडेकोट सीमासुरक्षा करताना अन्य देशांतील नागरिकांना त्यांच्या येथे प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक खेळवण्याचा अथवा बंदिस्त स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करण्याचा निर्णय ‘आयसीसी’ घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

  • ‘‘विश्वचषकासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सध्या तरी विश्वचषक पुढे ढकलण्याचा विचार आम्ही केलेला नाही. परंतु परिस्थिती पाहून योग्य वेळ आल्यास आम्ही नक्कीच विश्वचषकाविषयी निर्णय घेऊ. यासंबंधी सर्व संघांचे क्रिकेट मंडळ, गुंतवणूकदार यांच्याशी चर्चा करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याच्या फार्म हाउसवर जिल्हाबंदी मोडून परप्रांतीय कामगार :
  • वाई : पसरणी (ता. वाई) येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या ‘फार्म हाउस’वर जिल्हाबंदी आदेश मोडून पाच परदेशी कामगार दाखल झाल्याचे गावकऱ्यांना दिसून आल्यावर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गाव दक्षता समितीने वाई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

  • पसरणीच्या (ता. वाई) हद्दीत राज्यातील वरिष्ठ पदावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे त्याच्या गावी फार्म हाउस आहे. त्यांच्या बंधूंचे येथे वास्तव्य असते. अधिकारी येऊन जाऊन असतात. चार दिवसांपूर्वी हे अधिकारी गावी आले होते तेव्हाच या कामगारांना ते पोलीस मोटारीतून गावी घेऊन आल्याची तक्रार गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तर या अधिकाऱ्यांच्या बंधूनी २ मार्च रोजी हे सर्व जण आल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे. यातील काही तरुणगावात काही साहित्य खरेदीसाठी गेले असता गावकऱ्यांनी पकडून पंचायतीच्या कार्यालयात त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तीन दिवसांपूर्वी गावात आल्याचे सांगितले आहे.

  • यानंतर पोलीस पाटील, तलाठी, गाव दक्षता समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला असता त्यांनी २ मार्च रोजी आल्याचे सांगितले. मात्र तक्रारी वाढू लागल्यानंतर गुरुवारी (दि. १६) रोजी प्रशासनाने त्यांची तपासणी करून हातावर शिक्के मारून त्यांना घरात राहण्यास सांगितले आहे. मात्र ग्रामस्थांनी व गाव दक्षता समितीने आज सायंकाळी पोलिसात तक्रार दाखल करत त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याची मागणी लावून धरली आहे.

‘शक्य असेल ती सर्व मदत करु’, पंतप्रधान मोदींचा इजिप्त, दक्षिण आफ्रिकेला शब्द :
  • करोना व्हायरसविरोधातील लढाईत भारत जगातील वेगवेगळया देशांना औषधांचा पुरवठा करत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रप्रमुखांना करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

  • “करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा कसा सामना करायचा, याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली. भारताकडून आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याचे मी त्यांना आश्वासन दिले आहे” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन दिली.

  • इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर सुद्धा पंतप्रधान मोदींनी करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाबद्दल चर्चा केली. “अब्देल फताह एल-सिसी यांच्याबरोबर Covid-19च्या भारत आणि इजिप्तमधील स्थितीबद्दल चर्चा झाली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरु आहेत, त्याला भारत आपल्यापरीने शक्य ती सर्व मदत करेल” असे मोदींनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

तबलिगी जमात आणि रोहिंग्यांचं कनेक्शन, गृहमंत्रालयांचा सर्व राज्यांना अलर्ट :
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना निर्वासित मुस्लीम रोहिंग्यांची माहिती मिळवत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. रोहिंग्या तबलिगी जमातच्या सदस्यांच्या संपर्कात आल्याचा संशय असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असून रोहिंग्या आणि तबलिगी जमातमधील संबंधांचा तपासस करण्यास सांगितलं आहे. सोबतच रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्यांशी संबंधित लोकांची करोना चाचणी करण्यासही सांगितलं आहे. यासंबंधी गरज असलेली सर्व पावलं उचला असा आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

  • केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांचे पोलीस प्रमुख आणि मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे की, “रोहिंग्या मुस्लिमांनी तबलिगी जमातच्या इज्तिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती मिळत आहे. यामुळे त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा संशय आहे”. या पत्रात हैदराबाद, तेलंगण, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि मेवाट येथील रोहिंग्यांवर विशेष लक्ष देत ओळख पटवण्यास सांगण्यात आलं आहे.

  • तेलंगणमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रोहिंग्यांनी तबलिगी जमातच्या हरियाणामधील मेवाट येथील कार्यक्रमात हजेरी लावली होती. हेच लोक दिल्लीमधील निजामुद्दीने मरकजमध्येही सहभागी झाले होते. रोहिंग्यांशी संबंधित लोक श्रमविहार आणि शाहीनबाग येथेही गेले होते. पत्रानुसार जे लोक या ठिकाणांवर गेले होते ते आपल्या छावण्यांमधून गायब आहेत. तबलिगी जमातशी संबंध आल्याने रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्याशी संबंधितांची करोना चाचणी करणं महत्त्वाचं आहे.

१८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.