चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ सप्टेंबर २०२२

Date : 17 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : आनंद, इलामपार्थी यांना जागतिक युवा विजेतेपद :
  • भारताच्या प्रणव आनंद आणि ए. आर. इलामपार्थी यांनी शुक्रवारी जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटातील अनुक्रमे १६ आणि १४ वर्षांखालील गटांचे विजेतेपद पटकावले.

  • अग्रमानांकित आनंदने ११ डावांमध्ये एकूण नऊ गुणांची कमाई करताना अर्ध्या गुणाच्या फरकाने बाजी मारली. आनंद संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. त्याने सात सामन्यांत विजय मिळवले, तर चार सामने बरोबरीत सोडवले. आनंदने १०व्या डावात अर्मेनियाच्या ईमिन आहोनयाला हरवले, तर अखेरच्या डावात फ्रान्सच्या ड्रोइन ऑगस्टिनशी बरोबरी साधली. द्वितीय मानांकित एम. प्रणेशने एकूण आठ गुणांसह अन्य तिघांच्या साथीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले.

  • इलामपार्थीने ११ डावांमध्ये एकूण ९.५ गुण प्राप्त केले. त्यानेही अर्ध्या गुणाच्या फरकाने सरशी साधली. इलामपार्थीने चौथ्या डावात युक्रेनच्या आर्टीम बेरिनकडून पराभव पत्करला. पण याव्यतिरिक्त नऊ सामन्यांत विजय मिळवले, तर एक बरोबरीत सोडवला. १८ वर्षांखालील गटात सोहम कामोत्राने एकूण सात गुणांसह १४वे स्थान मिळवले, तर एस.  हर्षदला (६.५ गुण) २४वे स्थान मिळाले.

जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणी दुसऱ्या स्थानी, पुढे फक्त इलॉन मस्क :
  • अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत LVMH Moet Hennessy – Louis Vuitton चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत त्यांच्या अगोदर आता केवळ इलॉन मस्क हेच आहेत.

  • फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही शुक्रवारच्या सुरुवातीस अरनॉल्ट यांच्या १५५.२ बिलियन डॉलर्सच्या तुलनेत १५५.४ अब्ज डॉलर्स एवढी होती.

वाचा अब्जाधीशांची यादी -

  • फोर्ब्सच्या यादीत सध्या स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) इलॉन मस्क हे अग्रस्थानी आहेत. ज्यांची एकूण संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर्स आहे. त्याच्यापाठोपाठ अदानी, अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१४९.७ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो.

  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी ९२.३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. त्यांच्या अगोदर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१०५.३ अब्ज डॉलर्स ), लॅरी एलिसन (९८.३ अब्ज डॉलर्स) आणि वॉल स्ट्रीटचे वॉरेन बफे (९६.५ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक येतो.

कोण होत्या या लाटणंवाल्या बाई :
  • ही गोष्ट काही आटपाट नगराची नाही किंवा राजे राजवाड्यांची नाही. मात्र, तरीही काहिशी जादूई आणि सकारात्मक बोध देणारी. ही गोष्ट आहे मुंबईतल्या मध्यमवर्गीय घरातील महिलांची, पन्नास वर्षांपूर्वीची… त्यांच्या लढ्याची आणि खंबीर नेतृत्वाची… देशभर गाजलेल्या आंदोलनाची. लाटण मोर्चाची आणि हा मोर्चा उभा करणाऱ्या लाटणवाल्या बाईंची.

  • लाटणं मोर्चा ही संकल्पना किंवा आंदोलनाची प्रतिमा साकारली ती मुंबईत. महागाई, तुटवडा, काळाबाजार, पाण्याची टंचाई या सगळ्या विरोधात महिलांचं आंदोलन उभं राहिलं. हजारो महिला लाटणं घेऊन मंत्रालयावर चालून गेल्या. चलनवाढ, भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यानंतर बांग्लादेशमधील निर्वासितांचे देशात आलेले लोंढे या सगळ्याचा ताण भारताच्या अर्थव्यवस्थेवर आला होता. अन्नधान्याची टंचाई भासू लागली, इंधनाचे दर वाढले, साठेबाजी वाढली.

  • कामगारांचे संप होऊ लागले, कारखाने बंद पडले, हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. रेशनच्या दुकानांसमोर तासन् तास रांगा लागलेल्या असायच्या. स्वयंपाक घरातील अत्यावश्यक गोष्टीही सहजी मिळत नव्हत्या. महागाई विरोधात देशभर आंदोलनं उभी राहिली. मात्र त्यात गाजला तो महिलांच्या पुढाकाराने झालेला लाटणं मोर्चा. १३ सप्टेंबर १९७२ या दिवशी हा लाटणं मोर्चा उभा राहिला. आताही महागाई, भाववाढ यांची चर्चा होत असताना या देशभरात गाजलेल्या आंदोलनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली.

  • समाजवादी पक्षाच्या तत्कालीन आमदार मृणाल गोरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होत. त्यांनी मुंबईत महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती स्थापन केली. मुंबईत निघालेल्या या लाटण मोर्चाचं लोण हळूहळू देशभर पसरलं. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये महिला महागाई विरोधातील आंदोलनामध्ये लाटणं घेऊन उतरू लागल्या. पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षातील नेत्या या आंदोलनात सामिल झाल्या होत्या.

  • मृणालताईंसह, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर, कमल देसाई, तारा रेड्डी यांसह तत्कालिन महिला नेत्या सहभागी झाल्या होत्या. अगदी सत्ताधारी पक्षातील महिला नेत्याही या आंदोलनाचा भाग झाल्या. मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न मृणालताईंनी आंदोलन करून धसास लावला त्यानंतर त्यांना ‘पाणीवाली बाई’ अशी ओळख मिळाली. महागाईच्या विरोधात आंदोलन उभं करताना घेतलेल्या सभांमध्ये ‘सरकारला लाटण्याने बडवलं पाहिजे…’ असं एक महिला कार्यकर्ती संतापाने म्हणून गेली आणि त्यानंतर मृणालताईंच्या नेतृत्वाखाली लाटणं हे महिलांच महागाई विरोधातील शस्त्र झालं. लाटणं घेऊन महिला मोर्चे काढू लागल्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या मृणालताईंची ओळख ‘लाटणवाल्या बाई’ अशी झाली.

ही युद्धाची वेळ नव्हे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सल्ला :
  • रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे,’’ असा सल्ला शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिला. सध्या जगासमोर अन्नधान्य, खते आणि इंधन टंचाई या सर्वात मोठय़ा समस्या आहेत, असेही मोदी यांनी पुतीन यांच्या निदर्शनास आणले.

  • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) २२वी वार्षिक परिषद येथे झाली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधानांनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘‘आपण युद्धाबाबत दूरध्वनीवरही चर्चा केली आहे. आता शांततेच्या मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करण्याची संधी प्रत्यक्ष भेटीमुळे मिळाली,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर, ‘‘युद्धाबाबतची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,’’ असे पुतिन यांनी मोदींना सांगितले.

  • रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांचे प्रमुख या वार्षिक परिषदेत सहभागी झाले आहेत.

  • युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात भारताने अद्याप रशियाबद्दल निषेधाचा सूर काढलेला नाही. मात्र या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी भारताची युद्धविरोधी भूमिका स्पष्ट केली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनीही गुरुवारी पुतिन यांच्याकडे अशीच चिंता व्यक्त केली होती.

  • दरम्यान, पुतिन यांच्याशी चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत करोना महासाथीनंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. करोनानंतरची परिस्थिती आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे जगापुढे आर्थिक आव्हाने आहेत. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ती पूर्वपदावर आणण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. भारताच्या आर्थिक विकासाचा संदर्भ देऊन मोदींनी सांगितले की, भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

  • रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि तैवान सामुद्रधुनीत चीनच्या आक्रमक लष्करी भूमिकेमुळे भू-राजकीय तणाव आणि गोंधळाच्या काळात आठ देशांच्या प्रभावशाली गटाची ही परिषद होत आहे. परिषदेच्या आवारात उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्जियोयेव यांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले.

भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवायचंय- पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताला लवकरच ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • “जग कोविड-१९ चा सामना करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पातळीवर आयात-निर्यातीत अनेक अडचणी निर्माण झाल्यात आहेत. आम्हाला भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज भारतात ७० हजारांहून अधिक स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. आम्ही विकासावर आमचे लक्ष केंद्रीत करत आहोत. मला आनंद आहे की, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारवाढीवर चर्चा झाली. तत्पूर्वी उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह आणि समरकंदचे राज्यपाल यांनी पंतप्रधान मोदींचे समरकंदमध्ये स्वागत केले. समरकंदमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचे दोन सत्र होणार आहेत. पहिल्या सत्रात केवळ शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य सहभागी होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये इतर देशांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

आशिया चषकात विराटची जोरदार कामगिरी, टी-२० क्रमवारीत १४ व्या स्थानी झेप :
  • नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात कोहलीने ‘विराट’ कामगिरीच्या जोरावर १४ स्थानांची उंच उडी घेत सर्वोतम २० मध्ये पोहचला. अफगानिस्तान विरुद्ध त्याने टी २० मधील पहिले शतक झळकवत आपण फॉर्म मध्ये आलो आहोत हे दाखवून दिले. तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज राहिला. विराटने आशिया चषक २०२२ मध्ये सुंदर खेळींचे प्रदर्शन केले. त्यामध्ये त्याने २ अर्धशतके आणि एका शतकाच्या जोरावर संपूर्ण मालिकेत २७६ धावा फटकावल्या आहेत. एकूण ५ सामन्यांमध्ये त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या बॅटने खोऱ्याने धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने नाबाद १२२ धावा चोपल्या होत्या, जी त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.

  • विराट आयसीसी फलंदाजांच्या टी २० क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. आशिया चषकापूर्वी तो ३३ व्या स्थानावर होता. आता विराटच्या खात्यात ५९९ गुण जमा झाले आहेत. तो भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून फक्त एका स्थानाने आणि ७ गुणांनी मागे आहे. रोहित ६०६ गुणांसह चौदाव्या क्रमांकावर आहे.

  • तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वलस्थानी कायम आहे. तो आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही राहिला होता. त्याने ६ सामन्यात २८१ धावा केल्या होत्या. या प्रदर्शनानंतर त्याचे आयसीसी फलंदाजी क्रमवारीतील गुण ८१० झाले आहेत. रिझवाननंतर ऍडेन मार्करम ७९२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.यासह विराट क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आयसीसी फलंदाजी क्रमवारीत टॉप-१५ मध्ये असणारा फलंदाज बनला आहे. तो आता टी २० क्रमवारीत १४व्या स्थानावर आला आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीत १२ व्या स्थानावर त्याचा ताबा आहे.

१७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.