चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 17, 2021 | Category : Current Affairs


अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांची नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा :
 • आपल्या सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत  (इंडो-पॅसिफिक) क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

 • तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली आणि ‘महत्त्वाची’ असे वर्णन करण्यात आलेल्या ‘एयूकेयूएस’ या नव्या आघाडीचे उद्घाटन दूरचित्रवाणीवरील संयुक्त भाषणासह आभासी पद्धतीने बुधवारी करण्यात आले. या आघाडीअंतर्गत, संयुक्त क्षमतांचा विकास व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच सुरक्षा आणि संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळ्या यांचे अधिक सखोल एकीकरण करण्याचे तिन्ही देशांनी मान्य केले आहे.

 • ‘ऑकस’चा पहिला मोठा उपक्रम म्हणून, ऑस्ट्रेलिया अमेरिका व ब्रिटनच्या मदतीने अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्यांचा एक ताफा बांधणार आहे. भारत- पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही क्षमतावाढ करण्यात येत आहे.

तमिळनाडूमध्ये ‘नीट’ निकालांत शहरांचा वरचष्मा :
 • ‘नीट’ परीक्षा सुरू झाल्यापासून वैद्यकीय प्रवेशात ग्रामीण भागातले, गरीब आणि स्थानिक भाषेत शिकणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी संख्येत मोठी घट झाली असल्याचा निष्कर्ष तमिळनाडू राज्य सरकारने स्थापन केलेल्या ९ सदस्यीय समितीने दिला आहे.

 • तमिळनाडूने नुकतेच ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा) विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर केले आहे. तेथे आता बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शाखांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ‘नीट’ परीक्षेचा वैद्यकीय शाखांच्या प्रवेशांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली होती.

 • ‘नीट’पूर्वी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी सरकारी शाळांतील १.१२ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. ‘नीट’नंतर हे प्रमाण अवघे ०.१६ टक्के एवढे झाले आहे. गेल्या वर्षापासून तमिळनाडू सरकारने सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ७.५ टक्के आरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तसेच इंग्रजी माध्यमातील शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग ८५.१२ टक्क्यांवरून ९८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

उत्तर कोरियाने केली रेल्वेतून क्षेपणास्त्राची चाचणी :
 • नेहमी सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उत्तर कोरियाने आता रेल्वेमधून क्षेपणास्त्र चाचणी करत जगाला धक्का दिला आहे. ८०० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. रेल्वेतून क्षेपणास्त्र वाहून नेत आणि ते यशस्वीपणे डागत उत्तर कोरियाने जगाला क्षमता दाखवून दिली आहे. क्षेपणास्त्र चाचणीचे एक छायाचित्र उत्तर कोरियाने प्रसिद्ध केलं आहे. डागलेले क्षेपणास्त्र हे ८०० किलोमीटर अंतर पार करत जपान जवळच्या समुद्रात कोसळले.

 • रेल्वेतून क्षेपणास्त्र वाहून नेण्यामुळे क्षेपणास्त्राचा ठाव ठिकाण समजणे अवघड जाते, विशेषतः उपग्रहापासून – ड्रोनपासूनही ते लपवता येते. रेल्वेमुळे क्षेपणास्त्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद आणि सुरक्षित नेता येते. रेल्वेतून क्षेपणास्त्र डागण्याची यशस्वी चाचणी घेतल्याने उत्तर कोरियाच्या मारक क्षमतेत एक महत्त्वाची भर पडली आहे.

 • याआधीच गेले अनेक महिने उत्तर कोरिया विविध पल्ल्यांची मारक क्षमता असलेल्या विविध क्षेपणास्त्रांची चाचणी करत आला आहे. नुकतंच क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी करत स्वतःची मारक क्षमता जगाला दाखवून दिली आहे. मात्र अशा चाचण्यांमुळे त्या भागातील शांततेचा भंग होत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. रेल्वेतून केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरिया आणि जपानच्या चिंतेत भर पडली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन - औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा :
 • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावं अशी चर्चा होती.

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 • “मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करत आहोत. त्या संतपीठात आपल्या संतांची शिकवणूक दिली जाईल.

 • संतांची शिकवण म्हणजे काय? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार :
 • संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

 • २०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.

 • माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

१७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)