चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ सप्टेंबर २०२०

Date : 17 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टाटा समूह ८६१ कोटींमध्ये उभारणार नवं संसद भवन :
  • संसद भवनाची नवी इमारत सेट्रल विस्टा उभारण्याचं कंत्राट टाटा समुहाला मिळालं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसंदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवलं आहे.

  • टाटा समुहासोबतच या प्रक्रियेमध्ये लार्सन अँड टुब्रो, शापुरजी पालनजीसारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश होता. या कंपन्यांना पछाडत टाटा समुहानं हे कंत्राट मिळवलं आहे. यापूर्वी संसदेच्या इमारतीचं कंत्राट मिळवण्यासाठी सात कंपन्या या शर्यतीत होत्या. त्यानंतर केंद्रीय लोकनिर्माण विभागाकडून तीन कंपन्यांची ऑनलाइन प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संसदेची नवी इमारत पार्लियामेंट हाऊसच्या प्लॉट नंबर ११८ वर उभी राहणार आहे. या इमारतीची उभारणी सेंट्रल विस्ता रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार आहे.

  • संसदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे. नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर नव्या संसद भवनाच्या उभारणीचं काम सुरू होणार आहे.

सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण :
  • सहकारी बँकांमधील ठेवीदारांचे हितरक्षण केले जावे, या उद्देशाने या बँका पूर्णत्वाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेख व नियंत्रणाखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला बुधवारी लोकसभेने मंजुरी दिली.

  • मुंबईतील पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेतील उघडकीस आलेल्या गैरव्यवहारानंतर, आवश्यक उपाययोजना म्हणून ‘बँकिंग नियमन (दुरुस्ती) विधेयक, २०२०’ तयार केले गेले. तातडीने पावले टाकली जाणे आवश्यक असल्याने २६ जून रोजी वटहुकुमाद्वारे विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केली गेली. आता त्याची जागा लोकसभेने संमत कायद्यानेच घेतली आहे.

  • या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, हा कायदा ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आहे, सहकारी संस्था निबंधकांचे  अधिकार गुंडाळण्यासाठी नाही. सहकारी बँकांच्या कारभारात व्यावसायिकता आणण्यासह, या बँकांना भागभांडवल वाढविणे सोयीस्कर ठरेल, अशा तरतुदींसह त्यांचे सशक्तीकरण हे रिझव्‍‌र्ह बँकेकडे देखरेख गेल्याने शक्य बनणार आहे.

उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

  • परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मास्क परिधना करणे अनिवार्य असणार आहे.  परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता(असल्यास) करणे अनिवार्य आहे.

  • परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. कोविड सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी आढळून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांना अगोदर कळवणे बंधनकारक असणार आहे. शिवाय उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे देखील हिताचे असेल असे कळवण्यात आले आहे.

१७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.