चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ ऑक्टोबर २०२२

Date : 17 October, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा - रुद्रांक्ष, अर्जुन, किरणला सुवर्णपदक :
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल तिहेरी स्पर्धा प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटील, अर्जुन बाबुटा आणि किरण जाधव यांनी सुवर्ण कामगिरी केली. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. भारतीय त्रिकुटाने चीनचा १६-१० असा पराभव करून ही सोनेरी कामगिरी केली. रुद्रांक्षने जागतिक स्पर्धेत वरिष्ठ पातळीवरील हे दुसरे सुवर्णपदक मिळविले.

  • यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी त्याने याच स्पर्धा प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविले होते. भारताने रविवारी १ रौप्य आणि २ कांस्यपदकेही मिळविली.

  • स्पर्धेत भारताचे चीनपाठोपाठ दुसरे स्थान कायम असून, आतापर्यंत भारताने ५ सुवर्ण, १ रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळविली आहेत. मन्वी जैन आणि समीर यांनी मिश्र दुहेरीत भारताला पहिले रौप्यपदक मिळवून दिले. पायल खत्री आणि साहिल दुधाने यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.

एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून - अमित शहांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे प्रकाशन :
  • हिंदी भाषेमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. अन्य आठ भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

  • मध्य प्रदेश सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला असून स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मेडिकल बायोकेमिस्ट्री, अ‍ॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिऑलॉजी या तीन विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचे शाह यांनी प्रकाशन केले. यावेळी ते म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हिंदीमध्ये बोलतात.

  • यामुळे देशातील युवकांचा आत्मविश्वास वाढला आहे. २०व्या शतकात काही लोकांनी ‘ब्रेन ड्रेन’ची (तज्ज्ञ व्यावसायिकांचे परदेशात जाणे) संकल्पना मांडली. पंतप्रधानांनी ही संकल्पना ‘ब्रेन गेन’मध्ये रूपांतरित केली.’’ मध्य प्रदेशातील भाजप सरकारने हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे मोदींचे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान वाटतो, असेही शहा पुढे म्हणाले.

  • पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, किडनीचा उल्लेख किडनी असाच करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदीमधून शिक्षण घेतले तरी वैद्यकीय भाषेतील सर्व संकल्पना विद्यार्थ्यांना ज्ञात होतील, अशी माहिती मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी दिली.

  • आता इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांना सतावणार नाही. ते आपल्या भाषेमध्ये अभिमानाने शिक्षण घेऊ शकतील.

युक्रेनला अमेरिकेची अतिरिक्त मदत :
  • अमेरिका युक्रेनला अतिरिक्त ७२.५ कोटी डॉलरचा शस्त्रपुरवठा करणार असून, इतर लष्करी मदतही करणार आहे. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीअटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) बैठकीनंतर बायडेन प्रशासनाने ही घोषणा केली.

  • ‘नाटो’च्या बैठकीत युरोपीय देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा व हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक भागांत रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढवल्याने युरोपसह जगातील अनेक राष्ट्रांच्या नेत्यांनी युक्रेनला भरीव मदत पुरवण्याचे वचन दिले.

  • बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की युक्रेनला अमेरिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अतिरिक्त लष्करी मदतीत कोणतेही महत्त्वाचे नवे शस्त्र समाविष्ट नाही. युक्रेनच्या शस्त्रप्रणालीसाठी दारूगोळय़ाचा पुनर्पुरवठा केला जाईल.

देशात सर्वाधिक ‘स्टार्टअप’ महाराष्ट्रात ; देशभरात ७.५ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा :
  • रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यताप्राप्त ‘स्टार्टअप’च्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. २०१६ ते जून २०२२ या सहा वर्षांत राज्यात स्टार्टअपच्या संख्येत ८६ वरून १३,५१९ इतकी लक्षणीय वाढ झाली.

  • सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाराची कास धरावी म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये ‘स्टार्टअप इंडिया’ सुरू केले. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या योजनेला देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत नवसंकल्पांना वाव देण्यासाठी अनेक नवीन उद्योजक पुढे आले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार योजनेच्या पहिल्या वर्षांत २०१६ मध्ये राज्यात ८६ स्टार्टअप सुरू झाले. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यात लक्षणीय वाढ होत गेली. २०२२ पर्यंत ही संख्या १३,५१९ पर्यंत पोहचली होती.

  • दरम्यान, या उपक्रमाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कृती आराखडा तयार केला. त्यात ‘स्टार्टअप’ला प्रोत्साहन देणाऱ्या १९ बाबींचा समावेश केला. त्याचाही फायदा या योजनेला झाला. सरकारच्या प्रोत्साहनामळे मान्यताप्राप्त ‘स्टार्टअप’ची संख्या देशात ४७१ (२०१६) वरून ७२,९९३ (३० जून २०२२) पर्यंत वाढली. हे ‘स्टार्टअप’ देशातील ६४९ हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरले असून यातील ५० टक्के दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणींच्या शहरांमध्ये आहेत. त्यातून ७.५ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असा दावा वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केला आहे.

  • दरम्यान, १९ फेब्रुवारी२०१९ ते ३० जून २२ पर्यंत, देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअप्सच्या संख्येनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - पालघरच्या ईशाला रौप्य, सातारच्या अनुष्काला कांस्य :
  • महाराष्ट्राच्या दोन युवतींनी कुवेत येथे सुरू असलेल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पदके मिळवून दिली. मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पालघर जिल्ह्यातील ईशा जाधवने रौप्य, तर सातारा जिल्ह्यातील अनुष्का कुंभारने कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या १६ वर्षीय ईशाने ५६.१६ सेकंद अशी वेळ देताना रौप्यपदक आपल्या नावे केले. पंधरा दिवसांपूर्वी आपला सोळावा वाढदिवस साजरा करणाऱ्या ईशाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. ईशा अमेय क्लासिक क्लब येथे संदीप लटवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

  • कऱ्हाड (जि. सातारा) येथे माजी राज्य क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अनुष्काने ५७.३६ सेकंद अशी वेळ देताना कांस्यपदक जिंकले. तिने जुलै महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या जागतिक कुमारी स्पर्धेतही भाग घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आकाश यादवने १९.३७ मीटरवर गोळा फेकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यात भारताच्या सिद्धार्थ चौधरीने कांस्यपदकाची कमाई केली. सिद्धार्थने १९ मीटर अंतरावर गोळा भिरकावला. मुलांच्या १५०० मीटर शर्यतीत अमित चौधरीने ४ मिनिटे व ४.५९ सेकंद वेळ देत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

  • मुलींच्या थाळीफेकीत निकिता कुमारीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. निकिताने ४४.१४ मीटर अंतरावर फेक केली. राष्ट्रीय स्पर्धेत लक्षद्वीपसाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरलेल्या मुबस्सिना मोहमने लांब उडीत ५.९१ मीटर अंतरावर उडी मारताना पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची किमया केली. पोल व्हॉल्टमध्ये कुलदीप कुमारने ४.८० मीटर उडी मारताना कांस्यपदक जिंकले. 

१७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.