चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ नोव्हेंबर २०२०

Date : 17 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत बायोटेकच्या स्वदेशी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात :
  • देशात सध्या करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख कमी होत असला तरी धोका मात्र टळलेला नाही. आशतच करोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. भारतात भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन करोनावरील लस विकसित करत आहे.

  • काही दिवसांपूर्वी या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. भारत बायोटेकनं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील करोना लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती मागील महिन्यात भारत बायोटेककडून देण्यात आली होती. दरम्यान, आता २६ हजार स्वयंसेवकांवर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याचंही भारत बायोटेकनं म्हटलं आहे. यासंदर्भात बेवसाईटची एक लिंकही भारत बायोटेकनं शेअर केली आहे. कंपनीनं ऑक्टोबर महिन्यात डीजीसीआयकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती.

नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री :
  • बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.

  • राजभवनात दुपारी ४.३० वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली.

  • सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रालोआचे राज्यातील सर्व प्रमुख नेते हजर होते.

  • दरम्यान, दोन दिवसापूर्वी रालोआच्या सांसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदी नितीशकुमार यांची निवड झाली होती. आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नितीश यांनी नकार दिला होता. पण करारानुसार नितीश यांनीच हे पद स्वीकारावे, असे भाजपने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार आज शपथविधी झाला. 

हळवा ‘हृदयसम्राट’ :
  • मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.

  • सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..

  • फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली.

  • १९६० मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी ‘मार्मिक’मधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.

श्रीविठ्ठलाचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन :
  • येथील श्री विठ्ठल-रुख्मिणीमातेचे मुखदर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन देणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच  मुखपट्टी,योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली.

  • राज्यातील सर्व मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली. या नंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सह अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

  • या शिवाय ६५ वर्षांपुढील,१० वर्षांखाली आणि गर्भवतींना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही.  सकाळी ६ ते ७, ८ ते ९,१० ते ११,११ ते १२, दुपारी १२ ते १,२ ते ३,३ ते ४, संध्याकाळी ५ ते ६,७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती जोशी यांनी दिली आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

१७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.