“सरकारी नोकऱ्या मिळवणं झालं सोपं”; मोदी म्हणाले, “मुलाखती बंद झाल्याने…”
देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता केंद्र सरकारकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आज ७१ हजार नियुक्तीपत्रे तरुणांना वाटण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना संबोधित केलं. तसंत, देशात रोजगार वाढवण्यासाठी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“काही वर्षांपूर्वीपर्यंत सरकारी नोकरी मिळवणं फार कठीण काम होतं. अर्ज मिळण्याकरता तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असत. त्यानंतर पोस्टाने अर्ज पाठवावा लागत असे. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी अर्ज पोहोचला की नाही हेसुद्ध कळत नसायचं. पण आता अर्जप्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. तसंच, ग्रुप सी आणि डी पदांच्या भरतीसाठी मुलाखतीही बंद झाल्या आहेत. यामुळे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीसुद्ध संपली”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. रोजगार मेळावा उपक्रमeअंतर्गत आज देशभरात ७१ हजार नियुक्ती पत्रे वाटण्यात आली, यावेळी पंतप्रधान बोलत होते.
“आजचा दिवस विशेष आहे. नऊ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी १६ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले होते. तेव्हा पूर्ण देश उत्साह, उमंग, विश्वासाने आनंदी झाला होता. सबका साथ, सबका विश्वासच्या मंत्रासोबत पुढे जाणारा भारत विकसित भारत बणण्यासाठी प्रयत्न करत आहे:, असंही मोदी म्हणाले.
सरकारच्या योजना आणि धोरणांचे कौतुक करत मोदी म्हणाले की, “तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. भारत सरकारची प्रत्येक योजना, प्रत्येक धोरण युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. गेल्या नऊ वर्षांत भारत सरकारने सुमारे ३४ लख कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च केले आहेत.”
“गेल्या नऊ वर्षांत नोकऱ्यांचे स्वरुपही बदलले आहे. या बदलत्या परिस्थितीत तरुणांसाठी नवनवन क्षेत्र उद्यास आली आहेत. या नवीन क्षेत्रांना केंद्र सरकारने सातत्याने मदत केली आहे. या नऊ वर्षांत देशाने साक्ष दिली आहे. स्टार्ट अप संस्कृतीत एक नवीन क्रांती झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी देशात १०० स्टार्टअप होते. आज तीच संख्या एक लाखांवर गेली आहे”, असंही मोदींनी पुढे स्पष्ट केलं.
टेलिकॉम क्षेत्रात उडाली खळबळ! ‘ही’ कंपनी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
सध्या जगभरामध्ये जजगतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Amazon , Meta, Google , Apple अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. आता टेलिकॉम कंपनी असणारी Vodafone देखील आपल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करणार आहे.
टेलिकॉम क्षेत्रातली मोठी कपात
व्होडाफोनच्या सीईओ मार्गेरिटा डेला व्हॅले यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन पुढील तीन वर्षात तब्बल ११,००० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील ही सर्वात मोठी कपात असणार आहे. कंपनीचे सीईओ म्हणाल्या, ” आमच्या कंपनीची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे कंपनीमध्ये काही बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.”
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने जर्मनीमध्ये १.३ टक्के घट नोंदवली आहे. व्होडाफोनसाठी जर्मनी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई खूपच कमी असेल किंवा त्यात वाढ होणार नाही, असा अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या कंपनीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये १,०४,०० कर्मचारी कार्यरत आहेत.
आधीही केली आहे कर्मचाऱ्यांची कपात
व्होडाफोन कंपनीने याआधी देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के म्हणजे १ कर्मचाऱ्यांची कपात केली होती.वोडाफोन कंपनीने ही माहिती रॉयटर्सशी शेअर केली होती. कंपनीच्या दोन उच्च अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले होते की, ब्रिटिश टेलिकॉम कंपनीला आपल्या इटलीमधील युनिटची संख्या कमी करायची आहे. त्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत करण्याचा निर्णय घेतला आहे.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.
अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहपदी अजित भुरे यांची निवड झाली असून सहकार्यवाहपदी समीर इंदुलकर, दिलीप कोरके आणि सुनील ढगे यांची निवड झाली आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाने दणदणीत विजय मिळवला होता, त्याशिवाय कार्यकारी समिती सदस्यांमध्येही ‘रंगकर्मी नाटक समुहातील’ ११ जणांची निवड झाली आहे.
यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.
शरद पवारांचं स्मृती इराणींना पत्र, हज यात्रेकरुंसाठी केली ‘ही’ महत्त्वाची मागणी
मुस्लीम समुदायासाठी ‘हज यात्रा’ ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो यात्रेकरू हजला जातात. हज यात्रेकरूंना सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात. यावर्षी हज यात्रेला जाण्यासाठी संपूर्ण भारतात एकूण २२ विमानतळांवर एम्बर्केशन पॉइंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पण मुंबई एम्बर्केशन पॉइंटच्या तुलनेत औरंगाबाद एम्बर्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून ८८ हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या हज यात्रेकरूंनी याविरोधात आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई आणि औरंगाबादवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंकडून समान शुल्क आकारलं पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
शरद पवारांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
शरद पवार पत्रात म्हणाले की, या वर्षी अल्पसंख्याक मंत्रालयाने हज यात्रेकरुंसाठी भारतातील २२ विमानतळांची निवड केली आहे. हज समितीने यात्रेकरुंसाठी एम्बार्केशन पॉइंट म्हणून औरंगाबादचीही निवड केली आहे. या एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून अधिकचं शुल्क आकारलं जात आहे, याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या तुलनेत औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून ८८ हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत.
यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील हज यात्रेकरूंनी या विषमतेविरोधात आवाज उठवला आहे. औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाण्यासाठी लागणारं शुल्क हे मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या शुल्काएवढंच असावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंट आणि नागपूर एम्बार्केशन पॉइंटचं शुल्क मुंबई एम्बार्केशन पॉइंटवर लागू केलेल्या शुल्काच्या बरोबरीने आणल्यास मला आनंद होईल, असं शरद पवार पत्रात म्हणाले.
भारतातील धर्मस्वातंत्र्यावर अमेरिकेकडून ठपका; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच अमेरिकी प्रशासनाचा अहवाल जाहीर
भारतात धार्मिक द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचे आरोप देशांतर्गत राजकीय वर्तुळात अनेकदा केले जातात. यासंदर्भात वेगवेगळे दावेही केले जातात. मात्र, आता अमेरिकन सरकारच्या एका अधिकाऱ्याने तसा दावा केला आहे. सोमवारी अमेरिन सरकराच्या गृह विभागाने जारी केलेल्या वार्षिक अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबाबत निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या महिनाभर आधीच हा अहवाल आणि अमेरिकन प्रशासनाची टिप्पणी आली आहे.
“जगभरातल्या अनेक देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामध्ये रशिया, भारत चीन आणि सौदी अरेबियासारखे देश आहेत”, असा उल्लेख अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कार्यालयाचे राजदूत राशद हुसेन यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना नमूद केलं. अमेरिकेच्या गृहखात्याचे सचिव अँथनी ब्लिंकन यांनी तयार केलेल्या ‘रिपोर्ट ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ अहवालाच्या प्रकाशनानंतर ते बोलत होते.
काय आहे अहवालामध्ये?
ब्लिंकन यांनी तयार केलेल्या या अहवालामध्ये जगभरातल्या २०० देशांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ब्लिंकन यांनी त्यांच्या टिप्पणामध्ये भारताचा उल्लेख केला नसून अहवालातील भारताबाबतच्या नोंदी या गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. या नोंदी देशातील आणि विदेशातील माध्यमांनी धार्मिक स्वातंत्र्यावर येणाऱ्या निर्बंधांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे नमूद करण्यात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना हुसेन यांनी भारताच्या संदर्भात भूमिका मांडली आहे. “भारतात नुकतंच कायद्याचे पुरस्कर्ते आणि देशभरातील विविध धार्मिक नेत्यांनी हरिद्वारमध्ये मुस्लिमांबाबत करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषणांचा निषेध करत देशाच्या सहिष्णु परंपरेचं जतन करण्याचं आवाहन केलं आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्या लोकसंख्येच्या धार्मिक भावना दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. परिणामी अनेक रोहिंग्यांवर पलायन करण्याची वेळ आली”, असंही हुसेन यांनी नमूद केलं.
क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडत केला मोठा कारनामा
आयपीएल २०२३ मधील ६३ वा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा फलंदाज क्विंटन डी कॉकने एक मोठा विक्रम रचला आहे. क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२ धावा करताच टी-२० कारकिर्दीतील नऊ हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला आहे.
जगातील सहावा फलंदाज ठरला –
डी कॉकने टी-२० कारकिर्दीतील ३०७ सामन्यांच्या २९८व्या डावात ९००० धावा पूर्ण केल्या. या प्रकरणात त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला आहे. ज्याने ३२३ सामन्यांच्या ३०४ डावांमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत डी कॉक सर्वात जलद ९,००० धावा पूर्ण करणारा जगातील सहावा खेळाडू ठरला. त्याने शिखर धवन (३०८ डाव), मार्टिन गप्टिल (३१३ डाव), फाफ डू प्लेसिस (३१७ डाव), जोस बटलर (३१८ डाव) यांच्यासह अनेक दिग्गज फलंदाजांना मागे सोडले आहे.
सर्वात जलद नऊ हजार धावांचा विक्रम बाबर आझमच्या नावावर -
टी-२० कारकिर्दीतील सर्वात जलद नऊ हजार धावांचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने २५४ सामन्यांच्या २४५ डावांमध्ये हे स्थान गाठले. ख्रिस गेल २४९, विराट कोहली २७१, डेव्हिड वॉर्नर २७३ आणि अॅरॉन फिंच हे २८१ डावात हे स्थान मिळवणारे अव्वल फलंदाज आहेत. फिंचनंतर आता डी कॉकच्या नावाची नोंद झाली आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर कठीण खेळपट्टीवर डी कॉकला फक्त दोन षटकार मारता आले. त्याने १५ चेंडूत एकूण १६ धावा केल्या. पीयूष चावलाने डी कॉकला इशान किशनकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर लखनऊ संघाने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकार लगावले. त्याचबरोबर क्रृणाल पांड्या ४९ धावांचे योगदान दिले. तसेच मुंबई इंडियन्स संघापुढे १७८ धावांचे लक्ष्य ठेवले.
दीड वर्षांत राज्यात ३५४ कृषी पर्यटन केंद्रे ; सर्वाधिक १४३ पुणे जिल्ह्यात :
राज्याचे पर्यटन धोरण लागू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ३५४ शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या संस्थांनी कृषी पर्यटन केंद्रे सुरू केली आहेत. सर्वाधिक १४३ कृषी पर्यटन केंद्रे पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कृषी पर्यटन वाढावे, २०२५ पर्यंत ग्रामीण भागात पर्यटन क्षेत्राद्वारे दहा लाख रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरण २०२० जाहीर केले. या धोरणात खेडेगाव, शेतीक्षेत्र, शेतकरी हे तीन घटक केंद्रस्थानी ठेवून योजना आखण्यात आली. यामध्ये शेतकरी किंवा शेतकरी गट किंवा कृषी विज्ञान केंद्र यांना या योजनेत सहभागी होता येते.
ग्रामीण भागातील शेती, माती, संस्कृती, पारंपरिक सण, उत्सव, खेळ, बैलपोळा, बैलगाडी, लोककला, शेतीतील उत्पादने, फळे, पिके, पशुधन यांसह खाण्या-पिण्याची, निवासाची सोय करून पर्यटकांना ग्रामीण संस्कृती, गावगाडा याची भुरळ पाडणे. यातून पर्यटन व रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
त्रिपुरात ११ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी :
सत्ताधारी भाजपचे नऊ आणि मित्रपक्ष आयपीएफटीचे दोन अशा ११ आमदारांना सोमवारी त्रिपुरातील माणिक साहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भाजप- आयपीएफटी आघाडी सरकारच्या मंत्र्यांना राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एस.एन. आर्य यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये भाजपचे जिष्णु देव वर्मा, रतन लाल नाथ, प्राणजित सिंघ रॉय, मनोज कांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुषांत चौधरी, राम पाद जमातिया आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (आयपीएफटी) एन.सी. देववर्मा व प्रेम कुमार रियांग यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री माणिक साहा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व प्रतिमा भौमिक आणि माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव हे शपथविधी समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते. मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा नंतर केली जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. अकरा मंत्र्यांपैकी भाजपचे राम पाद जमातिया व आयपीएफटीचे प्रेम कुमार रियांग हे दोघेच बिप्लब कुमार देव यांच्या मंत्रिमंडळात नव्हते. आयपीएफटीचे मेवेर कुमार जमातिया यांना साहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
सीमेवरील पायाभूत सुविधा वाढवण्याचे चीनचे प्रयत्न सुरूच :
चीनचे लष्कर (पीपल्स लिबरेशन आर्मी- पीएलए) अरुणाचल प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचे काम करत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांनी सोमवारी दिली.
तथापि, सीमेवर उद्भवू शकणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतही सतत आपल्या पायाभूत सुविधा आणि क्षमतांमध्ये वाढ करत आहे, असे ईस्टर्न कमांडचे प्रमुख कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल आर.पी. कलिता यांनी सांगितले.
‘तिबेट क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे मोठे काम सुरू आहे. चीन सतत त्यांचे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाची संधानता (कनेक्टिव्हिटी) यांचा विकास करत आहे, जेणेकरून परिस्थितीला प्रतिसाद देण्याच्या किंवा सैन्याची हालचाल करण्याच्या अधिक चांगल्या स्थितीत ते असतील,’ असे कलिता पत्रकार परिषदेत म्हणाले.
चीनच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कारणांसाठी वापरता येतील अशी सीमेवरील खेडी प्रत्यक्ष ताबारेषेनजीक उभारली असल्याचेही कलिता यांनी सांगितले. ‘आम्ही परिस्थितीवर सतत देखरेख ठेवून आहोत. आम्हीदेखील आमच्या पायाभूत सुविधा व क्षमतांचा, तसेच परिस्थिती हाताळण्याच्या यंत्रणेचा श्रेणीसुधार करत आहोत. याने आम्हाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे,’ असे हे अधिकारी म्हणाले.
काँग्रेसचा जनतेशी संपर्क तुटला असल्याची कबुली माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्यानंतर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी ‘भारत जोडो’चा नारा दिला. येत्या २ ऑक्टोबरपासून (गांधीजयंती) काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा काढण्याची घोषणा सोनिया गांधी यांनी ‘नवसंकल्प’ चिंतन शिबिराच्या समारोपाच्या भाषणात केली.
‘‘सामाजिक एकता आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला पदयात्रेतून काँग्रेस प्रत्युत्तर देईल. तसेच, जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर आवाज उठवण्यात येईल, असे सांगत सोनिया यांनी ‘‘भाजपने उभ्या केलेल्या आव्हानांवर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला. ‘भारत जोडो’ पदयात्रेमध्ये तरुण आणि माझ्यासारखे बुजुर्गही सहभागी होतील. पण, या ज्येष्ठांना पदयात्रेत विनासायास सामील होता येईल आणि त्यांची दमछाक होणार नाही, असा मार्ग शोधावा लागेल, अशी मिश्कील टिप्पणीही सोनिया यांनी केली़
‘‘पक्षाला मजबूत करण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही’’, असे राहुल गांधी यांनी सोनियांच्या आधी केलेल्या भाषणात स्पष्ट केले. जिल्हास्तरावरील जनसंपर्क मोहीमही १५ जूनपासून सुरू होणार असून आर्थिक, बेरोजगारी, महागाई आदी प्रमुख विषयासंदर्भातही काँग्रेसची भूमिका जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
‘‘चिंतन शिबिरातील सर्व चर्चामध्ये पक्षांतर्गत बाबींबाबत तक्रार केली गेली. कोणाला कोणते पद मिळाले आहे, वगैरे पक्षांतर्गत मतभेदींची चर्चा होत राहिली. पण, या अंतर्गत बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची ही वेळ नव्हे. आता काँग्रेसचे लक्ष पक्षाबाहेरील बाबींकडे म्हणजेच जनतेकडे गेले पाहिजे. केवळ काँग्रेस पक्षासाठी नव्हे, तर देशाच्या हितासाठी आपण लोकांकडे गेले पाहिजे.
पक्षातील ज्येष्ठ नेते असो वा तरुण नेते असो वा कार्यकर्ते असो, आपण प्रत्येकाने जनतेशी चर्चा केली पाहिजे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे’’, असे खडेबोल राहुल यांनी ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांना सुनावले. ‘‘घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष असून हाच या पक्षाचा ‘डीएनए’ आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा लोकांशी जोडून घेऊ शकतो’’, असेही राहुल म्हणाले.