चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ मे २०२१

Updated On : May 17, 2021 | Category : Current Affairs


रेल्वेचे वायफाय सहा हजाराव्या स्थानकावर :
 • देशात झारखंडमधील हजारीबाग शहरातील रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय शनिवारी सुरू करण्यात आले असून वाय फाय सुविधा असलेले ते सहा हजारावे स्थानक ठरले आहे.

 • रेल्वेने वायफाय सुविधा मुंबई रेल्वे स्थानकावर २०१६ मध्ये मोफत सुरू केली होती. त्यानंतर पाच हजार स्थानकांवर ती उपलब्ध करण्यात आली. त्यात मिदनापूर हे पाच हजारावे रेल्वे स्थानक होते. १५ मे रोजी ओडिशातील अंगुल जिल्ह्य़ात जरपडा येथे  वायफाय सेवा सुरू करण्यात आले.

 • वायफाय सेवा रेल्वे स्थानकांवर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे भारत सरकराच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला पाठबळ मिळाले आहे. ग्रामीण व शहरी नागरिक आता डिजिटल साधनांचा वापर करू शकतात. वायफाय सुविधा सध्या सहा हजार रेल्वे स्थानकांवर मोफत देण्यात आली आहे.

 • रेल टेल या सार्वजनिक मालकीच्या कंपनीकडून ही सेवा रेल्वेवर आर्थिक भार पडू न देता दिली जात आहे. यात गुगल व दूरसंचार मंत्रालय, पीजीसीआयएल, टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य आहे.

दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउन वाढवला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा :
 • दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

 • मात्र करोना पूर्णपणे गेलेला नाही याची पूर्ण जाणीव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 • दिल्लीतील लॉकडाउनचा अवधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत अजून एक आठवडा लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे. आता २४ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. गेल्या आठवड्यात लागू असलेले निर्बंध या आठवड्यातही लागू असणार आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी लग्न समारंभावर निर्बंध तसेच राहणार आहेत.

राजीव सातव यांचे निधन :
 • काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते अ‍ॅड. राजीव सातव यांचे रविवारी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

 • गेल्या २३ दिवसांपासून सातव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका उमद्या नेत्यास मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. करोना नियमांचे पालन करून सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

 • कळमनुरी तालुक्यातील मसोड पंचायत समिती गणातून २००२ मध्ये निवडून आलेल्या सातव यांचा युवक काँग्रेसच्या बांधणीच्या निमित्ताने दिल्ली येथे वावर वाढत गेला. संघटनात्मक बांधणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत असणारा नेता अशी सातव यांची ओळख होती. माजी मंत्री रजनी सातव यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. पंचायत समिती, जिल्हा  परिषद सदस्य अशी एकेक पायरी चढत राजीव सातव खासदार झाले.

देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाइन वैद्यकीय परिषद :
 • राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या “ माझा डॉक्टर” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून आज राज्यभरातील अगदी गाव पातळीवरील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्याने ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेऊन उपचारांबाबत फॅमिली डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया येत आहे.

 • विशेष म्हणजे हजारो नागरिकांनी देखील या परिषदेत दर्शक म्हणून हजेरी लावली, तसेच आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात केले.

 • “प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोनावर उपचार” या वनएमडी संस्थेने ही परिषद आयोजित केली होती. राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

लिस्टर सिटीला जेतेपद :
 • लिस्टर सिटीने बलाढय़ चेल्सीचा १-० असा पराभव करत एफए चषकावर नाव कोरले. लिस्टर सिटीने क्लबच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एफए चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.

 • यौरी टिलेमान्स याने ६३व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला. टिलेमान्सने ३० मीटरवरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला. याआधी लिस्टर सिटीला चार वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. १९६९मध्ये त्यांनी अखेरच्या वेळी एफए चषकाची अंतिम फेरी गाठली होती.

 • ‘‘आम्ही जेतेपद पटकावले यावर विश्वासच बसत नाही. त्यामुळे र्निबध असले तरी जल्लोष करताना मी आखडता हात घेतला नाही,’’ असे लिस्टर सिटीचा गोलरक्षक कास्पेर श्मेइचेल याने सांगितले.

 • थॉमस टकेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या चेल्सीने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रात दुखापत झाल्यामुळे लिस्टरला जॉनी इव्हान्सची उणीव भासली. अखेर ६३व्या मिनिटाला चेल्सीच्या पारडय़ात गोल केल्यानंतर टिलेमान्सने चेंडूवर नियंत्रण मिळवले आणि लांबूनच चेंडूला गोलजाळ्यात पोहोचवले.

राज्यांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा :
 • राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 • केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे. १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत.

 • अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत. काही राज्यांकडे ऋण शिल्लक दाखवत असून पुरवलेल्या लशींपेक्षा वापर जास्त आहे. यातील काही लशी लष्करी दलांसाठी पुरवण्यात आल्या होत्या. पुढील तीन दिवसांत ५० लाख ९१ हजार ६४० लशीच्या मात्रा राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना दिल्या जाणार आहेत. चाचणी करा, संपर्क शोधा, उपचार करा व कोविड सुसंगत वर्तन ठेवा या मुद्दय़ांवर भर देण्यात येत असला तरी कोविड नियंत्रणात लसीकरण हा प्रमुख टप्पा आहे.

 • केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली असून राज्ये व कें द्र शासित प्रदेशांना मोफत लस दिली जात आहे. मुक्त व वेगवान अशा पद्धतीने १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे जाहीर केले. केंद्रीय औषध प्रयोगशाळेने प्रमाणित केलेल्या लशींपैकी पन्नास टक्के लशी या केंद्राने खरेदी केल्या आहेत. त्या मात्रा राज्यांना आधी मोफत उपलब्ध करण्यात येत होत्या.

१७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)