आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदक आत्मविश्वास दुणावणारे - सर्वेश कुशारे
- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धा खूप महत्त्वाची होती. या स्पर्धेतील पदकाने माझा आत्मविश्वास दुणावला आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उंच उडी प्रकारातील खेळाडू सर्वेश कुशारेने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. त्याच वेळी जागतिक स्पर्धेतील पात्रतेची संधी या वेळी अवघ्या सहा सेंटिमीटरने हुकल्याची खंत वाटते, असेही तो म्हणाला.
- सर्वेशने बँकॉक येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी २.२६ मीटर उडी मारून रौप्यपदक मिळवले. विशेष म्हणजे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे उंच उडी प्रकारातील हे केवळ दुसरेच पदक ठरले. यापूर्वी २०१३ मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत जितीन थॉमसने २.२१ मीटर उडीसह रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर यंदा सर्वेश रौप्यपदकाचा
- मानकरी ठरला. सर्वेश मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील देवगावचा असून, सध्या तो पुण्यात लष्करी क्रीडा संस्थेत (एएसआय) जितीन थॉमस यांच्याकडेच मार्गदर्शन घेत आहे.
- जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी २.३२ मीटर, तर ऑलिम्पिकसाठी २.३३ मीटर असा पात्रता निकष आहे. जागतिक स्पर्धेसाठी आता सर्वेशला जागतिक मानांकनानुसारच खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी सर्वेशकडे अजून एक वर्ष आहे. सर्वेश म्हणाला, ‘‘जागतिक स्पर्धेसाठी पात्रता हुकल्याची खंत जरूर आहे. आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही; पण ऑलिम्पिक पात्रतेसाठी माझ्याकडे वर्षभराचा कालावधी आहे. प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करून ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’’
- ‘‘आईवडिलांकडून प्रत्येक पावलावर मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. शाळेत असताना रावसाहेब जाधव यांनी माझी तयारी करून घेतली. सुविधांचा अभाव असूनही त्यांनी मक्याच्या भुस्याची गादी करून माझ्याकडून सराव करून घेतला. शाळेत असताना २०१२ मध्ये मिळवलेले शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील पहिले पदक आजही मला प्रेरणा देते. गुजरात राष्ट्रीय स्पर्धेत मी २.२७ मीटर उडीसह सुवर्णपदक जिंकले. ही माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. थॉमस सरांच्या मार्गदर्शनाचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्याचबरोबर भारतीय अॅथलेटिक्स संघटनेकडून मिळणारा स्पर्धात्मक अनुभव फायद्याचा ठरतो आहे,’’ असेही सर्वेशने सांगितले.
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून
- राज्य विधिमंडळाच्या तीन आठवडय़ांच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. संख्याबळ घटले असले तरी विरोधक माघार घेणार नाहीत, असे स्पष्ट करीत विरोधकांनी आक्रमक होण्याचे सूचित केले आहे. पावसाने दिलेली ओढ, दुबार पेरण्यांचे संकट, कृषी क्षेत्रावरील संकट यावर मार्ग काढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असेल.
- राष्ट्रवादीतील बंडामुळे विरोधकांचे संख्याबळ घटले आहे. सत्ताधारी पक्षाला २०० पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असल्याने विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. पण चहापानावर बहिष्कार घालून विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याचा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला. ‘सरकारच्या पाठीशी २१० पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असून विरोधी पक्ष आत्मविश्वास गमावलेला आणि गोंधळलेला दिसत आहे. विरोधी पक्ष आहे कुठे, असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.
- विरोधक दुबळे असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी पावसाने दगा दिल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकले आहे. राज्याची निम्मी लोकसंख्या अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रातील पीछेहाट सरकारसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.
- राज्यात तीन महिन्यांत आठ ठिकाणी झालेले जातीय तणाव, समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका, कायदा आणि सुव्यवस्था आदी विषयांवर सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागात १७,८६४ पदे भरलीच नाही, आरोग्य विभाग वाऱ्यावर
- सरकार कोणतेही असो, कितीही पक्षांचे असो, आरोग्य विभागाला कोणीच वाली नाही हे वास्तव आहे. एकीकडे पुरेसा निधी अर्थसंकल्पात द्यायचा नाही, तर दुसरीकडे डॉक्टरांची रिक्त पदेही वर्षानुवर्षे भरायची नाही.
- आरोग्य विभागात आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांसह आजघडीला १७ हजार ८६४ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. अशा प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य विभागाचा गाडा हाकायचा कसा असा सवाल विभागातील डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे.
- मुख्यमंत्री बनल्यानंतर एका मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आरोग्य अर्थसंकल्प दुप्पट करण्याची घोषणा केली होती. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करत अर्थसंकल्पात ६ हजार ३३८ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र प्रत्यक्षात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ ३ हजार ५०१ कोटी रुपये देऊन आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसली. या ३ हजार ५०१ कोटी रुपयांपैकी १ हजार ४०० कोटी हे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि १ हजार २०० कोटी रुपये केंद्रीय आरोग्य योजनांवर खर्च होणार आहेत. त्यामुळे उर्वरित ९०० कोटी रुपयांमध्ये आरोग्य विभागाचा गाडा हाकायचा कसा हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
भारत-अमिराती व्यापारास बळ; आता स्थानिक चलनांद्वारे व्यवहार, द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा निर्धार
- डॉलरऐवजी आपाआपल्या स्थानिक चलनांत व्यापारविनिमय करणे आणि जलद देय व्यवहार यंत्रणांची (फास्ट पेमेंट सिस्टीम) जोडणी याबाबत शनिवारी भारत आणि संयुक्त अरब अमिराती(यूएई)मध्ये द्विपक्षीय करार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फ्रान्सचे अध्यक्ष, त्यांच्या पत्नीसह प्रमुख व्यक्तींना ‘या’ खास भेटवस्तू
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांना खास भारतीय वस्तू भेट दिल्या. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
- मोदींनी मॅक्रॉन यांना चंदनाच्या लाकडाचा सतार भेट म्हणून दिला. या चंदनाच्या लाकडावर भारतातील प्राचीन शिल्प कोरलेले आहेत. याशिवाय या सतारावर सरस्वती, गणपती आणि मोरही कोरलेला आहे.