अर्जेटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसी कारकीर्दीत आठव्यांदा ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. यात मेसीने नॉर्वे आणि मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू अर्लिग हालँडला मागे टाकले. महिलांमध्ये स्पेनची खेळाडू ऐताना बोनामती या पुरस्काराची मानकरी ठरली.
‘फिफा’ वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी पुरुष विभागात मेसी आणि हालँड यांच्यात चुरस पाहायला मिळाली. जगभरातील राष्ट्रीय संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक, निवडक पत्रकार व चाहत्यांच्या मतांनंतर मेसी आणि हालँड यांचे समान ४८ गुण होते. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. पहिल्या स्थानासाठी मेसीला १०७ मते, तर हालँडला ६४ मते मिळाली होती. त्यामुळे मेसी या पुरस्काराचा मानकरी ठरला. फ्रान्स आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीपटू किलियन एम्बापे तिसऱ्या स्थानी राहिले. लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळयासाठी हे तिघेही उपस्थित नव्हते.
चाहत्यांची सर्वाधिक मते ही मेसीला मिळाली, तर पत्रकारांनी हालँडला अधिक मते दिली. तसेच राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांनी मेसी आणि प्रशिक्षकांनी हालँडला अधिक मते दिली. या पुरस्कारासाठी १३ महिन्यांपूर्वी कतार येथे झालेली विश्वचषकातील कामगिरी ग्राह्य धरली गेली नाही. विश्वचषकानंतर म्हणजेच १८ डिसेंबर २०२२ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करण्यात आला.
मेसी आणि एम्बापे यांनी पॅरिस सेंट-जर्मेनला लीग-१चे जेतेपद मिळवून दिले. मात्र, या संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये निराशा केली. विश्वचषकानंतर मेसीने पॅरिससाठी २२ सामन्यांत नऊ गोल आणि सहा गोलसाहाय्य केले. गतहंगामानंतर मेसीने अमेरिकेतील इंटर मियामी संघाशी करार केला.
सुमित नांगलची ऐतिहासिक कामगिरी! १९८९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय
भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचत मोठी कामगिरी केली आहे. त्याने अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत मोठा अपसेट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. अलेक्झांडरचे या स्पर्धेत ३१वे मानांकन होते. त्याचा पराभव करत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सुमित नागल २०१३ नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे. सोमदेव देवबर्मनने २०१३ मध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात अग्रमानांकित खेळाडूचा पराभव केला आहे. रमेश कृष्णन यांनी १९८९ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांनी स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला. विलँडर त्यावेळी टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होते.
सुमितने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची मुख्य फेरी जिंकली आहे. याआधी २०२०च्या यू.एस. ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल १०० मध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला त्याने सातव्यांदा पराभूत केले आहे. त्याचबरोबर विरोधी खेळाडूच्या क्रमवारीत सुमितचा हा दुसरा मोठा विजय आहे.
काय घडलं सामन्यामध्ये?
सुमितने शानदार सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने तीन वेळा अलेक्झांडरची सर्व्हिस तोडली आणि पहिला सेट ६-४ अशा फरकाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. अलेक्झांडर बुब्लिकनेही काही चुका केल्या आणि त्याचा फायदा घेत नागलने दुसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. दोन सेट जिंकल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची लढत झाली आणि टायब्रेकमध्ये नागलने बाजी मारली. त्याने हा सेट ७-६ असा जिंकला आणि सामना आपल्या नावावर केला. त्याच्यावर सर्व स्तरतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोस (स्वित्झर्लंड) दौऱ्यावर आहेत. आज (१६ जानेवारी) या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार यावेळी करण्यात आला. तसेच बी. सी. जिंदाल यांच्याबरोबर ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला.
ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलीकेली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून त्यांना महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जैन यांची चर्चा झाली.
जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या
देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी. सी. जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात ५००० नोकऱ्या निर्माण होतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार
महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्सबरोबर ४,००० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.
तलाठी भरतीविरोधात असंतोष; छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावर
तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि या सर्व प्रकरांकडे होणारे सरकारी दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला.
भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न परीक्षार्थी आंदोलकांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येत जमलेल्या परीक्षार्थीनी शासनाच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदीचा निषेध नोंदवला. छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीड येथेही परीक्षार्थीनी ‘सरकार गैरप्रकारांची चौकशी का करीत नाही,’ असा प्रश्न उपस्थित केला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान परीक्षार्थीनी हे आंदोलन केले.
आम्ही कोणाच्या विरोधात नाही. सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. तलाठी भरतीमध्ये पुन्हा गैरव्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे विद्यार्थी कसे जमव णार, असा सवाल परीक्षार्थीनी केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चुकीचे सांगत आहेत. सरकारने शंका दूर करणे आवश्यक आहेच, पण भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खासगी कंपन्यांचा एवढा अट्टहास कशासाठी, असा सवालही परीक्षार्थी आंदोलकांनी केला.
आंदोलकांवर गुन्हे
बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर, राहुल कांबळे, राहुल कवठेकर आणि सचिन ठेंगळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता.
परीक्षार्थीच्या तक्रारी..
* भरती प्रक्रियेसाठीचे शुल्क भरमसाठ.
* आरोग्य भरतीसाठी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे.
* तलाठी भरतीच्या २०० गुणांच्या पत्रिकेतही गैरव्यवहार.
* भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही?
२४ तास पुरेशी सुरक्षा आणि ‘वॉर रूम’; विमानांचा विलंब टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना
उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे विमान वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या विमानतळांसाठी अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत. त्यात प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळावर तक्रार निवारण कक्ष (वॉर रूम) उभारण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची कुमकही वाढविण्यात येणार आहे.
नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मंगळवारी विमानतळांवरील अतिरिक्त सुविधांबाबत विमानतळे तसेच विमान कंपन्यांना अतिरिक्त सूचना दिल्या. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली असून सर्व कंपन्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. विमानतळांवर पुरेशा प्रमाणात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी २४ तास उपलब्ध असतील, असेही त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर जाहीर केले. धुके अधिक असलेल्या विमानतळांवर ‘सीएटी-३’ ही प्रणाली असलेल्या धावपट्टया कार्यान्वित केल्या जातील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चारपैकी तीन धावपट्टी या प्रणालीने कार्यान्वित आहेत. धुक्याशी संबंधित व्यत्ययांचा सामना करण्यासाठी आणखी पावले उचलली जात असल्याची घोषणाही त्यांनी केली .
नव्या उपाययोजना ’ सहा महानगरांतील विमानतळांना दिवसातून तीनदा दैनंदिन घडामोडींचा अहवाल अनिवार्य
’ ‘डीजीसीए’ने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पूर्ततेबाबत नियमित तपासणी
’ प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल आणि निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष
’ सीआयएसएफच्या पुरेशा तुकडया २४ तास तैनात
’ दिल्ली विमानतळावर अद्ययावत ‘सीओटी ३’ कार्यप्रणाली असलेल्या धावपट्टया कार्यान्वित
आंध्र प्रदेशात भाऊ विरुद्ध बहीण सामना, शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी
आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला यांची नियुक्ती करण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी विरुद्ध त्यांची बहीण शर्मिला यांच्यात सामना होणार आहे. काँग्रेसला सत्ता मिळाल्यास शर्मिला हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असेच संकेत आहेत.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडल्यावर वायएसआर काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांची बहीण शर्मिला यांनी त्यांना साथ दिली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जगनमोहन यांना अटक झाल्यावर पक्षाची सूत्रे शर्मिला यांनी हाती घेतली होती. भावाला अटक झाल्यावर बहीण शर्मिला यांनी आंध्रमध्ये पदयात्रा काढून वातावरणनिर्मिती केली होती.
२०१९च्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळाले. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यात व बहीण शर्मिला यांच्यात दुरावा निर्माण झाला. शर्मिला यांनी नंतर वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. जगनमोहन आंध्र तर शर्मिला तेलंगणात आपले वर्चस्व निर्माण करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शर्मिला यांना तेलंगणात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यावर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.
कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात १० वर्षांसाठी नोकरभरती बंद
सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उत्तराखंड सरकारकडुन एक नवा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर कॉपी केली, तर त्या उमेदवाराला पुढील १० वर्षांसाठी बॅन करण्यात येईल. म्हणजेच त्या उमेदवाराला १० वर्ष कोणतीही सरकारी नोकरीची परीक्षा देता येणार नाही.
हा नवा नियम ‘अँटी कॉपींग लॉ’ म्हणून ओळखला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुस्कर सिंग धामी यांनी या नव्या नियमाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, “भरती परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या किंवा चीटिंग करून अयोग्य मार्ग वापरणाऱ्या उमेदवारांना पुढील १० वर्षांसाठी बॅन केले जाईल. हा निर्णय UKPSC पेपर लिकनंतर घेण्यात आला आहे, या पेपर लिकमुळे सुमारे १.४ लाख उमेदवारांची ‘पटवारी लेखपाल’ परीक्षा रद्द करण्यात आली.
सरकारी भरतीदरम्यान होणारी कॉपी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘हा देशातील सर्वात कठोर कॉपी विरोधी कायदा असणार आहे. गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे, यासह त्यांची संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे’ असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार
स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
उदय सामंत यांनी सांगितलं की, “डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. ‘महाराष्ट्र पॅव्हेलियन’मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच, महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे,” अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
‘या’ कंपन्यांनी केला सामंजस्य करार
ग्रिनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड – १२ हजार कोटींची गुंतवणूक
हाथवेय होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – १६ हजार कोटींची गुंतवणूक
आयसीपी इनव्हेसमेंट/इंडस कॅपिटल – १६ हजार कोटींची गुंतवणूक
रुखी फुड्स – २५० कोटींची गुंतवणूक
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेड लिमीटेड – १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: नदाल, त्सित्सिपासचे संघर्षपूर्ण विजय
रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स या प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या हंगामातील पहिल्याच ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सोमवारी स्पेनच्या अग्रमानांकित राफेल नदाल आणि ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्या फेरीत विजयासाठी झगडावे लागले. त्याच वेळी महिला विभागात अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक, जेसिका पेगुला, कोको गॉफ यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत नदालला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने तीन तास झुंजवले. मात्र, नदालने चार सेटपर्यंत रंगलेली लढत ७-५, ३-६, ६-४, ६-१ अशी जिंकली. नव्या हंगामातील नदालचा हा पहिला विजय ठरला.ग्रीसच्या त्सित्सिपासने स्पर्धेची विजयी सुरुवात करताना फ्रान्सच्या क्विन्टिन हॅलिसचा ६-३, ६-४, ७-६ (८-६) असा पराभव केला. तसेच सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणाऱ्या सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने मार्कोस गिरोनला ६-०, ६-१, ६-२ असे सहज नमवले. सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेने चुरशीच्या लढतीत कॅनडाच्याच वासेक पोस्पिसिलवर १-६, ७-६ (७-४), ७-६ (७-३), ६-३ अशी मात केली.
महिला विभागात अग्रमानांकित श्वीऑनटेकला पहिल्या विजयासाठी झगडावे लागले. मात्र, दोन्ही सेटमध्ये मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्वीऑनटेकने जर्मनीच्या ज्युली नेमायरचे आव्हान ६-४, ७-५ असे परतवून लावले. ही लढत १ तास ५९ मिनिटे चालली. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाने जॅकलिन क्रिस्टियनला ६-०, ६-१ असे नमवले. सातव्या मानांकित गॉफने कॅटरिना सिनियाकोव्हाचा ६-१, ६-४ असा पराभव केला.गतवर्षी उपविजेती ठरलेल्या डॅनिएल कॉलिन्सलाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. तेराव्या मानांकित कॉलिन्सने अॅना कालिस्कायाचा ७-५, ५-७, ६-४ असा पराभव केला. पहिल्या फेरीच्या निकालानंतर महिला विभागात जेसिका आणि गॉफ उपांत्य फेरीत समोरासमोर येऊ शकतात. त्याच वेळी कॉलिन्ससमोर श्वीऑनटेकचे आव्हान उभे राहू शकते. कोकोचा सामना अमेरिकन स्पर्धेची माजी विजेती एमा रॅडूकानूशी होऊ शकेल. रॅडूकानूने पहिल्या फेरीत जर्मनीच्या तमारा कोरपैशचा ६-३, ६-२ असा पराभव केला.
संरक्षण दलांत ‘अग्निपथ’ स्थित्यंतर घडवून आणेल; पंतप्रधान मोदी यांचा विश्वास
‘‘अग्निपथ योजना ही संरक्षण दलांना प्रबळ करण्यासाठी व भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यास समर्थ करण्यासाठी या दलांत स्थित्यंतर घडवणारी योजना ठरेल,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. तिन्ही सशस्त्र दलांत अल्पकालीन सेवेसाठी भरतीची योजना असलेल्या ‘अग्निपथ’च्या पहिल्या तुकडीच्या ‘अग्निवीर’ जवानांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार मोदी यांनी सोमवारी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे अभिनंदन केले. या पथदर्शक योजनेत सहभागी झाल्याबद्दल मोदींनी अग्निवीरांची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. ही योजना महिलांना सक्षम करेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, की युवा अग्निवीर सशस्त्र दलांना अधिक तरुण व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ‘तंत्रस्नेही’ बनवतील. विशेषत: सध्याच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. सशस्त्र दलांत तांत्रिकदृष्टय़ा अद्ययावत असलेले सैनिक महत्त्वाची भूमिका बजावतील.
पंतप्रधान म्हणाले की, ‘नव्या भारता’त नवा जोश आहे. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासह त्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकविसाव्या शतकातील बदलत्या युद्धतंत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष युद्धाच्या नव्या कक्षा व ‘सायबर’ युद्धाच्या आव्हानांवरही विवेचन केले. अग्निवीरांच्या क्षमतेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची भावना व दृढसंकल्पामध्ये सशस्त्र दलांचे शौर्य प्रतिबिंबित होते. आपल्या संरक्षण दलांनी देशाचा राष्ट्रध्वज आपल्या शौर्याने नेहमीच दिमाखात उंच फडकत ठेवला आहे.
महिला ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क व्हायकॉम १८ कडे; ९५१ कोटी रुपयांची विजयी बोली
महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पाच हंगामांसाठीचे प्रसारण हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम १८ने प्राप्त केले आहेत. त्यासाठी त्यांनी तब्बल ९५१ कोटी रुपयांची विजयी बोली लावल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. महिला ‘आयपीएल’च्या सामन्यांचे प्रसारण हक्क प्राप्त करताना व्हायकॉम १८ ने डिझ्नी-स्टार आणि सोनी यांना मागे टाकले.
महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाला मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होण्याची शक्यता असून या स्पर्धेत पाच संघांचा सहभाग असेल. या स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी ‘बीसीसीआय’ने सोमवारी लिलावाचे आयोजन केले होते. जागतिक प्रसारण हक्कांमध्ये टीव्ही, डिजिटल, तसेच टीव्ही व डिजिटल एकत्रित असे तीन विभाग करण्यात आले होते. या तीनही विभागांसाठी व्हायकॉम १८ ने लावलेली ९५१ कोटी रुपयांची एकत्रित बोली यशस्वी ठरली.
‘‘गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटची खूप प्रगती होत आहे. आता आपण आपली महिला ट्वेन्टी-२० लीग सुरू करणे हे पुढील पाऊल होते. चाहत्यांना आता महिलांचे अधिक क्रिकेट सामने पाहण्याची संधी मिळेल,’’ असे ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जानेवारी २०२२
MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑनलाइन सेवा पुरवणारी वेबसाईट डाऊन (Online application process for MPSC stopped) असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही दिली. मात्र रविवारी मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.
एमपीएससीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना (MPSC Recruitment) तांत्रिक अडचणी म्हणजेच टेक्निकल फॉल्टमुळे अनेकांना अर्ज भरता येत नव्हता. वेळेत अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. आयोगाने जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींनुसार सुरु असणारी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केलीय.
ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने संपूर्ण प्रक्रियाच स्थगित केलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. संबंधित वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच पुन्हा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी योग्य ती मुदतवाढ देण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलंय. “प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल,” असं ट्विट करण्यात आलंय.
पंतप्रधानांकडून कौतुक :
रविवारी एक वर्ष पूर्ण केलेल्या भारताच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. महासाथीच्या विरोधातील लढ्याला या मोहिमेने बळ दिले असून, तिच्यामुळे जीव वाचवण्यास आणि उपजीविकांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
महासाथीचा पहिल्यांदा फटका बसला, त्या वेळी या विषाणूबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. तथापि, आमचे शास्त्रज्ञ व संशोधक यांनी लशी विकसित करण्यात स्वत:ला झोकून दिले. लशींच्या माध्यमातून महासाथीशी लढण्यात आमचा देश योगदान देऊ शकला याचा भारताला अभिमान आहे, असे ट्वीट मोदी यांनी केले.
‘लसीकरण मोहिमेशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. आमचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची भूमिका असाधारण राहिलेली आहे’, असेही मोदी यांनी नमूद केले.
‘दुर्गम भागांत लोकांना लस दिली जात आहे, किंवा आमचे आरोग्य कर्मचारी तेथे लशी घेऊन जात आहेत अशी दृश्ये आम्ही पाहतो, तेव्हा आमची हृदये आणि मने अभिमानाने भरून येतात’, असे पंतप्रधान म्हणाले. महासाथीशी लढण्यात भारताचा दृष्टिकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण मार्चपर्यंत सुरू होण्याची चिन्ह :
देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अमलबाजवणी केली जात आहे. याचच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.
१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्चपासून सुरू होणार आहे, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) COVID-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.
आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.
देशात ६९.८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण; करोना प्रतिबंधक मोहिमेची वर्षपूर्ती :
देशातील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालावधीत देशभरात लशीच्या १५६.७६ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी ९३ टक्क्यांहून अधिक लोकांना करोना प्रतिबंधक लशीची किमान पहिली मात्रा मिळाली असून, ६९.८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त, स्वदेशात निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ या लशीवर एक टपाल तिकीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी जारी केले.
१० कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा भारताने गेल्या वर्षी १ एप्रिलला गाठला. २५ जून रोजी २५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या. ६ ऑगस्टला ५० कोटी, तर १३ सप्टेंबरला ७५ कोटी लसमात्रांचा टप्पा गाठण्यात आला, असे मांडविया यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले.
गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला देशातील लसीकरणाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला. या वर्षी ७ जानेवारीला लसमात्रांची १५० कोटींची संख्या ओलांडली गेली.
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरी ‘लक्ष्य’भेद!; सात्त्विक-चिराग, सेन यांना ऐतिहासिक जेतेपद :
भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन आणि आघाडीची जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना रविवारी इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात २० वर्षीय लक्ष्यने विश्वविजेत्या लोह किन येवला धूळ चारताना कारकीर्दीतील पहिले सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद ठरले.
तसेच पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिरागने तीन वेळा जगज्जेत्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेतिवान या इंडोनेशियन जोडीवर सरशी साधताना इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी ठरण्याचा मान मिळवला.
मागील महिन्यात जागतिक अजिंक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या लक्ष्यने रविवारी पाचव्या मानांकित येवचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये लक्ष्यकडे १६-९ अशी आघाडी होती.
जगज्जेत्या येवने पुनरागमन करताना लक्ष्यला सहजासहजी गुण मिळवण्याची संधी दिली नाही. त्याने २०-१९ अशी आघाडीही मिळवली. परंतु २२-२२ अशी बरोबरी असताना लक्ष्यने पुढील दोन्ही गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये येवने लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्यने २१-१७ अशी बाजी मारताना पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली.