चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 फेब्रुवारी 2024

Date : 17 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केन विल्यमसनने ३२वे शतक झळकावत सचिन-स्मिथला टाकले मागे, युनूस खानच्या विक्रमाशी केली बरोबरी
  • न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे. त्याने आता सर्वाधिक शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या दोघांची कसोटी क्रिकेटमध्ये ३२-३२ शतके आहेत. पंरतु, केन विल्यमसनने स्टीव्ह स्मिथपेक्षा कमी डाव खेळून ३२ कसोटी शतके पूर्ण केली आहेत. त्यामुळे तो सर्वात वेगवान ३२ कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शानदार शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. केन विल्यमसनने शानदार फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले आणि त्यामुळेच किवी संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
  • विल्यमसनने १७२ व्या डावात ३२ शतके पूर्ण केली. यासाठी स्टीव्हन स्मिथने १७४ डाव घेतले होते. रिकी पाँटिंगने १७६ डावांमध्ये ३२वे शतक तर सचिन तेंडुलकरने १७९ डावांमध्ये ३२वे शतक पूर्ण केले होते. जगातील अव्वल क्रमांकाच्या कसोटी फलंदाजाने आता शेवटच्या सात कसोटी सामन्यांमध्ये सात शतके ठोकली आहेत. माऊंट मौनगानुई येथील मालिकेतील पहिल्या कसोटीत ३३ वर्षीय विल्यमसनने दोन्ही डावांत (११८ आणि १०९) शतके झळकावली.

सर्वात जलद ३२ कसोटी शतके पूर्ण करणारा फलंदाज (डावानुसार)

  • १७२ – केन विल्यमसन<br>१७४ – स्टीव्ह स्मिथ
  • १७६ – रिकी पाँटिंग
  • १७९ – सचिन तेंडुलकर
  • १९३ – युनूस खान

कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज -

  • ५- केन विल्यमसन
  • ५- युनूस खान
  • ४- ग्रॅम स्मिथ, सुनील गावस्कर, रिकी पाँटिंग, रामनरेश सरवन
जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच, वित्त विभागाची हायकोर्टात माहिती…
  • जुन्या निवृत्तीवेतनाचा निर्णय केवळ राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, अशी खळबळजनक माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी याबाबत निर्णय घेतला गेला असल्याची माहिती न्यायालयात दिली गेली.
  • यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल केले आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या; पण १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने केला आहे. यापैकी इच्छुक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्यांना ही योजना लागू करण्यासाठी सहा महिन्यांमध्ये पर्याय सादर करायचा आहे. हा पर्याय न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्तिवेतन योजना लागू ठेवली जाणार आहे; परंतु हा कल्याणकारी निर्णय जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट नवीन निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली होती. वित्त विभागाने यासंदर्भात ३१ ऑक्टोबर २००५ रोजी निर्णय जारी केला होता. त्यात नवीन निर्णयामुळे सुधारणा झाली आहे. नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या; पण १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या दोनशेवर जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
  • दरम्यान, वित्त विभागाद्वारे संबंधित निर्णय जारी करण्यात आल्यामुळे गेल्या ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निर्णय याचिकाकर्त्यांना लागू होतो का, अशी विचारणा केली होती. परिणामी, वित्त विभागाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यातील खळबळजनक माहितीमुळे इतर अधिकारी-कर्मचायांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणावर न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण? राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर
  • मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला. त्यावर येत्या मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजास १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याचे समजते.कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.
  • भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात २०१८ मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयात वैध ठरलेले हे आरक्षण कालातंराने सर्वोच्च न्यायालयाने मात्र रद्द केले होते.कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना इतर मागास प्रवर्गाच्या सवर्गाचे आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे.
  • या आंदोलनाची दखल घेत मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करून त्यांना पुन्हा आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगामार्फत गोखले इन्स्टिटय़ूट, आयआयपीएस या नामांकित संस्थांच्या साह्याने २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
  • हा अहवाल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यानंतर तो खुला केला जाणार आहे. आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब केले असून त्यानुसार मराठा समाजास शिक्षणात आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधिमंडळात संमत करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजाच्या अन्य प्रश्नावर तसेच कुणबी नोंदी साडपडेल्यांना कुणबी दाखले देण्याबाबतची या अधिवेनात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय नागरिक स्मार्टफोनच्या आहारी; ८४ टक्के लोकांमध्ये दिसतेय ‘ही’ सवय
  • बरेच लोक स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला स्मार्टफोनमध्ये गुंतलेली लोक आपण पाहतच असतो. पण लोकांचं स्मार्टफोनमध्ये गुतलेलं प्रमाण किती आहे? याची आकडेवारी खूप वेगवेगळी आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने याबाबत एक सर्व्हे केला आहे. ज्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या अहवालानुसार भारतातील ८४ टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या १५ मिनिटांच्या आत आपला स्मार्टफोन तपासतात. तसेच दिवसभरातला ३१ टक्के वेळ लोक स्मार्टफोनवर घालवतात आणि दिवसांतून सरासरी ८० वेळी लोक आपला मोबाइल तपासतात.

स्ट्रिमिंग कंटेटवर अधिक वेळ जातोय

  • ‘स्मार्टफोनच्या अनुभवाची पुनर्कल्पना: फोन अधिक स्मार्ट बनवण्यात ‘सरफेसेस’ महत्त्वाची भूमिका कशी बजावतात’ (Reimagining Smartphone Experience: How ‘Surfaces’ can play a key role in making the phone smarter) अशा लांबलचक नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बरेचसे लोक स्मार्टफोनवर ५० टक्के वेळ स्ट्रिमिंग कंटेटवर घालवतात.

मोबाइलवर घालवणारा वेळ वाढला

  • स्मार्टफोनवर घालविण्यात येणाऱ्या वेळेतही वाढ झाल्याची आकडेवारी अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. २०१० साली सरासरी दोन तास स्मार्टफोनवर घालवले होते, त्यात वाढ होऊन आता ४.९ तासांचा वेळ स्मार्टफोनवर घालवला जातो. विशेष म्हणजे २०१० साली, मोबाइलवर बोलणे किंवा मजकूराच्या रुपातील संदेश पाठविण्यासाठी १०० टक्के वेळ वापरला जात होता. मात्र २०२३ मध्ये बोलणे आणि मेसेज करणे यासाठी फक्त २०-२५ टक्के वेळ वापरला जातो.
  • स्मार्टफोनच्या वापराबाबत समाजीकरणाने दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर सर्चिंग, गेमिंग, शॉपिंग, ऑनलाईन व्यवहार आणि बातम्यांचा क्रमांक लागतो. १८-२४ वयोगटातील मुलं ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा इन्स्टाग्राम रिल्स, यूट्यूब शॉर्ट्स इत्यादीसारख्या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ पाहण्यात जास्त वेळ दवडत असल्याचे दिसत आहे.
“माझं जास्त मौन बाळगणं योग्य नाही”, कबीराचा दोहा ऐकवत काय म्हणाले चंद्रचूड?
  • देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कबीराच्या दोह्याचं उदाहरण देत एक वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे. प्रयागराज या ठिकाणी राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या समारंभात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं तसंच शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत चंद्रचूड?

  • ‘अति का भला न बोलना, अति की भली न चूप, अति का भला न बरसना, अति की भली न धूप’ हा दोहा ऐकवत डी. वाय. चंद्रचूड म्हणाले समाजातली कुणीही व्यक्ती जास्त बोलत असेल तर ते योग्य नाही त्याचप्रमाणे मी जास्त शांत राहणं, मौन बाळगणं योग्य नाही. यावेळी त्यांनी कायद्याबाबत अनेक गोष्टींचा उल्लेख केला. कायद्याचं शिक्षण घेणं हे फक्त तुमचा पेशा म्हणून स्वीकारु नका. तर एक वकील झाल्यानंतर आपल्याला नव्या विषयांची ओळख, समाजातल्या समस्या, तसंच बदल घडवून आणणं यावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातलं शिक्षणाचं क्षेत्र हे आणखी विस्तारलं पाहिजे असंही डी. वाय. चंद्रचूड म्हणाले आहेत.

कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये

  • शिक्षण दिलं जात असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. कुठलाही अभ्यासक्रम असा हवा जो विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल. अगदी इंग्रजी भाषा असेल तरीही त्यांना त्याचं दडपण यायला नको. हिंदीतून शिक्षण देण्यास प्राथमिकता दिली गेली पाहिजे. असं झालं तर अनेक प्रतिभाशाली विद्यार्थी समोर येतील. शिक्षणाच्या संधीही योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत. भाषा, प्रांत, लिंग यांच्या आधारे कुठलाही भेदभाव व्हायला नको असंही मत चंद्रचूड यांनी मांडलं आहे. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे. याच कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चंद्रचूड यांना गणेशाची मूर्तीही भेट म्हणून दिली. हा फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहे.
योजना शेतकरी हिताच्याच! पंतप्रधान मोदी यांचे ठाम प्रतिपादन
  • पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र झाले असताना, शुक्रवारी हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’, असे सांगत आंदोलक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
  • काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा योजना घोषित केली पण, त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता आला नाही. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने हमी दिली नाही. पण, केंद्रात आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना केवळ बँकेचे कर्ज मिळवून दिले नाही तर आम्ही हमीही दिली, असे मोदी म्हणाले.
  • किमान आधारभूत किमतीसंदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, हरियाणातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अप्रत्यक्ष दखल घेतली. केंद्र सरकारने छोटय़ा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी किसान सन्मान निधीसारख्या योजना राबवल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
  • आंदोलक शेतकरी नेते व तीन केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये गुरुवारी पाच तास झालेली चर्चाही निष्फळ ठरली. आत्तापर्यंत तोडगा काढण्यासाठी तीन बैठका झाल्या आहेत. शेतकरी नेत्यांनी अनेक सूचना केल्या असून चर्चा सकारात्मक झाली, असे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी पत्रकारांना सांगितले. हमीभावाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालू राहील, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.
राम मंदिर आता रोज तासभर बंद
  • श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने शुक्रवारपासून अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदि रोज दुपारी एक तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून श्रीराम दुपारी तासभर विश्रांती घेतील. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतर मंदिरात येणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर न्यासाने दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाढवली आहे.
  • आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले, की श्री राम हे पाच वर्षांच्या बालक रूपात आहेत, त्यामुळे बालदेवतेला थोडी विश्रांती देण्यासाठी न्यासाने हा निर्णय घेतला आहे. या काळात मंदिराचे दरवाजे दुपारी एका तासासाठी बंद ठेवले जातील. हे मंदिर दुपारी साडेबारा ते दीडपर्यंत बंद राहील. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ापूर्वी रामलल्लांच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत होती. दुपारी दीड ते साडेतीन या काळात मंदिर बंद ठेवण्यात येत असे.

आता काँग्रेसचे ‘जय सियाराम’ - मोदी

  • ‘भगवान रामचंद्र ‘काल्पनिक’ असल्याचे जे मानायचे आणि ज्यांना राममंदिराचे बांधकाम नको होते, तेच आता ‘जय सियाराम’चा जयघोष करत आहेत,’ अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी येथे बोलताना केली. आज संपूर्ण देश अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामलल्लांचे दर्शन घेत आहे. एवढेच काय काँग्रेसची जी मंडळी प्रभू रामाला काल्पनिक म्हणायचे, ज्यांना कधीच अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे नव्हते तेही ‘जय सियाराम’ म्हणू लागले आहेत अशी टीका त्यांनी केली.

 

एअर इंडिया एकूण ८७० विमानं खरेदी करणार; कराराची किंमत लाखो कोटींमध्ये

  • टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया कंपनीने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस कंपन्यांसोबत करार करत ४७० विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पून्हा आणखी ३७० विमानं घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण ८७० विमानं काही पुढील वर्षात दाखल होणार आहेत. एअर इंडियाचे वरिष्ठ वाणिजिक्य आणि रुपांतरण विभागाचे अधिकारी निपुण अग्रवाल यांनी बुधवारी लिंक्डिनवर लिहिलेल्या एका पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. तसेच एअर इंडियाच्या करारानंतर भारत आणि जगभरात या कराराचे कौतुक केले गेले, लोकांचे हे प्रेम आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असेही अग्रवाल म्हणाले.
  • एअर इंडियाने मंगळवारी फ्रांसच्या एअरबसकडून २५० तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने घेणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे. आता निपुण अग्रवाल यांनी सुचित केल्याप्रमाणे हा करार आणखी मोठा होणार आहे. कारण या ४७० विमानांच्या खरेदीमध्ये आणखी ३७० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे ऐकूण खरेदी करण्यात येणाऱ्या विमानांची संख्या ८४० होणार आहे.
  • जुन्या करारानुसार जे ४७० विमानं घेतली जाणार होती, त्यामध्ये पुढच्या दशकापर्यंत ३७० विमानांची वाढ करण्यात येणार आहे. त्याबरोबर विमानाच्या इंजिनाची देखभालीसाठी सीएफएम इंटरनॅशन रोल्स रोयस आणि जीई एरोस्पेस या कंपन्यांसोबत करार करण्यात आल्याची माहती अग्रवाल यांनी दिली. मात्र सर्व विमानांच्या आगमनाची तारीख अजून निश्चितपणे सांगण्यात आलेली नाही. एअरबसचे ए ३५० हे विमान याचवर्षी भारतात येईल. तर एअरबसच्या ए३२१ न्यूओस आणि इतर विमानांची डिलिव्हरी पुढील वर्षात मिळेल.

जगात पुन्हा भारताचा डंका! यूट्यूबच्या CEO पदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती

  • यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. आता अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.
  • यूट्यूब हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. सुसान व्होजिकी गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या २०१४ साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झाली. पण, कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचा सुसान व्होजिकी यांनी सांगितलं.
  • नील मोहन यांनी २००८ साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केली होती. २०१५ साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकार पदी नील मोहन यांनी नियुक्ती झाली आहे. दरम्यान, सुसान व्होजिकी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अल्फाबेट इंकच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची पडले.

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त; समृद्धी महामार्ग, वंदे भारतनंतर मिळाली तिसरी भेट

  • शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज(गुरुवार) सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.
  • शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज(गुरुवार) सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला.
  • सध्या शिर्डीला १३ विमानसेवा - शिर्डी विमानतळही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये सुरु झाले होते. आता या सुविधेमुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला १३ विमानसेवा आहेत.

पाणी सुरक्षा हा चिंतेचा विषय- पंतप्रधान

  • पाणी सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे सांगून, देशाच्या निसर्गाशी असलेल्या ‘भावनिक नात्याचे’ पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. या नात्यालाच जग ‘कायमस्वरूपी विकास’ म्हणते, असे त्यांनी सांगितले.
  • आध्यात्मिकतेचा प्रसार करणारे ब्रह्मकुमारीज आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांची संयुक्त देशव्यापी मोहीम असलेल्या ‘जल अभियानाचे’ उद्घाटन करताना मोदी बोलत होते. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील ब्रह्मकुमारीजच्या अबू रोड मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाद्वारे संबोधित केले. पाण्याचे संवर्धन हा सामूहिक चिंतेचा विषय असायला हवा असे सांगतानाच, जलप्रदूषण आणि भूजलाच्या पातळीत होणारी घट याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली.
  • ही जनजागृती पुढील आठ महिने देशभर राबवली जाणार असून, त्याद्वारे १० कोटी लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. ‘एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येमुळे पाणी सुरक्षा हा भारतासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. ही आपणा सर्वासाठी सामूहिक जबाबदारी आहे. पाणी असेल, तरच उद्याचा दिवस असेल त्यासाठी आपल्याला आजपासूनच मिळून प्रयत्न करावे लागतील’, असे मोदी म्हणाले. जलसंवर्धन हा हजारो वर्षे भारताच्या अध्यात्माचा भाग राहिलेला आहे. त्यामुळेच आपण पाण्याला ईश्वर आणि नद्यांना माता म्हणतो. ज्या वेळी एखादा समाज निसर्गाशी असा भावनिक संबंध स्थापित करतो, तेव्हा जग त्याचे वर्णन ‘कायमस्वरूपी विकास’ असा करते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

त्रिपुरामध्ये ८१ टक्के मतदान, केंद्रांवर मोठय़ा रांगा; ब्रू स्थलांतरितांचे अनेक वर्षांनंतर मतदान

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. एकूण ८१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानासाठी राज्यातील विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तुरळक घटना वगळता राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. २ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

त्रिपुरा विधानसभेची सदस्य संख्या ६० असून सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी मतदानाची निर्धारित वेळ वाढवून रात्री ९.३० करण्यात आली होती. यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले आहे. राज्यात नुकत्याच पुनस्र्थापित करण्यात आलेल्या ब्रू स्थलांतरितांनी प्रथमच मतदानात भाग घेतला. राज्यात ब्रू निर्वासितांची एकूण लोकसंख्या ३७,१३६ असून त्यापैकी १४,००५ मतदानासाठी पात्र आहेत.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 फेब्रुवारी 2022

 

निर्बंध शिथिल करा; रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना :
  • देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़

  • करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडय़ात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५०,४७६ इतकी नोंदविण्यात आली़  गेल्या २४ तासांत २७,४०९ नवे रुग्ण आढळल़े दिवसभरात करोना चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६३ आढळले’’ याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आह़े ‘‘करोना

  •  रुग्णवाढीनंतर अनेक राज्यांनी आपल्या सीमा आणि विमानतळांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले  सार्वजनिक आरोग्य संकटाला तोंड देताना या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहारांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी,’’ असे राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटले आह़े

  • सध्या देशभरात दैनंदिन रुग्णसंख्या घटत असल्याने राज्यांनी तेथील करोनास्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि ते कमी करावेत, असे निर्देश देताना केंद्राने परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध नुकतेच शिथिल केल्याचा दाखला राजेश भूषण यांनी पत्रात दिला आह़े करोना नियंत्रणाबरोबरच नागरिकांचे जीवन आणि उपजीविकेवरील करोनाचा दुष्परिणाम कमीतकमी असेल, यावर भर देण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार राजेश भूषण यांनी या पत्रात केला.

मार्क झकरबर्गनं केली ‘मेटामेट्स’ची घोषणा, कंपनीचं ब्रीदवाक्यही बदललं :
  • गेल्या महिन्याभरात फेसबुकची कमी झालेली युजर्सची संख्या, मार्क झकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत तसेच शेअर्समध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर फेसबुकमध्ये लवकरच काही नव्या उपाययोजना पाहायला मिळण्याची शक्यता अनेक व्यवसाय तज्ज्ञ व्यक्त करत होते.

  • अखेर त्याची घोषणा खुद्द मार्क झकरबर्गनंच केली असून फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचं त्यानं बारसंच करून टाकलं आहे. याशिवाय इतर काही गोष्टींसोबतच कंपनीचं ब्रीदवाक्य देखील त्यानं बदलून टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच फेसबुकच्या मूळ कंपनीचं नामकरण ‘मेटा’ असं करण्यात आलं होतं. त्यानंतरचा हा दुसरा मोठा बदल आहे!

  • गुगलचे गुगलर्स, तसे मेटाचे - कर्मचाऱ्यांच्या नव्या नावासंदर्भात मार्क झकरबर्गनं माहिती दिली आहे. ज्या प्रकारे गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स म्हणतं, मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज म्हणतं तसंच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांना ‘मेटामेट्स’ म्हटलं जाईल, असं मार्क झकरबर्गनं जाहीर केलं आहे. लवकरच हे बदल लागू केले जातील असं मार्कनं फेसबुक कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितलं आहे.

राज्यातल्या शहरांची, गावांची नावं बदलण्यासाठी जनतेकडून मागवणार सूचना; ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा :
  • देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक कारणांमुळे अनेक शहरांवरील शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. याचसंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आसाममधील शहरे आणि गावांची नावे बदलण्यासाठी सूचना मागवण्यात येतील आणि त्यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू करेल जिथे जनता त्यांच्या सूचना देऊ शकेल.

  • खुद्द मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी हे पोर्टल सुरू करण्याबाबत माहिती दिली आणि ट्विट केले की, ‘एका नावात बरेच काही आहे. एखाद्या शहराचे, गावाचे किंवा गावाचे नाव त्यांची संस्कृती, परंपरा आणि सभ्यता दर्शवते. जी नावं आमच्या सभ्यतेच्या, संस्कृतीच्या विरुद्ध आहे आणि कोणत्याही जाती किंवा समुदायासाठी अपमानास्पद आहेत ती बदलण्यासाठी आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवू.

  • आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. जनरल बिपिन रावत यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर आरोप करण्यात काँग्रेसने कोणतीही कसर सोडली नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. “ज्या दिवसापासून ते लष्करप्रमुख झाले, तेव्हापासून त्यांनी त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. पण जेव्हा मी त्याला आपल्या शूर सैनिकांचा अपमान केल्याबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा तो संतापतो. हा नवा भारत आहे. अशी वृत्ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही”, असं ते म्हणाले होते.

“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना :
  • पंजाबमध्ये मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच तिथल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

  • यासाठी मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला असून त्या वेळी जर फक्त ६ किलोमीटर पुढे भारतीय सैन्य गेलं असतं, तर गुरूनानक देव यांची तपोभूमी भारतात राहिली असती, असं देखील मोदी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

  • पहिली घटना…देशाची फाळणी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशाची फाळणी, १९६५चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१चं बांगलादेश युद्ध या तीन घटनांचा उल्लेख केला आहे. “जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा काँग्रेसचे लोक होते. यांना एवढंही समजलं नाही की सीमेपासून ६ किलोमीटर अंतरावर गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला (लाहोर) भारतात घेतलं जावं. काँग्रेसच्या लोकांनी पाप केलं आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.

१७ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.