चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ डिसेंबर २०२२

Date : 17 December, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

भारताच्या गोल्डन बॉयचा आणखी एक पराक्रम, नीरज चोप्राने उसेन बोल्टचा मोडला विक्रम : 
  • नीरज चोप्रा अॅथलेटिक्स विश्वातील कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नीरज चोप्राचे भारतापासून जगभरात करोडो चाहते आहेत. २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी खूप खास आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राची खूप मुलाखत घेण्यात आली आणि त्यांच्याबद्दल अनेक लेख लिहिले गेले. यावर्षी त्याच्या खात्यात आणखी एक मोठा विक्रम जमा झाला आहे. २०२२ मध्ये नीरज चोप्रांवर सर्वाधिक लेख लिहिले गेले आहेत. या प्रकरणात त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले.

  • भारताचा गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नीरज चोप्राचे आणखी एक आश्चर्य पाहायला मिळत आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी २०२२ हे वर्ष खूप खास ठरले आहे. उल्लेखनीय म्हणजे, नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि असे करणारा तो पहिला अॅथलीट ठरला होता. त्याच वेळी, त्याच वर्षी डायमंड लीग जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरला. एकामागून एक ऐतिहासिक विजय मिळवून तो आता जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू बनला आहे.

  • ग्लोबल इंटरेस्टटेड चार्ट - भारताच्या नीरज चोप्राने उसेन बोल्टला मागे टाकल्याची बातमी जागतिक अ‍ॅथलेटिक्सने ग्लोबल इंटरेस्टटेड चार्ट प्रकाशित केल्यावर आली. आम्ही तुम्हाला सांगतो की दरवर्षी जागतिक ऍथलेटिक्स अशा खेळाडूंची यादी प्रसिद्ध करते ज्यांच्याबद्दल सर्वाधिक लिहिले गेले आहे. नीरज चोप्रा देखील अशाच लोकप्रिय खेळाडूंपैकी एक बनला आहे.

  • उसेन बोल्ट वर्षांमध्ये प्रथमच ऍथलीट्सबद्दल सर्वाधिक लिहिल्या गेलेल्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. ट्रॅक आणि फील्ड या खेळातून निवृत्त झालेला जमैकन स्प्रिंट लीजेंड त्याच्या पकडीतून निसटत असल्याचे हे लक्षण आहे. २०२२ मध्ये भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्राने करिष्माई बोल्टची जागा घेतली आहे, तर उसेन बोल्टने २०१७ मध्ये १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये विश्वविक्रम केला आहे, असे जागतिक ऍथलेटिक्सने नीरज चोप्रा यांच्या संदर्भात म्हटले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात ३० टक्क्यांनी वाढ? राज्य मंडळ तोटय़ात असल्याने प्रस्ताव : 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) तोटय़ात आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात खर्च वाढल्याने मंडळाला ४० ते ५० कोटींचा फटका बसत असून, आर्थिक नुकसानावर नियंत्रणासाठी दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क ३० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला. 

  • राज्य मंडळ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. दहावी आणि बारावीच्या साधारणपणे ३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा राज्य मंडळामार्फत घेतली जाते. राज्य मंडळ स्वायत्त असल्याने आर्थिक कारभार संस्थेच्याच स्तरावर केला जातो. दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींचे शुल्क आदी माध्यमातून राज्य मंडळाला उत्पन्न मिळते. सध्या दहावीचे शुल्क ३७५ रुपये, तर बारावीचे शुल्क ४१५ रुपये आहे. परीक्षा शुल्क आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींच्या माध्यमातून साधारणपणे १८० कोटींचे उत्पन्न मिळते. राज्य मंडळाने २०१७ मध्ये केलेल्या शुल्कवाढीनंतर गेल्या सहा वर्षांत शुल्कवाढ केलेली नाही. मात्र दरम्यानच्या काळात अन्य खर्चामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ न होता खर्च वाढल्याने राज्य मंडळ तोटय़ात गेल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

  • संस्थेला राज्य शासनाकडून निधी दिला जात नाही. आस्थापना खर्चासह शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन यासह विद्यार्थ्यांसाठीच्या सोयीसुविधा, परीक्षकांचे मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन आदी खर्च मंडळालाच करावा लागतो. पूर्वी दहावी आणि बारावीचे मिळून साधारणपणे ३५ लाख विद्यार्थी असायचे. आता विद्यार्थी संख्या ३० लाखांपर्यंत कमी झाल्याने उत्पन्नात वाढ झालेली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाचे दर वाढले, कागदाचे दर वाढले, मनुष्यबळाचा खर्च मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. परिणामी ४० ते ५० कोटींचा तोटा मंडळाला सहन करावा लागत आहे. मंडळाच्या ठेवींचे व्याज खर्चासाठी वापरण्याची वेळ मंडळावर आली आहे. मंडळाच्या उत्पन्नात वाढ न झाल्यास मंडळ आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

  • दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या शुल्कात ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुढील वर्षांपासून शुल्कवाढ लागू करण्यात येईल.

व्यक्तिगत स्वातंत्र्य हा‘मौल्यवान’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य :

 

  • व्यक्तिगत स्वातंत्र्य हा एक ‘‘मौल्यवान आणि अविभाज्य अधिकार’’ आहे. त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालय आपले ‘‘साधे घटनात्मक कर्तव्य, बंधन आणि कार्य पार पाडते. त्यात अधिक आणि कमी असे काही नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शुक्रवारी स्पष्ट केले.

  • प्रलंबित खटल्यांचे प्रमाण मोठे असताना सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज आणि क्षुल्लक जनहीत याचिकांवर सुनावणी घेऊ नये, असे विधान केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी केले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे वरील भाष्य महत्त्वाचे मानले जाते.

  • आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीचे ऐकत नसू तर आम्ही येथे असण्याचे औचित्य काय? अशी उद्विग्नताही खंडपीठाने व्यक्त केली. खंडपीठात न्या. पी. एस. नरसिंहा यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने कोणताही खटला लहान किंवा मोठा नसतो. त्यामुळे आम्ही व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या प्रकरणांवर कारवाई केली नाही आणि याचिकाकर्त्यांना दिलासा दिला नाही तर आम्ही येथे काय करीत आहोत, असा प्रश्न निर्माण होतो, असेही खंडपीठाने सुनावले. उत्तर प्रदेशातील एक याचिकाकर्ते इकराम यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि न्यायालयाचे घटनात्मक कर्तव्य यावर टिप्पणी केली.

क्रोएशिया-मोरोक्को आमनेसामने : 
  • विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी शनिवारी होणारी तिसऱ्या स्थानासाठीची लढत जिंकून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची विजयी सांगता करण्याचे क्रोएशिया आणि मोरोक्को या संघांचे लक्ष्य असेल. क्रोएशियाचा कर्णधार आणि तारांकित मध्यरक्षक लुका मॉड्रिचचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता आहे.

  • क्रोएशिया आणि मोरोक्को या दोनही संघांनी विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, उपांत्य फेरीत क्रोएशियाला अर्जेटिनाकडून ०-३ असा, तर मोरोक्कोला फ्रान्सकडून

  • ०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना विश्वचषकाच्या जेतेपदापासून वंचित राहावे लागले.

  • क्रोएशिया आणि मोरोक्को हे संघ यंदा साखळी फेरीत आमनेसामने आले होते. हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली.

  • गतविश्वचषकात अंतिम फेरीपर्यंतची मजल मारणाऱ्या क्रोएशियाकडून यंदा फार कोणाला अपेक्षा नव्हत्या. मात्र, सांघिक कामगिरीच्या बळावर क्रोएशियाने उपांत्य फेरीचा टप्पा गाठला. अर्जेटिनाविरुद्ध क्रोएशियाला सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ डिसेंबर २०२१

 

१०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा :
  • गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झालं. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेक वर्ग ऑनलाईन झाले.

  • महाराष्ट्रात आत्ता कुठे शाळा काही प्रमाणात सुरू होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर किमान पुढील वर्षी तरी १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार का? आणि होणार तर कधी आणि कशा होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता या परीक्षांचा मुहूर्त ठरला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

  • वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात २०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.

  • लेखी परीक्षा किती काळ चालणार - “ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा कधी - “१२वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तर १०वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

लग्नासाठी मुलीचे वयही २१ वर्षे; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय :
  • महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षांवरून २१ वर्षे, म्हणजे पुरुषांइतकेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  विवाहाचे समान वय निश्चित करण्यासाठी, निरनिराळ्या समुदायांतील विवाहांशी संबंधित विविध वैयक्तिक कायद्यांमध्ये आनुषंगिक बदल करण्याचाही प्रयत्न सरकार याबाबतच्या प्रस्तावित विधेयकाद्वारे करू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • आतापर्यंत विवाहासाठी महिलांचे कायदेशीर वय १८ वर्षे, तर पुरुषांचे २१ वर्षे होते. महिलांच्या विवाहासाठी किमान वय किती असावे याबाबत  सरकार विचार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर वर्षभराने सरकारने हा निर्णय घेतला. 

  • दरम्यान, महिलांचे विवाहाचे वय वाढवणे म्हणजे ‘आजाराच्या कारणापेक्षा त्याच्या लक्षणांवर इलाज करणे आहे’, असे पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. कमी वयात विवाहाबाबत चिंता हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असले, तरी या मुद्द्यावर कायदेशीर कारवाई करणे म्हणजे ज्यामुळे अशा प्रथा अनेक शतके अस्तित्वात राहिल्या त्या मूळ कारणांचा शोध न घेता लक्षणांवर इलाज करण्यासारखे आहे.

  • सखोल रुजलेली लैंगिक असमानता, प्रतिगामी सामाजिक निकष, आर्थिक असुरक्षितता, दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधींचा अभाव या सर्वांमुळे कमी वयात आणि सक्तीच्या विवाहाच्या घटना घडतात, असे या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

लससंशोधन केंद्र उभारण्यासाठी ‘सीरम’तर्फे ऑक्सफर्डला ५०० कोटी :
  • पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची मालकी असलेल्या पूनावाला कुटुंबाच्या अंदाजे ५०० कोटी रुपयांच्या अर्थदानातून नवे लससंशोधन केंद्र उभारण्याची घोषणा ऑक्सफर्ड विद्यापीठाने केली आहे.

  • पुनावाला कुटुंबाच्या मालकीच्या सीरम लाइफ सायन्सेस, अदर पुनावाला यांच्या मालकीची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नियोजित संशोधन केंद्र लससंशोधनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाने बुधवारी जाहीर केले.

  • प्रस्तावित लससंशोधन केंद्र विद्यापीठाच्या ‘ओल्ड रोड कॅम्पस’मध्ये उभारण्यात येणार असून तेथे ३०० हून अधिक संशोधक काम करतील, असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.  

  • या संशोधन केंद्रासाठी पूनावाला कुटुंबाच्या मालकीच्या सीरम लाइफ सायन्सेसने ५०० कोटी रुपयांचे (सुमारे ५० दशलक्ष ब्रिटिश पौंड) अर्थदान करण्याचा निर्णय घेतला आहे. लससंशोधनासाठी पूनावाला कुटुंबाने आजवर केलेले सर्वांत मोठे अर्थदान असल्याचे मानले जाते.

Apple कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार १००० डॉलर्सचा बोनस :
  • करोनाचं संकट संपेल असं वाटत असताना नव्या व्हेरिएंटची धास्ती वाटू लागली आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटू लागले आहेत. त्यामुळे कार्यालयं आणि शाळा सुरु करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे.

  • आता अ‍ॅप्पल या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. खरं तर, अ‍ॅप्पलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्‍यांसाठी कार्यालय उघडले जाईल. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता.

  • कंपनीने आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. करोनाचा उद्रेक पाहता अ‍ॅप्पलने तीन रिटेल स्टोअर्स देखील बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले स्टोअर्स मियामी, मेरीलँड आणि ओटावा येथे आहेत. अ‍ॅप्पलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केलं आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता.

  • मात्र आता पुन्हा हा नियम लागू केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अ‍ॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अ‍ॅप्पलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.

देशभरात ८७ जण ओमायक्रॉनबाधित :
  • कर्नाटक, तेलंगण, दिल्ली व गुजरात या राज्यांत मिळून गुरुवारी ओमायक्रॉनच्या १४ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे, देशभरातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ८७ झाली आहे. गुरुवारी कर्नाटकातील ५ रुग्णांसह, तेलंगण, दिल्ली व गुजरात या राज्यांत मिळून १४ जणांना करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झाला.

  • दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी देशातील करोनाविषयक परिस्थितीचा, तसेच सर्व केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्यविषयक पायाभूत सोयींच्या तयारीचा आढावा घेतला, असे आरोग्य मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

  • महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या सर्वाधिक, म्हणजे ३२ रुग्णांची नोंद झाली असून, त्याखालोखाल राजस्थानचा (१७) क्रमांक आहे. देशातील ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण २ डिसेंबरला कर्नाटकमध्ये आढळले होते. कर्नाटकात ओमायक्रॉनचे आणखी ५ रुग्ण आढळल्यामुळे, तेथील रुग्णांची संख्या आठवर गेली आहे.

  • देशात गेल्या २४ तासांत ७९७४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ३,४७,१८,६०२ वर पोहचली. मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या ८७,२४५ इतकी कमी झाली. याच काळात ३४३ जणांचा करोनाने मृत्यू झाल्यामुळे करोनामृत्यूंचा आकडा ४,७६,४७८ वर पोहचला आहे.

१७ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.