चालू घडामोडी आणि दिनविशेष - 17 ऑगस्ट 2023

Date : 17 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषक स्पर्धेतील यश ऐतिहासिक -आनंद
  • विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत एका देशाच्या एका खेळाडूनेही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठणे हे मोठे यश असते. आपल्या तब्बल चार खेळाडूंनी हा टप्पा गाठला आहे. भारतीय बुद्धिबळपटूंचे हे यश ऐतिहासिक आहे, असे गौरवोद्गार पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने काढले.
  • भारतातील बुद्धिबळ आणि बुद्धिबळपटूंनी गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली अलौकिक कामगिरी सध्या बाकू येथे सुरू असलेल्या विश्वचषकातही कायम राखली आहे. भारताच्या डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि अर्जुन एरिगेसी या चार ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यात यश आले आहे.
  • ‘‘भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषकातील यश ऐतिहासिक आहे. या स्पर्धेत आव्हान शाबूत असलेल्या आठ बुद्धिबळपटूंपैकी चार भारतीय आहेत. हा भारतासाठी विक्रमच म्हणावा लागेल. आता या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आपल्या एक किंवा दोन बुद्धिबळपटूंना ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतून जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्याला आव्हान देणारा खेळाडू निश्चित केला जाईल. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेची भारतीय बुद्धिबळप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतील,’’ असे आनंदने सांगितले.
  • विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन बुद्धिबळपटू पुढील वर्षी कॅनडा येथे होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंद आणि एरिगेसी आमनेसामने आल्याने यापैकी एक स्पर्धेत आगेकूच करणार हे निश्चित आहे. उपांत्य फेरीतही त्यांनी विजय मिळवल्यास त्यांचे ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील स्थान पक्के होईल.
‘चांद्रयान-३’ चंद्राच्या अखेरच्या कक्षेत; प्रोपल्शन आणि लँडर वेगळे होण्याच्या तयारीत
  • भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ या अंतराळ यानाने बुधवारी महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. हे यान बुधवारी सकाळी ८.३० वाजता चंद्राच्या पाचव्या व अखेरच्या कक्षेत पोहोचले असून चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ आले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संस्थेने दिली.चांद्रयान-३ ने चौथ्यांदा आपली कक्षा बदलली असून आता ते चंद्राभोवती १५३ किमी ७ १६३ किमी या कक्षेत फिरत आहे.
  • चांद्रयान-३ या अंतराळ यानातील प्रोपल्शन मॉडय़ूल आणि लँडर मॉडय़ूल एकमेकांपासून वेगळी होण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी ते वेगळे करण्याचे नियोजित करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. चांद्रयान-३च्या लँडरमध्ये रोव्हर जोडण्यात आले असून या दोन्हीला मिळून लँडर मॉडय़ूल बोलले जाते. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण धुव्रावर अलगद उतरणार आहे.
राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान महिनाभर नागरिकांसाठी खुले
  • राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान बुधवारपासून महिन्याभरासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ‘ट्विटर’) प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले, की १६ ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या काळात सर्वाना अमृत उद्यान पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
  • १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी द्वितीय उद्यान उत्सवाचे उद्घाटन केले. ‘उद्यान उत्सव-२’अंतर्गत अमृत उद्यान १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ (सोमवार वगळता) जनतेसाठी खुले राहील. पर्यटक सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत (दुपारी ४ ला बागेत अंतिम प्रवेश) या बागेला भेट देऊ शकतात. ‘उद्यान उत्सव-१’अंतर्गत २९ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान अमृत उद्यान खुले करण्यात आले होते. त्या वेळी दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. हे उद्यान यंदा प्रथमच वर्षभरात दुसऱ्यांदा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे.
८० टक्के उमेदवार मुलाखतीत पगाराबाबत खोटं सांगतात, PhysicsWallah चा दावा!
  • नोकऱ्यांसाठी आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच मुलाखत, चर्चा, पगाराची अपेक्षा वगैरे सगळे रीतसर सोपस्कार पार पाडले असतील. मात्र, आपल्या कंपनीत मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार त्यांच्या पगाराबद्दल किंवा त्यांच्या आधीच्या अनुभवाबद्दल खोटं सांगतात, असा दावा PhysicsWalla च्या एचआर विभागाचे प्रमुख सतीष खेंगरे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी वापरलेल्या एका सॉफ्टवेअरच्या माहितीचा दाखला दिला आहे. मनीकंट्रोलनं ईटीएचआरवर्ल्डच्या दाखल्यानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी

  • या वृत्तानुसार PhysicsWalla यासाठी उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तपासणी करत आहे. त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. यातून त्यांच्या पार्श्वभूमीसोबतच उमेदवारांचे बँक अकाऊंट डिटेल्सही तपासले जातात, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
  • “कधीकधी उमेदवारांकडून आपल्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तरं खरी नसतात. ते त्यांच्या कामगिरीसंदर्भातील प्रश्नांवरही खोटं बोलू शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्तरांचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. PhysicsWalla डार्विनबॉक्स नावाच्या तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करतं. यातून कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी टार्गेट, कामाचं मूल्यमापन, त्यांच्या कामासाठी मानांकन आणि ठरवलेलं ध्येय व गाठलेलं ध्येय यातील तफावत अशा गोष्टींचं मापन करता येतं”, अशी प्रतिक्रिया सतीश केंगरेंनी इटीएसआरवर्ल्डला दिली आहे.
  • PhysicsWallaकडून त्यांच्या कंपनीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.
अहमदाबाद सर्वात परवडणारे शहर; पुणे, कोलकता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी
  • देशात वाढत्या व्याजदरांमुळे घरे परवडत नसल्याचे चित्र आहे. यातच आता घरे परवडणाऱ्या शहरांमध्ये अहमदाबादने पहिले स्थान पटकाविले आहे. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबाद अग्रस्थानी असून त्यानंतर कोलकता आणि पुण्याचा संयुक्तपणे दुसरा क्रमांक लागला आहे. या शहरांमध्ये उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्तय़ाचे प्रमाण कमी आहे.
  • मालमत्ता क्षेत्रातील नाइट फ्रँक संस्थेने याबाबतचा चालू वर्षांतील पहिल्या सहामाहीचा अहवाल बुधवारी जाहीर केला. त्यात सर्वसाधारण घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर तपासण्यात आले. हे गुणोत्तर म्हणजे उत्पन्नापैकी किती पैसे मासिक हप्तय़ासाठी जातात हे दर्शविते. देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये हे गुणोत्तर २०१० ते २०२१ या कालावधीत घसरल्याचे दिसून आले. करोना संकटाच्या काळात रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात करून व्याजदर दशकातील नीचांकी पातळीवर आणले होते. त्यामुळे हे गुणोत्तर घसरले होते. त्यानंतर वाढत्या महागाईमुळे रिझव्र्ह बँकेने व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. तेव्हापासून देशात घरांचे परवडणे कमी झाले आहे. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत देशातील प्रमुख आठ महानगरांमध्ये अहमदाबादमध्ये घरातील उत्पन्नाशी कर्जाच्या मासिक हप्तय़ाचे गुणोत्तर सर्वात कमी होते.

कौटुंबिक उत्पन्नाच्या तुलनेत मासिक हप्ता

  • अहमदाबाद : २३
  • पुणे : २६
  • कोलकता : २६
  • बंगळुरू : २८
  • चेन्नई : २८
  • दिल्ली : ३०
  • हैदराबाद : ३१
  • मुंबई : ५५ (टक्क्यांमध्ये)
२० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा: मोहित कुमारला सुवर्ण ; रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा अंतिम लढतीत ९-८ असा पराभव
  • भारताचा मोहित कुमार (६१ किलो) २० वर्षांखालील गटातील फ्री-स्टाईल प्रकारातील नवा जगज्जेता मल्ल ठरला. या वयोगटात विजेतेपद मिळविणारा मोहित चौथा भारतीय ठरला. दरम्यान, मुलींच्या ७६ किलो वजनी गटातून प्रियाने अंतिम फेरी गाठली. यापूर्वी मुलींच्या गटात गेल्या वर्षी अंतिम पंघालने ५३ किलो गटात विजेतेपद मिळवले होते.
  • मोहितने बुधवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या एल्डर अखमाडुनिनोवचा गुणांवर ९-८ असा पराभव केला. लढतीत एकवेळ मोहित ०-६ असा पिछाडीवर होता. मात्र, वेगवान कुस्ती करण्याच्या नादात एका क्षणी एल्डर उर्जा गमावून बसला आणि त्याचा फायदा घेत मोहितने सलग नऊ गुणांची कमाई करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २० वर्षांखालील गटात भारताला जागतिक स्पर्धेत २०१९ नंतर विजेतेपद मिळाले. त्यावेळी दीपक पुनिया विजेता ठरला होता. दीपक आता वरिष्ठ गटात खेळतो. मोहित भारताचा या गटातील चौथा विजेता ठरला. यापूर्वी पलिवदर चिमा (२००१) आणि रमेश कुमार (२००१) यांनी विजेतेपद पटकावले होते.
  • फ्री-स्टाईल विभागात ७४ किलो वजनी गटात जयदीप आणि १२५ किलो वजनी गटात रजत राहुल कांस्यपदकाचे मानकरी ठरले. जयदीपने किर्गिस्तानच्या झॉकशिलीक बेटाशोवाच ४-२, तर राहुलने कॅनडाच्या करनवीर सिंग माहिलचा ९-८ असा पराभव केला. यापूर्वी मंगळवारी झालेल्या लढतीतून सागर जगलने (७९ किलो) रौप्य, तर दीपक चहलने (९७ किलो) कांस्यपदक पटकावले.
  • दरम्यान, मुलींच्या गटातून प्रियाने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या केनेडी ब्लेडसचा प्रतिकार सहजपणे एकतर्फी लढतीत १०-० असा मोडून काढ़ला. प्रियाने आपल्या सर्व लढती एकतर्फी जिंकल्या. पहिल्या फेरीत तिने अल्बेनियाच्या मारिया सिलीनवर ४-० अशी मात केली, उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्याच ऑलिआक्झांड्रा काझ्लोवाचा प्रतिकार ११-० असा मोडून काढला. मुलींच्या गटातील अन्य एका लढतीत ६८ किलो वजनी गटात आरजूला उपांत्य फेरीत अल्बेनियाच्या एलिझाबेटा पेटलीकोवाकडून ३-९ असा पराभव पत्करावा लागला. आरजू आता कांस्यपदकाची लढत खेळेल.

 

आई-वडिलांचे कष्ट प्रेरणादायी!; राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरची भावना :
  • ‘संकेत पान टपरी’ ते राष्ट्रकुल पदक विजेता हा सारा प्रवास कठीण होता. या प्रवासात साथ देणारे आणि मला इथपर्यंत आणण्यासाठी खस्ता खाणारे आई-वडीलच माझ्यासाठी खरे प्रेरणास्रोत असल्याचे वेटलिफ्टिंगमधील राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता संकेत सरगरने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

  • स्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. त्यानंतर संकेतच्या हातावर लंडनमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली. संकेत सध्या मुंबईत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहे. ‘‘वडिलांना खेळाडू व्हायचे होते. परिस्थितीमुळे त्यांना जमले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे कष्ट मी पाहात होतो. कुटुंब चालवत असताना त्यांची होत असलेली ओढाताण बघत होतो. त्यामुळेच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि मी स्वत:ला त्या दृष्टीने घडवत गेलो,’’ असे संकेतने सांगितले.

  • सांगलीत पानाच्या दुकानात वडिलांना मदत करणारा संकेत त्यातून वेळ काढत अभ्यास, सराव याची सांगड घालत राष्ट्रकुल पदकापर्यंत पोहोचला. या प्रवासाबद्दल संकेत म्हणाला, ‘‘वडिलांनी दुकानाजवळच असलेल्या दिग्विजय व्यायामशाळेत मला घातले, वेटलिफ्टिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा मी यात लौकिक मिळवेन असे कधीच वाटले नव्हते. नाना सिंहासने आणि मयूर सिंहासने यांच्याकडून प्राथमिक धडे घेतले. प्रारंभीची दोन वर्षे तर अशीच गेली. स्पर्धा म्हणजे काय, हेदेखील माहीत नव्हते. जिल्हास्तराच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे, हेच मला कळत नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तर सोडा राष्ट्रीय स्तरापासूनही मी खूप दूर होतो. अपुऱ्या तयारीनेच मी विभागीय स्पर्धेत उतरलो. तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. परिपूर्ण तयारीशिवाय त्या स्पर्धेत कारकीर्दीतले पहिले रौप्यपदक मिळवले. तेव्हाच या खेळात कारकीर्द घडवण्याचा विचार निश्चित केला.’’

भारताने आक्षेप घेतलेले चिनी जहाज अखेर श्रीलंकेत :
  • श्रीलंकेच्या हंबन्टोटा या बंदरात चीनचे उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करणारे जहाज ‘युआन वँग ५’ मंगळवारी पोहोचले. या जहाजाच्या श्रीलंकेच्या बंदरातील वास्तव्याला भारताने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हेरगिरी होण्याची शक्यता असल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारताच्या आक्षेपामुळे श्रीलंकेने चीनला या जहाजाचे आगमन स्थगित करण्यास सांगितले होते. मात्र, नंतर या जहाजाच्या आगमनास श्रीलंकेकडून शनिवारी परवानगी देण्यात आली होती.

  • या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढता (ट्रॅकिंग) येतो. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिण भागातील हंबन्टोटा या बंदरात स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी पोहोचले. या बंदरात त्याचे २२ ऑगस्टपर्यंत वास्तव्य असेल. हे जहाज ११ ऑगस्टला येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, श्रीलंकेच्या प्रशासनाकडून परवानगीस विलंब झाल्याने त्याच्या आगमनासही उशीर झाला.

  • सुरक्षाविषयक चिंता व्यक्त करून भारताने श्रीलंकेवर विनाकारण आणलेला दबाव निर्थक असल्याची टीका चीनने केली होती. त्यानंतर श्रीलंका सरकारने भारत व चीनशी उच्चस्तरीय चर्चा केली. मैत्री, परस्पर विश्वास आणि भरीव संवादाद्वारे या जहाजास श्रीलंकेत येण्यास मान्यता देण्यात आल्याचे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

  • श्रीलंकेने स्पष्ट केले, की निर्धारित कालावधीत इंधन पुनर्भरणासाठी या जहाजास श्रीलंकेत थांबण्यास संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली. चीनच्या दूतावासाच्या विनंतीनुसार या जहाजाच्या श्रीलंकेतील वास्तव्यादरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार नाही. या जहाजास आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती श्रीलंका सरकारला चीनतर्फे करण्यात आली आहे.

‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करा, हिंदू महासंघाची मागणी :
  • सरकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, असं विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राजकीय वातावरण तापत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. ‘वंदे मातरम्’ऐवजी आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

  • ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘जन-गण-मन’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करावं आणि सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ म्हणणं अनिवार्य करावं, अशी मागणी दवे यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

  • ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला काही नेत्यांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना आनंद दवे म्हणाले की, “काल पुन्हा एकदा काही मुस्लीम नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला. हिंदू महासंघ म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की, त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हटल्यानं त्यांचं काहीही नुकसान होत नाही. त्यांच्या भावनासुद्धा दुखावल्या जात नाहीत. हिंदुंच्या दृष्टीने जिथे-जिथे अनुकूल घडतं, तिथे विरोध करण्याची गेल्या हजारो वर्षांची त्यांची परंपरा आहे. हे त्याचं एक नवीन उदाहरण आहे. अनेक लोकांनी ‘वंदे मातरम्’ म्हटलं आहे. अनेकांनी ‘वंदे मातरम्’ म्हणत लढा दिला आहे.”

‘बीसीसीआय’चे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.

  • चौधरी निवृत्त ‘आयपीएस’ अधिकारी होते. झारखंड पोलीस दलात पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहिले. २००५च्या झिम्बाब्वे दौऱ्यात ते भारताचे प्रशासकीय व्यवस्थापक होते. या दौऱ्यात माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालिक प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता.

  • तेव्हा चॅपेल यांनी ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष शरद पवार यांना ई-मेलद्वारे गांगुलीसह संघातील वरिष्ठांना वगळण्याची शिफारस केली होती. ‘बीसीसीआय’च्या सचिवपदाचा चौधरी यांचा कार्यकाळ कठीण होता. या कालखंडात ‘बीसीसीआय’चा कारभार प्रशासकीय समितीच्या हाती होता. या समितीने त्यांना काम करण्यास परवानगी नाकारली होती. विराट कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाचेही ते साक्षीदार होते.

१७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.