चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ ऑगस्ट २०२१

Date : 17 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुण्याच्या बापलेकीनं सर केलं आफ्रिकेमधील सर्वात मोठं शिखर; २० दिवसांमधील दुसरी मोठी मोहीम यशस्वी :
  • रशियामधील माउंट एलब्रुस शिखर सर करणाऱ्या मराठमोळ्या धनाजी लांडगे आणि गिरीजा लांडगे या बाप लेकीच्या जोडीने आणखी एक शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. आफ्रिका खंडातील एकमेव शिखर असलेल्या माउंट किलीमांजारोची उंची ६ हजार ८९५ मीटर ऐवढी आहे. बारा वर्षीय गिरीजा आणि तिचे वडील धनाजी यांनी या शिखरावर यशस्वीरित्या चढाई केलीय. या कामगिरीसाठी पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • आफ्रिका खंडातील पर्वतरांगांचा भाग नसलेला माउंट किलीमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. नुकतेच या दोघांनी रशियातील माउंट एलब्रूस शिखर सर केलं होतं. या मोहिमेनंतर नवीन आव्हान स्वीकारत धनाजी आणि गिरीजाने अथक परिश्रम घेत हे शिखर सर करण्याचा किर्तीमान स्थापीत केला आहे.

  • “या मोहिमेची सुरुवात ११ ऑगस्टपासून केली होती. मोहिमेदरम्यान १७०० मीटर, २७०० मीटर, ३७२० मीटर, ४७०० मीटर अशी टप्प्याटप्प्याने ४ दिवसात उंची गाठण्यात आली,” असं धनाजी यांनी सांगितलं आहे. या चढाईदरम्यान रोज नवीन प्रदेश व नवीन वातावरणाचा सामना करावा लागत होता.

  • पहिल्या दिवशी पावसाळी जंगल आणि पाऊस, दुसऱ्या दिवशी मुरलॅण्ड म्हणजेच खडकाळ असा भूभाग व दमट हवामानाचा सामना करावा लागला. तर तिसऱ्या दिवशी वाळवंट सदृश प्रदेश अन् ऊन्हाळी वातावरणाचा सामना करावा लागला. या सर्व परिस्थितींशी दोन हात करत १५ ऑगस्टच्या पहाटे १ वाजता शिखर माथ्याच्या मुख्य चढाईला म्हणजेच ४७०० मीटर वरून ५८९५ मीटरच्या चढाईला सुरुवात करण्यात आल्याचं धनाजी म्हणाले.

लॉर्ड्सवर इंग्लंडला धूळ चारत विराटने मोडला विंडीजच्या महान कर्णधाराचा रेकॉर्ड :
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लॉर्ड्सवर विजयी तिरंगा फडकावत मोठे यश मिळवले आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १५१ धावांनी हरवत १-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्सवर रंगलेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांची गरज होती, पण यजमान संघ अवघ्या १२० धावांवर सर्वबाद झाला.

  • इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवरील विजय हा भारतीय कर्णधार कोहलीचा ३७वा विजय होता. हा सामना जिंकण्याबरोबरच त्याने अनेक दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आणि जगात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या अव्वल चार कर्णधारांच्या यादीत नाव मिळवले. कोहलीने कसोटी विजयांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार क्लाइव लॉयड यांना मागे टाकले आहे. लॉयड यांनी कसोटीत ३६ विजय मिळवले होते.

  • दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने कसोटीत कर्णधार म्हणून ५३ विजय मिळवले आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ४८ कसोटी विजय नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ ४१ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार कोहली ३७ विजयांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  • विराट कोहलीने सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांना मागे टाकले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ६० कसोटीत २७ विजय मिळवले होते. सौरव गांगुलीने ४९ कसोटींचे नेतृत्व केले आणि २१ सामने जिंकले. मोहम्मद अझरुद्दीनने ४७ कसोटीत १४ विजय मिळवले होते.

काबूल विमानतळावर लवकरच अमेरिकेचे सहा हजार सैनिक  :
  • अमेरिका व मित्र देशांच्या नागरिकांना काबूलमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिका सहा हजार सैनिक पाठवित आहे.  अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे.

  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे, की त्यांनी अमेरिकेतील मित्र देशांच्या समपदस्थांना दूरध्वनी केले पण त्यात भारताचा समावेश नव्हता. अमेरिका व युरोपीय समुदायाच्या एकूण साठ देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले असून सत्तेवर असलेल्यांना मानवी व मालमत्ता हानीची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त निवेदनात म्हटल्यानुसार हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुढील ४८ तासात सहा हजार सैनिक विमानतळावर पोहोचून तेथील हवाई नियंत्रण ताब्यात घेणार आहेत. काबूलचा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आला असून अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्यांसाठीच फक्त तो खुला राहिला आहे.

  • येत्या काही आठवडय़ात अफगाणिस्तानात राहणाऱ्या अमेरिकी लोकांना तसेच दूतावास कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच काही अफगाणी नागरिक यांना हलवण्यात येणार आहे. जे अफगाणी लोक अमेरिकेचा आपत्कालीन स्थलांतर व्हिसा मिळवण्यास पात्र आहेत त्यांच्यातील दोन हजार जण आधीच अमेरिकेत पोहोचले असून सुरक्षा छाननी झालेल्या सर्व अफगाणी लोकांना अमेरिकेच्या ताब्यात दिले जाईल. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे, की ब्लिंकन हे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी व नॉर्वेच्या  परराष्ट्रमंत्र्यांशी स्वतंत्रपणे बोलले असून सुरक्षा स्थितीची चर्चा केली आहे. अमेरिकी दूतावासातील बहुतांश कर्मचाऱ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यात आले आहे.

ऑलिम्पिकपटूंशी पंतप्रधान मोदी यांचा मुक्तसंवाद :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व क्रीडापटूंची भेट घेतली. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी केलेल्या भाषणात भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचे कौतुक केल्यानंतर सोमवारी मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्वाना आमंत्रित केले.

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णासह एकूण सात पदकांची कमाई केली. शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यावर रविवारी सकाळी भारताचे सर्व क्रीडापटू लाल किल्ल्यावर ध्वजवंदनासाठी उपस्थित होते. सोमवारी मोदी सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्याशी संवाद साधताना दिसले. त्याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाशी चर्चा करताना मोदी हॉकी स्टीकची पडताळणी करताना आढळले.

  • भारतीय कुस्ती महासंघातर्फे निलंबित करण्यात आलेली कुस्तीपटू विनेश फोगट, सीमा बिस्ला, नेमबाजी, बॉक्सिंग क्रीडा प्रकारांचे चमू आणि महिला हॉकी संघानेसुद्धा मोदी यांचे घर गाठले.

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी! पार केला लसीकरणाचा मोठा टप्पा :
  • गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. भारतातही या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.

  • महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. काल म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

  • तर देशानेही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

  • ‘लसीकरणाच्या बाबतीत भारताने विक्रमी प्रगती केली असून आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ५५ कोटी मात्रा दिल्या आहेत. करोना विरोधातील भारताचा लढा बळकट करा. लसीकरण करून घ्या!’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केले.

राज्यात आज ‘डेल्टा प्लस’चे १० नवीन रूग्ण वाढले; एकूण रूग्णसंख्या ७६ वर :
  • राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसताना, आता डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे.

  • राज्यात आज आढळळेल्या डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये कोल्हापूर – ६, रत्नागिरी – ३, सिंधुदुर्ग – १ या रूग्णांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत आढळून आलेल्या ७६ रूग्णांपैकी पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

  • ‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून यात रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

१७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.