महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात बदल करण्याची मुभा आयोगाने दिली असली तरी यातून उमेदवारांना पूर्ण दिलासा मिळालेला नाही. परीक्षार्थीना जिल्हा केंद्राऐवजी केवळ विभागीय केंद्रात बदल करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रवास करावाच लागणार आहे. करोनामुळे लागू असलेले प्रवासाचे निर्बंध, अन्य शहरातील मुक्काम आणि खानावळ हे प्रश्न परीक्षार्थीना पूर्व परीक्षेआधी सोडवावे लागणार आहेत. त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राज्यातून दरवर्षी तीन लाख विद्यार्थी हे राज्यसेवेची परीक्षा देतात. राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे परीक्षेच्या तयारीसाठी पुणे शहराची निवड करतात. ही संख्या ४० हजारांच्या घरात आहे. करोनामुळे लागू टाळेबंदीदरम्यान अनेक विद्यार्थी आपापल्या गावी गेले.
करोनाचे वाढते संक्रमण बघता या विद्यार्थ्यांना पुन्हा पुण्यापर्यंत प्रवास करणे अशक्य आहे. त्यामुळे ही परीक्षा जिल्हानिहाय केंद्रांवर घ्यावी, अशी मागणी होत होती. मात्र, आयोगाने जिल्हा नव्हे तर विभागीय केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा दिली. त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी झाले असले तरी परीक्षार्थीसमोरील प्रश्न कायम आहेत.
परीक्षेसाठी पुणे विभागीय केंद्र निवडलेल्या गोंदिया येथील विद्यार्थ्यांने केंद्रात बदल केल्यास त्याला नागपूर विभागीय परीक्षा केंद्र मिळेल. सकाळी दहाचा पेपर असल्याने गोंदिया येथील विद्यार्थ्यांला आदल्या दिवशीच नागपूरला येऊन राहावे लागेल. करोनाच्या संकटकाळात वसतिगृह, हॉटेल, खानावळी बंद असल्याने विद्यार्थ्यांनी कुठे राहावे असा प्रश्न आहे. त्यामुळे विभागीय केंद्र बदल करण्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे परीक्षार्थीच्या समस्येत फारसा फरक पडणार नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्रीन्यू यॉर्कमधील रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क येथील रुग्णालयात जाऊन रॉबर्ट यांची भेट घेतली होती.
आपले धाकटे बंधू आणि जिवलग मित्र रॉबर्ट ट्रम्प यांचे निधन झाल्याचे जड अंत:करणाने आपण जाहीर करीत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रात्री प्रसृत केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. रॉबर्ट यांची उणीव आपल्याला सातत्याने भासणार आहे, मात्र त्याची स्मृती आपल्या हृदयात कायम राहील, रॉबर्ट तुमच्या आत्म्याला शांती लाभो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. रॉबर्ट काका, तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल, असे इव्हान्का ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे.
रॉबर्ट ट्रम्प यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, त्यामुळे अलीकडेच त्यांना मॅनहटनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे न्यू यॉर्क टाइम्सने ट्रम्प कुटुंबीयांच्या हवाल्याने म्हटले आहे.
वॉशिंग्टन : नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत सत्ता मिळाली तर एच १ बी व्हिसा प्रणालीत सुधारणा करून देशनिहाय ग्रीनकार्ड कोटा पद्धत रद्द करण्यात येईल, असे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार जो बायडेन यांनी सांगितले.
एच १बी व्हिसा हा अस्थलांतरित पद्धतीचा असून त्याच्या मदतीने अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना कामावर ठेवू शकतात. सैद्धांतिक व तज्ज्ञता असलेल्या कामगारांना एच १ बी व्हिसा दिला जातो. अनेक कंपन्या त्या व्हिसावर अवलंबून आहेत, कारण त्यामुळे भारत व चीन या देशातून कुशल कर्मचारी मिळतात.
भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय अमेरिकी लोकांसाठी जाहीर केलेल्या धोरणात्मक मसुद्यात डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे की, कुटुंबाधारित स्थलांतर पद्धत लागू करून कुशल कामगारांना संधी दिली जाईल. द्वेष व धार्मिक तेढ कमी करण्यात येईल.
भाषिक भेद दूर करून विविधतेचा सन्मान करून भारतीय -अमेरिकी लोकांचा आदर केला जाईल. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराने भारतीय अमेरिकी लोकांसाठी धोरणात्मक निवेदन जारी करण्याची ही पहिलीच वेळ असून अमेरिकेतील आठ राज्यात १३ लाख भारतीय-अमेरिकी मतदार आहेत. बायडेन हे कुटुंबाधारित स्थलांतरास प्राधान्य देणार असून कुटुंबांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. स्थायी, कामासाठीची स्थलांतर व्हिसा संख्या वाढवली जाईल. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित यातील पीएच डी कार्यक्रमासाठी व्हिसा करता मर्यादा आहे, त्यातून सूट देण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं निधन आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
चेतन चौहान यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंततर प्रकृती बिघडल्यामुळे चौहान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
माजी कर्णधार आणि विश्वविजेता एम.एस धोनीनं १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी क्रिकेटला रामराम ठोकला. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. धोनीच्या निवृत्तीनंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया दिल्या. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित करावा. आता काँग्रेस आमदाराने धोनीला देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावे अशी विनंती केली आहे.
धोनीला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी मध्यप्रदेशमधील माजी मंत्री आणि क्राँग्रेस आमदार पी.सी शर्मा यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारकडे केली. शर्मा यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. पी.सी शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘भारतीय क्रिकेटला जगभरात विजेता म्हणून पुढे आणणारं देशाचं रत्न महान कर्णधार एम.एस.
धोनीला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यायला हवं. धोनी खेळातील भारतरत्न आहे. त्यानं क्रिकेटमध्ये देशाचं नाव मोठं केलं आहे. त्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानिक करण्यात यावं.’
भारतरत्न हा देशातील देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्माम देशाची सेवा करणाऱ्यांना दिला जातो. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या प्रकाराचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्रात हा मान आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. धोनीच्या भरीव कामगिरीमुळे त्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी आता होत आहे. धोनीनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतरत्नची मागणी केली होती.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.