चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ सप्टेंबर २०२१

Date : 16 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - कोमलला रौप्य आणि संजीवनीला कांस्यपदक :
  • राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या कोलम जगदाळे (१६:०१.४३ सेकंद) आणि संजीवनी जाधव (१६:१९.१८ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक कमावले.

  • जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी सुरू झालेल्या स्पर्धेत रेल्वेच्या पारुल चौधरीने (१५:५९.६९ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. २२ वर्षीय कोमलने पारुलला आव्हान दिले, परंतु तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीमध्ये रेल्वेच्या अभिषेक पालने सुवर्णपदक मिळवले, तर धर्मेंदर आणि अजय कुमार या सेना दलाच्या स्पर्धकांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. पोल व्होल्टमध्ये तमिळनाडूच्या पवित्रा वेंकटेशने सुवर्णपदक मिळवले, तर रेल्वेच्या मारिया जेसनने रौप्य आणि कृष्णा रशनने कांस्यपदक मिळवले.

MHT CET Exam 2021; विद्यार्थांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न कायम :
  • अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, एमसीए, एमबीए, आर्किटेक्चर, बीएड आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल. तसेच महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. आज १५ सप्टेंबर पासून परीक्षा सुरु होत असतांना अजूनही विद्यार्थांना परीक्षेसाठी लोकलने प्रवास करता येणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही.

  • आज एमसीए, एम.एचएमसीटी, एम.आर्क, एम.पी.एड, बीए/बीएससी आणि बीएड सीईटीची परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थांना लोकल प्रवास परवानगी द्यावी यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र पाठवले आहे असं सांगण्यात आलं आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप पत्र प्राप्त झालं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थांनी नक्की काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

  • किती विद्यार्थी परीक्षा देणार - यावर्षी MHT CET 2021 परीक्षेसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एवढेच नाही तर कोविड -१९ साथीच्या दरम्यान परीक्षा केंद्रांची संख्या १९८ वरून २२६ करण्यात आली आहे.

राज्यात दिवसभरात ४ हजार ३६४ रूग्ण बरे, ५२ जणांचा मृत्यू :
  • करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही. जरी आतापर्यंत करोनाच्या प्रकरणांमध्ये किंचित घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य तज्ज्ञ वेळोवेळी याबद्दल नवीन माहिती शेअर करत राहतात. दरम्यान, महाराष्ट्रात करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.

  • राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज राज्यात करोना बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६४ रूग्ण बरे झाले, तर ३ हजार ७८३ नवीन करोनाबाधित आढळले. याशिवाय, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

  • राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ०३४ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ६५,०७,९३० झाली आहे.

७३६ अफगाणी नागरिकांची भारतात नोंदणी करण्याची विनंती :
  • १ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत एकूण ७३६ अफगाणी नागरिकांनी भारतात नव्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) नावांची नोंद केली असून; अफगाणी नागरिकांची भारतात नोंदणी व मदत याबाबत वाढणाऱ्या विनंत्या विचारात घेण्यासाठी आपण आपली क्षमता वाढवत आहोत, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांच्या येथील उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सांगितले.

  • अफगाणी नागरिकांना व्हिसा जारी करणे व त्याची मुदत वाढवणे, मदत करणे आणि त्यांच्या अडचणींवर तोडगा शोधणे यासंबंधीच्या प्रकरणांबाबत आपण सरकारशी सतत संपर्कात आहोत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांबाबतच्या या संस्थेने दिली.

  • आकडेवारीनुसार, यूएनएचसीआरचा संबंध असलेल्या भारतातील व्यक्तींची एकूण संख्या ४३,१५७ इतकी आहे. यापैकी १५,५५९ लोक अफगाणिस्तानातील निर्वासित आणि आश्रय मागणारे आहेत. ‘१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत ७३६ अफगाणी लोकांची यूएनएचसीआरने नव्या नोंदणीसाठी नोंद केली,’ असे संस्थेने सांगितले.

पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला यांचा समावेश :
  • टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश आहे. साप्ताहिकाने बुधवारी शंभर प्रभावशाली व्यक्तींची २०२१ या वर्षाची यादी जाहीर केली असून त्यात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ड्युक अ‍ॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी व मेघन तसेच माजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

  • ‘टाइम’ने म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उजळले आहे.

  • सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविषयी म्हटले आहे की, चाळीस वर्षीय पूनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत असून त्यांनी अत्यंत योग्य वेळी जगाला मदत केली. करोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पूनावाला नक्की मदत करतील. लस असमानता गंभीर असून जगातील काही देशांकडे जास्त लस आहे तर काही देशात लशीचा तुटवडा आहे.

  • टाइमच्या यादीत टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अ‍ॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचा समावेश आहे.

देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात २०२०मध्ये तुलनेने घट :
  • २०१९वर्षाच्या तुलनेत २०२०मध्ये म्हणजे करोनाच्या काळात महिलांवरील  अत्याचाराच्या नोंद गुन्ह्यांचे प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिली आहे. दरवर्षी गुन्हेगारीचे प्रमाण वर्गवारीनिहाय ही संस्था जाहीर करीत असते.

  • २०२० वर्षासाठीचा गुन्हेविषयक अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार  महिलांबाबतच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी याच काळात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच, देशभरातील आकडेवारीमध्ये सर्वाधिक प्रमाण पती किंवा इतर कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

  • मंगळवारी जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ८.३ टक्के घट झाल्याचे  दिसून आले आहे. २०१९मध्ये हा आकडा ४ लाख ५ हजार ३२६ इतका होता, २०२०मध्ये तो ३ लाख ७१ हजार ५०३ इतका खाली आला आहे.

  • देशाची राजधानी दिल्लीमध्ये महिलांविरोधातील  गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. दिल्लीत २०१९मध्ये १३ हजार ३९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२०मध्ये ती १० हजार ९३ इतकी खाली आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील हे प्रमाण ५९ हजार ८५३ वरून ४९ हजार ३८५ इतके  झाले आहे.

१६ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.