चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जून २०२१

Updated On : Jun 16, 2021 | Category : Current Affairs


आगीच्या फुग्यांना फायटर जेट्सने दिलं उत्तर; सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ला :
 • पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये आग लावण्यात आलेले मोठ्या आकाराचे फुगे पाठवल्यानंतर इस्रायलच्या हवाईदलाने बुधवारी गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत. पोलीस आणि इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हे आग लावलेले फुगे पाठवण्यात आल्याने गाझा आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असतानाही हल्ले करण्यात आलेत.

 • मागील महिन्यामध्ये २१ तारखेला (२१ मे २०२१ रोजी) दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीसंदर्भात एकमत झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा या हवाई हल्ल्यांमुळे संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

 • पॅलेस्टाईनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाईदलाने गाझा शहराच्या दक्षिणेतील खान यूनुसच्या पूर्वेकडील एका ठिकाणावर हल्ला केला. खान यूनुसमधील एएफपीच्या एका छायाचित्रकाराने हे बॉम्ब हल्ले स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेत.

 • इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार आग लावलेल्या फुग्यांचं उत्तर देण्यासाठी लढाऊ विमानांनी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला.

अखेर ट्विटरकडून  अनुपालन अधिकारी नियुक्त :
 • ट्विटरने मंगळवारी अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे जाहीर केले असून या अधिकाऱ्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच थेट माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 • सरकारने ट्विटरला नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यासाठी अखेरची संधी देत असल्याची नोटीस पाठविली होती. निकषांचे पालन न केल्यास या व्यासपीठाला दायित्वातून देण्यात आलेल्या सवलतीला मुकावे लागेल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आश्वासन ट्विटरने सरकारला दिले होते.

 • आता ट्विटरने अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून त्याबाबतचा तपशील लवकरच माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास देण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा कंपनी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज :
 • करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे.  करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत.

 • सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने करोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया केवळ ६० हजार स्थानिक लोकांना कोरोनामुळे हज करण्यास परवानगी देईल.

 • करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आता हजसाठी १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कर आकारणी ग्रामपंचायतची वसुली मात्र एमआयडीसीकडे :
 • ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील जमीन, इमारत, स्वच्छता कर व मालमत्ता कराची वसुली जिल्ह्यात यंदापासून एमआयडीसीमार्फत केली जाणार आहे.

 • कर आकारणी ग्रामपंचायतमार्फत मात्र वसुली एमआयडीसीमार्फत तसेच वसुलीतील ५०:५० टक्के वाटा ग्रामपंचायत व एमआयडीसीमध्ये विभागला जाणार, अशी कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यात याचा परिणाम जाणवणार आहे. त्यामध्ये नगर शहराजवळील नवनागापूर व निंबळक या दोन मोठ्या  ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.

 • उद्योजकांच्या मागणीनुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये हा आदेश जारी केला असला तरी त्यातून काही प्रमाणातच उद्योजक, कारखानदारांचा प्रश्न सुटला आहे. मुळात उद्योजकांचा ग्रामपंचायत कर आकारणी चुकीच्या पद्धतीने होते, असा आक्षेप आहे. या अक्षेपावर मात्र ग्रामविकास विभागाकडून त्यांना स्पष्टीकरण मिळाले नाही. ग्रामपंचायत ज्या दराने व ज्या पद्धतीने बिल आकारेल, त्याची  केवळ वसुली एमआयडीसीकडून होणार आहे, असेच राज्य सरकारच्या आदेशात स्पष्ट केले आहे.

 • राज्यात इतर जिल्ह्यात ही कार्यपद्धत यापूर्वीच अवलंबली गेली. नगर जिल्ह्यात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. सन २०२०-२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी अद्यापि एमआयडीसीकडे बिलेच पाठवलेली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्याची वसुली झालेली नाही.

राज्यपालांनी स्वतःकडे ठेवली आहे विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी; सुनावणीत पुढे आली माहिती :
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ सदस्यांची नावं पारित करुन राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली देण्यात आली होती.

 • दरम्यान मंगळवारी १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ही यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवली असल्याचं सांगण्यात आलं. आता राज्यपाल यावर काय निर्णय घेतात हे पहावं लागणार आहे.

 • अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहितीबाबत प्रथम अपील दाखल केले असून राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीत अनिल गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास मग नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे? असा सवाल केला.

 • राज्यपालांकडे यादीसहीत संपूर्ण माहिती आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती दयावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल.

कोपा अमेरिका २०२१ - अर्जेटिनाची चिलीशी बरोबरी :
 • लिओनेल मेसी याने फ्री-किकवर शानदार गोल झळकावल्यानंतरही अर्जेटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. या सामन्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहण्यात आली.

 • पहिल्या सत्रात मेसीने फ्री-किकवर डाव्या पायाने मारलेला फटका चिलीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून जात गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होने तो अडवण्याचा प्रयत्न केला. पण ब्राव्होने डाव्या बाजुला हवेत झेप घेतल्यानंतरही चेंडू त्याच्या बोटांना स्पर्श करून थेट गोलजाळ्यात गेला. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राव्होने मेसीची फ्री-किक अडवली होती.

 • मेसीने २५ मीटरवरून केलेल्या या अप्रतिम गोलमुळे अर्जेटिनाने ३३व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली. पण एडवाडरे वर्गास याने ५७व्या मिनिटाला चिलीला बरोबरी साधून दिली. ५७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आर्टुरो विदालने मारलेला फटका इमिलियानो मार्टिनेझ याने अडवल्यानंतर वर्गासने परतीच्या फटक्यावर गोल झळकावला.

१६ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)