चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2024

Date : 16 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य,’ न्यायालयाचा निर्णय; नेमका निकाल काय?
  • सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्दबातल ठरवली आहे. निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य असून त्यामुळे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे हनन होते, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला असून या घटनापीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते. घटनापीठातील पाचही सदस्यांनी एकमताने हा निर्णय दिला आहे.
  • घटनापीठाच्या पहिल्या निकालाचे वाचन सरन्यायाधीशांनी केले. तर दुसऱ्या निकालाचे वाचन न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केले. न्यायालयाने निकाल देताना खालील प्रश्नांचा विचार केल आणि त्यावर आपला निर्णय दिला.

निवडणूक रोखे योजनेमुळे माहितीच्या अधिकाराचे हनन

  • निवडणूक रोखे योजनेमुळे माहितीचा अधिकार देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद १९ (१) (अ) चे उल्लंघन होत आहे का? याचा न्यायालयाने विचार केला. यावर बोलताना ‘राजकीय पक्षांना कोठून निधी मिळतोय याची माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक रोखे योजनेमुळे माहितीच्या अधिकाराचे हनन होते,’ असे न्यायालयाने म्हटले.

निधीबद्दल खुलासा न करणे हे घटनाबाह्य

  • अमर्यादित निधीमुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांवर परिणाम होतो का? याचाही न्यायालयाने विचार केला. याबाबत निर्णय देताना राजकीय पक्षांना मिळणारा निधी आणि धोरणनिर्णिती यावर सरन्यायाधीशांनी भाष्य केले. कपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या निधीबद्दल खुलासा न करणे हे असंवैधानिक आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. निवडणूक रोख्यांमुळे काळ्या पैशाला आळा घालता येतो, असा दावा सरकारकडून करण्यात आला. मात्र या दाव्यामुळे मूलभूत अधिकारांमध्ये होत असलेला हस्तक्षेप समर्थनीय ठरू शकत नाही, असे न्यायालय म्हणाले. हा निर्णय देताना न्यायालयाने २०१७ सालच्या पुट्टास्वामी निकालाचा आधार घेतला. या निकालात तीन मुद्दे लक्षात घेण्यात आले होते.
ठरलं तर! टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्माच टीम इंडियाचा कर्णधार, जय शाह यांची घोषणा!
  • भारताने २०२१३ सालातील विश्वचषकात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. सलग १० विजयामुळे यावेळी भारतच विश्वचषकावर आपले नाव कोरणार असे समस्त क्रिकेटप्रेमींना वाटत होते. मात्र या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुर्दैवाने भारताचा पराभव झाला. दरम्यान, या पराभवामुळे रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? त्याला कर्णधारपदापासून दूर केले जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. यावरच आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे.

जय शाह नेमकं काय म्हणाले?

  • रोहित शर्माच २०२४ साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा कर्णधार असेल असे स्पष्ट संकेत, जय शाह यांनी दिले आहेत. राजकोटमधील एका कार्यक्रमात बोलताना जय शाह यांनी आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीवर भाष्य केले. यावेळी बोलताना, “२०२३ सालच्या अहमदाबाद येथील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपण सलग १० सामन्यांत विजय मिळवला. मात्र आपण तो विश्वचषक जिंकू शकलो नाही. पराभव झाला असला तरी आपण सर्वांचीच मनं जिंकली. मी तुम्हाला आश्वासन देतो की, २०२४ सालच्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोस येते आपण भारताचा झेंडा नक्की फडकवू,” असे जय शाह म्हणाले.

एकदिवसीय विश्वचषकात नेमकं काय घडलं होतं?

  • एकदीवसीय विश्वचषक स्पर्धेत २०२३ भारताने सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी गेली होती. भारताने सलग दहा सामन्यांत विजय मिळवत प्रतिस्पर्धींना धूळ चारली होती. अंतिम सामन्यात भारताचा समाना ऑस्ट्रेलियाशी होता. या सामन्यात मात्र दुर्दैवाने भारताला पराभव पत्करावा लागला. या समान्यात भारताने सुरुवातीला फलंदाजी करत ४० षटकांत २४० धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने ४७ धावा केल्या होत्या. तर विरोट कोहली आणि के. एल. राहुल यांनी अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकांत ही भारताने उभारलेली धावसंख्या गाठत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता.

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार टी-२० विश्वचषक

  • दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्मा आणि धडाडीचा फलंदाज विराट कोहली यांचा भारतीय संघात समावेश केला जाणार की त्यांना विश्रांती दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जय शाह यांच्या या विधानानंतर रोहित शर्मा भारतीय संघात असेल तसेच त्याच्याकडे पूर्ण संघाचे नेतृत्व असेल हे स्पष्ट झाले आहे. आगामी टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे. त्याची तयारी आता भारतीय संघाने सुरू केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; येत्या २० फेब्रुवारी रोजी…
  • मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण चालू केलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
  • मराठा आरक्षणसासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला मराठ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल तयार करून आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा केली आहे. या अधिवेशना मराठा आरक्षण व राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“आंदोलन करायला नको होतं”

  • दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणावर नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन करायला नको होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. “सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची भूमिका घेणं योग्य नाही. त्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं. आधीच्या अध्यादेशातील काही अडथळे, अस्पष्ट बाबी आम्ही स्पष्ट केल्या आहेत. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलन करायला नको होतं. दुर्दैवाने ते झालं. पण आता त्यांना आवाहन आहे की सरकार या सगळ्या गोष्टी करत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“कुणबी नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षण नाही”

  • दरम्यान, १९६७ पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांना आधीच्या नोंदींनुसार आरक्षण असेल, असंही ते म्हणाले. “१९६७ पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे. आत्ताचं मराठा आरक्षण पूर्णपणे ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत, पूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं, त्यानुसार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक अहवाल’ प्रकाशन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण!
  • जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे आज (१५ फेब्रुवारी) मुंबईत प्रकाशन होत आहे.
  • या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन उपस्थित राहणार आहेत. जिल्हा निर्देशांकमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा यावेळी सन्मान केला जाईल.
निवडणूक रोखे योजनेवर आरबीआय आणि निवडणूक आयोगाने कोणते आक्षेप घेतले होते?
  • माजी केंद्रीय अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी २०१७चे केंद्रीय अंदाजपत्रक मांडताना निवडणूक रोखे योजना मांडली होती. निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी आणि ती अधिक पारदर्शक करण्यासाठी ही योजना असल्याचे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. मात्र, त्यावेळी रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि निवडणूक आयोगाने त्याबद्दल अनेक गंभीर शंका आणि चिंता उपस्थित केल्या होत्या.
  • या योजनेच्या माध्यमातून देणगीदारांना गोपनीय पद्धतीने राजकीय पक्षांना देणगी देणे शक्य झाले होते. स्टेट बँकेकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१८ ते जुलै २०२३ या कालावधीत साधारण १३ हजार कोटी रक्कम या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगीच्या स्वरूपात मिळाली आहे.
  • माहिती अधिकार कार्यकर्ते कमोडोर लोकेश के बत्रा यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून आरबीआय आणि निवडणूक आयोगाचे म्हणणे जाणून घेतले होते. त्यानुसार, निवडणुकांमध्ये दिल्या जाणाऱ्या राजकीय निधीमधील भ्रष्टाचार निपटण्यासाठी ही योजना असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत केवळ स्टेट बँकेच्या केवायसी औपचारिकता पूर्ण करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांनाच या देणग्या देता येतील. तसेच निवडणूक रोखे प्राप्त करण्यासाठी राजकीय पक्षांना स्टेट बँकेत विशेष खाते उघडावे लागेल. या प्रक्रियेत देणगीदाराचे नाव गोपनीय राखणे सर्वात महत्त्वाचे आहे असे सरकारचे म्हणणे होते. याबाबतचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
  • तत्कालीन वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ५ ऑक्टोबर २०१७ रोजी आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले होते की, ही योजना म्हणजे “राजकीय निधीपुरवठा अधिक उत्तरदायी आणि स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.” ही योजना कशी राबवावी यासाठी आरबीआयने काही सूचना केल्या होत्या. हे रोखे बेअरर रोख्यांच्या स्वरूपात जारी न करता डिमॅट स्वरूपात जारी करावेत ही सूचना अमान्य करताना गर्ग यांनी लिहिले होते की, डिमॅट स्वरूपात रोख्यांमुळे राजकीय पक्षांसमोर देणगीदारांची नावे गुप्त ठेवण्याचे मुख्य वैशिष्ट्य हिरावून घेतले जाईल आणि योजना अयशस्वी होईल. जेव्हा योजना लागू करण्यात आली तेव्हा देणग्या बेअरर रोख्यांच्या स्वरूपातच देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

 

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

  • राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा  कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांना  जाहीर झाला आहे. तर ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  •  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन २०२२च्या पुरस्कारांची घोषणा केली.यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.  विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या प्रकाशनने आतापर्य १ हजार २४० ग्रंथ प्रकाशित केले आहेत. गेली ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.
  • डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोली चे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी  द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख २ लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेडय़ातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्ष ते कार्यरत आहेत. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  तर  कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कोहिनूर नसलेल्या मुकुटाची इंग्लंडच्या राजपत्नीकडून निवड

  • ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या ६ मे रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळय़ापासून त्यांची पत्नी व ब्रिटनच्या राणी (क्वीन कन्सोर्ट) कॅमिला यांनी भारताचा विख्यात कोहिनूर हिरा नसलेला राजमुकुट निवडला आहे. ही घोषणा बकिंगहॅम पॅलेसने केली आहे. भारतात इंग्रजांची वसाहत असताना हा कोहिनूर हिरा ब्रिटनमध्ये आणण्यात आला होता. तो परत मिळावा, अशी भारताची मागणी आहे.
  • राज्याभिषेकासाठी कॅमिला यांनी निवडलेल्या महाराणी मेरी यांच्या मुकुटात (क्वीन मेरी क्राऊन) जगातील सर्वात मोठय़ा पैलू पाडलेल्या मौल्यवान कोहिनूर हिऱ्याची प्रतिकृती लावली जाईल. कारण आता मूळ कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातु:श्री – ‘एलिझाबेथ-द क्वीन मदर’च्या मुकुटाची कायमस्वरूपी शोभा वाढवत राहणार आहे. कॅमिला यांनी राज्याभिषेकासाठी निवडलेल्या महाराणी मेरी मुकुटास ‘टॉवर ऑफ लंडन’ येथील प्रदर्शनातून हटवले आहे. आता तो या राज्याभिषेक सोहळय़ात क्वीन कन्सोर्ट कॅमिला यांना समारंभपूर्वक घातला जाईल. कॅमिला यांनी निवडलेल्या क्वीन मेरी यांच्या मुकुटामध्ये कोहिनूर हिऱ्याची विलग करण्याजोगी प्रतिकृती दर्शनी भागात लावलेली आहे. परंतु राज्याभिषेकासाठी या मुकुटात बदल होतील अथवा ही प्रतिकृती तशीच ठेवली जाईल, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.
  • १०५.६ कॅरेटचा हा कोहिनूर हिरा जगातील सर्वात मोठय़ा पैलू पाडलेल्या अतिमौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे. १८५० मध्ये तत्कालीन महाराणी व्हिक्टोरियाला हा हिरा अर्पण केल्यापासून ब्रिटनच्या राजघराण्यातील दागिन्यांतील तो मुख्य दागिना बनला आहे. कोहिनूर हिरा सर्वात शेवटी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातु:श्री ‘क्वीन मदर’ यांनी परिधान केला होता. २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हा हिरा सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

Elon Musk यांनी गेल्या वर्षात दान केले तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे शेअर्स, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

  • एलॉन मस्क हे सध्या ट्विटरचे सीईओ आहेत. आपल्या अनेक निर्णयांमुळे ते कायम चर्चेत असतात. टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी गेल्या दोन वर्षात मोठी रक्कम दान केली आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये मस्क यांनी एकूण ६४ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती दान केली आहे. २०२२ मध्ये २०२१ च्या तुलनेत कमी संपत्ती दान केली आहे.
  • २०२२ मध्ये किती केले दान : ट्विटर आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षात $१.९५ बिलियन म्हणजेच जवळजवळ १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स दान केले आहेत. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) कडे ही माहिती दिसून आली. या फायलिंगनुसार मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सुमारे ११.६ दशलक्ष शेअर्स दान केले. ज्यामध्ये हे शेअर्स कोणत्या संस्थांना दान केले गेले हे सांगण्यात आली नाही. जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीजवळ आता टेस्लाचा जवळजवळ १३ टक्के हिस्सा आहे. कोणत्या धर्मादाय संस्था किंवा धर्मादाय संस्थांना हे दोन देण्यात आले याची माहिती मागवलेल्या ईमेलला टेस्लाने लगेच उत्तर दिले नाही.
  • २०२१ मध्ये एलॉन मस्क यांनी सुमारे ५.७४ अब्ज डॉलर म्हणजेच ४७ हजार कोटी रुपयांहून अधिकचे दान केले. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मस्क यांनी टेस्ला स्टॉक चॅरिटीला दिले तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण दान केलेल्या शेअर्सवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही. मस्क यांनी २०२१ मध्ये गिव्हिंग प्लेजवर सही केली होती. याचा अर्थअसा होतो की, अब्जाधीशांना त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या संपत्तीपैकी किमान अर्धी संपत्ती दान करण्याची आवश्यकता असते.

संरक्षण क्षेत्रातील ७५ टक्के खरेदी देशांतर्गत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

  • संरक्षण क्षेत्रासाठी असलेल्या एकूण भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी, २०२३-२४ साली देशांतर्गत संरक्षण उत्पादकांकडून खरेदीसाठी भारत ७५ टक्के रक्कम खर्च करेल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली. निरनिराळी शस्त्रे व इतर लष्करी साहित्य यांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
  • पुढील आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या एकूण १,६२,००० कोटी रुपये इतक्या भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी देशांतर्गत उत्पादकांकडून खरेदीसाठी सुमारे १ लाख कोटी रुपये राखून ठेवले जातील असा याचा अर्थ असल्याचे एअरोइंडियासाठी येथे आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • ‘तुम्ही एक पाऊल उचलले, तर दहा पावले उचलण्याची हमी सरकार तुम्हाला देते. विकासाच्या मार्गावर धावण्यासाठी तुम्ही जमिनीची मागणी केली, आम्ही तुम्हाला संपूर्ण आकाश देत आहोत’, असे औपचारिक करार करण्यासाठी झालेल्या ‘बंधन’ कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले. ‘स्थानिक उद्योगासाठी भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी तीनचतुर्थाश राखून ठेवणे हे त्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे’, याचा त्यांनी उल्लेख केला.
  • अधिकृत आकडेवारीनुसार, २०१९-२० पासून २०२१-२२ पर्यंत भारताच्या स्वदेशनिर्मित संरक्षण उत्पादनाचे मूल्य २.५८ लाख कोटी रुपये होते. २०२०-२१ साली सरकारने भारतीय संरक्षण उद्योगाकडून खरेदीसाठी भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी ५८ टक्के रक्कम राखून ठेवली होती. २०२१-२२ साली ती ६४ टक्क्यांपर्यंत, २०२२-२३ साली ६८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली.

Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’, जाणून घ्या खासियत

सध्या जगभरात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात OpenAI ChatGpt ची चर्चा सुरु आहे. OpenAI ने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेल्या ChatGpt चॅटबॉट आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे. यामध्ये भारतात देखील देशातील पहिला इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.

भारतीय वित्तीय कंपनी Velocity ने देशातील पहिला ChatGPT इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे. या कंपनीने या चॅटबॉटचे नाव Lexi असे ठेवले आहे. Velocity ने AI चा फायदा घेऊन सध्याच्या अ‍ॅनालिटिक्स टूल व्हेलॉसिटी इनसाइट्ससह ते एकत्रित करण्यात आले आहे. Velocity Insights वापरणारे भारतीय ई-कॉमर्स ब्रँड मेटा मालकीच्या WhatsApp वर दैनंदिन व्यावसायिक रिपोर्ट मिळवू शकतात. हे ई-कॉमर्स साइट्सना त्यांची व्यवसाय कार्ये विकसित करण्यास मदत करणार आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2022

 

विंडीज, आफ्रिकेचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध :
  • वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील.

  • यंदा २७ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ‘आयपीएल’चा १५वा हंगाम खेळवण्यात येण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे काही नामांकित खेळाडू विविध दौरे तसेच वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना संपूर्ण ‘आयपीएल’ खेळण्याची मुभा दिली आहे. यंदाच्या हंगामात विंडीजचे १७, तर आफ्रिकेचे ११ खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • शिखर धवनकडे पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ३६ वर्षीय धवनला पंजाबने लिलावादरम्यान ८.२५ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले. ‘‘धवनच्या रूपात अनुभवी खेळाडूचा संघात समावेश केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्हाला आमचा कर्णधार मिळाला आहे. पुढील आठवडय़ाभरात याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल,’’ असे पंजाबच्या संघ व्यवस्थापनातील सदस्याने सांगितले.

११ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार ; ३ ते २५ मार्च कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन :
  • राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बिगुल अखेर वाजलं आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत मुंबईत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून, ११ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंक्लप मांडला जाणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली.

  • माध्यमांना माहिती देताना मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र विधान मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेण्याचं आजचं कामकाज सल्लागर समितीमध्ये ठरलं आहे. यामध्ये ११ मार्च रोजी, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाईल.”

  • तसेच, “या कामकाजात साधारण आता प्रलंबित असलेलं एक बील आणि यापुढील काही दिवसांत जी बिलं येतील, अशी अपेक्षित असलेली बिलं ही मांडली जातील. अर्थसंकल्पावरील ज्या मागण्या असतील, त्यासाठी पाच दिवसांची चर्चा ही देखील मान्य करण्यात आलेली आहे.” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

  • विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी आज दिल्लीतील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जाणार; अचानक Tweet करुन दिली माहिती :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता गुरु रविदास विश्वराम धाम मंदिराला भेट देणार आहेत. दिल्लीतील करोलबाग येथे असणाऱ्या या मंदिरात बुधवारी रविदास जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे त्याचनिमित्ताने मोदी ही भेट देणार आहेत.

  • गुरु रविदास जयंतीचा उत्सव पंजाबमधील दलित सामाजामधील लोकांकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यामधील ३० टक्के जनता याच समाजातील असून लवकरच या राज्यात विभानसभेची निवडणूक होणार असल्याने या मंदिर भेटीमागील राजकीय कनेक्शनसंदर्भात चर्चा सध्या जोरात आहे.

  • पंतप्रधान मोदींनीच मंगळवारी यासंदर्भातील माहिती ट्विट करुन दिली. “रविदास जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर उद्या सकाळी नऊ वाजता मी दिल्लीतील करोलबागमधील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात जाणार आहे. येथे मी लोककल्याणासाठी प्रार्थना करणार आहे,” असं मोदींनी म्हटलंय.

माजी मंत्री अश्वनीकुमारांचा काँग्रेसचा राजीनामा :
  • पंजाब विधानसभेची निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, माजी मंत्री व पंजाबमधून तीनवेळा राज्यसभेचे खासदार झालेले अश्वनीकुमार यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस रसातळाला जात असल्याचे कारण देत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला.

  • काँग्रेस पक्षापासून लांब राहून देशाची अधिक सेवा करू शकतो, असे अश्वनीकुमार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह आदी नेते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अश्वनीकुमार यांनी मात्र अजून पुढील राजकीय वाटचालीबद्दल जाहीर भाष्य केलेले नाही.

  • संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत असताना मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्वनीकुमार यांनी केंद्रीय विधिमंत्रीपद भूषवले होते. ते २००२, २००४ आणि २०१० असे तीनदा पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

  • पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांना काँग्रेसने अपमानित केले. त्याचा प्रतिकुल परिणाम राज्यातील मतदारांवर पडला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे नव्हे तर ‘आप’चे सरकार सत्तेवर येऊ शकेल, असे मत अश्वनीकुमार यांनी व्यक्त केले. पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार  आहे.

संसदेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण करणारं YouTube चॅनेल टर्मिनेट; युट्यूबने केली कारवाई :
  • राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करणारं युट्यूब चॅनेल टर्मिनेट करण्यात आलं आहे. युट्यूबनेच ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

  • युट्यूबच्या माध्यमातून देशभरातील जनतेला संसदेमध्ये नक्की काय कामकाज होतं हे थेट दाखवण्यासाठी संसद टीव्ही नावाचं चॅनेल सुरु करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माध्यमातून हे चॅनेल हाताळलं जातं. मात्र ‘यूट्यूबवरील कम्युनिटी गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यामुळे’ चॅनेल टर्मिनेट करण्यात आलं आहे.

  • नेमक्या कोणत्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय यासंदर्भातील माहिती गुगलकडून देण्यात आलेली नाही. गुगल या कंपनीकडे युट्यूबची मालकी असून यासंदर्भातील एक ईमेल गुगलला करण्यात आलाय. मात्र त्यावर अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही. सकाळी संसद टीव्ही सर्च केल्यानंतर एरर ४०४ नोटीफिकेशन दाखवण्यात येत होतं. तुम्ही शोधत असलेलं चॅनेल उपलब्ध नसल्याचा मेसेज स्क्रीनवर दाखवण्यात येत होता.

  • युट्यूबच्या धोरणांनुसार या माध्यमावर कोणत्या प्रकराची माहिती असावी याबद्दल काही नियम तयार करण्यात आलेत. हे नियम व्हिडीओ, व्हिडीओंवरील कमेंट, व्हिडीओंचे थम्बनेललाही लागू होतात. मशिन रिव्हू आणि प्रत्यक्ष पहाणीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील कंटेट वेळोवेळी तपासला जातो. यामध्ये नियमांचं काही उल्लंघन होत असल्यास असा कंटेट अथवा चॅनेलवर कारवाई करुन ते टर्मिनेट करणं किंवा काढून टाकण्याची कारवाई केली जाते.

आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : युवा भारतीय बॅडिमटनपटू; लक्षवेधी कामगिरीसाठी सज्ज :
  • आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार असून लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांसारखे युवा भारतीय खेळाडू या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.

  • या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पुरूष संघापुढे कोरिया, तर महिला संघापुढे यजमान मलेशियाचे आव्हान असेल. भारताच्या अनुभवी खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पुरुष संघाची जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनवर भिस्त असून किरण जॉर्ज आणि मिथून मंजुनाथ यांची त्याला साथ लाभेल. पुरुष दुहेरीत रवीकृष्ण पीएस-शंकर प्रसाद उदयकुमार आणि मनजित सिंह-डिंकू सिंग कोंथूजाम यांचा चांगल्या कामगिरीचा प्रयत्न असेल. अ-गटात समाविष्ट असलेल्या भारतीय पुरुष संघाचे कोरियाव्यतिरिक्त तीन वेळा विजेत्या इंडोनेशिया आणि हॉंगकॉंग यांच्याशी सामने होतील.

  • दुसरीकडे सय्यद मोदी स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी मालविका, आकर्षि कश्यप आणि अश्मिता चाहिला यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाचे मलेशियासह गतविजेत्या जपानशी सामने होणार आहेत. भारतीय महिला संघाला ब-गटातून आगेकूच करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तसेच या कामगिरीसह हे संघ मे महिन्यात होणाऱ्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

१६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.