चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ फेब्रुवारी २०२१

Date : 16 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बॅंक ऑफ महाराष्ट्रसह चार बॅंकांची होणार विक्री?, नव्या आर्थिक वर्षात हाेणार प्रक्रिया :
  • केंद्र सरकारने खासगीकरणाच्या पुढच्या टप्प्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडे माेर्चा वळविला आहे. सरकारने चार बॅंकांची नावे निश्चित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

  • बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचे पुढच्या टप्प्यात खासगीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी दाेन बॅंकांची नव्या आर्थिक वर्षात विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. 

  • या बॅंकाच्या खासगीकरणाबाबत यापूर्वी चर्चा नव्हती. सध्या आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सरकारने मध्यम स्तरीय बॅंकांच्या खासगीकरणाचा विचार केला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात काही माेठ्या बॅंकांचीही विक्री करण्यात येईल. 

  • बॅंका ऑफ इंडियामध्ये सुमारे ५० हजार, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सुमारे ३३ हजार, इंडियन ओव्हरसीज बॅंकेत २६ हजार आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रात १३ हजार कर्मचारी आहेत.

गोपनीयतेबाबत व्हॉटसअ‍ॅपला नोटीस :
  • युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात व्हॉटसअ‍ॅप वापरकर्त्यांची गोपनीयता  कमी राखत असून न्यायलयानेच लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व व्हॉटसअ‍ॅप यांना नोटिसा जारी केल्या आहेत.

  • न्यायालयाने म्हटले आहे की, व्हॉटसअ‍ॅप ज्या पद्धतीने भारतात काम करीत आहे ते पाहता गोपनीयतेचे रक्षण होईल असे वाटत नाही, त्यामुळे न्यायालयानेच आता यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्हॉटसअ‍ॅपला सांगितले की, तुमच्या कंपन्या दोन किंवा तीन लाख कोटी डॉलरच्या असतीलही पण लोकांना  तुमच्या आर्थिक बाजूपेक्षा  गोपनीयतेचे महत्त्व जास्त आहे. युरोपात विशेष माहिती संरक्षण कायदे आहेत, पण भारतात ते पुरेसे नाहीत.

  • सर्वोच्च न्यायालयाने सरकार व व्हॉटसअ‍ॅपला नोटिस जारी करून कर्मण्य सिंह सरीन यांनी २०१७ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तरे मागितली आहेत.

  • व्हॉटसअ‍ॅपची बाजू मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, युरोपमध्ये माहिती सुरक्षेसाठी खास कायदे आहेत. जर संसदेने तसे कायदे केले तर व्हॉटसअ‍ॅप ते कायदे पाळेल यात शंका नाही.

ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख माध्यम कंपनीचा बातम्यांसाठी पैसे आकारण्याचा गुगलशी करार :
  • ऑस्ट्रेलियातील सेव्हन वेस्ट मीडिया कंपनीने गुगलशी त्यांना बातम्यांच्या बदल्यात पैसे आकारण्याचा करार केला असून त्यांनी पत्रकारितेत बातम्यांसाठी पैसे आकारून एक नवीन भागादारीला सुरूवात केली आहे.

  • गुगल व इतर समाजमाध्यमांनी बातम्यांच्या बदल्यात  वृत्तमाध्यमांना पैसे अदा करावेत, अशा आशयाची मागणी बराच काळपासून पत्रकारिता व्यवसायात जोर धरीत असून त्यामुळे पत्रकारितेला आर्थिक पाठबळही मिळू शकते. या मुद्दयावर ऑस्ट्रेलियाच्या संसदेत कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सेव्हन वेस्ट मीडिया कंपनीने गुगलशी करार केला आहे. गुगल व सेव्हन वेस्ट मीडिया या दूरचित्रवाणी, मुद्रित व ऑनलाइन प्रकाशित कंपनीने गुगलशी करार केला असून  आठवडाभर त्यांच्यात चर्चा सुरू होती.

  • ऑस्ट्रेलियन सरकारच्या मंत्र्यांनी वृत्तमाध्यमांच्या बातम्या वापरण्याच्या बदल्यात त्यांना पैसे देण्याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग,अल्फाबेट व गुगलचे सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली आहे. सेव्हन वेस्ट मीडियाचे अध्यक्ष केरी स्टोक्स यांची २१ प्रकाशने असून त्यांनी सरकार व ऑस्ट्रेलियन स्पर्धा नियंत्रकांचे प्रस्तावित कायद्यासाठी आभार मानले आहेत.

  • ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांनी खंबीर भूमिका घेतल्याने समाज माध्यम कंपन्यांकडून वृत्तमाध्यमांना आर्थिक फायदा झाला असे त्यांनी म्हटले आहे. बातम्यांसाठी व आशयासाठी कशी व किती किंमत आकारावी यासाठी नियमही त्यांनी तयार केले आहेत. गुगलने या करारावेळी अस्सल पत्रकारिता व त्याचा दर्जा यांना मान्यता दिली आहे.

पहाडी बिल्लाज संघाला विजेतेपद :
  • महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकरने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पहाडी बिल्लाज संघाने केकेएफआय खो-खो सुपर लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात पहाडी बिल्लाजने पँथर्सचा ३१-२५ असा सहा गुणांनी पराभव केला.

  • इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतीकने (१.५० मि. आणि ११ गडी) अष्टपैलू कामगिरी केली. त्याला रेल्वेच्या निलेश पाटील (६ गडी) आणि केरळच्या महेश एम. (१.४० मि.) यांनी उत्तम साथ दिली. पँथर्ससाठी पश्चिम बंगालच्या सुभाशिष संतराने (१.५० मि.) चांगला खेळ केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पँथर्सने जॅग्वार संघाला, तर पहाडी बिल्लाजने चिताज संघाला नमवून अंतिम फेरीतील स्थान सुनिश्चित केले.

  • ठाण्याच्या महेश शिंदेला स्पर्धेतील सर्वोत्तम संरक्षक, तर सोलापूरच्या रामजी कश्यपला सर्वोत्तम आक्रमकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. महिलांमध्ये पँथर्स संघाने जेतेपद मिळवताना चिताज संघावर नऊ गुणांनी विजय मिळवला. त्यांचा हा सलग चौथा विजय ठरल्याने त्यांना जेतेपद बहाल करण्यात आले.

जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; पाच हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड :
  • इजिप्त हा देश प्राचीन संस्कृती आणि रहस्यमय वास्तूंसाठी ओळखला जातो. इजिप्तमध्ये हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या अनेक वास्तू आहेत. यात गिझाचे पिरॅमीड, देवदेवतांची हजारो वर्षांपूर्वीची मंदिर, थडगी, ममीज् असा मोठा एतिहासिक खजिना या देशात आहे.

  • नुकत्याच एका संशोधनात इजिप्तमध्ये एका पुरातन बिअर फॅक्टरीच्या अवशेषांचा शोध लागला आहे. ही बिअर फॅक्टरी पाच हजार वर्ष जुनी असल्याचा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे.

  • एबिडोस इथल्या दफनभूमीत इजिप्त आणि अमेरिकेच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खननाचं काम हाती घेतलं आहे. या दफनभूमीत उत्खनन करत असताना काही पुरातन अवशेष हाती लागले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. उत्खननात सापडलेल्या बिअर फॅक्टरीचा फोटो इजिप्त सरकारनं शेअर करत ही माहिती दिली आहे.

१६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.