विदेशी थेट गुंतवणुकीप्रमाणेच कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात आपला महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, आगामी काळातही तो अव्वल स्थानावरच राहील असा ठाम विश्वास व्यक्त करीत राज्याचे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्व जण शपथबद्ध होऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.
स्वातंत्र्यदिनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत, असा शासनाचा मानस असून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले पाहिजे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले याचा विशेष आनंद होत असून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासन आपल्या दारीसारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना करोडो रुपयांचे लाभ दिले. केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली. आजवर साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत सरकारने बळीराजाला दिली आहे, असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
तलाठी भरतीसाठी ‘या’ जिल्ह्यांतून सर्वाधिक, सर्वांत कमी अर्ज दाखल… जाणून घ्या आकडेवारी….
महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरतीसाठी आलेल्या अर्जांचा जिल्हानिहाय तपशील जाहीर करण्यात आला. त्यानुसार पुणे, रायगड या जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून, तर मुंबई शहर आणि वाशिम जिल्ह्यांतून सर्वांत कमी अर्ज आले.
भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी ही माहिती दिली. टीसीएस या खासगी कंपनीमार्फत तलाठी भरती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील जिल्ह्यांतून मिळून एकूण १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज दाखल झाले आहेत. उच्च शिक्षित उमेदवारांनीही या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेचे नियोजनही करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक एक लाख १४ हजार ६८४, रायगड जिल्ह्यातून १ लाख ५३७, नाशिक जिल्ह्यातून ६८ हजार ३८, अहमदनगर जिल्ह्यातून ६१ हजार ६३३, सोलापूर जिल्ह्यातून ५८ हजार ९७७, नागपूर जिल्ह्यातून ५७ हजार ८७२, चंद्रपूर जिल्ह्यातून ५६ हजार ९३० अर्ज दाखल झाले.
तर सर्वांत कमी अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातून २ हजार ६३६, मुंबई शहरातून ३ हजार ७९३, अकोला जिल्ह्यातून ६ हजार ४०४ मुंबई उपनगरातून ७ हजार ६८९, लातूर जिल्ह्यातून ८ हजार ३१, गडचिरोली जिल्ह्यातून ९ हजार २०, गोंदिया जिल्ह्यातून ९ हजार ३३० अर्ज दाखल झाले.
स्वातंत्र्यदिनी ९५४ पोलिसांना पदके; महाराष्ट्रातील ७६ पोलिसांचा समावेश
केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनी विविध केंद्रीय आणि राज्य दलातील एकूण ९५४ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली आहेत. देशभरातील २३० जवानांना पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाचाही समावेश करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षांतून दोनदा ही पदके जाहीर केली जातात. महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना पदके जाहीर झाली असून त्यातील ३ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर, ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी,मुंबई) आदींना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. सीआरएफ अधिकारी लौक्राकपम इबोमचा सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सेवेतील हे दुसरे शौर्य पदक आहे. याव्यतिरिक्त विशेष सेवेसाठी ८२ राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी ६४२ पोलीस पदके देण्यात येणार आहेत.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि शौर्य पोलीस पदक ही दोन्ही पदके जीवन आणि मालमत्ता वाचविणे, गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्हेगारांना पकडणे यातील विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केली जातात. पोलीस सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाते. तसेच गुणवान सेवेसाठी पोलीस पदक साधनसंपत्ती आणि कर्तव्याची निष्ठेद्वारे वैशिष्टय़कृत मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते.
“मी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून…”, ऋषी सुनक यांचं मोठं विधान
इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रामायण पठणाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं. “मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे,” असं मत ऋषी सुनक यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ऋषी सुनक यांनी या कार्यक्रमात आपल्या मनोगताची सुरुवात ‘जय सिया राम’ असं म्हणत केली. ते म्हणाले, “भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंब्रिज विद्यापीठात आयोजित मोरारी बापू यांच्या राम कथेला उपस्थित राहणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आज मी या ठिकाणी इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून उपस्थित नाही, तर एक हिंदू म्हणून उपस्थित आहे.”
“मला आपली श्रद्धा धाडस, हिंमत आणि ताकद देते”
“माझ्यासाठी श्रद्धा ही खूप व्यक्तिगत गोष्ट आहे. ही श्रद्धा मला जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन करत असते. पंतप्रधान होणं ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे, पण हे सोपं काम नाही. या पदावर असताना खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात. कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी देशासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी मला आपली श्रद्धा धाडस, हिंमत आणि ताकद देते,” असं मत ऋषी सुनक यांनी व्यक्त केलं.
“माझ्यासाठी भगवान राम कायमच प्रेरणा देणारे”
“माझ्यासाठी भगवान राम कायमच प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्याकडून मला धाडसाने जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, माणूसकीने सरकार चालवण्यासाठी आणि निस्वार्थपणे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते,” असंही ऋषी सुनक यांनी नमूद केलं.
जगभरातील राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी भारताला ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताबरोबरची त्यांची ‘खास’, ‘विशेषाधिकारप्राप्त’, आणि ‘धोरणात्मक’ भागीदारी अधोरेखित केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशात रशियन अध्यक्ष पुतिन म्हणाले की, ‘‘प्रादेशिक आणि जागतिक अजेंडय़ावरील महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे रचनात्मक भागीदारीद्वारे सर्व क्षेत्रांमध्ये फलदायी द्विपक्षीय सहकार्याला चालना देत राहतील, असा विश्वास आहे. आम्ही भारताबरोबरच्या विशेष धोरणात्मक भागीदारीच्या संबंधांना खूप महत्त्व देतो.’’
कॅनेडियन खुली टेनिस स्पर्धा - सिमोना हालेप विजेती :
रोमानियाच्या सिमोना हालेपने ब्राझीलच्या बिएट्रिझ हदाद माइआला चुरशीच्या लढतीत पराभूत करत कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेचे तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले.
हालेपने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत ६-३, २-६, ६-३ अशी सरशी साधली. पहिल्या सेटमध्ये हालेप ०-३ अशी पिछाडीवर होती. यानंतर पुनरागमन करत तिने हा सेट ६-३ असा जिंकला. प्रतिस्पर्धी हदादने जोरदार खेळ करत दुसरा सेट ६-२ असा आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, हालेपने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ६-३ अशी बाजी मारली आणि जेतेपद पटकावले.
या पराभवामुळे हदादची विजयी घोडदौड खंडित झाली. अंतिम फेरी गाठताना २६ वर्षीय हदादने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील उपविजेती लैला फर्नाडेझ, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली इगा श्वीऑनटेक आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बेलिंडा बेन्चिचला नमवले होते.
पंतप्रधानांच्या भाषणात नवे उपक्रम, महत्त्वाच्या घोषणांबाबत उत्सुकता :
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लाल किल्ल्यावरून सलग नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकावणार असून, देशाला संबोधित करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यंदाचा सोहळा विशेष महत्त्वाचा आहे. यंदा कोणती महत्त्वाची घोषणा करणार याची उत्सुकता आहे.
गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी त्यांनी भाषणात त्यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मोहीम, गती शक्ती मास्टर प्लान आणि ७५ आठवडय़ांत ७५ ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०२० मध्ये पंतप्रधान मोदींनी सहा लाखांहून अधिक गावे ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्याचे काम एक हजार दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा केली होती.
प्रत्येक नागरिकाला ‘डिजिटल आरोग्य ओळखपत्र’वाटप योजनेचीही त्यांनी घोषणा केली. २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी ‘तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख’ या पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती.
देशाचा आजचा विकास अधिक सर्वसमावेशक -राष्ट्रपती :
भारतीय भूमीत लोकशाही केवळ रुजली नाही, तर ती समृद्धही झाली. आपल्या लोकशाहीबद्दल शंका घेणाऱ्यांचे अंदाज आपण भारतीयांनी खोटे ठरवले, असे स्पष्ट करीत राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, ‘‘लोकशाहीची अस्सल क्षमता शोधण्यासाठी जगाला मदत केल्याचे श्रेय भारताकडे जाते’’, असे प्रतिपादन केले.
देशाचा विकास अधिक सर्वसमावेशक होत असून प्रादेशिक भेदभावही कमी होत आहेत. दलित, गरजू आणि उपेक्षितांच्याप्रति करुणा हा आजच्या भारताचा ‘परवलीचा शब्द’ बनला आहे, असेही राष्ट्रपती मूर्मु यांनी नमूद केले.
लैंगिक भेदभाव कमी होत असल्याचा दावाही राष्ट्रपतींनी भाषणात केला. महिला त्यांना प्रतिबंध करणाऱ्या अनेक अडथळय़ांवर मात करीत आहेत. आमच्या मुली देशासाठी सर्वात मोठी आशा आहे, असेही त्या म्हणाल्या.
अलीकडच्या वर्षांत विशेषत: करोना साथीच्या उद्रेकानंतर जगाने नव्या भारताचा उदय होताना पाहिला आहे. जागतिक मंदीला मागे टाकण्याचे आणि अर्थव्यवस्थेच्या भरभराटीस मदत करण्याचे श्रेय घेण्यास सरकार आणि धोरणकर्ते पात्र ठरतात. देशाचा विकास अधिक सर्वसमावेशकरीत्या होत असून प्रादेशिक भेदभावही कमी होत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
सध्या टीकेचा विषय ठरलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरही मुर्मू यांनी भाष्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश भावी पिढीला औद्योगिक क्रांतीच्या पुढच्या टप्प्यासाठी सज्ज करणे आणि पुन्हा भारताच्या उज्ज्वल वारशाशी जोडणे, हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, जेव्हा देशाने स्वातंत्र्य मिळवले तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय नेते आणि तज्ज्ञांना त्यावेळी गरिबी आणि निरक्षरतेमुळे भारतातील लोकशाहीबद्दल साशंक होते. परंतु आम्ही भारतीयांनी त्यांचे अंदाज चुकीचे होते, हे सिद्ध केले.
ड्रोनच्या मदतीने होणार औषधांचं वितरण, अरुणाचलच्या कामेन्गमध्ये हायटेक सेवेला सुरुवात :
अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सोमवारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कामेन्गमधील सेप्पा ते चायान्ग ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा ५० सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
“भारताला जगातील ड्रोन हब बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अरुणाचल प्रदेश सरकारने आरोग्य सेवा, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) सहकार्य लाभले आहे”, अशी माहिती ट्वीट करत मुख्यमंत्री खांडू यांनी दिली आहे.
या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने(USAID) निधी दिला आहे. बंगळुरूच्या ‘रेडविंग लॅब्स’ या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे आरोग्यसेवेतील समस्या, आर्थिक व्यवहार्रता यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यावर आधारीत धोरण सरकार तयार करेल. त्यानंतर टप्पाटप्प्याने ही सेवा संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यासाठी पाऊलं उचलेल, असे खांडू यांनी म्हटले आहे.
सध्या पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकल्पाला ‘समरिद्धी’ या आरोग्य सेवेशी संबंधित संस्थेने देखील आर्थिक आणि तांत्रिक मदत केली आहे. पूर्व कामेन्ग जिल्हा डोंगराळ भागात वसलेला आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यास प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषत: पावसाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी आता सरकारकडून ड्रोन यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू झालेली ही ड्रोन सेवा ‘गेम चेंजर’ ठरेल, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे उपायुक्त प्राविमल अभिषेक यांनी दिली आहे. “आंतरराष्ट्रीय संस्थानी २०२१ मध्ये अरुणाचल प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला होता.
इयान चॅपेलने पुन्हा घेतली निवृत्ती! ४५वर्षांच्या कारकिर्दीचा झाला शेवट :
क्रिकेट खेळामध्ये दोन्ही संघ, पंच आणि मैदानाबरोबर चांगल्या समालोचकालादेखील तितकेच महत्त्व आहे. काही प्रसिद्ध क्रिकेट समालोचकांनी आपल्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात कायमची जागा मिळवलेली आहे. अशाच समालोचकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांचा समावेश आहे. गेल्या ४५ वर्षांपासून चॅपेल समालोचनाचे काम करत होते. आता त्यांनी आपल्या साडेचार दशकांच्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅपेल यांनी समालोचनामधून निवृत्ती घेतली आहे.
७८ वर्षीय चॅपेल हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “मला आजही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा दिवस आठवत आहे. खेळ बस झाला आता, अशी जाणीव तेव्हा मला झाली होती. मात्र, समालोच सोडण्याचा निर्णय घेताना मला फार विचार करावा लागला. काही वर्षांपूर्वी किरकोळ झटका (स्ट्रोक) आला होता. तेव्हा मी नशीबवान ठरलो. परंतु, आरोग्याच्या समस्यांमुळे आता सर्वकाही कठीण होत आहे.”
इयान चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी ७५ कसोटी सामने खेळून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी समालोचन सुरू केले होते. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट वाहिनी, ‘चॅनल नाईन’साठी रिची बेनॉड, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासह मिळून चॅपेलने समालोचनाचे काम केले. ‘कसा समालोचक म्हणून लोकांनी तुम्हाला आठवणीत ठेवावे?”, असा प्रश्न विचारला असता चॅपेलने मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. काहींना वाटेल की मी चांगले काम केले. काहींना वाटेल की अतिशय वाईट होतो. पण, याचा मला थोडाही फरक पडत नाही.”