दहशतवादाशीच नव्हे, तर विस्तारवादाविरोधातही भारत समर्थपणे लढत असून सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना लडाखमध्ये जवानांनी कसा धडा शिकवला, हे अवघ्या जगाने पाहिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले.
७४व्या स्वातंत्र्यदिनी शनिवारी लाल किल्ल्यावरून सलग सातव्यांदा दिलेल्या दीड तासांच्या भाषणात मोदी यांनी चीन वा पाकिस्तानचा उल्लेख टाळला, परंतु १५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांचा हल्ला परतवून लावणाऱ्या जवानांचे कौतुक केले.
भारताची पश्चिम नियंत्रण रेषा पाकिस्तानला भिडली असून पूर्वेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा चीनशी संलग्न आहे. या दोन्ही सीमांवर शेजारी राष्ट्रांकडून होणाऱ्या आक्रमकलष्करी कारवायांचा बीमोड केला जाईल, असा निर्धार व्यक्त करीत मोदी यांनी चीनच्या विस्तारवादी भूमिकेवर परखड टीका केली.
लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, आज भारताला जगाचा पाठिंबा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वासाठी १९२ पैकी १८४ देशांनी भारताच्या बाजूने कौल दिला. भौगोलिक सीमा भिडलेले देशच शेजारी असतात असे नव्हे, समान तत्त्वे आणि भावना असलेले देशही (अन्य आशियाई देश) सहकारी असतात. मोठय़ा परिघातील शेजारी राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ संबंध आहेत, एकमेकांबद्दल आदरही आहे!
डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, असे ‘राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्र’ प्रत्येकाला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.
ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजना’ सुरू होत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘या योजनेनुसार प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र दिले जाईल. सर्व आरोग्यसेवांसाठी त्याचा वापर करता येईल.’’ वैद्यकीय तपासणी अहवाल, डॉक्टरांनी दिलेली औषधे, उपचार आदी माहिती ओळखपत्रात नोंदवलेली असेल. ही आरोग्य योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राबवली जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘स्वावलंबी भारत’ अशी घोषणा करताना मोदी म्हणाले की, किती काळ आपण कच्चा माल निर्यात करून वस्तू आयात करत राहणार? हे दुष्टचक्र थांबवण्याची वेळ आली आहे. देशासाठी गरजेच्या वस्तू देशातच बनवल्या गेल्या पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्या जगभर निर्यातही केल्या पाहिजेत. ‘मेक इन इंडिया’तून ‘मेक फॉर वर्ल्ड’कडे वाटचाल करण्याचा निर्धार मोदी यांनी केला. करोनाच्या काळातही जगभरातून भारतात गुंतवणूक होत असून थेट परदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढली आहे. भारताकडे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता असल्याचे जगभरातील गुंतवणूकदारांना वाटते. स्थानिक उद्योगांना चालना देण्यातून स्वावलंबी भारत घडू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
कसे असेल ओळखपत्र? राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्रावर व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहितीची साठवणूक असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना आपल्या प्रकृतीची नोंद डिजिटल स्वरूपात व्हावी अशी इच्छा आहे अशा प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र तयार करावे लागेल. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन यासारख्या आरोग्य यंत्रणांशी हे ओळखपत्र जोडण्यात येईल. हे ओळखपत्र व्यक्तीची मूलभूत माहिती आणि मोबाइल क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून तयार केले जाईल. ओळखपत्रधारकाला आपल्या आरोग्याच्या सर्व नोंदी या ओळखपत्राशी जोडण्याची सोय असेल.
जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह काही देशांच्या आक्षेपानंतरही रशियानं आपल्या करोनाच्या लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
“ही लसीच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच करोना विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यासदेखील ही लस यशस्वी ठरली आहे,” असं रशियाच्या आरोग्य मंत्रालाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही लस एका व्यक्तीला दोन वेळा देण्यात येते आणि या विषाणूविरोधात दोन वर्षांपर्यंत रोग प्रतिकारक क्षमता विकसित करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यापूर्वी या लसीची ७६ स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.
या लसीचं उत्पादन लवकरच परदेशांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि फिलिपिन्समध्येही याची चाचणी सुरू होणार असल्याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर दुसरीकडे ही लस किती सुरक्षित आहे आणि प्रभावशाली आहे याची चाचणी करण्यात आली नसल्याचं ब्रिटनचे वृत्तपत्र डेलीमेलनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या लसीचे काही दुष्परिणामही दिसून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
तुम्ही तुमच्या करोना लसीचा ट्रायल डेटा प्रसिद्ध करा, जेणेकरुन तज्ज्ञांना परिणामकारकता तपासता येईल अशी WHO ने रशियाला यापूर्वी विनंती केली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार आतापर्यंत केवळ ३८ स्वयंसेवकांवरच या लसीची चाचणी करण्यात आली. लसीचा डोस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये १४४ प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसले. तसंच चाचणीच्या ४२ व्या दिवसापर्यंत ३१ स्वयंसेवकांमध्ये साईड इफेक्ट्स दिसत असल्याचा दावा डेली मेलनं केला आहे. तर दुसरीकडे रशियानं आपली लस सुरक्षित असल्याचं सांगत २० देशांकडून लसीची मागणीही आल्याचं म्हटलं आगे. तर रशियन वृत्तसंस्था फोटांकानं स्वयंसेवकांमध्ये दिसत असलेल्या साईड इफेक्ट्सची यादी मोठी असल्याचं म्हटलं आहे.
“आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.