चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2023

Date : 16 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रो लीग हॉकी (पुरुष) - भारताचा जर्मनीवर शानदार विजय :
  • भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी अननुभवी जर्मनीविरुद्धच्या दुसऱ्या ‘एफआयएच’ प्रो लीग लढतीत ३-१ असा शानदार विजय नोंदवला. या विजयासह भारताने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे.

  • भारताकडून सुखजीत सिंग (१९व्या मिनिटाला), वरुण कुमार (४१व्या मि.) आणि अभिषेक (५४व्या मि.) यांनी गोल साकारले, तर जर्मनीचा एकमेव गोल अँटन बोइकीलने (४५व्या मि.) केला. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने जर्मनीचा ३-० असा पराभव केला होता. भारताने १२ सामन्यांत सर्वाधिक २७ गुण कमावले आहे, तर जर्मनीच्या खात्यावर १० सामन्यांतून १७ गुण जमा आहेत. या दोन विजयांसह भारताने प्रो लीगमधील मायदेशातील मोहिमेची विजयी सांगता केली आहे. यापुढे जून महिन्यात भारतीय संघ बेल्जियम आणि नेदरलँड्स संघाविरुद्ध सामने खेळणार आहे.

  • जर्मनीच्या संघातील २२ खेळाडूंपैकी सहा जणांनी या दोन सामन्यांत पदार्पण केले. त्यामुळे नवोदितांचा भरणा असलेल्या जर्मनीविरुद्ध भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरी केली.

  • पहिल्या सत्रात भारताने प्रतिस्पर्ध्याच्या वर्तुळात काही उत्तम आक्रमणे केली; परंतु या संधींचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रातील चौथ्या मिनिटाला सुखजीतने मैदानी गोलसह भारताचे खाते उघडले. मनप्रीत सिंग आणि निलकांता शर्मा यांच्या साहाय्यामुळे सुखजीतला कारकीर्दीतील दुसरा गोल साकारता आला. या गोलनंतर भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. दडपणाखाली खेळणाऱ्या जर्मनीचा प्रयत्न क्रिशन बहादूर पाठकने हाणून पाडला. मध्यंतरापर्यंत भारताने तीनदा गोललक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला, तर जर्मनीच्या वाटय़ाला एकही आला नाही.

न्यायालयांतील पदभरती, पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न- सरन्यायाधीश :
  • देशभरात न्यायालयांतील रिक्त पदे भरण्यासह न्यायालयांतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे न्यायाधीश आणि इतरांचे सुरक्षाविषयक प्रश्नही सोडविले जात आहेत, अशी माहिती सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी शुक्रवारी दिली. आपल्या न्यायव्यवस्थेवर क्षमतेपेक्षा अधिक कामाचा ताण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  •    येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय तेलंगण राज्य न्यायिक अधिकारी परिषदेचे उद्घाटन रमणा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. आपण सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारताच रिक्त पदांवर भरती आणि पायाभूत सुविधांची सुधारणा यात लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयांची संख्या पुरेशी असली आणि तेथे योग्य त्या पायाभूत सुविधा असल्या तरच लोकांना न्याय देणे शक्य होईल. त्यामुळे आपण यात लक्ष घातले आहे, असे ते म्हणाले.

  • न्यायालय मग ते जिल्हा, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय असो, तेथे कोणतीही जागा खाली असता कामा नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील न्यायव्यवस्थाही बळकट झाली पाहिजे, पण विविध भागांत न्यायालयांतील सुविधा कमी पडतात, असे त्यांनी निदर्शनास आणले. तेलंगणातील न्यायाधीशांची पदे २४ वरून ४२ पर्यंत वाढविण्याबाबतची प्रलंबित फाइल आपण विनाविलंब निकालात काढल्याचा दाखला त्यांनी दिला.

  • तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यावेळी उपस्थित होते. तेलंगण सरकारने न्यायालयांतील चार हजार जागांवर भरती सुरू केली आहे. केंद्र आणि अन्य राज्यांनी कंत्राटी भरती सुरू केली असताना राव यांनी असा निर्णय घेतल्याबद्दल रमण यांनी त्यांचे कौतुक केले.

“रशियाने फक्त पाच दिवसांची मुदत…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रात्री उशिरा साधला देशवासियांशी संवाद :
  • रशियाने आपल्याला फक्त पाच दिवस दिलेले असतानाही आपण ५० दिवसांनंतरही आपण टिकून आहोत याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशवासियांना म्हटलं आहे. झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी २४ फेब्रुवारीला रशियाविरोधात लढण्याचा निर्णय घेणाऱ्या युक्रेनच्या करोडो नागरिकांची ही उपलब्धी असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं.

  • झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात रशियन सैन्याला रोखण्यासाठी देशातील नागिरकांनी अनेक मार्गांनी मदत केल्या सांगितलं. रशियन युद्धनौका समुद्राच्या तळाशी असल्या तरी त्यांना आपण माघारी पाठवू शकतो हेदेखील दाखवून दिलंत असं ते म्हणाले. रशियन क्षेपणास्त्र क्रूझर मॉस्क्वा बंदरात नेत असताना बुडालं होतं. याचाच संदर्भ देत ते बोलत होते.

  • झेलेन्स्की यांनी यावेळी युद्धाचा पहिला दिवस कसा होता याची आठवण ताजी करत म्हटलं की, “अनेक देशाच्या नेत्यांना युक्रेन टिकेल की नाही याबद्दल खात्री नव्हती. अनेकांनी मला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांना युक्रेनियन्स किती शूर आहेत हे माहिती नाही. तसंच आपण स्वातंत्र्याला किती हवं तसं जगण्याला किती महत्त्व देतो याची कल्पना नाही”.

मोदी सरकारकडून चुकून ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तब्बल ४३५० कोटी; वसूली करण्याचे आदेश :
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झाले आहेत जे या योजनेसाठी अपात्र आहेत. केंद्र सरकार आता अशा सर्व शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे.

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार यासंबंधी केंद्र सरकारने काही नियम आखले आहेत. दरम्यान पीटीआयच्या एका वृत्तानुसार, यानंतरही जवळपास ४३५० कोटी रुपये अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये असे अनेक शेतकरीदेखील आहेत जे आयकर भरतात आणि सोबतच सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात.

  • केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) सुरू केली होती. या योजनेंतर्गत सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. २००० प्रमाणे तीन हफ्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

  • राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश मार्गदर्शक तत्त्वांनुसार आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची यादी तयार करतात. शेतकरी कुटुंब म्हणजे यामध्ये पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. जास्त उत्पन्न असलेल्या शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतात.

१६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.