चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ एप्रिल २०२१

Date : 16 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चिमुकलीची उत्तुंग भरारी! अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद :
  • २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे तिचे सर्वंत्र कौतुक होत आहे.

  • चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया पद्यापूर शाखेमध्ये सहायक रोखपाल पदावर कार्यरत असलेले वैभव शेरेकर हे मुळचे अकोला येथील आहे. नोकरीनिमित्त ते चंद्रपूर येथे स्थिरावले. त्यांना वैदिशा ही एकुलती एक मुलगी आहे. अवघ्या एक वर्षांची असताना तिला एक गोष्ट सांगितली की तिच्या लक्षात रहायची. तिच्या असाधारण कुशाग्र बुद्धीचा कसा सदुपयोग करता येईल यावर विचार करून, शेरेकर कुटुंबीय तिला नवनवीन पाठ्यपुस्तके आणत होते.

  • वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली. तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली.

  • वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते. तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.

NEETPG - 2021 परीक्षा देखील पुढे ढकलली :
  • देशभरात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षा  पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतंच केंद्र सरकारने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

  • ‘सीबीएसई’ दहावीची परीक्षा रद्द - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEETPG – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

  • मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय - करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धा - सरिताला सुवर्णपदक :
  • भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.

  • अंतिम फेरीची लढत संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना सरिता १-७ अशी पिछाडीवर पडली होती. पण ५९ किलो वजनी गटात पंचांकडे दाद मागण्याचा भारताचा निर्णय फसल्यानंतर बातारजावला चार गुणांची बढत मिळाली. त्यातच सरिताने स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे बातारजावला आणखी एक गुण मिळवता आला. बातारजावने ७-१ अशी आघाडी घेतल्यानंतर सरिताने पुनरागमन केले.

  • बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने ७-७ अशी बरोबरी साधली. अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस १०-७ अशा फरकाच्या आधारे सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.

  • प्रतिस्पर्धी २०१८ सालची जागतिक कांस्यपदक विजेती असल्याने हा सामना माझ्यासाठी खडतर होता. पण मी माझ्यापरीने सामन्याची तयारी केली होती. पहिल्याच सामन्यात तिच्याकडून हरल्यानंतर अंतिम फेरीत मी रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली.

अमेरिकेचे रशियावर निर्बंध :
  • रशियाच्या १० राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा अमेरिकेने गुरुवारी केली, तसेच तीसहून अधिक व्यक्ती व महत्त्वाच्या वित्त संस्थांवर निर्बंध लागू केले. गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल, तसेच अमेरिकी संघराज्यात्मक यंत्रणांमध्ये हॅकिंग केल्याबद्दल रशियाला जबाबदार मानून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

  • रशियाने सात वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये घुसखोरी करून त्यातील क्रिमियाचा भाग आपल्या ताब्यात घेतला, तो अद्यापही आपल्याकडेच राखला आहे. त्याचप्रमाणे युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या व आघाडीच्या सैनिकांविरुद्ध हल्ले चढवण्यासाठी रशिया आर्थिक मदत देत असल्याचाही अमेरिकेचा आरोप आहे. याबद्दल रशियाला दंड आकारणे हाही या निर्बंधांचा उद्देश आहे.

  • अमेरिकेतील निवडणुकांशी आपला संबंध असल्याचा किंवा अफगाणिस्तानात इनाम देत असल्याचा आरोप रशियाने नाकारला आहे. सोलरविंड्स संगणक हल्ल्याशी  काही देणेघेणे नसल्याचेही रशियाने म्हटले आहे.

भारत कोणत्याही दबावापुढे झुकत नाही हे सिद्ध :
  • देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्या संदर्भाने रावत बोलत होते.

  • रायसिन चर्चासत्रामध्ये सहभागी होताना रावत पुढे म्हणाले की, चीनकडे वरच्या दर्जाचे सशस्त्र दल आहे त्यामुळे आपण अनेक देशांना झुकवू शकतो असा त्यांचा समज होता, परंतु भारताने खंबीर भूमिका घेत देश कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे सिद्ध केले, असे रावत म्हणाले.

  • भारताने खंबीर भूमिका घेतली आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळाला, भारत दबावापुढे झुकेल असे त्यांना वाटले, मात्र तसे घडले नाही, असेही ते म्हणाले. भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

  • मात्र लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दोन्ही देशांनी फेब्रुवारी महिन्यात पांगॉँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरांवरून आपले सैनिक आणि शस्त्रे मागे घेतली. आता संघर्षाची जी ठिकाणे राहिली आहेत तेथूनही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

‘मरकझ’ला परवानगी नाही :
  • रमझानच्या काळात निझामुद्दीन मरकझमध्ये भाविकांना प्रवेश देण्याबाबत सहमती दर्शवणाऱ्या केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी घूमजाव करीत मशिदीमध्ये कोणालाही कोणत्याही कार्यक्रमास मुभा दिली जाऊ शकत नाही, असे मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले.

  • नमाज अदा करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून भाविकांना ‘मरकझ’मध्ये प्रवेश मिळावा, अशी मागणी करणाऱ्या दिल्ली वक्फ मंडळाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

  • राजधानीत ‘दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (डीडीएमए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व धार्मिक कार्यक्रमांवर १० एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने रमझान महिन्यात निझामुद्दीन मरकझमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही, असे केंद्र  सरकार आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले.

  • न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी केंद्र सरकारच्या वकिलांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार गेल्या वर्षापासून मशिदीत नमाज अदा करणाऱ्या पाच जणांना पुढील सुनावणीपर्यंत तसे करण्यास परवानगी असेल.

१६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.