आधीच इशारा दिल्यानुसार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक मदत बंद केली आहे. दरवर्षी अमेरिका आरोग्य संघटनेला ५० कोटी डॉलर्सची मदत देत असते, पण यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ गलथानपणे हाताळतानाच चीनकेंद्री भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून ही मदत बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला आहे.
करोनाची साथ पसरवण्याच्या व त्यातील माहिती दडवण्याच्या चीनच्या कृत्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने पांघरूण घातले असा आरोप अमेरिकेने केला आहे. आतापर्यंत कोविड-१९ साथीत जगात १,१९,००० बळी गेले असून अमेरिकेत पंचवीस हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने तीव्र चिंता व्यक्त केली असून जागतिक आरोग्य संघटनेला चीनकडून दिलेल्या मदतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, चीनने करोनाविरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला आधीच २ कोटी डॉलर्स दिले आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी एक आठवडा स्वत:च विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. रुपाणी यांची मंगळवारी काँग्रेसच्या आमदाराने भेट घेतली होती त्या आमदारालाच करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने रुपानी यांनी वरील निर्णय घेतला आहे.
रुपाणी यांची प्रकृती उत्तम आहे, ते व्हिडीओ कॉन्फरन्स, व्हिडीओ-कॉलिंग आणि टेली-कॉलिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासकीय कारभार पाहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे सचिव अश्विनीकुमार यांनी बुधवारी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकाही अभ्यागताला जाण्याची मंजुरी एक आठवडा दिली जाणार नाही. प्रख्यात डॉक्टर आर. के. पटेल आणि अतुल पटेल यांनी रुपाणी यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे, असे सचिवांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांनी पक्षाच्या काही आमदारांसह रुपाणी यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली होती आणि खेडावाला यांना करोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खेडावाला यांनी पत्रकारांशीही चर्चा केली होती.
अमेरिकेची अर्थव्यवस्था करोना र्निबधानंतर पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर सल्लामसलतीसाठी नेमलेल्या सल्लागार गटात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा अमेरिकी भारतीय उद्योगधुरिणांची नेमणूक केली आहे. गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई व मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांचा त्यात समावेश आहे.
देशातील बुद्धिमान व्यक्तींचा सल्ला आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करताना घेत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाची असून करोनामुळे ३३ कोटी लोकांपैकी ९७ टक्के लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आल्याने अमेरिकेतील अर्थचक्र थांबले असून १.६० कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत.
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातील उद्योग व विविध क्षेत्रातील दोनशे धुरिणांचा समावेश असलेले सल्लागार गट तयार केले आहेत. हे सर्वजण अर्थव्यवस्था सुरळित करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांना शिफारशी करणार आहेत. या व्यक्तींकडून काही नव्या कल्पना मांडल्या जाणे अपेक्षित आहे, असे त्यांनी व्हाइट हाऊस येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
चीनमधून आज करोना व्हायरसची चाचणी सामग्री येऊ शकते. यामध्ये रॅपिड टेस्टिंग किटचा समावेश आहे. या किट्समुळे Covid-19 च्या चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे. चीनमधून सामनाची पहिली खेप येणार आहे. त्यामध्ये तीन लाख रॅपिड टेस्टिंग किट्स असणार आहेत.
चीनकडून या किट्सच्या निर्यातीला बराच विलंब झाला आहे. पुढच्या दोन आठवडयात चीनमधून असे आणखी २० ते ३० लाख किट्स भारतात पाठवण्यात येतील. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. खराब दर्जामुळे जगातील काही देशांमध्ये चिनी किट्सना नकार देण्यात आला. त्यानंतर चीन सरकारने निर्यातयोग्य आणि किट्सची दर्जात्मक चाचणी झालेल्या कंपन्यांची यादी तयार केली.
त्याशिवाय चीनच्या कस्टम विभागानेही किट्सच्या क्वालिटी टेस्टिंगचा आग्रह धरला. त्यामुळे भारतात हे किट्स पोहोचायला उशीर झाला. करोना संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या हॉटस्पॉसच्या भागात या रॅपिड टेस्टिंग किटसचा वापर करण्यात येणार आहे.
केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी कोणत्याही आर्थिक मदतीची घोषणा न केल्याबद्दल थॉमस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारांना सध्या केवळ कौतुकाची नाही तर मदतीची गजर असल्याचा टोला थॉमस यांनी लगावला आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना थॉमस यांनी सध्या बँका राज्य सरकारांकडून मोठ्याप्रमाणात व्याज घेत आहेत. त्यामुळेच पंतप्रधानांनी केवळ कौतुक न करता राज्यांना आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत थॉमस यांनी व्यक्त केले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना राज्य सरकारांचे कौतुक केलं. ज्यापद्धतीने राज्यातील सरकारे या संकटला तोंड देत आहे त्याचे कौतुक मोदींनी केलं. मात्र माझ्या मते राज्यांना केवळ कौतुक हवंय असं नाही त्यांना आर्थिक मदतीचीही गरज आहे. जेव्हा आम्ही बँकांकडे कर्ज मागण्यासाठी जातो तेव्हा ते नऊ टक्क्यांचा व्याजदर सांगतात.
अनेक राज्यांनी ५०० ते १००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. अनेक राज्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करणे किंवा विकास कामे थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे,” असं मत थॉमस यांनी व्यक्त केलं. मर्यादित पर्याय हाती असल्याने राज्य सरकारांवर आर्थिक ताण येणार असल्याचे मत थॉमस यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या दुसऱ्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या सुचनेनुसार काही निर्बंध हटवण्याचा विचार करत असल्याचेही थॉमस यांनी स्पष्ट केलं.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.