चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 सप्टेंबर 2023

Date : 15 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पहिले ‘सी २९५’ विमान भारताकडे सुपूर्द
  • ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी’ने बुधवारी भारतीय हवाई दलाकडे (आयएएफ) पहिले ‘सी २९५’ हे वाहतूक विमान सुपूर्द केले. भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २१ हजार ९३५ कोटींना ५६ ‘सी २९५’ वाहतूक विमाने खरेदी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी’बरोबर करार केला होता. बुधवारी स्पेनमधील सेव्हिल शहरात एअरबस कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात भारतीय हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांना हे विमान सुपूर्द करण्यात आले.
  • या करारानुसार ‘एअरबस’ २०२५ पर्यंत सेव्हिल शहरातील उत्पादन प्रकल्पातून भारताला सुसज्ज स्थितीतील १६ ‘सी २९५’ विमाने पुरवणार आहे. उर्वरित ४० विमाने नंतर दोन्ही कंपन्यांतील औद्योगिक भागीदारी कराराचा भाग म्हणून ‘टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड’द्वारे (टीएएसएल) भारतात उत्पादित करून त्यांची बांधणी (असेम्बल) केली जाईल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे या विमानांच्या निर्मिती सुविधेची पायाभरणी केली होती.
  • खासगी कंपनीद्वारे भारतात बनवले जाणारे हे पहिले लष्करी विमान असेल. भारतीय हवाई दल साठ वर्षांपूर्वी सेवेत दाखल केलेल्या ‘एव्हरो-७४८’ या जुन्या विमानांचा ताफा बदलून ही ‘सी२९५’ विमाने खरेदी करत आहे. ‘सी२९५’ हे एक अद्ययावत वाहतूक विमान मानले जाते. त्यातून ७१ सैनिक अथवा ५० ‘पॅराशूटर’ची वाहतूक युद्ध अथवा आणीबाणीच्या काळात करता येऊ शकते. याशिवाय ज्या ठिकाणी सध्याची अवजड विमाने पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम ठिकाणी लष्करी उपकरणे आणि रसद पुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जातो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडित अथवा आजारी नागरिकांना तातडीने हलवण्यासाठीही या विमानांचा उपयोग होऊ शकतो. हे विमान विशेष मोहिमांशिवाय आपत्तीच्या-आणीबाणीच्या स्थितीत सागरीत किनाऱ्याच्या भागात गस्त घालू शकते.
  • गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, एअरबसने सांगितले की कंपनी आपल्या भारतीय औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे विमान उत्पादन आणि देखभाल सुविधा भारतात आणेल. भारतासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या ‘सी २९५’ विमानाने मे महिन्यात सेव्हिल येथे आपले पहिले यशस्वी उड्डाण केले. दुसरे विमान सेव्हिल येथील उत्पादन प्रकल्पात बांधणीच्या अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षी मेमध्ये ते भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. भारतीय हवाई दलातील सहा वैमानिक आणि २० तंत्रज्ञांनी सेव्हिल येथे आधीच दीर्घ प्रशिक्षण घेतले आहे. बडोदा येथे ‘सी २९५’ विमानाचे उत्पादन आणि उत्पादन प्रकल्प पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगात भारतीय हवाई दलाकडे सर्वाधिक ‘सी २९५’ विमाने असतील.
वाहन परवान्यांसाठी कायद्यात बदल आवश्यक आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
  • हलकी वाहने चालवण्यासाठीच्या परवाना असलेल्या व्यक्तीला विशिष्ट वजनाचे जड वाहन चालवण्याचा कायदेशीर अधिकार देताना कायद्यात बदल करणे आवश्यक आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला विचारला.
  • हे लक्षावधी नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम करणारे धोरणात्मक मुद्दे असल्याचे निरीक्षण नोंदवून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, सरकारने या प्रकरणी धोरणात्मक पुनर्विचार करावा. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यास सांगितले. कायद्याचा कोणताही अन्वयार्थ लावताना रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेसंदर्भातील योग्य मुद्दय़ांचा विचार केलाच पाहिजे.
  • या कायदेशीर प्रश्नासंदर्भात न्यायालयाने यापूर्वी महाधिवक्ता आर. वेंकटरामानी यांचे सहाय्य मागितले होते. ‘मुकुंद देवांगण विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा २०१७ चा निकाल केंद्राने स्वीकारला आणि या निर्णयांनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आल्यानंतर घटनापीठाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे यावरील मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
  • मुकुंद देवांगण प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे ठरवले होते की ज्या वाहनाचे एकूण वजन साडे सात हजार किलोंपेक्षा जास्त नाही, त्यांना हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) व्याख्येतून वगळलेले नाही.
पाकिस्तानचा पत्ता कट! फायनल भारत वि. श्रीलंका
  • आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४२ षटकांत २५२ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य होते आणि श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर आठ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. त्याचबरोबर आशिया चषकाच्या फायनलमध्ये ११व्यांदा मुसंडी मारली आहे. 
  • या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अगोदरच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, आता अंतिम फेरीत भारताला श्रीलंका संघ आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघाचा सामना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.
  • २५३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या श्रीलंका संघाला पहिला धक्का २० धावांच्या स्कोअरवर बसला. कुसल परेरा आठ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने १७ धावा करून बाद झाला. त्याला शादाब खानच्या अचूक थ्रोने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ७७ धावसंख्येवर संघाला दुसरा धक्का बसला. पथुम निसांका ४४ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.

कुसल मेंडिसचे अवघ्या नऊ धावांनी हुकले शतक - 

  • यानंतर श्रीलंका संघाची १७७ धावांवर तिसरी विकेट पडली. सदिरा समरविक्रमा ५१ चेंडूत ४८ धावा करून बाद झाली. त्याने कुसल मेंडिससोबत शतकी भागीदारी केली. इफ्तिखार अहमदच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने त्याला यष्टीचित केले. श्रीलंकेची चौथी विकेट २१० धावांवर पडली. कुसल मेंडिस ८७ चेंडूत ९१ धावा करून बाद झाला. इफ्तिखार अहमदच्या चेंडूवर मोहम्मद हारिसने शानदार झेल घेतला. मेंडिसने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. २२२ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची पाचवी विकेट पडली. कर्णधार दासुन शनाका चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला. इफ्तिखार अहमदने त्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले.
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ परीक्षा होणार ऑफलाईन पद्धतीने
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या या परीक्षा आता पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने घेण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून, या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत करण्यात येत आहे.
  • एमपीएससीने या निर्णयाबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे गुरुवारी दिली. एमपीएससीने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव त्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. आता या दोन्ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतल्या जातील. या दोन्ही परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. तसेच पदसंख्या, आरक्षणात कोणताही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले.
  • आतापर्यंत घेण्यात आलेल्या सरळसेवा भरतीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर उमेदवारांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीने प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीनेच परीक्षा घेण्याची उमेदवारांची मागणी होती. त्यानुसार आता एमपीएससीने निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. भविष्यात एमपीएससीने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार केल्यास आता स्वत:ची परीक्षा केंद्रे, यंत्रणा उभी करून परीक्षा घ्यावी, असे स्टुडंट्स राइट असोसिएशनचे महेश बडे यांनी सांगितले.
निवृत्ती मागे घेणाऱ्या बेन स्टोक्सने रचला इतिहास, इंग्लंडकडून ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
  • बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अफलातून फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्टोक्सने किवी गोलंदाजांचा समाचार घेत वादळी खेळी केली. त्याने १२४ चेंडूत १८२ धावा केल्या, त्यात १५ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. स्टोक्स हा असा खेळाडू ठरला असता ज्याने इंग्लंडकडून पहिले एकदिवसीय द्विशतक केले असते मात्र, अवघ्या १८ धावांनी हुकले. स्टोक्सला जरी द्विशतक पूर्ण करता आले नसले तरी त्याने मोठा इतिहास रचला आहे. तो इंग्लंडकडून सर्वात जास्त एकदिवसीय धावा करणारा खेळाडू झाला आहे.
  • स्टोक्सने केलेल्या या १८२ धावा ही इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या फॉरमॅटमध्ये १८० हून अधिक धावा करणारा तो पहिला इंग्लिश क्रिकेटर ठरला आहे. स्टोक्सने जानेवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावांची खेळी करणाऱ्या जेसन रॉयचा विक्रम मोडला आहे. रॉयने त्या सामन्यात १५१ चेंडूंचा सामना केला, ज्यात १६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अॅलेक्स हेल्स (१७१) तिसऱ्या, रॉबिन स्मिथ (नाबाद १६७) चौथ्या आणि जोस बटलर (नाबाद १६२) पाचव्या क्रमांकावर आहे.
  • न्यूझीलंडच्या गोलंदाजांना गुडघे टेकायला लावणाऱ्या बेन स्टोक्सने आणखी एक कामगिरी केली आहे. एखादा संघ जेव्हा ऑलआऊट होतो तेव्हा त्यात सर्वाधिक एकदिवसीय धावसंख्या करणारा तो क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १७५ धावांची खेळी खेळली होती.

बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

  • १८२ – बेन स्टोक्स विरुद्ध न्यूझीलंड, आज
  • १७५ – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००९
  • १७३ – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१६
  • १६२ – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, २०१९
  • १६० – इम्रान नझीर विरुद्ध झिम्बाब्वे, २००७

 

जागतिक अजिंक्यपद  कुस्ती स्पर्धा - विनेशला कांस्य :
  • भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या विनेश फोगटने (५३ किलो) जागतिक स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. पात्रता फेरीतील पराभवानंतरही मिळालेली संधी विनेश फोगटने अचूक साधली. याशिवाय निशा दहियाला (६८ किलो) अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

  • विनेशने पात्रता फेरी गमावल्यानंतरही कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत मजल मारली. मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. खुलनने अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे रेपिचेज गटातून विनेशचे आव्हान कायम राहिले. रेपिचेज गटात अझरबैझानच्या लैला गुरबार्नोवियाने दुखापतीमुळे तिला पुढे चाल मिळाली.

  • कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने स्वीडनच्या बलाढय़ एम्मा माल्मर्गेनचा ८-० असा पराभव केला. एम्माने विनेशविरुद्ध दुहेरीपटाचे आक्रमण केले होते. मात्र, त्यास दाद न देता विनेशने एक चाक डावावर दोनदा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर दुहेरी पटाचा डाव टाकून तिने आणखी दोन गुणांची कमाई केली. अखेरच्या टप्प्यात बगलडूब डाव टाकून विनेशने एम्माला निष्प्रभ केले. या डावावर विनेशने आणखी दोन गुणांची कमाई करून कांस्यपदकावर मोहोर उमटवली.

  • निशाने पात्रता फेरीत लिथुआनियाच्या डानुटे डॉमीकाटय़ेटेचा तांत्रिक आघाडीवर पराभव करून आपल्या मोहिमेस सुरुवात केली. त्यानंतर निशाने चेक प्रजासत्ताकच्या अडेला हझलोकोवाला १३-८ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत  निशाने बल्गेरियाच्या सोफिया जॉर्जिएवाचे आव्हान ११-० असे  संपुष्टात आणले. उपांत्य फेरीत निशाला जपानच्या एमी इशीकडून गुणांवर ४-५ असा पराभव पत्करावा लागला. आता निशा गुरुवारी कांस्यपदकासाठी खेळेल.

४० हजार कोटी रुपये खर्च करुन ‘या’ देशात उभारलं जाणार ‘मून रिसॉर्ट’; सोयीसुविधांबद्दल वाचून थक्क व्हाल :
  • तशी दुबईची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. अगदी या जागेला भेट न देणाऱ्यांनाही दुबईची महती आहे. जगातील सर्वात उंच इमारत असणारी बुर्ज खलिफा याच शहरात आहे. त्याप्रमाणे बुर्ज अल अरब सारखे आगळेवेगळे संग्रहालयही पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आता समोर आलेल्या एका वृत्तानुसार दुबईमध्ये आता एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येणार असून हे रिसॉर्ट चंद्राच्या थीमवर आधारीत असणार आहे. या रिसॉर्टचे काही कनसेप्ट बेस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • दुबईमधील हे चंद्रसारखं दिसणारं रिसॉर्ट उभारण्यासाठी जवळजवळ ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. भारतीय चलनामध्ये ही रक्कम तब्बल ४० हजार कोटी इतकी होते. अरेबियन बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार हे रिसॉर्ट उभारण्याचं काम कॅनडामधील मून वर्ल्ड रिसॉर्ट्स इंटरनॅशनल ही कंपनी करणार आहे. ही इमारत ७३५ फूट उंच असणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये ही इमारत बांधून पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • या रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा असतील. यात स्पा सेंटर, नाईट लाइफसाठी विशेष सेक्शन्सही असतील. या रिसॉर्टमधील मुख्य मार्ग हा गोलाकार असणार आहे. या रिसॉर्टमध्ये दरवर्षी २५ लाख पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या रिसॉर्टच्या इमारतीमधील सर्वात वरच्या मजल्यावरील २३ टक्के जागा ही कसिनोसाठी असेल. नऊ टक्के जागा ही नाईटक्लब्ससाठी तर हॉटेल्ससाठी ४ टक्के जागा राखीव ठेवली जाणार आहे. या रिसॉर्टच्या गच्चीचा एक तृतियांश भाग हा बीच क्लबसाठी वापरला जाणार आहे. उतरेला एक तृतीयांश भाग हा लगूनसाठी आणि चार टक्के भागावर अॅम्पीथेअटर बांधलं जाणार आहे.

  • संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील पर्यटनाला सध्या सुगीचे दिवस आहेत. “आमच्या देशातील पर्यटनासंदर्भातील आर्थिक उलाढालीने २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १९ बिलीयन द्राम्सचा (५.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा) टप्पा ओलांडला आहे,” असं शेख मोहम्मद यांनी सांगितल्याचं डब्लूएएम या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. “हॉटेलमधील पाहुण्यांची संख्या एक कोटी २० लाखांहून अधिक असून ही वाढ ४२ टक्के इतकी आहे. हिवाळ्यामध्येही मोठ्या संख्येने पर्यटक येतील असा अंदाज आहे,” असं शेख मोहम्मद म्हणाले आहेत.

उद्योग, मुख्यालये महाराष्ट्राबाहेर नेण्याची परंपरा कायम :
  • वेदांत-फॉक्सकॉनचा १ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून गदारोळ सुरू असला तरी महाराष्ट्रातील उद्योग, केंद्रीय सरकारी आस्थापनांची मुख्यालये महाराष्ट्राबाहेर नेत आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासारखा प्रस्ताव बाजूला ठेवत महाराष्ट्राची कोंडी करण्याची परंपरा कायम असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ,  सामाजिक वातावरण यामुळे उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात रस असते. विविध केंद्रीय आस्थापनांची मुख्यालयेही त्यामुळे मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांत स्थापन करण्यात आली. मात्र राजकीय-प्रशासकीय पातळीवरील धुरिणांच्या प्रांतवादी धोरणांमुळे महाराष्ट्राला अनेकदा फटका बसला आहे.

  • एक मोटार उत्पादक कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक होती. त्यावेळी एका अधिकाऱ्याने ही कंपनी महाराष्ट्रात येऊच नये अशा रीतीने त्यांच्याशी बोलणी केली. तसेच आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा ते गुंतवणूक करू शकतात, असे कळवले. त्यामुळे तो प्रकल्प दक्षिणेत एका राज्यात गेला होता. त्याची माहिती कळाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख संतापले होते.

  • आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईत उभारण्याची घोषणा यूपीए सरकारच्या काळात झाली होती. पण केंद्रात  नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर हे वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले. नागपूर येथील राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ नागपूरला होते ते गुजरातला हलवण्यात आले. एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईत होते. ते दिल्लीत हलवण्यात आले. जहाजे तोडण्याचा उद्योगही मुंबईतून गुजरातला हलला. ट्रेडमार्क पेटंटचे कार्यालय मुंबईतून दिल्लीला हलवण्यात आले. याचबरोबर सागरी पोलिसांची अकादमी पालघरमधून गुजरातला हलवण्यात आली.

मोदी, पुतीन यांच्या बैठकीकडे लक्ष ; युक्रेनवरील हल्ल्यानंतर पहिलीच प्रत्यक्ष भेट :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उझबेकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) पार्श्वभूमीवर दोन्ही नेते स्वतंत्र बैठक घेतील. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर दोघांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असेल.

  • गुरूवारी आणि शुक्रवारी उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओ २२वी बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यात शिखरबैठक होणार असल्याचे रशियाने जाहीर केले आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रे, जी-२०मध्ये सहकार्य, आशिया प्रशांत भागातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला भारताच्या परराष्ट्र खात्याने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पंतप्रधान जिनपिंग यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक करण्याची शक्यता आहे. 

  • मोदी-शरीफ भेट नाहीच - पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यामध्ये द्वीपक्षीय चर्चा होण्याची शक्यता मावळत चालली आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने याबाबत अद्याप काही माहिती दिली नसली, तरी अशा बैठकीची शक्यता नसल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे.

१५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.