चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 15, 2021 | Category : Current Affairs


जगाचं ४० टक्के लसीकरण; पण गरीब देशांत फक्त दोन टक्के - गीता गोपिनाथ :
 • जगभरातच पसरलेल्या करोना विषाणूविरुद्ध सर्वच देशांनी कंबर कसली आहे. सर्वच देशांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. प्रगत आणि विकसनशील देशांमध्ये लसीकरणाने आता चांगलाच वेग घेतला असला तरी गरीब देशांमध्ये मात्र लसीकरणाचं प्रमाण काही फारसं समाधानकारक नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे.

 • लसीकरणाच्या प्रमाणाबद्दल एक ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, जगभरातलं या आठवड्यातलं लसीकरणाचं प्रमाण जरी ४० टक्क्यांवर पोहोचलं असलं तरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, गरीब राष्ट्रांमध्ये हे प्रमाण फक्त २ टक्के आहे.

 • २०२१ या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्वच देशांमधलं लसीकरणाचं प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी श्रीमंत राष्ट्रे आणि सर्व लस उत्पादकांच्या त्वरित सहकार्याची गरज आपल्याला आहे.

जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित, ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण; असा पहा निकाल :
 • इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर १८ उमेदवारांना टॉप रँक मिळाला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली आहे.

 • विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र २०-२५ जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र २६ ऑगस्टपासून २ डिसेंबरपर्यंत आयोजित होतं.

असा पहा निकाल –

१ – अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
२ – होम पेजवर ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लि करा
३ – तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा
४ – माहिती भरल्यानंतर सबमिट करा
५ – चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल
६ – तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या

ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांचे लसीकरण :
 • ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असून १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर  – बायोएनटेक लशीची पहिली मात्रा देण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात केली जात आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले की, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला मान्य करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल. लसीकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने जी शिफारस करण्यात आली त्याचे आम्ही स्वागतच करीत आहोत.  लसीकरणाचा हा कार्यक्रम काळजीपूर्वक व यशस्वीपणे राबवण्यात येईल.

 • रशियाचे अध्यक्ष पुतिन विलगीकरणात - मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन विलगीकरणात गेले असल्याचे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेकोव्ह यांनी मंगळवारी जाहीर केले.  पुतिन यांच्या निकटवर्तीयांना करोनाची लागण झाल्यावर त्यांनी विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. पुतिन यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 • भारतातील रुग्णसंख्येत मोठी घट नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून गेल्या २४ तासांत २५,५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ६२ हजार २०७  झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा बैठकीस मोदींसह १०० नेते उपस्थित राहणार :
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन २४ सप्टेंबरला सुरू होत असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह शंभर देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

 • संयुक्त राष्ट्रात पुढील आठवड्यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. २०२० मध्ये कोविडमुळे हा कार्यक्रम आभासी पद्धतीने घेण्यात आला होता. मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेस २५ सप्टेंबर रोजी संबोधित करणार असून त्याच निमित्ताने क्वाड देशांच्या बैठकीस २४ सप्टेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत. मोदी, बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानी पंतप्रधान योशिहिडे सुगा हे नेते क्वाड शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत.

 • क्वाड देशांची पहिली आभासी बैठक १२ मार्च २०२१ रोजी झाली होती त्यात प्रादेशिक व इतर विषय चर्चेला होते. मोदी यांचे ७६ व्या आमसभा अधिवेशनात २५ सप्टेंबर रोजी भाषण होणार असून कोविडनंतरचे पुनरू त्थान या विषयावर चर्चा होणार आहे. एकूण १०९ देशांचे प्रमुख  चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यातील साठ देशांच्या नेत्यांची भाषणे ध्वनिचित्रमुद्रित असतील.

 • बायडेन हे न्यूयॉर्कला येणार असून प्रथमच आमसभेत भाषण करणार आहेत. ब्राझीलच्या प्रमुखांनंतर बायडेन यांचे भाषण होणार आहे यावेळची चर्चा ही २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीला बोलण्याची संधी शेवटी मिळणार आहे. त्यांचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गुलाम इसाकझाई हे भाषण करतील अशी अपेक्षा आहे. त्यांची नेमणूक आधीचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी केली होती.

मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती :
 • श्रीलंका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने मंगळवारी समाजमाध्यमावर संदेश लिहीत निवृत्तीची घोषणा केली.

 • ‘‘मी यापुढे ट्वेन्टी-२० क्रिकेटही खेळणार नसून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. या सुंदर प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच भविष्यात माझ्या अनुभवाचा उपयोग करत युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे मलिंगाने त्याच्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले.

 • त्याने यावर्षी जानेवारीमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही अलविदा केले आहे. मलिंगाने ३० कसोटी सामन्यांत १०१ बळी, २२६ एकदिवसीय सामन्यांत ३३८ बळी आणि ८४ ट्वेन्टी-२० सामन्यांत १०७ बळी घेतले होते.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा - गतविजेत्या भारताचा पराभव :
 • संयुक्त गतविजेत्या भारताला ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. दोन डावांनंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या निर्णायक अतिजलद (ब्लिड्झ) लढतीत अमेरिकेने भारताला ४.५-१.५ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे भारतीय बुद्धिबळ संघांचे यंदा जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

 • भारतीय संघाने साखळी लढतींपाठोपाठ बाद फेरीच्या पहिल्या लढतीतही चांगली कामगिरी करताना युक्रेनवर मात केली होती. त्यामुळे या संघाकडून जेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात भारताने अमेरिकेला ५-१ अशी धूळ चारली होती. परंतु, अमेरिकेने प्रत्युत्तर देताना दुसरा डाव ४-२ असा जिंकत लढतीत बरोबरी साधली. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या अतिजलद लढतीत भारताचे पी. हरिकृष्णा, बी. अधिबन, कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली हे बुद्धिबळपटू पराभूत झाले. तर निहाल सरिनचा सामना बरोबरीत सुटला. केवळ द्रोणावल्ली हरिकाने कामगिरीत सातत्य राखताना दोन्ही डावांनंतर अतिजलद डावातही विजय संपादला.

 • त्याआधी, उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात भारतीय बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळ केला. या डावात पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने जेफ्री जिओंगचा, पी. हरिकृष्णाने डारिऊस स्विर्कझचा, द्रोणावल्ली हरिकाने अ‍ॅना झातोन्सकीचा आणि आर. वैशालीने थालिआचा पराभव केला. कोनेरू हम्पी आणि निहाल सरिन यांचे सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे भारताने पहिला डाव ५-१ असा जिंकला.

१५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

टिप्पणी करा (Comment Below)