चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ सप्टेंबर २०२०

Updated On : Sep 15, 2020 | Category : Current Affairsकाही देशांकडून करोना महामारीचा फायदा घेण्याचा प्रयत्न; संयुक्त राष्ट्रांत भारताचा हल्लाबोल :
 • “काही देश दहशतवादाला समर्थन देण्यासाठी तसंच आक्रमक धोरणांचा अवलंब करण्यासाठी करोना महामारीचाही फायदा घेत आहेत,” असं म्हणत संयुक्त राष्ट्रांत भारतानं हल्लाबोल केला. पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता सोमवारी भारतानं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. काही देशांकडून करोना महामारीचा फायदा घेतला जात असला तरी भारतानं करोना महामारीची झळ सोसणाऱ्या देशांना त्वरीत वैद्यकीय मदत पुरवली आणि त्यांना समर्थन दिल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

 • ‘भारत-युएन डेव्हलपमेंट पार्टनरशिप फंड’च्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी आक्रमक भूमिका घेतली.

 • “करोना महामारीच्या काळाचाही काही देश दहशतवादाला समर्थन आणि आपल्या आक्रमक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे करोना काळात इतर देशांच्या मदतीसाठी भारतानं पुढाकार घेतला होता. या महामारीच्या काळात त्वरित वैद्यकीय मदतीची गरज आहे,” असंही तिरूमूर्ती म्हणाले.

संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व :
 • संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

 • “प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

 • भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत. बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

स्थलांतरित मजुरांच्या बळींबाबत केंद्र अनभिज्ञ :
 • करोनामुळे देशभर अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी कबुली केंद्रीय कामगार मंत्रालयाने लेखी उत्तरात दिली.

 • संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून तोंडी उत्तरे दिली जाणार नाहीत. मात्र, सदस्यांच्या लेखी प्रश्नांना लेखी उत्तर दिले जाईल, अशी तडजोड सत्ताधारी पक्षाने मान्य केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी करोनाकाळातील स्थलांतरित मजुरांच्या दुरवस्थेसंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने कोणतीही माहिती जमा केलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर सरकारने दिले.

 • करोनाकाळात किती रोजगार नष्ट झाले, याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर सरकारने दिले. मात्र, ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अंदाजानुसार १.८९ कोटी संघटित रोजगार नष्ट झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ४ कोटी स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन जगण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका छोटे व्यापारी, फेरीवाले व मजुरांना बसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

रशियातील नेते नवाल्नी यांना नोविचोक विष दिल्याचे स्पष्ट :
 • रशियातील विरोधी नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांना सोविएत काळात उपलब्ध असलेले नोविचोक हे विष देऊन त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, अशी माहिती जर्मनीच्या सरकारने सोमवारी दिली आहे.

 • जर्मनीच्या लष्करी प्रयोगशाळेने सांगितले की, त्यांच्या नमुन्यात नोविचोक हा विषारी पदार्थ सापडला आहे. जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन सीबर्ट यांनी म्हटल्यानुसार हेग येथील रासायनिक शस्त्रे प्रतिबंध संघटनेलाही नमुने पाठवण्यात आले असून त्यांनी केलेल्या चाचण्यांतही तो पदार्थ नोविचोक गटातील असल्याचे म्हटले आहे.  जर्मनीने आता फ्रान्स व स्वीडन यांना जर्मनीच्या निष्कर्षांचा तटस्थ आढावा घेण्यास सांगितले असून त्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत.

 • नवाल्नी हे रशियातील पुतिन यांच्या विरोधात उभे ठाकलेले नेते असून विषप्रयोगाने आजारी पडल्यानंतर त्यांना २० ऑगस्टला उपचारासाठी जर्मनीत नेण्यात आले होते. रशियाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जर्मनीने केली होती. रशियाने या विषप्रयोगाबाबत स्पष्टीकरण करावे अशी मागणी सिबर्ट यांनी सोमवारी पुन्हा केली आहे. युरोपीय समुदायातील देशांशी आम्ही पुढील कारवाईबाबत संपर्कात आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. रशियाने यात हात असल्याचा इन्कार केला असून रशियाला पाश्चिमात्य देश बदनाम करीत आहेत असा पलटवार केला आहे.

आनंदविरुद्ध विजय हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण -विदित :
 • पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदविरुद्धचा विजय हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेत्या भारताचा कर्णधार विदित गुजराथीने म्हटले आहे.

 • २५ वर्षीय विदित २०१३ मध्ये ग्रँडमास्टर झाला, त्यानंतर २०१९मध्ये त्याने आनंदला नमवण्याची किमया साधली होती. यासंदर्भात विदित म्हणाला, ‘‘आनंदविरुद्ध खेळण्याचा अनुभव माझ्यासाठी बरेच काही शिकणारा होता. मी भारतातील सर्वोत्तम पाच बुद्धिबळपटूंमध्ये गणला जात होतो. तरी आनंदविरुद्ध खेळण्याची संधी फारशी मिळाली नव्हती. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा आनंदशी सामना केला. त्यावेळी त्याची बलस्थाने आणि कमकुवतपणाचा अंदाज घेतला. त्याचाच उपयोग मला २०१९ च्या विजयात झाला.’’

 • भारताने नुकतेच रशियासह बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे संयुक्त विजेतेपद पटकावले. विदितच्या नेतृत्वाखालील संघात आनंद, महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांचा समावेश होता.

१५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)