चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 नोव्हेंबर 2023

Date : 15 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वानखेडे स्टेडिअमवर गाड्या आणि ‘या’ वस्तूंना नो एन्ट्री, IND vs NZ साठी पोलिसांनी सांगितले नियम
 • सलग नऊ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या यजमान भारतीय संघाचा सामना ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बुधवारी न्यूझीलंड संघाशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघाने विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. फलंदाजी व गोलंदाजी सर्वच आघाड्यांवर संघाने चमक दाखवली आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील क्रिकेटप्रेमी मुंबईत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी क्रिकेटप्रेमींना काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत त्यांनी X वर व्हिडीओही पोस्ट केला आहे.
 • “१५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारत विरुद्ध न्युझिलंड या सेमी फायनल सामन्यासाठी मुंबई पोलीस दल वानखेडे स्टेडिअमवर सज्ज आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. ते म्हणाले की, वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना स्टेडिअमवर प्रवेश देताना सुरक्षेच्या कारणास्तव विलंब होतो. विलंब टाळण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी साडे अकरा वाजता स्टेडिअमवर पोहोचावं. सामना दोन वाजता सुरू होणार आहे. परंतु, प्रवेश साडेअकरा वाजल्यापासून देण्यात येणार आहे.
 • “स्टेडिअममध्ये बॅग, पॉवर बॅग, नाणी, पेन्सिल, पेन, कोरे कागद, मार्कर, कोणत्याही प्रकारचे बॅनर्स, काही आक्षेपार्ह वस्तू, ज्वलनशील पदार्थ, काडीपेटी, लायटर, सिगारेट, गुटखा आदी वस्तूंना प्रतिबंध आहे. या वस्तू ठेवण्यासाठी स्टेडिअममध्ये सोय नाही, याची नोंद घ्यावी”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. “प्रेक्षकांनी येताना खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. कारण, स्टेडिअम परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. लोकल ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर १, २ आणि ७ वर पोहोचण्यासाठी चर्चगेट स्थानकावर उतरणे सोयीचे राहील. तर गेट क्रमांक ३, ४ आणि ५ वर पोहोचण्याकरता मरिन लाईन्स स्थानकावर उतरणे सोयीचे ठरेल”, असंही त्यांनी सांगितलं.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सेमीफायनलच्या सामन्यावर चक्रीवादळ, पावसाचे सावट
 • बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची, तसेच येत्या चार दिवसांत चक्रीवादळाची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात १६ नोव्हेंबरला होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यावर चक्रीवादळाचे सावट असून, त्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे.
 • चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसानंतरचा काळ पोषक मानला जातो. त्यानुसार सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीची वाटचाल चक्रीवादळापर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोसमी पावसानंतर ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.दिल्लीच्या प्रादेशिक विशेष हवामानशास्त्रीय केंद्राने (आरएसएमसी) दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. तसेच ते वायव्य दिशेला सरकत १६ नोव्हेंबरच्या सुमारास तीव्रता वाढून त्याचे दाब क्षेत्रात रुपांतर होऊ शकेल. त्यामुळे येत्या चार दिवसांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्मितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 • या पार्श्वभूमीवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने क्रिकेटप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. मात्र चक्रीवादळाची स्थिती, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे सावट या सामन्यावर आहे.
आदिवासी कल्याणासाठी २४ हजार कोटी; पंतप्रधान मोदींची घोषणा
 • केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
 • मोदी यांनी मंगळवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत देशात आदिवासींसाठी २४ हजार कोटींची योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेली प्रचंड गर्दी हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार याचे संकेत आहेत. मध्यप्रदेशातील जनतेत प्रचंड उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस संतांकडे वळली आहे. कांग्रेसला माहिती आहे की मोदींच्या हमीपुढे त्यांचे खोटे आश्वासन टिकणार नाही.
 • निवडणुका जशा जवळ येत आहेत  तशी काँग्रेसच्या दाव्यांमधील फोलपणा उघड होत चालला आहे.  बुधवारी आदिवासी गौरव दिवस आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान करण्यासाठी झारखंडला जाणार आहे. यानिमित्त केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करणार आहे.

सर्व आश्वासने पूर्ण करू

 • जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, तीन तलाकविरुद्ध कायदा आणि राम मंदिर निर्माण हे कधीच वास्तवात उतरणार नाही, असे वाटत होते. पण हे सर्व भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करून दाखवले आहे. आम्ही मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असे म्हणत मोदी यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली.
ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचं निधन
 • ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात हॉटेल व्यावसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना दिलं जातं.
 • ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
 • EIH लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ओबेरॉय ग्रुप फ्लॅगशिप, भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून पीआरएस ओबेरॉय यांना ओळखलं जातं. “अनेक देशांमधील आलिशाम हॉटेल्सच्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व पुरवण्याव्यतिरिक्त, पीआरएस ओबेरॉय यांनी ‘ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स’च्या विकासात पुढाकार घेतला.
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा विक्रम ; २०२२-२३मध्ये सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेत गेल्या वर्षांच्या तुलनेत ३५ टक्के वाढ
 • उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत २,६८,९२३ विद्यार्थी अमेरिकेत गेले असून हा सर्वकालीन उच्चांक आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.अमेरिकेत शिकणाऱ्या १० लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक  आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षण  घेण्यासाठी विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी या देशात प्रवास केला आहे, असे ‘ओपन डोअर्स’ अहवालात म्हटले आहे.
 • ‘‘अमेरिकेमधील प्रत्येक भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या यशाला पािठबा देणारे कुटुंब या यशासाठी मान्यतेस पात्र आहेत. परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय आणि तुमची अमेरिकेची निवड तुमच्याद्वारे केलेली मौल्यवान गुंतवणूक दर्शवते. भारत व अमेरिका या देशांना तुम्ही अधिक जवळ आणत आहात आणि आम्हाला उज्ज्वल भविष्याकडे नेत आहात,’’ असे भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी म्हणाले.‘ओपन डोअर्स’ अहवालाच्या आकडेवारीनुसार, २००९-१० नंतर प्रथमच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा स्रोत बनण्यासाठी भारताने चीनला मागे टाकले आहे.
 • भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे, तर भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांची संख्याही १६ टक्क्यांनी वाढली आहे.

 

शरथला ‘खेलरत्न’, भक्तीला ‘अर्जुन’ पुरस्कार; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ३० नोव्हेंबरला वितरण :
 • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमुळे प्रलंबित राहिलेल्या देशातील प्रतिष्ठित ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कारांवर क्रीडा मंत्रालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमालला ‘खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ‘लोकसत्ता तरूण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसह २५ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. नामांकित क्रिकेट  प्रशिक्षक दिनेश लाड यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल.

 • ‘अर्जुन’ पुरस्कार विजेते : सीमा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अ‍ॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अ‍ॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निकहत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशिला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वलारीवन (नेमबाजी), ओमप्रकाश मिथरवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला

 • (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा जलतरण), जर्लिन अनिका जे (कर्णबधिर बॅडमिंटन).

 • ‘द्रोणाचार्य’- जीवनज्योत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहंमद अली कोमर (बॉक्सिंग), सुमा शिरुर (नेमबाजी), सुजीत मान (कुस्ती)

 • ‘द्रोणाचार्य’ (जीवनगौरव) – दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल), राज सिंग (कुस्ती)

 • ‘ध्यानचंद’ (जीवनगौरव) – अश्विनी अकुंजी (अ‍ॅथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बी. सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादूर गुरुंग (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)

‘ट्विटर’, ‘फेसबुक’नंतर आता अ‍ॅमेझॉनही मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, हजारो कर्मचारी गमावणार नोकरी :
 • ‘ट्विटर’, ‘मेटा’नंतर आता अ‍ॅमेझॉनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही तिमाहींपासून कंपनीच्या तोट्यात वाढ होत असल्याने खर्चकपातीबरोबरच मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची शक्यता व्यक्त होत आहे. कंपनी या आठवड्यात जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून काढण्याची शक्यता असल्याचं वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलं आहे.

 • ऑनलाइन विक्री कंपनी असणाऱ्या अ‍ॅमेझॉनने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यास कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल. जगभरात अ‍ॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारीसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे.

 • कर्मचारी कपात झाल्यास यामध्ये डिव्हाइस ग्रुपसह रिटेल आणि एचआर विभागाचा समावेश आहे. यामध्ये अॅलेक्सा वॉइस असिस्टंटची जबाबदारी असणाऱ्या कर्चमाऱ्यांचाही समावेश असू शकतो.

 • ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉनने तोट्यात असणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितलं आहे. ई-कॉमर्स कंपनीला सणांच्या दिवसातही मोठा तोटा सहन करावा लागला होता. एरव्ही नफा होणाऱ्या सणांमध्येही तोटा झाल्यानंतर काही आठवड्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे. किंमती वाढत असल्याने ग्राहक आणि व्यावसिकांकडे खर्चाकरता जास्त पैसै नसल्यानेच तोटा झाल्याचं कपंनीचं म्हणणं आहे.

अमेरिका-चीन यांच्यात संघर्ष रोखण्यावर सहमती; बायडेन आणि जिनपिंग यांच्यात प्रथमच प्रत्यक्ष बैठक :
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि  चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात सोमवारी बाली येथे प्रथमच प्रत्यक्ष बैठक झाली. हिंदू-प्रशांत क्षेत्र आणि तैवानमधील चीनच्या सक्तीच्या लष्करी कारवाईबाबतचे मतभेद दूर करण्याचे आणि द्विपक्षीय संघर्ष रोखण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. ‘जी – २०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडेन आणि क्षी यांच्यातील ही उच्चस्तरीय बैठक तीन तास चालली. दोन्ही नेत्यांनी उभे राहून परस्परांशी हस्तांदोलन केले आणि हसत हसत एकमेकांचे स्वागत केले.

 • बायडेन म्हणाले, की आपल्यातील वैयक्तिक संवाद सुरू ठेवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. दोन्ही देशांनी एकत्रितरित्या काही करावे यासाठी खूप मोठी संधी आहे. माझ्या मते, चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नेत्यांची जबाबदारी सामायिकच आहे. ते आपल्यातील मतभेद व्यवस्थित हाताळू शकतात आणि स्पर्धा, संघर्ष रोखू शकतात.

 • परस्पर सहकार्याची आवश्यकता असलेल्या तातडीच्या जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्याचे मार्गही चीन आणि अमेरिका शोधू शकतात, अशी पुस्तीही बायडेन यांनी जोडली. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या दोघांच्या चर्चेकडे आहे, असे जिनपिंग यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. सध्या चीन-अमेरिकेचे संबंध अशा स्थितीत आहेत की सर्वाना त्याबाबत चिंता आहे. कारण असे संबंध आपल्या दोन्ही देशांसाठी आणि त्यांच्या नागरिकांसाठी हिताचे नाहीत.

कोणतीही नोटीस न देता मस्क यांनी ५५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं :
 • ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर आता या कंपनीत पुन्हा नोकरकपात झाल्याची माहिती समोर येत आहे. नोकरकपातीच्या दुसऱ्या फेरीत ट्विटरमधून साडेपाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वसुचनेची नोटीस न देता नोकरकपात करण्यात आली आहे. याबाबत ट्विटरकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 • कंपनीचे ईमेल आणि इतर सुविधा बंद झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. रिअल इस्टेट, मार्केटिंग, अभियांत्रिकी आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेसह इतर देशांमधील कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्याचे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांनादेखील नोकरकपातीविषयी माहिती नसल्याचे पुढे आले आहे.

 • कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी नोकरीवरुन काढून टाकण्यात येत असल्याचा ईमेल ट्विटरकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर हा नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचंही यात नमुद करण्यात आलं आहे.

 • एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.

मेरी कोम, सिंधूसह दहा क्रीडापटू ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर :
 • नव्या घटनेनुसार निर्माण करण्यात आलेल्या भारतीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओए) खेळाडू समितीमध्ये (अ‍ॅथलिट कमिशन) पाच वेळच्या जगज्जेत्या मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांच्यासह दहा खेळाडूंची बिनविरोध निवड करण्यात आली. खेळाडू समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान ही निवड करण्यात आली. हिवाळी ऑलिम्पिकमधील खेळाडू शिवा केशवन, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, अनुभवी टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमल, हॉकीपटू राणी रामपाल, ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवलेली तलवारबाजी खेळाडू भवानी देवी, रोईंगपटू बजरंग लाल आणि माजी गोळाफेकपटू ओपी कऱ्हाना या अन्य खेळाडूंचा या समितीत समावेश आहे.

 • निवडण्यात आलेल्या १० खेळाडूंपैकी पाच महिला खेळाडू असून, सर्वानी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. केवळ केशवन हा हिवाळी ऑलिम्पिकचा खेळाडू आहे. समितीत १० खेळाडूंचा समावेश असणार असून, यासाठी दहाच खेळाडूंनी अर्ज भरला होता. ‘आयओए’च्या आगामी निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे उमेश सिन्हा यांनीच या खेळाडूंची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

 • अभिनव बिंद्रा, सरदार सिंगची थेट निवड - भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा २०१८ पासून आठ वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या, तर माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग २०१९ पासून चार वर्षांसाठी ऑलिम्पिक परिषदेच्या खेळाडू समितीवर आहेत. यामुळे दोघांची ‘आयओए’च्या खेळाडू समितीवर थेट निवड करण्यात आली. अशा पद्धतीने खेळाडू समितीच्या १२ जागा पूर्ण होतात. या दोघांना मतदानाचा अधिकार असेल.

15 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.