चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ मे २०२१

Date : 15 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिका मुखपट्टीमुक्तीच्या दिशेने :
  • अमेरिका आता करोना साथीतून पुन्हा पूर्वपदावर येत असून लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनी आता मुखपट्टी वापरण्याची गरज नाही, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे.

  • घरात व बाहेर वावरणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणाच्या सर्व मात्रा पूर्ण केल्या असल्यास मुखपट्टी लावण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी व्हाइट हाऊस येथील रोज गार्डन येथे मुखपट्टी न लावता ही घोषण केली.

  • बायडेन यांनी सांगितले की, मुखपट्टीच्या वापरातून मुक्तता हा एक मैलाचा दगड असून आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. अमेरिकेत लसीकरण वेगाने सुरू आहे. सीडीसी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे त्यांनी सांगितले की, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींकडून दुसऱ्याला कोविड १९ होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे तुम्ही लसीकरण पूर्ण केले असेल तर मुखपट्टी वापरण्याची गरज नाही.

  • दोन मात्रांची लस असेल तर दोन मात्रा पूर्ण केल्यानंतरच मुखपट्टीचा वापर बंद करता येईल. जर लसीकरण झाले नसेल तर मुखपट्टी वापरावीच लागेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी मुखपट्टी वापरणे बंद केले तरी चालणार आहे.

नेपाळच्या पंतप्रधानपदाची ओली यांना तिसऱ्यांदा शपथ :
  • नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांचा शपथविधी शुक्रवारी झाला. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी संसदेत बहुमत गमावले होते. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली.

  • विरोधी पक्षांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी संसदेत बहुमत सिद्ध न करता आल्याने ओली (वय ६९) यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. ओली हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएल या पक्षाचे अध्यक्ष असून सोमवारी प्रतिनिधिगृहात त्यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला होता. ओली यांना आता पुन्हा तीस दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करून दाखवावा लागेल.

  • अन्यथा राज्यघटनेच्या अनुच्छेद ७६(५) अन्वये सरकार स्थापनेचे प्रयत्न करावे लागतील. यापूर्वी ते ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान पंतप्रधान होते. त्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारी २०१८ ते १३ मे २०२१ या काळात ते पंतप्रधान होते. अध्यक्षांनी विरोधी पक्षांना असे सांगितले की, गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त सदस्यांनी बहुमताचे सरकार बनवण्यात हातभार लावावा.

बारावीच्या परीक्षांबाबत CBSE चा अद्याप निर्णय नाही, विद्यार्थी-पालक संभ्रमात :
  • देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये फक्त १०वीच्या परीक्षा रद्द करण्यात येऊन १२वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय बोर्ड असणाऱ्या CBSE नं यासंदर्भात स्वतंत्र भूमिका घेतली आहे.

  • सीबीएसईनं १०वीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यावेळी १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं होतं. या परीक्षा नेमक्या कधी होतील?

  • याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर अर्धा मे महिना उलटूनही अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

“करोनाचं दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल”, जागतिक आरोग्य संघटनेनं दिला इशारा :
  • गेल्या वर्षभरात जगभरात करोनानं कहर माजवल्यानंतर आता कुठे जगातल्या काही देशांमध्ये परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. भारतासारख्या काही देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे.

  • जगभरात करोनावर संशोधित झालेल्या लसींमुळे आख्ख्या जगानं करोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र वेगळाच इशारा दिला आहे.

  • “कोविड-१९नं आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये आयसीसी २० संघ खेळवणार :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-२० वर्ल्डकपमध्ये संघात वाढ करण्याच्या विचारात आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होतात, मात्र आता ही संख्या २० अशी होऊ शकते. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, यंदा भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील संघामध्ये कोणताही बदलर होणार नाही. २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २० संघ खेळवण्यात येऊ शकतात.

  • याव्यतिरिक्त, आयसीसी ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्येही सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. २०१९मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये ही संख्या १४वरून १० अशी करण्यात आली होती.

  • यंदाचा टी-२० वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, पण भारतातील करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीला या वर्ल्डकप स्पर्धेसाठी पर्यायी स्थळ म्हणून ठेवण्यात आले आहे.

१५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.