चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२२

Updated On : Jan 15, 2022 | Category : Current Affairs


तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव; दक्षिण अफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली :
 • तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं ३ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

 • भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या.

 • भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

देशातील परदेशी चलनाच्या साठ्यात सातत्याने घट; सरकारकडील गोल्ड रिझर्व्हचे मूल्यही घसरले :
 • देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये ८७.८ कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये ६३२.७३६ अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

 • यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे १.४६६ अब्ज डॉलर्सचे कमी होऊन ६३३.६१४ अब्ज डॉलर्सवर आलं होतं. तर २४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये ५८.७ कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन ६३५.०८ अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. १७ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा १६ कोटी डॉलर्सने घसरुन ६३५.६६७ अब्ज डॉलर्स वर आला होता.

 • आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आठडेवारीनुसार सात जानेवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये परदेशी चलन साठ्यात मोठी घट झाली. ही घट प्रामुख्याने फॉरेन करन्सी अॅसेट (एफसीए) म्हणजेच परदेशी चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये एफसीएचा महत्वाचा वाटा असतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालानुसार सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या एफसीएमध्ये ४९.७ कोटी डॉलर्सची घसरण झाली. 

नव्या वर्षातील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर :
 • नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

 • पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

 • याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

 • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

ओमायक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट येणार? संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली भिती :
 • गेल्या दोन वर्षांपासून भारतात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत पहिल्या वर्षी देशाला या विषाणूमुळे मोठा फटका बसला. लाखो जीव गमवावे लागले. मात्र, त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा वाईट परिणाम झाला.

 • लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली. मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर देशानं अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काहीसं यश मिळतं न मिळतं, तोच पुन्हा डेल्टा व्हेरिएंटनं अर्थव्यवस्थेवर हल्ला केला! आता पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकतं, अशी भिती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.

 • पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचं संकट भारतासमोर उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा ; सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत :
 • दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शानदार विजयांची नोंद करीत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.

 • महिला एकेरीत अग्रमानांकित आणि माजी विश्वविजेत्या सिंधूने ३६ मिनिटांत २१ वर्षीय अश्मिताला २१-७, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कॅटरथाँगशी सामना होणार आहे. सिंगापूरच्या तिसऱ्या मानांकित येओ मिनने आजारपणामुळे माघार घेतल्याने सुपानिडाला पुढे चाल मिळाली. याआधी २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत सिंधूने आसामच्या अश्मिताला नामोहरम केले होते.

 • आकर्षी कश्यपने मालविका बनसोडची झंझावाती वाटचाल २१-१२, २१-१५ अशी रोखली. तिची उपांत्य फेरीत थायलंडच्या द्वितीय मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत एक तास चाललेल्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱ्या मानांकित लक्ष्यने आठव्या मानांकित एचएस प्रणॉयवर १४-२१, २१-९, २१-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

 • लक्ष्यचा उपांत्य फेरीत मलेशियाच्या एनजी झे यंगशी सामना होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या द्वितीय मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सिंगापूरच्या ही यंग काय टटेरी आणि लो कीन हीन जोडीचा ३९ मिनिटांत २१-१८, २१-१८ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

१५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)