चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जानेवारी २०२१

Date : 15 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पॅरिस सेंट-जर्मेनला नेयमारमुळे विजेतेपद :
  • पायाच्या दुखापतीमुळे सलग पाच सामन्यांना मुकणाऱ्या ब्राझिलच्या नामांकित खेळाडू नेयमारने बदली खेळाडू म्हणून साकारलेल्या निर्णायक गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावताना मार्सिले संघाला २-१ असे पराभूत केले.

  • लीग १ आणि फ्रेंच चषक या फ्रान्समधील दोन स्पर्धाच्या विजेत्यांमध्ये दरवर्षी चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी रंगते. यंदा पुन्हा एकदा या करंडकावर फ्रेंच चषकाचे विजेते सेंट-जर्मेन यांनीच मोहोर उमटवली. सेंट-जर्मेनने १०व्यांदा हा करंडक उंचावला.

  • मॉरो इकार्डीने ३९व्या मिनिटाला पहिला गोल झळकावून सेंट-जर्मेनला मध्यंतरापूर्वी १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६५व्या मिनिटाला नेयमारला बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले. मग ८५व्या मिनिटाला पेनल्टी मिळाल्यामुळे नेयमारने दुसरा गोल झळकावून संघाचा विजय सुनिश्चित केला.

उद्यापासून लसीकरण :
  • देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.

  • करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • देशातील एकूण २९३४ लसीकरण केंद्रांपैकी काही ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयांचा या केंद्रांमध्ये समावेश आहे.

  • आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

आत्मनिर्भर भारत! ‘स्वदेशी शस्त्रांनी भविष्यातील युद्ध जिंकण्याचं लक्ष्य’ :
  • भविष्यातील कुठलेही युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी जिंकण्याच्या टप्प्प्यापर्यंत पोहोचण्याचे भारताचे लक्ष्य आहे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले.

  • इंडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने काल मंजुरी दिली. हा सर्व व्यवहार ४८ हजार कोटी रुपयांचा आहे.

  • हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारा आहे. त्यानंतर आज बिपिन रावत यांनी हे विधान केले. “स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल” असे रावत यांनी सांगितले. “मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमची एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे” असे बिपिन रावत म्हणाले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय :
  • यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा परदेशी प्रमुख पाहुण्याविना पार पडणार आहे. करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

  • यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले सुद्धा होते. पण ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला.

  • त्यानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता करोना स्थितीमुळे कुठल्याही परदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक झटका, आता Snapchat ने कायमस्वरुपी केलं ‘बॅन’ :
  • अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया कंपन्या सतत बंदी घालत आहेत. आता Snapchat नेही डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन करत असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी कंपनीने ट्रम्प यांच्यावर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. कॅपिटॉल हिल हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत.

  • “आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे”, असं स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितलं.

  • “त्यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली”, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा समान अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय देताना मुला प्रमाणे मुलीलाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी नोकरीचा समान हक्क देण्यात यावा असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मुलगी अविवाहित असली किंवा विवाहित असली तरी तिला हा हक्क दिला गेला पाहिजे असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

  • उच्च न्यायालयाने मृत अवलंबित कोटाच्या (Deceased Dependent Quota) नियमांमध्ये अविवाहित या शब्दाला केवळ पुरुषांसाठी गृहित धरणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या शब्दाची व्यख्या व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याच्या आधारे करण्यात येऊ नये असं म्हणत न्यायालयाने असा भेदभाव करणं कायद्याला धरुन नसल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.

  • न्यायमूर्ती जे. जे. मुनीर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये मुलीलाही समान हक्क देण्यात यावा असं म्हटलं आहे. यासाठी नियमामध्ये बदल करण्याची गरज नसल्याचे न्यायलायने नमूद केलं असून ठराविक शब्दांकडे व्यक्ती स्त्री आहे की पुरुष या आधारावर भेदभाव करु नये असं म्हटलं आहे.

  • उच्च न्यायालयाने प्रयागराजमधील शिक्षण विभागामधील म्हणजेच बीएसएमधील प्रकरणासंदर्भात याचिकाकर्त्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. मृत नातेवाईकाच्या जागी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या या महिलेचा अर्ज केवळ ती विवाहित असल्यामुळे स्वीकारता येणार नाही हा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे. बीएसए प्रयागराजने दोन महिन्याच्या आत या नियुक्तीसंदर्भातील प्रकरण निकाली काढावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

१५ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.