चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 डिसेंबर 2023

Date : 15 December, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
      पुण्यात होणार चार विश्वविक्रम  
  • राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात चार विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. वाचन संस्कृती वृद्घिंगत करण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांची दोनशे दालने असणार आहेत. तसेच अनेक मान्यवर लेखक, कलाकार, राजकीय नेतेही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महोत्सवात चार विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • त्यात गुरुवारी (१४ डिसेंबर) सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना वाचन करून दाखवण्याचा उपक्रम होईल. १५ डिसेंबरला फर्ग्युसन महाविद्यालयात जास्तीत जास्त पुस्तकांनी भारत हा शब्द साकारला जाणार आहे. १६ डिसेंबरला ‘जयतू भारत’ या वाक्यात जास्तीत जास्त पुस्तकांचा समावेश असेल. तर अधिकाधिक लोकांनी मोठ्याने वाचण्याच्या व्हिडिओ अल्बमचा उपक्रम २१ डिसेंबरला होईल.
  • युनेस्कोच्या निकषांनुसार जागतिक पुस्तकांची राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. १४ डिसेंबरला ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात महापालिकेचा सहभाग आहे. त्यात महापालिकेच्या शाळा, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालय अशा ठिकाणी दुपारी बारा ते एक या वेळेत वाचन करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
साहित्यिक, व्यंगचित्रकार, कवी आणि कुशल रंगमंच निवेदक मधुप पांडे यांचे निधन
  • साहित्यिक, व्यंगचित्रकार, कवी आणि कुशल रंगमंच संचालक मधुप पांडे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले.
  • साहित्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मधुप पांडे यांना साहित्य श्री हसीरत्न (काका हाथरासी पुरस्कार ट्रस्ट), विंध्य विभूती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, हिंदीसेवी सन्मान, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सर्वोच्च पुरस्कार, साहित्यिक सन्मानासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • पहिल्या जागतिक हिंदी संमेलनाचे सहसंयोजक; मॉरिशसच्या चौथ्या जागतिक हिंदी परिषदेत भारत सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे ते सन्माननीय सदस्यही होते. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे ते पदाधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने साहित्य क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
केंद्राने आपत्तीकाळात पाठविले १ हजार ३५९ कोटी ‘एसएमएस’
  • आपत्ती काळात नागरिकांना सावध करण्यासाठी एकात्मिक ईशारा प्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. देशात आपत्ती आल्यास नागरिकांच्या मोबाईलवर संदेश येतात. कधीकधी त्यामुळे शंकाही उपस्थित होतात. त्यामुळे पाठविले जाणारे आणीबाणीचे संदेश व्यक्तीच्या गोपनियतेला बाधा निर्माण करतात का, असा प्रश्न खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला. तसेच मोबाईल निगडीत अलर्ट सेवा आहेत का, असाही उपप्रश्न होता.
  • त्यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉ. देवूसिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले की आपत्ती व्यवस्थापनात दूरसंचार तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडते. गृह व दळणवळण मंत्रालयाने एकत्रितपणे येणाऱ्या आपत्तीबद्दल सावध करण्यासाठी एकात्मिक ईशारा प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर करून नागरिकांना सतर्क करण्यासाठी लघुसंदेश सेवा उपयोगात येते. ऑगस्ट २०२१ पासून ही प्रणाली सर्व राज्ये तसेच केंद्र शासीत प्रदेशात कार्यरत आहे.
  • आतापर्यंत एकूण १ हजार ३५९ कोटी एसएमएस पाठविण्यात आले आहे. आपत्ती जागरूकता अधिक सुधारण्यासाठी दोनही मंत्रालयांनी सहकार्य केले आहे. ही प्रणाली स्वदेशी पद्धतीने तयार केली असून सर्वसमावेशक चाचणी करून कार्यान्वित केली आहे. माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी तसेच जीवितहानी टाळण्यासाठी ही प्रणाली तयार झाली. मुख्य म्हणजे सामान्य नागरिकांच्या गोपनियतेला प्रणालीपासून कोणताही धोका नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या उत्तरातून स्पष्ट केले.
पिकांवरील रोगांचा उपाय आता मोबाईलवर!
  • शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल त्यांना पिकांवरील रोग व किडीवर उपाययोजना सुचविणार आहे. यामुळे तातडीने योग्य ओषधीची फवारणी करुन पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
  • केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत ‘नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम’ (एन.पी.एस.एस) हे ‘मोबाईल ॲप’ विकसित करण्यात आले आहे. हे ॲप ‘प्ले स्टोअर’मधून आपल्या भ्रमणध्वनीमध्ये घेता येते. याची कार्यपद्धती सोपी आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकांचे निरीक्षणे करून कीड व रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी. त्यावर शेतकऱ्यांना तत्काळ उपायोजना सुचविल्या जाऊन कोणते कीटकनाशक वापरावे याची माहिती देण्यात येते. त्यामुळे पिकावर तत्काळ फवारणी करून, होणारे जास्तीचे नुकसान टाळता येणार आहे. लाखो शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
  • सध्या या ॲपद्वारे मिरची, कापूस, आंबा, मका व भाताची कीड व रोग व्यवस्थापन बाबतची माहिती नोंदवता येण्याची सुविधा आहे. मात्र लवकरच यात इतरही पिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मनोज ढगे यांनी सांगितले. शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारीदेखील पिकांवरील कीड व रोगांची निरीक्षणे नोंदवू शकतात. पिकांवरील कीड व रोगांची माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचित करू शकतात.
  • जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून नुकतेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नागपूर येथील सहसंचालक डॉ. ए. के. बोहरीया, उपसंचालक डॉ. मनीष मोंढे, पिक संरक्षण अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठरलं! ‘या’ शहरात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला
  • आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचा पुढचा हंगाम २०२४ मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेसाठी सध्या काही महिने बाकी आहेत, मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेटप्रेमी नेहमीच वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना मोठ्या स्पर्धेत झाला तर सामन्याचा उत्साह द्विगुणित होतो. आता भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना कोणत्या शहरात होणार ते निश्चित झाले आहे.
  • द गार्डियनच्या वृत्तानुसार, यावेळी भारत आणि पाकिस्तानचे संघ न्यूयॉर्क शहरात आमनेसामने येणार आहेत. आगामी स्पर्धेसाठी दोन्ही संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ युवकांमध्ये सातत्याने प्रयोग करत आहे. त्यामुळेच अनुभवी खेळाडू काही काळापासून टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघात सहभागी झाले नाहीत.
  • यूएसने पुष्टी केली आहे की, ते फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क, डाउनटाउन मॅनहॅटनपासून सुमारे २५ मैलांवर असलेली फक्त तीन ठिकाणांचा वापर केला जाईल. पहिली दोन समर्पित क्रिकेट मैदाने आहेत, तर तात्पुरते, ३४,००० आसनांचे स्टेडियम न्यूयॉर्कमधील स्पर्धेसाठी बांधले जाईल, ज्यामध्ये ताज्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सुमारे ७,११,००० भारतीय रहिवासी आणि सुमारे १,००,००० पाकिस्तानी वंशाचे लोक आहेत.

टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना -

  • टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत एकूण १२ सामन्यात आमनेसामने आले आहेत. या काळात पाकिस्तान संघाविरुद्ध टीम इंडियाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या नऊ सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाला भारतीय संघाविरुद्ध तीन सामन्यांत यश मिळाले आहे. यापैकी दोन सामने भारताने मायदेशात जिंकले आहे. तसेच न्यूट्रल ग्राऊंवर भारताने सात, तर पाकिस्तानने दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा: भारतीय संघ जर्मनीकडून पराभूत
  • गेल्या सामन्यात नेदरलँड्सवर दिमाखदार विजय मिळवणाऱ्या भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाला उपांत्य सामन्यात आपली लय कायम राखता आली नाही व एकतर्फी झालेल्या सामन्यात जर्मनीकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसऱ्यांदा कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचे भारताचे स्वप्न अधुरेच राहिले.
  • उपांत्यपूर्व सामन्यात दोन गोलच्या पिछाडीनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताकडे जर्मनीचा भक्कम बचाव व मजबूत आक्रमण यांचे उत्तर नव्हते. तसेच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले अपयशही भारताला महागात पडले. भारताला या सामन्यात १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण यापैकी एकावरही गोल करता आला नाही.  जर्मनीने चारही सत्रांत एकेक गोल केला, तर भारताकडून एकमेव गोल चिरमाको सुदीपने ११व्या मिनिटाला केला.
  • जर्मनीकडून लिये हेसबाकने आठव्या मिनिटाला व ३०व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. ग्लेंडर पॉलने (४१व्या मि.) पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावला. स्पर्लिग फ्लोरियनने सामना संपण्याच्या दोन मिनिटाआधी मैदानी गोल करत संघाला ४-१ असे आघाडीवर नेले. आता भारताचा कांस्यपदकासाठी सामना होईल. भारताने २००१मध्ये होबार्ट व २०१६मध्ये लखनऊ येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकल्या होत्या. याशिवाय १९९७मध्ये इंग्लंडच्या मिल्टन किन्स येथे झालेल्या स्पर्धेत भारत उपविजेता होता. दोन वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यावेळीही भारताला जर्मनीने ४-२ असे नमवले होते. तसेच जोहोर चषकाच्या उपांत्य सामन्यातही भारताला जर्मनीकडून ३-६ असा पराभव पत्करावा लागला होता. भारताला जर्मनीविरुद्ध वारंवार अपयश येत आहे. या वर्षी जर्मनीने पाचपैकी पाच सामन्यांत भारताला नमवले आहे.

 

विल्यमसन कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार; न्यूझीलंडचा नवा कर्णधार कोण हे ही ठरलं :
  • केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने गुरुवारी सांगितले की, केन विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.

  • त्याचबरोबर टॉम लॅथम उपकर्णधार म्हणून संघाची धुरा सांभाळेल. केन विल्यमसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत राहणार आहे.

  • ३२ वर्षीय केन विल्यमसनने एक निवेदन जारी करून सांगितले की, वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा ३१वा कसोटी कर्णधार असेल. सौदीच्या नेतृत्वाखाली, किवी संघ या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचा दौरा करेल, जिथे न्यूझीलंड संघ यजमान संघासोबत २ कसोटी आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. ही मालिका २६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल.

आदिवासी भागातील मातांना मिळणार प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात बुडित मजुरी : 
  • राज्यातील आदिवासी भागातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी मातांना प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात काळासाठी त्यांची बुडणारी मजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत ९२४३ गरोदर मातांना ६६ कोटी ७७ लाख रुपये बुडित मजुरी पोटी देण्यात येणार आहेत.

  • राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तथापि या उपरही माता व बालमृत्यू रोखण्यात म्हणावे तितके यश येताना दिसत नाही. यामुळे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी नव्याने या विषयाचा अभ्यास केला असता आर्थिक व सामाजिक परिस्थितीतून आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात रोजंदारीचे काम करून कुटुंबाची उपजीविका सांभाळत असल्याचे दिसून आले. गरोदरपणाच्या काळातही या महिला शेवटपर्यंत काम करत असतात तसेच बाळाच्या जन्मानंतरही परिस्थितीमुळे त्यांना पुरेशी विश्रांती न घेता काम करावे लागत असल्याचे दिसून आले.

  • या गरोदर मातांना पुरेशी विश्रांती व सकस आहार मिळणे गरजेचे असून याची योग्य काळजी घेतल्यास माता व बाळाची प्रकृती चांगली राहू शकते. तसेच यातून माता व बालमृत्यू काही प्रमाणात टाळता येतील असा निष्कर्ष आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला. बरेचवेळा आदिवासी महिला रोजंदारीसाठी फिरतीवर जात असतात अशावेळी त्यांना प्रकृतीची योग्य ती काळजी घेणे शक्य होत नाही तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य कर्मचार्यांना त्यांचा पुरेसा पाठपुरावा करता येत नाही.

  • आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच मेळघाटचा दौरा केला असताना आदिवासी महिला व बालमृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याविषयी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यात पावसाळ्यात अनेक आदिवासी गावांशी संपर्क तुटतो त्याचाही फटका बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर संपर्क तुटणार्या गावांशी कशाप्रकारे संपर्क जोडता येईल याचा अभ्यास करून योजना सादर करण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले. तसेच आदिवासी भागातील गरोदर मातांना प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात काळासाठी बुडणारी रोजंदारी दिल्यास या माता एकाच ठिकाणी राहातील. जेणेकरून आरोग्य विभागाला त्यांची देखभाल व सकस आहार देऊन माता व बालमृत्यू कमी करता येईल अशी भूमिका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली.

जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द; विरोधी याचिकांवर लवकरच सुनावणी : 

  • जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्या कलम ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिका सुनावणीसाठी लवकरच सूचिबद्ध करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. या प्रकरणातील मध्यस्थ राधा कुमार यांनी या याचिकांची लवकर सूचिबद्ध करण्याची विनंती केली, त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी स्पष्ट केले, की आम्ही विचारविनिमय करून तारीख निश्चित करू.

  • यापूर्वी २५ एप्रिल व २३ सप्टेंबर रोजी तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अनुच्छेद ३७० च्या तरतुदी निष्क्रिय करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्याचे मान्य केले होते. माजी सरन्यायाधीश रमणा व न्यायमूर्ती आर.के. सुभाष रेड्डी आता निवृत्त झाले आहेत.

  • त्यामुळे या याचिकांवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय पुन्हा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करणार आहे. जम्मू-काश्मीरला लागू असलेल्या अनुच्छेद ३७० रद्द करणे व जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करणारा २०१९ चा जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायदा लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

१० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन; केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला माहिती : 
  • देशात दहा ते १७ वर्षे वयोगटातील एक कोटी ५८ लाख मुलांना विविध प्रकारचे व्यसन असल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास दिली.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा संदर्भ घेऊन केंद्राने आहे, की भारतीयांकडून उत्तेजना व नशेसाठी ‘अल्कोहोल’ हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्याखालोखाल गांजा-भांग व अफू वापरली जाते. सुमारे १६ कोटी नागरिक मद्याद्वारे अल्कोहोलचे सेवन करतात.

  • पाच कोटी सात लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलच्या आहारी गेले असून, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. तीन कोटी एक लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेले अमली पदार्थाचे व्यसन करतात. त्यापैकी सुमारे २५ लाख व्यक्तींच्या तब्येतीवर या व्यसनाचे दुष्परिणाम होतात. सुमारे दोन कोटी २६ लाख नागरिक अफूचे सेवन करतात. त्यामुळे झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे ७७ लाखांना वैद्यकीय मदतीची गरज भासते.

कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला : 
  • कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची चुरस टोकाला पोहोचली असताना फुटबॉल पंढरी कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खेळाडूंच्या चित्रकारीचे पैलू कलानगरीत साकारले आहेत.

चित्रे लक्षवेधी 

  • कतारमध्ये विश्वचषक विजेता कोण होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापुरातील शेकडो फुटबॉलप्रेमी कतारमध्ये उपस्थित आहेत. इकडे करवीरनगरी अंतिम टप्प्यात स्पर्धेविषयीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. येथील रायगड कॉलनीतील तुषार घाडगे या फुटबॉलप्रेमीने घरामध्ये नेमार, पेले, गॅब्रियल जीजस, लिओनेल मेस्सी यांच्यासह भारतीयांच्या गळय़ातील ताईत असलेला सुनील छेत्री या फुटबॉल खेळाडूंची नितांत सुंदर चित्रे रेखाटली आहेत. यामुळे भिंतींना जिवंतपणा आला आहे. चित्रे पाहण्यासाठी फुटबॉल शौकीन गर्दी करत आहेत.

पेले स्टेट्सवर

  • तर दुसरीकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे कायमस्वरूपी आकर्षण राहिलेले फुटबॉलपटू पेले यांचे जुन्या काळातील एक चित्र समाज माध्यमात अग्रेषित होत आहे.

  • धार्मिक देवदेवतांच्या चित्रासाठी विख्यात असलेले दिवंगत चित्रकार पी. सरदार यांनी ऐंशीच्या दशकात चितारलेले पेले यांचे हे चित्र अनेकांनी स्टेटस म्हणून वापरले आहे. या चित्राचा पुन:प्रत्यय घेण्यासाठी हरून सरदार पटेल यांच्या स्टुडिओकडे फुटबॉल शौकीन वळत आहेत.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ डिसेंबर २०२१

 

उद्योगपती एलन मस्क यांची टाइम मासिकाकडून ‘पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड :
  • जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे.

  • “पर्सन ऑफ द इयर एखाद्या व्यक्तीचा प्रभाव प्रतिबिंबित करतो आणि पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या बाहेरील जीवनावर छाप पाडणारे कमी लोक आहेत. एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”, असे गौरवोद्गार टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल यांनी काढले.

  • टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे.

  • टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे.

इंडियन चेस लीगचे पहिले पर्व पुढील वर्षी :
  • क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल आदी खेळांकडून प्रेरणा घेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) स्वत:ची लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी जूनमध्ये इंडियन चेस लीगचे आयोजन करणार असल्याची ‘एआयसीएफ’ने मंगळवारी घोषणा केली.  

  • सहा संघांत होणाऱ्या इंडियन चेस लीगमध्ये प्रत्येक संघात दोन सुपर ग्रँडमास्टर, दोन भारतीय ग्रँडमास्टर, दोन महिला ग्रँडमास्टर, एक कनिष्ठ गटातील भारतीय मुलगा आणि एक कनिष्ठ गटातील भारतीय मुलगी यांचा समावेश असेल, अशी माहिती ‘एआयसीएफ’कडून देण्यात आली.

  • पहिल्यांदाच होणाऱ्या या लीगचे सामने दुहेरी साखळी (डबल राऊंड-रॉबिन) पद्धतीने खेळले जाणार आहेत. साखळी फेरीअंती गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम लढतीत आमनेसामने येतील. दोन आठवड्यांच्या कालावधीत एक किंवा दोन शहरांमध्ये या लीगचे सामने होणार आहेत. तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपणही केले जाईल.

भारतीय वंशाच्या लीना नायर यांचा युनिलिव्हरमधून राजीनामा; फ्रेंच कंपनी शनैलच्या सीईओ होणार :
  • भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनणार आहेत. लीना आतापर्यंत अँग्लो-डच कंपनी युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) लीना यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे. आता त्या शनैलमध्ये सीईओ म्हणून रुजू होणार आहेत.

  • “कंपनीच्या CHRO लीना नायर यांनी नवीन संधी स्वीकारण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शनैलमध्ये रुजू होणार आहेत,” असं युनिलिव्हरने निवेदनात म्हटलं आहे.

  • युनिलिव्हरचे सीईओ अॅलन जोप लीना यांचे त्यांनी दिलेल्या योगदानाबदद्ल आभार मानले आहे. ते म्हणतात, “गेल्या तीन दशकांमध्ये लीना यांनी कंपनीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यासाठी मी कृतज्ञ आहे.

  • लीना यांनी युनिलिव्हरमध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप महत्वाची भूमिका बजावली. मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून तिची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली आहे. कंपनीच्या भविष्यातील कामांची तयारी करण्यासाठी आणि लिडरशीप डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्या आमच्या समता, विविधता आणि सर्वसमावेशक अजेंडा समोर नेण्यात आघाडीवर राहिल्या.”

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशिया-चीन खलबते; पुतिन-जिनपिंग यांच्यात आज चर्चा :
  • रशिया आणि चीन या दोन्ही देशांविरोधात अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • या दोन्ही देशांचे पाश्चात्त्य देशांशी असलेले संबंध सध्या तणावपूर्ण बनले आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केल्याने, तसेच चीनमधील मानवी अधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिका आणि नाटो देशांनी रशिया, चीनला इशारे दिले आहेत.

  • रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन आणि जिनपिंग यांच्यात बुधवारी दूरचित्र संवाद होणार. यावेळी युरोपमधील तणावपूर्ण स्थिती आणि अमेरिका तसेच नाटो राष्ट्रांची आक्रमक भूमिका यावर उभय नेते खल करणार आहेत.

  • क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषत: युरोप खंडातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. त्यामुळे मित्रदेशांत (चीन, रशिया) चर्चा होण्याची गरज आहे. सध्या अमेरिका आणि नाटो यांच्याकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे चीन आणि रशिया यांनी त्यावर चर्चा करणे आवश्यक झाले आहे.

‘हाय रिस्क’ देशांमधून येणाऱ्यांसाठी नवा नियम; RT-PCR चाचणीसाठी आता करावी लागणार पूर्वनोंदणी :
  • ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ‘हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्या RT-PCR चाचणीसाठी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांनी त्यांच्या चाचण्यांची आधीच नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रवाशांच्या चाचण्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांची असेल.

  • ब्रिटननेही अशाच प्रकारची नियमावली लागू केली आहे. त्यानुसार देशात येणार्‍या सर्व प्रवाशांनी RT-PCR चाचण्यांसाठी अगोदर बुकिंग करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झालेल्या कोणालाही ब्रिटीश विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी नाही.

  • भारतात, हा नियम २० डिसेंबरपासून लागू होईल. पहिल्या टप्प्यात, तो फक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू होईल.

  • नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना ‘हाय रिस्क’ देशांमधून येत असल्यास किंवा गेल्या १४ दिवसांत ‘हाय रिस्क’ देशांना भेट दिलेली असल्यास प्रवाशांना RT-PCR चाचण्यांसाठी अनिवार्यपणे पूर्वनोंदणी करण्याची परवानगी देण्यासाठी एअर सुविधा पोर्टलमध्ये बदल केले जातील.

राज्यात आणखी आठ ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले; मुंबईत आणि वसई-विरारमध्ये रूग्णांची नोंद :
  • राज्यात एकीकडे करोनाची लाट ओसरल्याचे दिसत असताना आता हळूहळू ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून येताना दिसत आहेत. आज राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या २८ वर पोहचली आहे.

  • राज्यात आज आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आजपर्यंत राज्यभरात आढळून आलेल्या २८ ओमायक्रॉन बाधितांपैकी ९ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.

  • याचबरोबर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६८४ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत, तर ६८६ रूग्ण कोरनामुक्त झाले आहेत. याशिवाय २४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

  • राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६६,४५,१३६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत ६४,९३,६८८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, १,४१,२८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ६ हजार ४८१ आहे.

15 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.