चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ डिसेंबर २०२०

Date : 15 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस :
  • इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये जारी केलेली आणीबाणी घटनाबाह्य़ जाहीर करण्याच्या एको ९४ वर्षीय महिलेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस जारी केली असून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

  • याचिका मान्य करताना न्यायाधीश एस. के. कौल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, आणीबाणी जाहीर केल्याच्या घटनेला आता ४५ वर्षे उलटल्यानंतर तिची वैधता तपासली जाऊ शकते किंवा नाही तसेच आणीबाणी आताच्या काळात घटनाबाह्य़ जाहीर करणे गरजेचे आहे का, याबाबत केंद्राने आपले मत द्यावे. आणीबाणी आता घटनाबाह्य़ जाहीर जाहीर करून कुणाला दिलासा मिळेल यावर आम्ही विचार करीत आहोत.

  • साळवे यांनी सांगितले की, याचिकाकर्त्यां वीरा सरीन यांना आणीबाणीचा फटका बसला होता. त्यांना आणीबाणीच्या काळात कसे वागवण्यात आले याचा न्यायालयाने विचार करावा. इतिहासाची पुनरावृत्ती होता कामा नये. त्या काळात नागरिकांचे घटनादत्त हक्क हिरावून घेण्यात आले व राज्यघटनेचाच विश्वासघात  करण्यात आला.

  • आमच्या पिढीतील लोकांना जे भोगावे लागले त्यावर विचार व्हायला हवा, त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा कारण हा राजकीय चर्चेचा विषय नाही. त्याकाळात तुरुंगांमध्ये काय घडले हे सर्वाना माहिती आहे. आता त्यावर दिलासा देण्यात खूप विलंब होणार आहे पण जे झाले होते ते चुकीचे होते हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. आणीबाणीच्या काळात सत्तेचा गैरवापर करण्यात आला होता त्यामुळे ती अवैध ठरवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राची कुस्ती पोरकी झाली - पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन :
  • महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडली होती, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेरीस उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • खंचनाळे हे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले…१९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. याच वर्षात खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचंही विजेतेपद पटकावलं होतं.

  • १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती. श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार सुरु असताना कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या उपचारासाठी सरकारकडून ५ लाखांची मदत मिळवून दिली होती.

सोनू सूदचा पुन्हा मदतीचा हात; ग्रामीण नवउद्योजकांचं करणार डिजिटल-आर्थिक सक्षमीकरण :
  • लॉकडाउनच्या काळापासून गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेता सोनू सूदचं मदतकार्य अद्यापही सुरुच आहे. आता त्यानं ग्रामीण भागातील नवउद्योजकांचं डिजिटल-आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्याने ‘स्पाईस मनी’ या कंपनीशी करार केला आहे. यातून सुमारे १ कोटी नवउद्योजकांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.

  • करोनाची साथ सुरू झाल्यापासूनच सोनी सूदने देशाच्या कानाकोपऱ्यातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचे ध्येय बाळगले होते. ग्रामीण भारताची डिजिटल प्रगती व्हावी यासाठी सोनू सूदने स्पाईस मनीच्या सहकार्याने गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये नवउद्योजकतेची मानसिकता घडविण्याचे काम करण्याचे ठरवले आहे. यासाठी सोनू ‘स्पाईस मनी’मध्ये इक्विटी गुंतवणूक करून भागीदार होणार आहे, त्यामुळे या कंपनीच्या ‘अकार्यकारी सल्लागार मंडळाच्या सदस्य’पदी त्याची नियुक्ती होणार आहे.

  • ‘स्पाइस मनी’चे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले, “एक कोटीहून अधिक ग्रामीण उद्योजकांना डिजिटल आणि आर्थिक सक्षम बनवण्याची स्पाईस मनीची मोहीम आहे. आपलं घर व कुटुंबीयांना न सोडता उपजीविका करण्यास भारतीयांना आम्ही सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याद्वारे भारताच्या प्रत्येक भागात आत्मनिर्भरता, नवउद्योजकता व आर्थिक समावेशकतेचा प्रसार करणार आहोत.’’

अखेर जीमेल, गुगल आणि युट्यूब सुमारे ५० मिनिटांनी पूर्ववत :
  • गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा आणि युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालं होतं. मात्र आता या तिन्ही सेवा पूर्ववत झाल्या आहेत. गुगल वर्कस्पेस या ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन सगळ्या सेवा पूर्ववत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सुमारे ४५ मिनिटं गुगल, जीमेल आणि युट्यूब या सेवांना एरर येत होता. आता मात्र या सेवा पूर्ववत झाल्या आहेत अशी माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे. तसेच गुगलने युजर्सचे आभारही मानले आहेत.

  • अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत होत्या. तसंच यूट्युबवरही एरर येत होता आणि जीमेलवरही एरर होता. आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येत होता. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु होतं. मात्र जगातल्या अनेक ठिकाणी गुगल, जीमेल आणि युट्यूब या तिन्हीवर अॅक्सेस करण्यास युजर्सना समस्या जाणवत होत्या. हा फटका नेमका कशामुळे बसला आहे? गुगल, युट्यूब आणि जीमेल का डाऊन झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

  • युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला “something went wrong” हा मेसेज येत होता. जगातल्या काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे असंही समजतं होतं. मात्र जीमेल आणि युट्यूब यांना एरर येतो होता. दरम्यान युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले आहेत. युट्यूब, जीमेल आणि गुगल डाऊन झाल्यानंतर जे ट्रेंड सुरु झाले आहेत त्यामध्ये अनेक युजर्सनी मीम्सही तयार करुन ट्विटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वेळापासून जीमेलवर क्लिक केल्यास किंवा रिफ्रेश केल्यास Temporary Error (500) असा संदेश येत होता.

महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९३.५४ टक्के :
  • महाराष्ट्रात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात २ हजार ९४९ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

  • सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ इतकी झाली आहे.

  • आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वी पेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे २५ मृत्यू नाशिक-११, अमरावती-६, पुणे-३, परभणी-२, नांदेड-२, नागपूर-१ असे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

१५ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.