चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ ऑगस्ट २०२०

Date : 15 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • “करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. करोना व्हायरसवरील लस प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते ७४ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत होते.

  • “करोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन आणि वितरणाचा आराखडा ठरला आहे. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • “भारतात करोना व्हायरसच्या लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. उत्पादन, वितरणाचा सर्व आराखडा ठरला आहे. प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा :
  • एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. पुणे महसूली विभागाच्या बाहेरच्या ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांना केंद्र बदलण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

  • काही दिवसांपूर्वी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही परीक्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ही परीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, आता एमपीएसचीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.

  • केंद्र बदलणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्र निवडता येईल. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सुरक्षिततेचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केंद्र बदलण्याची परवानगी देण्याची मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधी करण्यात येत होती.

‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा :
  • भारताचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळयांना रोखलं आहे. करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

  • भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो.

  • देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.

आता परीक्षा कशी घेता येईल :
  • एप्रिलमध्ये हजार करोना रुग्ण असताना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत, आता तर लाखो रुग्ण आहेत, मग परीक्षा कशी घेता येईल, तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचा जीव पहिल्या वा दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी महत्त्वाचा असतो का, असा युक्तिवाद युवासेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

  • युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी ठाकरे यांनी याचिकेद्वारे केली आहे. विधि शाखेचा विद्यार्थी यश दुबे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकांवर न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठासमोर सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना ३० सप्टेंबपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला असून त्या संदर्भात सूचनाही जाहीर केल्या आहेत. मात्र, या सूचनांचे स्वरूप ‘सल्ला’ असे असून स्थानिक गरजांनुसार त्यात बदल करता येऊ शकतो. करोनाचे रुग्ण पटीने वाढत असून अनेक महाविद्यालयांचे विलगीकरण केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे, अशा स्थितीत तिथे परीक्षा कशी घेता येऊ शकेल, असा मुद्दा दिवाण यांनी उपस्थित केला. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातही शैक्षणिक संस्था सुरू करण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली नाही. 

गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याचे आवाहन :
  • देश आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. या वेळी भाषणाच्या सुरुवातीला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सर्वप्रथम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

  • पंतप्रधान मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • गृहमंत्री अमित शाह यांनी “आपण सर्वजण मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा संकल्प करू आणि भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा अधिक वापर करून, देशाला नव्या उंचीवर पोहचवण्यात आपले सर्वोच्च योगदान देऊ, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ” अशा शब्दात ट्वटिद्वारे देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार :
  • पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान देण्यात आला आहे. शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी गिलानी यांनी ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार देण्यात आला. गिलानी हे फुटीरतावादी नेते असून त्यानी अनेकदा काश्मीरमध्ये भारतविरोधी वक्तव्यही केली होती. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं आपला नवा नकाशा जारी केला होता. त्यात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचंही दाखवण्यात आलं होतं.

  • स्वातंत्रदिनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्यात आला. माजी हुर्रियत नेते गिलानी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ रिझवी यांनी हा पुरस्कार दिला. दरम्यान, या कार्यक्रमाला गिलानी हे उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी काही हुर्रियतच्या नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी गिलानी यांना सन्मानित करण्यात येईल, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं होतं.

  • पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाद्वारे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. गिलानी यांनी काही दिवसांपूर्वीच हुर्रियतमधून आपला राजीनामा दिला होता. काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसेचा आरोप असलेल्या आरोपींमध्ये त्यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिसाचारानंतर टेरर फंडिंगचादेखील आरोप करण्यात आला होता. तर बऱ्याच कालावधीसाठी गिलानी यांना त्यांच्या घरात नजरकैदेतही ठेवण्यात आलं होतं.

१५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.