चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ एप्रिल २०२०

Date : 15 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विशेष रेल्वे सोडण्याचा कोणताही विचार नाही; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण : 
  • लॉकडाउनच्या काळात विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याचा विचार रेल्वे विभागाकडून सुरु असल्याच्या माध्यमांतील वृत्ताचे रेल्वे मंत्रालयाने खंडन केले आहे. लॉकडाउन संपेर्यंत अर्थात ३ मे पर्यंत असे कुठलेही नियोजन नसल्याचेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • मंत्रालायने म्हटले की, “देशभरात सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे सेवा ३ मे पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान विविध शहरांमधील स्थलांतरितांच्या झालेल्या गर्दीला त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचारही नाही.” रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने माध्यमांना आवाहन केले की, “या स्पष्टीकरणाची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच या संदर्भात कोणतीही चुकीची बातमी येणार नाही याची काळजी घेऊन आमची मदत करावी.”

  • दरम्यान, नुकतेच आयआरसीटीसीनं म्हटलं होतं की, “३ मे पर्यंत रद्द झालेल्या ज्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग झाले आहे त्याचे पैसे प्रवाशांना पूर्णपणे परत करण्यात येतील. यासाठी प्रवासांना त्यांचे बुकिंगचे तिकीट रद्द करण्याची गरज नाही. तसेच ज्या प्रवाशांनी त्याचं तिकीट रद्द केलं आहे, त्यांनाही पूर्ण रिफंड देण्यात येईल.”

WHO संदर्भात अमेरिकेने घेतला मोठा निर्णय : 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेत दिले होते. चीनमधून निर्माण झालेल्या या आजाराचे गांभीर्य जागतिक आरोग्य संघटनेने लपवले असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

  • “प्रशासनाला मी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश देत आहे. करोनाच्या प्रसाराची माहिती लपवणे व गैरव्यवस्थापन यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, त्याची समीक्षा सुरु आहे” असे डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले. जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने पारदर्शकपणे माहिती समोर ठेवली नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

  • संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो. अमेरिकेने मागच्यावर्षी WHO ला ४० कोटी अमेरिकन डॉलरचा निधी दिला होता. WHO ला दिल्या जाणाऱ्या निधीचे काय करायचे? त्याबद्दल चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असे ट्रम्प म्हणाले.

  • ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा करोना व्हायरसचा जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप केला होता. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावेल असून काल २४ तासात अमेरिकेत करोनामुळे २२२८ नागरिकांचा मृत्यू झाला.

देशभर टाळेबंदीत ३ मेपर्यंत वाढ : 
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या टाळेबंदीचा कालावधी ३ मेपर्यंत म्हणजे आणखी १९ दिवसांसाठी वाढवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे केली.

  • सहा दिवसांनंतर, २० एप्रिल रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर काही क्षेत्रांमधील आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात केंद्र सरकारकडून बुधवारी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठकही होणार आहे.

  • तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीची मुदत मंगळवारी (१४ एप्रिल रोजी) संपल्यामुळे वाढीव टाळेबंदीचा निर्णय मोदींनी जाहीर केला. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत बहुतांश मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी किमान दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. तसेच आर्थिक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतही चर्चा केली गेली होती. त्यानुसार पुढील आठवडय़ापासून काही प्रमाणात हे व्यवहार पुनस्र्थापित केले जाऊ शकतात, याचे सूतोवाच मोदींनी भाषणात केले. 

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, करोनाविरोधात  देशवासीयांनी एकजुटीने केलेली लढाई हेच डॉ. आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल.

देशात आज ८.२ लाख करोना पॉझिटिव्ह रुग्ण असते : 
  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन घेण्यात आला होता. या लॉकडाउनचा पहिला टप्पा काल संपला. या २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १०,३०० पर्यंत पोहोचली व ३४० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लॉकडाउन आणखी १९ दिवसांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली. लॉकडाउनचा दुसरा टप्पा तीन मे रोजी संपणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • पहिल्या लॉकडाउननंतर करोना व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसल्यामुळे दुसरा लॉकडाउन घ्यावा लागला. काल एकाच दिवसात देशभरात १४०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली व ३१ जणांचा मृत्यू झाला. २४ मार्चला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवडयांसाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी भारतात करोना व्हायरसचे ५२० रुग्ण होते व ११ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.

  • आठवडयाभरानंतर ३१ मार्चला करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १३९७ होता व मृतांची संख्या वाढून ३५ पर्यंत पोहोचली. आठवडयाभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७८ आणि मृतांची संख्या २४ ने वाढली. लॉकडाउनचे दोन आठवडे संपले. त्यावेळी सात एप्रिलला देशात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७८९ व मृतांचा आकडा वाढून १२४ पर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या आठवडयात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३९२ ने वाढली.

१५ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.