चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ मे २०२१

Date : 14 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘यूपीएससी’तर्फे होणारी सनदी सेवा पूर्वपरीक्षा लांबणीवर :
  • देशातील करोनाबाबतची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन, येत्या जून महिन्यात होऊ घातलेली सनदी सेवा पूर्वपरीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) गुरुवारी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.

  • केंद्रीय लोकसेवा आयोग सनदी सेवा परीक्षा दरवर्षी पूर्वपरीक्षा, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेते. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांसह इतर सेवांमधील अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

  • ‘कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय लोकसेवा आयोगाने २७ जून रोजी होऊ घातलेली सनदी सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२१ पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होईल’, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी संवाद :
  • देशात करोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या १०० जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ व २० मे रोजी दोन बैठकांच्या माध्यमातून संवाद साधतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली.

  • ९ राज्यांच्या ४६ जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकारी पहिल्या बैठकीत सहभागी होतील, तर १० राज्यांच्या ५४ जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा दुसऱ्या बैठकीत सहभाग असेल. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री या संवादसत्रात भाग घेतील, असेही त्यांनी सांगितले.

  • करोनाच्या परिस्थितीबाबत जिल्हा स्तरावरील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत होणारा पंतप्रधानांचा अशा प्रकारचा हा पहिलाच संवाद असेल. त्यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत अनेकदा आभासी बैठका घेतल्या आहेत.

करोना लसीकरणासाठी नोंदणी करताय? मग या Fake App पासून सावध राहा :
  • देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र देशात करोना लसींच्या तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यात लसीकरण नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लशींचा तुटवडा आणि अ‍ॅप वापरताना येणाऱ्या अडचणी यामुळे डोकेदुखी वाढली असताना आता बनावट अ‍ॅपचा सुळसुळाट दिसून येत आहे. त्यामुळे इंडियन कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं (सीईआरटी) बनावट अ‍ॅपबद्दल नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • करोना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा फायदा काही भामटे घेताना दिसत आहेत. यासाठी एसएमएसद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. लिंक पाठवून या अ‍ॅपद्वारे लसीकरणाची नोंदणी करा असं आवाहन केलं जात आहे. या बाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर इंडियन कम्प्यूटर इमर्जन्सी टीमनं शहनिशा केली आहे. त्यानंतर बनावट अ‍ॅपबद्दल खुलासा झाला आहे.

  • या बनावट अ‍ॅपद्वारे मोबाईल वापरकर्त्यांचा डेटा चोरी केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बनावट अ‍ॅपची लिंक डाऊनलोड करू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. सीईआरटीनं पाच बनावट अ‍ॅपची माहिती दिली आहे. यात Covid-19.apk, Vaci_Regis.apk, MyVaccin_V2.apk, Cov-Regis.apk आणि Vccin-Apply.apk या अ‍ॅपचा समावेश आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात रुग्णवाढ :
  • जिल्ह्य़ात ग्रामीण भागांत करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचे शिखर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात असल्याचे दिसून आले आहे. २६ एप्रिल ते २ मे या आठवडय़ादरम्यान जिल्ह्यात दहा हजार २८९ रुग्ण वाढ झाली असल्याचे तसेच बाधितांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते.

  • मार्चच्या मध्यापासून झपाटय़ाने झालेली रुग्णवाढीने एप्रिल महिन्यात उग्र रूप धारण केले होते. १५ एप्रिलनंतरच्या पंधरवडय़ात सर्वाधिक रुग्ण वाढ झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात ग्रामीण भागात ४९६१ तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ५३२८ रुग्ण वाढल्याचे दिसून आले.

  • जिल्ह्यातील ग्रामीण भागात मार्च अखेरीस बाधितांचे प्रमाण   सर्वाधिक २६.३ टक्के नोंदविण्यात आले होते. मात्र नंतर प्रतिजन चाचणीचे प्रमाण वाढविल्याने बाधितांचे प्रमाण २० टक्कय़ांच्या जवळपास स्थिरावले. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २६ एप्रिल ते २ मे या आठवडय़ात बाधितांचे प्रमाण सर्वाधिक ५५.८३ टक्के इतके नोंदविण्यात आले. मेच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.

अ‍ॅटलेटिको माद्रिद जेतेपदासमीप :
  • अ‍ॅटलेटिको माद्रिदने बुधवारी मध्यरात्री रेयाल सोसिएदादचा २-१ असा पराभव करत ला-लीगाच्या जेतेपदापर्यंत मजल मारली आहे. २०१४नंतर पहिल्यांदा ला-लीगाचे जेतेपद पटकावण्याची संधी अ‍ॅटलेटिको माद्रिदला आहे.

  • लेव्हांटे आणि बार्सिलोना यांच्यातील बरोबरीचा फायदा उठवत अ‍ॅटलेटिको माद्रिदने हा सामना जिंकून ३६ सामन्यांत ८० गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे.

  • बार्सिलोना तितक्याच सामन्यांत ७६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रेयाल माद्रिदही  ३५ सामन्यांत ७५ गुणांनिशी तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे आता पुढील दोन सामन्यांत जेतेपदासाठीची चुरस अधिक तीव्र होणार आहे.

१४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.