चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जून २०२१

Date : 14 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’ :
  • भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून तेथे कायद्याचे राज्य आहे, असे असले तरी भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत असल्याचे अमेरिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींना सांगितले आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध हे त्यापैकी एक चिंतेचे कारण आहे.

  • दक्षिण आणि मध्य आशियाचे प्रभारी साहाय्यक परराष्ट्रमंत्री डीन थॉम्पसन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीबाबतच्या काँग्रेस उपसमितीमध्ये वरील वक्तव्य केले आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, तेथे कायद्याचे राज्य आहे, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे आणि भारताचे अमरिकेशी चांगले संबंध आहेत, असे थॉम्पसन म्हणाले.

  • तथापि, भारत सरकारने घेतलेले काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील निर्बंध, त्याचप्रमाणे मानवी हक्क कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना ताब्यात घेण्याच्या प्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. देशातील नागरी स्वातंत्र्य कमी होत चालले असल्याची टीका परदेशी सरकार आणि मानवी हक्क गटांनी केली असली तरी भारताने यापूर्वी त्याचे खंडन केले आहे.

  • पाकिस्तान आणि बांगलादेशात पत्रकारांवरील निर्बंधाबाबत अमेरिकेला चिंता आहे तोच प्रकार आता भारतात घडत आहे, असे थॉम्पसन यांनी लोकप्रतिनिधींच्या प्रशद्ब्राला उत्तर देताना म्हटले आहे.

मानवाधिकार चळवळीला बळ देणाऱ्या युवतींचा ‘पुलित्झर’कडून गौरव :
  • चीनमध्ये उगुर मुस्लिमांच्या छळ छावण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या भारतीय वंशाच्या बझफीड न्यूजच्या पत्रकार मेघा राजगोपालन यांना यंदाचा अभिनव शोधपत्रकारितेचा ‘पुलित्झर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

  • राजगोपालन या बझफीड न्यूजच्या पत्रकार असून भारतीय वंशाच्या ज्या दोन पत्रकारांना हा पुरस्कार मिळाला त्यात त्यांचा समावेश आहे. टंपा बे टाइम्सचे नील बेदी हे स्थानिक वार्तांकन करतात, कॅथलनी मॅकगोरी यांच्यासमवेत संभाव्य गुन्हेगार शोधून काढणाऱ्या नगरपालांच्या एका योजनेचा पर्दाफाश त्यांनी केला होता.

  • श्रीमती राजगोपालन यांनी चीनच्या शिनजियान प्रांतातील  एका छळ छावणीला भेट दिली होती. राजगोपालन यांनी सांगितले, की धोका असतानाही जे लोक आपल्याशी तेथील छळछावण्यांमधील परिस्थितीबाबत बोलले त्यांचेही त्यांनी आभार मानले.

  • काही महिने या तिघांनी चीनच्या निर्बंध नसलेल्या सॉफ्टवेअरमधून चीनच्या प्रतिमा मिळवल्या. एकूण ५० हजार ठिकाणांच्या प्रतिमा त्यात आहेत. अनेक ठिकाणी दहा हजारांच्या आसपास अनेक लोकांना छोट्या जागेत कोंबण्यात आले होते, तर काहींना सक्तीने काम करायला लावले जात होते. यात वार्तांकनाच्या तंत्रज्ञानात्मक बाबींचे महत्त्व सामोरे आले आहे.

  • चीनमध्ये येण्यास बंदी केल्यानंतर राजगोपालन यांनी  शेजारी असलेल्या कझाकस्थानमध्ये प्रवास केला होता. त्यांनी शिनजियांग येथील छळछावण्यात असलेल्या किमान २४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

‘जी ७’द्वारे चीनला शह :
  • चीनच्या कोट्यवधी डॉलर्सच्या बेल्ट अँड रोड या प्रकल्पाला शह देण्यासाठी जी-७ देशांच्या बैठकीत जागतिक पायाभूत योजना जाहीर केली जाणार असल्याचे सूतोवाच अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने केले आहे.

  • जी ७ देश चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना लोकशाहीवादी देशांकडून एकजुटीने प्रतिसाद देण्याच्या विचारात असून चीनची आर्थिक व लष्करी ताकद गेली चाळीस वर्षे वाढत गेली असून त्याला कुणी आव्हान दिलेले नाही.

  • अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिका जी ७ देशांना एकत्र घेऊन चीनमधील कामगार पिळवणुकीवर भूमिका घेण्यास भाग पाडेल. तीन दिवसांची ही जी ७ परिषद नैर्ऋत्य इंग्लंडमध्ये होत असून या बैठकीअंती प्रसारित केलेल्या जाहीरनाम्यात चीनवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. आमची मूल्ये, निकष व उद्योग पद्धती यांचा एक संघटित सकारात्मक पर्याय उभा केला नव्हता तो आता उभा केला जाईल असे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या २०१३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला शह देण्याचा उद्देश अमेरिका बाळगून आहे. किमान १०० देशांनी बीआरआय प्रकल्पात चीनशी रेल्वे, बंदरे, महामार्ग बांधणीबाबत करार केले होते.

पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती :
  • करोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते नागपूर येथे युवा सेनेच्या कार्यक्रमाला आले होते.

  • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही.

  • शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

१४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.