चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२२

Updated On : Jan 14, 2022 | Category : Current Affairs


इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - मालविकाचा सायनावर सनसनाटी विजय :
 • नागपूरची उदयोन्मुख बॅडिमटनपटू मालविका बनसोडने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत गुरुवारी तिची प्रेरणास्थान असलेल्या सायना नेहवालवर सनसनाटी विजय मिळवला. मालविकासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

 • २० वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने १७-२१, ९-२१ अशी हार पत्करली. जागतिक क्रमवारीत १११व्या क्रमांकावरील मालविकाने फक्त ३४ मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. आकर्षी कश्यपने केयुरा मोपाटिनला २१-१०, २१-१० असे हरवले.

 • सिंधूने इरा शर्मावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची अश्मिता छलिहाशी गाठ पडणार आहे. अश्मिताने फ्रान्सच्या याईली होयॉक्सचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला.

 • पुरुष एकेरीत मिथुन मंजुनाथने माघार घेतल्याने प्रणॉयला पुढे चाल मिळाली. लक्ष्य सेनने स्वीडनच्या फेलिक्स ब्यूरेस्टेडचा २१-१२, १२-१५ असा पराभव केला. कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्धची लढत समीर वर्माने दुखापतीमुळे अर्धवट सोडली.

 • पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने श्याम प्रसाद व एस. संजित जोडीला २१-९, २१-१८ असे पराभूत केले.

देशभरात २४ तासात अडीच लाखांहून जास्त नवीन करोनाबाधितांची नोंद :
 • देशभराती करोना संसर्गाची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रूग्णही आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही दररोज भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करोना संसर्गाचा अधिक प्रमाणात प्रसार झालेल्या राज्यांना विशेष सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.

 • मागील २४ तासांमध्ये देशभरात अडीच लाखांहून जास्त म्हणजे २ लाख ६४ हजार २०२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कालच्या रूग्ण संख्येच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. याशिवाय ५ हजार ७५३ ओमायक्रॉनबाधितही आढळलेले आहेत.

 • तसेच, मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख ९ हजार ३४५ रूग्ण करोनामुक्त देखील झाल्याचे समोर आले आहे. सध्या देशात १२ लाख ७२ हजार ७३ अॅक्टीव्ह केसेस असून, पॉझिटिव्हिटी रेट १४.७८ टक्के आहे.

भारत-चीनदरम्यान आता पुन्हा चर्चा :
 • भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यानच्या चर्चेची चौदावी फेरी निर्णायक ठरली नाही, मात्र उर्वरित मुद्दय़ांबाबत ‘परस्परमान्य तोडगा काढण्यासाठी’ लष्करी व राजनैतिक माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.सीमाविषयक चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर व्हावी याबद्दल आपले मतैक्य झाले असल्याचे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.

 • पूर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉइंट १५ (हॉट स्प्रिंग्ज) येथून सैन्य माघारी घेण्याशी संबंधित मुद्दय़ांचे चर्चेच्या १५व्या फेरीत निराकरण करण्याबाबत भारत आशावादी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी म्हटले होते.

 • पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरावर पूल बांधल्याबद्दल भारताने चीनवर टीका केल्यानंतर चर्चेची ही ताजी फेरी पार पडली आहे. याच वेळी, हा भाग सुमारे ६० वर्षे चीनच्या अवैध कब्ज्यात असल्याचेही भारताने म्हटले होते.

 • भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरीय चर्चेची चौदावी फेरी बुधवारी पूर्व लडाखमधील चुशुल- मोल्दो सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या चीनकडील बाजूला पार पडली. दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचे प्रतिनधी या चर्चेदरम्यान उपस्थित होते, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

 • पश्चिम भागातील (लडाख सीमा) प्रत्यक्ष ताबा रेषेवरील संबंधित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी मतांचे ‘मनमोकळेपणाने व सखोल’ आदानप्रदान केले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आपापल्या देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचे, तसेच उर्वरित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

“ओमायक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना :
 • देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

 • पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे म्हटले आहे.

 • पंतप्रधानांसोबतच्या आभासी बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.

दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता :
 • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. सन २०२० मध्ये देशात करोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आलीय. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय.

 • विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणाऱ्या ‘बेटफेअर’ने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक (Indian Origin Rishi Sunak as Next British PM Boris Johnson to Resign) यांची वर्णी पंतप्रधानपदी लागू शकते.

 • ‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत.

 • ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जातोय, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.

१४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)